Home Blog Page 179

महाराष्ट्र राज्यात १ एप्रिलपासून सीएनजी स्वस्त.. सीएनजी वाहन चालकांसाठी मोठी खुशखबर !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेतील अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्याप्रमाणे संकुचित नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजी (CNG) इंधनावरील मुल्यवर्धित कराचा (VAT) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना काल (शुक्रवारी) केली. याबाबत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अधिसुचना जाहीर केली गेली. यामुळे महाराष्ट्रात १ एप्रिलपासून सीएनजी स्वस्त होणार असल्याने सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या चालकांसाठी ही एक खूशखबर आहे.

अधिसूचनेप्रमाणे इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (VAT) १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के करण्यात आला आहे. १ एप्रिलपासून सीएनजीचे सुधारित दर लागू होणार आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील वित्त विभागाने काल जारी केलेल्या अधिसूचनेप्रमाणे १ एप्रिलपासून महाराष्ट्रात सीएनजी इंधन स्वस्त होणार आहे. त्यामुळे सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. सीएनजीचे दर कमी झाल्याने आता अशा वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वायू प्रदूषणाला देखील अटकाव बसू शकतो. प्रदूषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्वाचा आहे.

 

मिरा भाईंदर महानगरपालिकेने साजरा केला जागतिक जल दिन!

पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांचा आयुक्त यांच्या हस्ते सन्मान!

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन पाणी पुरवठा विभाग मिरा भाईंदर महानगरपालिका तर्फे नगरभवन येथे जागतिक जल दिवस साजरा करण्यात आला.

महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत जल दिवस सन्मान समारोह सपन्न् झाला. सदर प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे व कार्यकारी अभियंता किरण राठोड उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास आयुक्त दिलीप ढोले यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना जागतिक जल दिवसाचे महत्त्व सांगताना महानगरपालिकेच्या पाणी व मलनि:सारण केंद्रा संबंधित विविध उपक्रमांची माहिती दिली.

मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना जागतिक जल दिवसाच्या शुभेच्छा देऊन जल संवर्धनाचे मुख्य उद्देश अधोरेखित केले. शहरातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळावे, पाण्याच्या स्तोत्राचे संरक्षण करणे, जनप्रबोधन करून नागरिकांमध्ये जल साक्षरतेचे महत्त्व पटवून देणे, विहीर पुनर्भरण तंत्र, पाण्याचा अपव्यय टाळणे इत्यादी गोष्टी लक्षात ठेवून शहरातील नागरिकांना जल संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी देखिल पाण्याचे महत्त्व पटवुन देताना सर्व कर्मचाऱ्यांचे वर्षभरात त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.

कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सर्व कर्मचारी कनिष्ठ अभियंता यांचे आभार व्यक्त करत पाणी पुरवठा विभागात सुरु असलेले विविध उपक्रम लोकांच्या गरजा आणि आवश्यकतेनुसार उपाययोजना व भविष्यातील कार्यक्रम या संबंधि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमामध्ये पाणी पुरवठा विभागात कार्यरत मेस्त्री, प्लंबर, वॉलमन आणि मीटर वाचक यांचा सन्मान करून वर्षभरात त्यांनी केलेले काम आणि सहकार्य यांचा एकत्रित मिलाप करुन आज त्यांना महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यां तर्फे मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे ह्यांचा सत्कार!

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी

मुंबई, प्रतिनिधी: एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी मेहुल खळे ह्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे ह्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचा छोटेखानी सत्कार केला.

एस.एन.डी.टी महिला विद्यापीठातील विविध शैक्षणिक उपक्रमां संदर्भात चर्चा केली. महिलांचे शिक्षण व समकालीन प्रश्न ह्या विषयावर लवकरच मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे एक परिसंवाद आयोजित करण्यात यावे अशी विनंती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे ह्यांच्याकडे मेहुल खळे यांनी केली.

ह्या बैठकीस विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव बाळू राठोड देखिल उपस्थित होते.

बनावट करारनामा करून ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडप करणाऱ्या सहा जणां विरुद्ध काशिमीरा पोलिसांनी केला गुन्हा दाखल!

संपादक: मोईन सय्यद/मिराभाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर: मुंबईत राहणाऱ्या एका ७४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा गाळा हडपण्यासाठी बळजबरी कब्जा करुन मृत व्यक्ती सोबतचा बनावट नोटरी करारनामा दाखवून पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने स्वतःच्या नावे कर आकारणी करून घेत ज्येष्ठ नागरिकालाच विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी ५ महिलांसह ६ जणां विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

राजेश कुमार सेठ (७४) रा. अंधेरी, लोखंडवाला यांच्या फिर्यादी नुसार, काशिमीरा महामार्ग लगत महाजनवाडी येथे त्यांची ११ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी बॉसी बारच्या पुर्व दिशेला सर्विस रोड लगत त्यांचे २ गाळे असून कोरोना संसर्ग काळा पासून ते गाळे बंदच आहेत. गाळ्याची घरपट्टी, लाईटबील सेठ यांच्या नावे असुन, सदर गाळ्यास लोखंडी शटर व जाळी मारलेली आहे.

२३ डिसेम्बर २०२१ रोजी ते दोन्ही गाळ्यांची पाहणी करण्यास ते गेले असता एका बाजुने कोणीतरी गाळ्यांची भींत तोडुन त्यास दरवाजा बसवुन, गाळ्याचा कब्जा करून वापर करीत असल्याचे दिसले. त्यावेळी निलेश जतान्ना उर्फ अन्नु याने ही जागा आमची आहे, इकडे परत आलास अशी धमकी देवुन शिवीगाळी केली. दोन दिवसांनी सेठ यांनी गाळ्यात बांधलेला दरवाजा बांधकाम करुन बंद करून टाकला.

तेव्हापासुन निलेश याने त्याची आई शोभा जतान्ना व इतर ३ महीलांना गाळ्याच्या समोर बसवून ठेवले होते. २८ जानेवारी रोजी सेठ हे गाळ्याच्या ठिकाणी गेले असता निलेश, शोभा, पुनम जतान्ना व इतर ३ अनोळखी महिलांनी सेठ याना शिवीगाळ, दमदाटी करून तू परत आलास तर ब्लाउज फाडून तुझ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करू असे धमकावले. त्यामुळे गाळा मालक सेठ घाबरून परत त्या ठिकाणी गेले नाहीत.

ही घटना घडल्या नंतर त्यांनी मिरा भाईंदर महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये चौकशी केली असता, त्यांचे काका नरेश सेठ २००७ साली मृत झालेले असताना निलेशने नरेश यांचे सोबत २००८ साली नोटरी केलेला खरेदी करारनामा मालमत्ता कर आकारणी स्वतःच्या नावे करण्यासाठी सादर केल्याचे आढळून आले व त्या आधारावर निलेश ने गाळ्याला मालमत्ता कर स्वतः च्या नावाने लावून घेतला. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी १६ मार्च रोजी निलेश, शोभा, पूनम व अन्य ३ महिलांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. तर संगनमत करून कर आकारणी करणाऱ्या मिरा भाईंदर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ह्या प्रकरणात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी नगरसेवक देखिल सामील असल्याचे बोलले जात आहे. आणि त्यामुळेच गाळा हडप करण्याचा या प्रकरणात अशा प्रकारे प्रभावशाली लोकांचा सहभाग आणि पाठिंबा असल्यामुळे या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे केला जाईल का? आणि पीडित ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नगरविकास मंत्री  एकनाथ शिंदे यांचे आमदार रविंद्र वायकर यांच्या तारांकीत प्रश्‍नाला सकारात्मक उत्तर; पश्‍चिम द्रुतगती महामार्ग (जेव्हीएलआर जंक्शन), ऑबेरॉय मॉल व आरे जंक्शन येथील उड्डाणपुलाखालील मोकळी जागा होणार सुशोभित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत


  मुंबईसह जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील विविध ठिकाणांवर उभारण्यात आलेल्या व येणार्‍या उड्डाणपुलाखालील वाढती अतिक्रमणे दूर करुन त्या जागा सुशोभित करण्यात येणार असून पश्‍चिम द्रूतगती महामार्ग (जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शन), ऑबेरॉय मॉल व आरे जंक्शन येथील उड्डाणुपलाखालील मोकळी जागा सुशोभिकरणाकरीता ऑबेरॉय रियल्टी यांना देण्यात आल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी तारांकीत प्रश्‍नांद्वारे विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देेताना दिली.

वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी मुंबईच्या विविध भागांमध्ये उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर एमएमआरडीएच्या माध्यमातूनही अनेक ठिकाणी मेट्रोची कामेही सुरू आहे. जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातही जेव्हीएलआर व पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर उड्डाणपुल उभारण्यात आले आहेत. यात पश्‍चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्‍वरी वाहतूक चौकी, सिप्झ गेट नंबर ३ समोर, जेव्हीएलआर, आरे जंक्शन, पश्‍चिम द्रुतगती महामार्ग येथील ऑबेरॉय मॉल, येथील उड्डाणपुलाखालील जागांमध्ये मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याचे वायकर यांनी तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून सभागृहाच्या निदर्शनास आणले. या उड्डाणपुलाखाली बेकायदेशीरीत्या अनेक नादुरुस्त वाहने अनधिकृतरित्या उभी असतात. याच उड्डाणपुलाखाली अनधिकृत बांधाकम करुन वास्तव्यास असलेले लोक त्यांचे प्रात:विधी याच परिसरात करीत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून जनतेच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.

त्यामुळे ज्या ज्या उड्डाणपुलाखाली अनधिकृत बांधकामे तातडीने निष्कासित करुन तसेच या जागेवर अनधिकृतरित्या उभी करण्यात आलेली जुनी व नादुरुस्त वाहने हटवून या उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभिकरण करुन आकर्षक रचनेची उद्याने बांधून ती जनतेसाठी खुली करावीत, अशी मागणी आमदार वायकर यांनी तारांकीत प्रश्‍नाच्या माध्यमातून सभागृहात केली. या प्रश्‍नाला उत्तर देताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी,‘सिप्झ गेट नंबर ३’ येथील काही मोकळ्या जागेत काहीवेळा बेघर लोक वास्तव्य करीत असल्याचे मान्य केले. जेव्हीएलआर, आरे व ऑबेरॉय मॉल जवळील उड्डाणपुलाखाली मेट्रोलाईन-६ व व मेट्रो लाईन-७ चे कार्यालय असून ही दोन्ही कामे पूर्ण झाल्यावर हे कार्यालय तेथेच राहणार असून पश्‍चिम द्रुतगती महामार्ग (जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शन), ऑबेरॉय मॉल व आरे जंक्शन येथील उड्डाणपुलाखालील मोकळी जागा सुशोभिकरणाकरीता मे.ऑबेरॉय रियल्टी यांना वाटप करण्यात आल्याची माहिती, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रविंद्र वायकर यांच्या तारांकीत प्रश्‍नाला उत्तर देताना दिली.