Home Blog Page 182

उच्च न्यायालयाचा एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून त्यांचे आंदोलन गेल्या तीन महिन्यांपासून सुरु आहे. या आंदोलनाला तीन महिने झाले तरीही या मागणीवर कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. सध्या या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. उच्च न्यायालयाने विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

उच्च न्यायालयाने विलीनीकरणाच्या प्रश्नावरून उच्च सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली होती. या त्रिसदस्यीय समितीने विलीनीकरणाची मागणी व्यावहारिक नसल्याचा निष्कर्ष काढून एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. एसटी महामंडळाचा राज्यसरकार सेवेत विलीनीकरण करता येणार नाही असा अहवाल या उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने दिला आहे. ही मागणी नाकारल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाचा कायदेशीर मार्ग बंद झाला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाचे शून्य रुग्ण आढळून आल्याने शिवसेनेकडून आयुक्तांचे अभिनंदन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. कोरोना रुग्णांची संख्या शून्य आढळून आल्याने शिवसेनेकडून आयुक्तांचे अभिनंदन करण्यात आले आहे. त्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे.
शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, उप जिल्हा प्रमुख राजेश कदम, विधानसभा संघटक तात्या माने, अमोल पाटील, संजय मोरे यांनी आज आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची त्यांच्या कार्यालयीन दालनात जाऊन भेट घेतली. रुग्ण संख्या शून्य आढळून आल्याने आयुक्तांचे कौतूक केले. त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा आयुक्तांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

कोरोना संकट काळात चांगली कामगिरी केल्याबद्दल केंद्राकडून महापालिकेस ‘इन्व्होशन अॅवार्ड’ देऊन गौरविण्यात आले होते. ही किमया देखील आयुक्तांच्या नेतृत्वाखाली कोरोना रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचेच फलीत होते. त्यानंतर आज पुन्हा रुग्ण संख्या शून्य आढळून आल्याने त्यांच्या पाठीवर शिवसेनेकडून कौतूकाची थाप देण्यात आली आहे. ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कोरोना काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडे दिलेले विशेष लक्ष यामुळे आजचा दिवस बघायला मिळतो आहे, कोरोना मुक्तीचे हे दिवस असेच टिकून राहो व नागरिकांचे जीवन भयमुक्त असे पूर्ववत होवो अशी सदिच्छा यावेळेला शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी व्यक्त केली.

रशिया – युक्रेन युद्धजन्य परिस्थितीत जोखमीच्या कामात मोलाचा वाटा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

एअर इंडियामध्ये डेप्युटी चीफ एअर क्राफ्ट इंजिनिअर या पदावर कार्यरत असलेले अजित जनार्दन पाटील यांचा युद्धजन्य युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात मोलाचा वाटा आहे. विद्यार्थ्यांच्या सुखरूप सुटकेसाठी गेल्या आठवड्यापासून तीन वेळा ते एअर इंडियाच्या विमानातून बुडापेस्ट, रूमानिया इथे जाऊन आले. आतापर्यंत सुमारे ९०० ते १००० भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या कामात ते सहभागी होते.

भारत सरकारमधील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती जेव्हा परदेश प्रवासाला जातात तेव्हा त्या विमानाच्या देखभालीची जबाबदारी प्रामुख्याने या विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर असते. अजित पाटील यांच्यावर आतापर्यंत अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामध्ये भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान अशा पदावरील व्यक्तींचा समावेश आहे.

डेप्युटी चीफ एअर क्राफ्ट इंजिनिअर अजित जनार्दन पाटील

रशिया – युक्रेन यांच्यादरम्यान भडकलेल्या युद्धात हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेन इथे अडकून पडले आहेत. या अतिशय जोखमीच्या ऑपरेशनसाठी विद्यार्थ्यांना आणणा-या विमानाबरोबर जाण्याची तयारी अजित पाटील यांनी दर्शवली.

मूळचे जळगावचे असलेले अजित पाटील त्यांच्या बालपणापासून डोंबिवलीकर असून, येथील धनाजी नाना चौधरी (डीएनसी) बहुद्देशीय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. आपल्या मित्रांशी यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, की “हे कोणा एकट्याचे काम नाही. मी या ऑपरेशन टीमचा एक भाग आहे. टीम म्हणून आम्ही आमची जबाबदारी उत्तम रितीने पार पाडत आहोत, त्यातून आपल्या देशाची प्रतिमा जगभरात उंचावण्यात हातभार लागत आहे याचा आनंद आणि अभिमान आहे. माझ्या कामाने मला देशासाठी योगदान देण्याची संधी मिळाली म्हणून मी एअर इंडियाप्रती अतिशय कृतज्ञ आहे. युक्रेनहून आलेल्या या मुलांमध्ये मला माझ्या तरूण मुलांचे चेहरे दिसत होते. त्यामुळे त्यांच्या पालकांची अस्वस्थता, घालमेल मी समजू शकत होतो. या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाच्या माध्यमातून रूमानिया आणि हंगेरी जवळच्या विमानतळावर बोलावून घेतले. तिथवर पोचण्यासाठीही अनेक मुलांना दिव्यातून जावे लागले. मात्र जेव्हा ते विमानात बसले तेव्हा  त्यांच्यासह आम्हां सर्वांनाच झालेला आनंद हा शब्दांपलिकडचा आहे.”

आज संध्याकाळी चौथ्यांदा ते या कामगिरीसाठी रूमानियाला रवाना होत आहेत.

 

मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्या मान्य; पहा कोणत्या मागण्या झाल्या पूर्ण !*


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मराठा आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून राज्य सरकारकडून जे फायदे देता येतील ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आपल्या लढ्याला आज यश मिळाले आहे. आजचा दिवस हा आनंदाचा, विजयाचा दिवस आहे असे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांनी केलेल्या सर्व मागण्या पूर्ण केल्याही माहिती जनसमुदायाला दिली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदान येथे उपस्थित असलेल्या सर्व आंदोलनकर्त्यांपुढे मागण्या वाचून दाखविल्या.

न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा स्थगिती आदेश देण्यात आला. परंतु, सप्टेंबर २०२० नंतर सुधारित निवड यादी नुसार जे एसीबीसीएस, ईडब्ल्यूएस उमेदवार शासकीय सेवेतून बाहेर पडले. त्यांना मानवतावादी दृष्टिकोनातून अधिसंख्य पद म्हणजे सिलेक्शन झालं होतं किंवा पॉईंट मिळाली नव्हती अशा सर्व तरुणांना नोकरीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत यावर खूप चर्चा झाली. कायदेशीर मुद्दे उपस्थित केले गेले. पण, मुख्यमंत्री यांनी काय होईल ते बघू. आपण कायदेशीर लढाई लढतोच आहोत. परंतु, हा प्रलंबित विषय आहे. आपलेच लोक सिलेक्शन होऊनही नोकरीपासून वंचित आहेत. त्यांच्याबद्दल आपणाला निर्णय घेता येईल. तंटामुळे अधिसंख्य पद निर्माण करण्यात येणार आहे. एक महिन्याच्या आत हे पद निर्माण करण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

या मागण्या झाल्या पूर्ण..

सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरू करण्यात येणार परदेशी शिक्षणासाठी कर्जमर्यादा १० लाख होती ती १५ लाख केली. परदेशी शिक्षणासाठी व्याज परत देण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्त पदे भरणार कोपर्डी खून खटल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल अपिलाची सुनावणी तातडीने घेण्याबाबत महाधिवक्ता यांना विनंती करणार. १५ दिवसाच्या आत याप्रकरणी हायकोर्टात अर्ज करण्यात येईल. याबाबत गृहमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि मी स्वतः पाठपुरावा करणार आहोत. ज्यांचा गुन्ह्यांमध्ये सहभाग नव्हता त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याबाबत ‘केस टू केस’ प्रकरण निहाय निर्णय घेण्यात येईल. जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतु न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेऊन त्याचा लवकरात लवकर निपटारा करण्यात येईल. आंदोलनात मृत पावलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठा फेरबदल; जाणून घ्या सुधारित दर !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाले आहेत. अशातच, १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत फार काही बदल झालेले नाहीत. मात्र, सध्याच्या काळात कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०२ डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाला.

ऑक्टोबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान व्यावसायिक सिलिंडरच्या किंमाती १७० रुपयांनी वाढ झाली आहे. १ ऑक्टोबर रोजी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत १७३६ रुपये होती. नोव्हेंबरमध्ये ते २००० आणि डिसेंबरमध्ये २१०१ रुपये झाले. यानंतर, जानेवारीमध्ये ते पुन्हा स्वस्त झाले. फेब्रुवारी २०२२ मध्ये ते स्वस्त झाले आणि १९०७ रुपयांवर आले.

दरम्यान, सध्याच्या जाहीर झालेल्या नवीन दारांमधील बदल लक्षात घेता नवीन सिलिंडरचे दर तब्बल १०५ रुपयांनी वाढले आहेत. व्यावसायिक सिलिंडरमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, ७ मार्चनंतर घरगुती एलपीजी सिलेंडर देखील महाग होण्याची शक्यता आहे. कारण सध्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान ३ मार्चला आणि सातव्या टप्प्याचे मतदान ७ मार्चला आहे. अशा परिस्थितीत ७ मार्चनंतर सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, १९ किलोचा एलपीजी गॅस सिलेंडर १ मार्चपासून दिल्लीत १९०७ रुपयांऐवजी २०१२ रुपयांना मिळणार आहे. कोलकात्यात आता १९८७ ऐवजी २०९५ रुपयांना मिळणार आहे, तर मुंबईत त्याची किंमत आता १८५७ रुपयांवरून १९६३ रुपयांपर्यंत वाढली आहे.

दरम्यान, देशातील मुख्य पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकी जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे विनाअनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत अनेक महिन्यांपासून दिलासा मिळाला आहे. अगदी ६ ऑक्टोबर २०२१ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कच्च्या तेलाच्या किमती $ १०२ प्रति बॅरल अशी वाढ झाली, तरीही कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीनंतर म्हणजेच ७ मार्चनंतर गॅसच्या दरात प्रति सिलेंडर १०० ते २०० रुपयांनी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.