Home Blog Page 191

मिरारोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जन्मजात बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया! बंद पडलेले हदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले

संपादक: मोईन सय्यद/मिरारोड प्रतिनिधी

मुंबई: : जन्मतः हृदयाचे ठोके बंद पडलेल्या आणि श्वासोच्छावासाचा त्रास असलेल्या एका नवजात बाळाचे प्राण वाचवण्यात मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांना यश मिळाले आहे. डॉ वीरेंद्र वर्मा (नियोनॅटोलॉजिस्ट) यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमने मृत पेशी आणि मेंदूचे नुकसान कमी करण्यासाठी हायपोथर्मिया उपचारासह अभिनव व्यवस्थापनाच्या सहाय्याने नवजात शिशुच्या हदयाचे ठोके पुर्ववत करत नवीन आयुष्य दिले आहे.

३.५ किलो वजनाच्या पूर्ण-मुदतीच्या बाळाला आपत्कालीन परिस्थितीत मिरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलच्या एनआयसीयु टीमकडे दाखल करण्यात आले. जन्मावेळी बाळाच्या हृदयाचे ठोके आणि श्वसनप्रक्रिया सामान्यरित्या होत नसल्याने जन्मल्यानंतर अवघ्या २५ मिनिटांतच बाळाच्या –हदयाचे ठोके व श्वासोच्छवास सुरळीत करण्यात येथील डाँक्टरांच्या चमूला यश आले.

वोक्हार्ट हॉस्पिटल मीरा रोड येथील नवजात शिशू तज्ञ डॉ. वीरेंद्र वर्मा सांगतात की, “आम्ही या बाळावर हायपोथर्मियाची पद्धत अवलंबविण्याचा प्रयत्न केला तत्पुर्वी त्याचे फायदे आणि दुष्परिणाम याविषयीची माहिती बाळाच्या पालकांना सांगून या उपचाराचा निर्णय घेण्यात आला. उपचारात्मक हायपोथर्मिया उपचारामध्ये बाळाला मानवी शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा ३ ते ४ अंश सेंटीग्रेड कमी तापमानात ठेवले जाते ज्यामुळे मेंदूमधील इजा कमी होण्यास मदत होते. या प्रक्रियेत ७२ तासांपर्यंत उपचारात्मक हायपोथर्मिया दिला जातो. रुग्णालयात पोहोचल्यानंतर १० मिनिटांच्या आत मुलाला काही विशेष औषध देण्यात आले. त्यानंतर बाळाच्या हृदयाचे ठोके पडायला लागले. आता बाळाची प्रकृती उत्तम असून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सामान्यतः जी बाळं जन्माच्या वेळी रडत नाहीत त्यांना हायपोक्सिक इस्केमिक एन्सेफॅलोपॅथी म्हणतात.

1. HIE ग्रेड 1: यामध्ये जवळजवळ 100% बाळं जगली आहेत आणि जवळजवळ 100% चे न्यूरोलॉजिकल परिणाम चांगले आहेत.
2. HIE ग्रेड 2: 70% बाळांना न्यूरोलॉजिकल कमतरता नसते आणि 30% बाळांना सेरेब्रल पाल्सी हा आजार होतो, जो अपंगत्व किंवा मतिमंदता किंवा दोन्ही द्वारे वैशिष्ट्यीकृत आहे.
3. HIE 3: 50% मुले मरतात आणि उर्वरित 50% मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी विकसित होतात.

वोक्हार्टमध्ये उपचाराकरिता दाखल झालेले हे बाळ HIE-2 किंवा 3 च्या श्रेणीतील असल्याचे दिसून येते.

डॉ वीरेंद्र पुढे म्हणाले*, ही पद्धत तापमान कमी करते आणि त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता आणि मुक्त रॅडिकल्सची निर्मिती कमी करण्यास मदत होते. जेव्हा ऑक्सिजन, ग्लुकोज आणि रक्ताची गरज कमी होते, तेव्हा मेंदूतील चेतापेशींचे संरक्षण होते. उपचारात्मक हायपोथर्मिया केवळ पूर्ण कालावधीत आणि चांगल्या वजनाच्या बाळांमध्येच केले जाऊ शकते जे जन्मल्यानंतर ६ तासांच्या आत रुग्णालयात पोहोचतात. मॅग्नेशियम सल्फेट, अॅलोप्युरिनॉल इत्यादी इतर न्यूरोप्रोटेक्टिव्ह थेरपी देखील दिल्या जाऊ शकतात. हायपोक्सिक इस्केमिक एन्सेफॅलोपॅथीमुळे सेरेब्रल पाल्सी होऊ शकते. परंतु, वेळीच उपचार झाल्याने या बाळाचे प्राण वाचवता आले.

मुलीचे वडील म्हणाले की, “जन्मानंतर मुलीच्या हृदयाचे ठोके योग्यपद्धतीने सुरू नव्हते. तिला श्वसनाचा त्रास होत होता. हे पाहून आम्ही घाबरून गेलो होतो. परंतु, वॉक्हार्ट रूग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या मुलीला नवीन आयुष्य मिळाले आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा अनधिकृत बांधकामांकडे काणा डोळा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लॉकडाऊन असताना देखील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामे छुप्या मार्गाने सुरू होतीच आणि आता तर राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर तर अनधिकृत बांधकामांना ऊत आला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी अनधिकृत बांधकामे निष्कशीत करून जमीनदोस्त करण्याचे कडक निर्देश देऊन सुद्धा कल्याण डोंबिवलीच्या क्षेत्रात असंख्य अनधिकृत बांधकामे सुरू असून पालिकेकडून अशी अनधिकृत बांधकामे निष्कशीत करण्याची तोडू कारवाई ही थातुरमातुर होत असून ज्या बांधकामांवर मोठा ताफा घेऊन तोडू कारवाई केली जाते तिथेच महिन्या दोन महिन्यातच पुन्हा अनधिकृत बांधकामे होताना दिसत असून ह्या इमारती पुन्हा कोणाच्या वरदहस्ताने उभ्या राहतात हा प्रश्न डोंबिवलीकर नागरिकांना पडत आहे.

उदाहरण द्यायचंच झालं तर डोंबिवली पूर्वेकडील “ग” प्रभागक्षेत्रातील दत्तनगर चौकात काही महिन्यांपूर्वी एका बांधकामावर त्या “ग” प्रभाग क्षेत्र अधीकारी यांनी पोलीसांचा मोठा फौजफाटा घेऊन तेथील अनधिकृत बांधकाम पूर्णतः निष्कशीत करून जमीनदोस्त केले होते व त्या जागेत बांधकाम करण्यास मनाई करण्यात आलेली असताना त्या इमारतीचे बांधकाम खुलेआम पडदे लावून दिवसाढवळ्या राजरोसपणे सुरू असून त्यास महापालिकेने परवानगी दिली आहे का हा प्रश्न तेथील नागरिकांच्या मनात उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे ह्या प्रभागाचे नगरसेवक हे शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख असून त्यांनी त्या चौकात सर्वात उंच तिरंगा फडकावला आहे आणि त्यांना त्यांच्या प्रभागात सुरू असलेली अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का अशी कुजबुज ऐकायला मिळत आहे.

नुकतेच प्रसिद्धीमाध्यमांसमोर आलेले एक अनधिकृत बांधकामाचे प्रकरण असे की आयरे गाव येथील सर्वे नं ११ हिस्सा नं अ/३ आणि सर्वे नं ११ ब/३ ह्या जागेचे मालक वेगळा असून त्यावर जागा मालकाशी कोणताही कायदेशीर आर्थिक व्यवहार न करता अतिक्रमण करून सदर जागेवर सात माळ्यांचा टॉवर बांधायचे काम सुरू केले होते पण जागा मालकाने आयुक्त, उपयुक्त, नगररचनाकार, प्रभागक्षेत्र अधिकारी यांना पत्रव्यवहार करून कायदेशीर रित्या महापालिकेने अतिक्रमण करणाऱ्यांवर काम थांबवण्याची नोटीस बजावली खरी पण तेथेही छुप्या मार्गाने काम सुरू असल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कळविले असता त्यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले खरे पण प्रश्न जितल्या तिथे अजूनही तसाच उपस्थित राहतो की अतिक्रमण करून अनधिकृत रित्या उघडउघड बांधकाम करणाऱ्या भूमाफीयांच्या डोक्यावर वरदहस्त नक्की कोणाचा आहे पालिका प्रशासन, प्रभागक्षेत्र अधिकारी का लोकप्रतिनिधी याचं उत्तर डोंबिवलीकर आता विचारत आहे.

तसेच “ग” व “फ” प्रभाग क्षेत्र उपयुक्त (अनधिकृत बांधकाम) यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर प्रभागक्षेत्र अधिकारी यांना योग्य ती कारवाई करण्यसाठी सांगण्यात आले आहे व ते करतील असे संपर्क साधला असता प्रसिद्धीमाध्यमांना सांगण्यात आले.

 

समाजसेवक वरीष्ठ पत्रकार निसार अली यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी

मुंबई: दैनिक सकाळ व दैनिक पुढारीचे पत्रकार, प्रसिद्ध समाजसेवक निसार अली सय्यद यांना राज्यस्तरीय कोरोना योद्धा पत्रकार पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. हा पुरस्कार दिनांक 15 व 16 नोव्हेंबर रोजी, अकोला अंत्री येथे होणाऱ्या ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या एकमेव पत्रकार मित्र संघटनेच्या वतीने 15 व्या वार्षिक संमेलनात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना केलेल्या पत्रकारिता क्षेत्रात तसेच सामाजिक क्षेत्रात निसार अली सय्यद यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा तर केलीच त्याच बरोबर पत्रकारितेत देखील उल्लेखनीय कार्य केले आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या या भरीव योगदानाबद्दल त्यांना ‘कोरोना योद्धा पत्रकार’ हा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहिती एजेएफसी चे केंद्रीय अध्यक्ष यासिन पटेल तसेच प्रदेशाध्यक्ष अजिंक्य गोवेकर यांनी दिली आहे. यापूर्वी देखील पत्रकार निसार अली यांना पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदाना करिता विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

निसार अली सय्यद यांना कोरोना योद्धा पत्रकार म्हणून राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

किरीट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

  भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. किरीट सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमय्या यांच्या विरोधात नागपूर कोर्टात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली आहे.

पत्रकारांशी बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, सतत खोट्या आरोपांची राळ उडवून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम किरीट सोमय्या करत आहेत. स्वतःच तपास अधिकारी व स्वतःच न्यायाधीश असल्याच्या आविर्भात ते विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सातत्याने खोटे आरोप करून बदनामी करत आहेत. किरीट सोमय्या यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर बोलताना वसुलीच्या पैशातील ४० टक्के शिवसेना, ४० टक्के राष्ट्रवादी काँग्रेस व २० टक्के काँग्रेसला मिळतो असा धादांत खोटा आरोप करून काँग्रेस पक्षाची बदनामी केली आहे. सोमय्या यांच्या या बेताल, बिनबुडाच्या आरोपाविरोधात अतुल लोंढे यांनी आज नागपूर न्यायालयात किरीट सोमय्या यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल केली आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे वितरण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे आज वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील ४ मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते. आज राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये एका शानदार कार्यक्रमात राष्ट्रपती यांच्या हस्ते वर्ष २०२० मधील पहिल्या टप्प्यातील पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. वर्ष २०२० मध्ये विविध क्षेत्रातील ७ मान्यवरांना पद्म विभूषण, १६ मान्यवरांना पद्म भूषण आणि ११८ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील १३ मान्यवरांचा समावेश आहे. आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये महाराष्ट्रातील ४ मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डॉ. रमण गंगाखेडकर यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्री गंगाखेडकर हे वरिष्ठ विषाणूशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल ऍण्ड रिसर्च (ICMR) या संस्थेच्या सारथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख म्हणून काम केलेले आहे. सरिता जोशी यांना हिंदी, मराठी, गुजरातीमध्ये अभिनय क्षेत्रातील योगदानासाठी पद्मश्री प्रदान करून गौरविण्यात आले. गेल्या ७ दशकात त्यांनी दूरचित्रवाणी, नाटक आणि सिनेजगतात आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. कंगना राणावत यांना हिंदी सिनेसृष्टीतील अभिनय क्षेत्रातील कार्यासाठी आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिनेक्षेत्रातील गायनासाठी अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. श्री सामी हे संगीतकारही आहेत.