Home Blog Page 190

गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण कडून, परत एकदा डोंबिवली शहरातील पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील घरफोड्या,चोरी करणारा तडीपार केलेला अट्टल गुन्हेगार जेरबंद..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.२.११.२०२१ रोजी सायंकाळी ६:३० वा दरम्यान मानपाडा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील हद्दपार (तडीपार) केलेला इसम कैलास सुभाष जोशी उर्फ जेपी हा त्रिमुर्ती नगर झोपडपट्टीत त्याचे राहते घरा जवळ उभा आहे, अशी त्याचे वर्णनासह गुप्त बातमीदारा कडून खात्रीशीर बातमी पोलीस हवालदार दत्‍ताराम भोसले, मुख्यालय ठाणे शहर यांना मिळाल्याने, त्यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट-३ चे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून कळवले असता, वपोनि मनोहर पाटील यांनी विलंब न लावता त्यांचे मार्गदर्शनाखाली योग्य त्या सूचना देऊन तात्काळ डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरारी गुन्हेगार व पाहिजे असलेले आरोपींचा शोध घेत असलेले एक पोलीस पथक सपोनि भूषण दायमा, पोउपनि मोहन कळमकर, सपोउपनि संजय माळी, पोलीस हवालदार विश्वास माने, वसंत बेलदार, सचिन वानखेडे, गुरुनाथ जरग, महेश साबळे, उमेश जाधव आणि राहुल ईशी असे सदर बातमी मिळाल्या ठिकाणी तात्काळ रवाना केले.

त्रिमुर्तीनगर झोपडपट्टीत त्याचे घरा चे बाजूलाच गल्ली जवळ सदर इसम उभा होता, मिळालेल्या वर्णनाप्रमाणे त्यास पथकातील एका पोलीसांनी ओळखले परंतु त्याचे घराचे पुढील व मागील बाजूने पोलीसांनी घेराव केल्याने त्यास पळून जाण्याची संधी न देता जागीच पकडले असता त्याचे नाव विचारता त्याने आपले नाव- कैलास सुभाष जोशी उर्फ जेपी (वय ३५ वर्ष) रा. पोपट किराणा स्टोर च्या मागे रूम नं. ०५ त्रिमुर्तीनगर झोपडपट्टी, पाथरली डोंबिवली पूर्व असे सांगितले सदर इसम हा अटल घरफोडी, चोरी करणारा आणि अतिशय चपळ असल्याने मानपाडा, डोंबिवली, विष्णूनगर,असे पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, नागरिकांच्या मालमत्तेस नुकसान पोहोचवू नये म्हणून त्यास मा.पोलिस उप आयुक्त सोा, परिमंडळ -३ कल्याण यांचे आदेशान्वये दि.२६.१०.२०२१ रोजी पासून ०१ वर्षे कालावधी करिता ठाणे जिल्ह्यातून हद्दपार (तडीपार) करण्यात आलेले असताना त्याने सदर आदेशाचा भंग केल्याने त्याच्या वर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांकडून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे कायदेशीर कारवाई करून पुढील तपासा करिता डोंबिवली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून सदर तडीपार केलेल्या अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हे शाखा युनिट-३ कल्याण चे पोलीसांनी कारवाई करून जेरबंद केल्यामुळे पोलीसांचे उत्कृस्ट कामगिरीचे नागरिकांकडून जाहीररीत्या कौतुक होत आहे.

रिक्षात विसरलेला आयफोन ७ डोंबिवली वाहतूक शाखेने शोधून केला परत..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी मानपाडा रोड बाज आर.आर. हॉस्पिटल, येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता सिंग या दिनांक २४/११/२०२१ रोजी सकाळी १० वा चे सुमारास नेहरू मैदान, डोंबिवली पूर्व येथून रिक्षाने आर.आर हॉस्पिटल येथे जात असताना त्यांचा आयफोन ७, किंमत सुमारे २५,०००/- रुपये हा मोबाईल रिक्षामध्ये विसरला गेला होता. ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांचा मोबाईल स्वीच ऑफ झाला होता. त्यांनी तात्काळ डोंबिवली वाहतूक शाखा येथे संपर्क करून सदरबाबत माहिती दिली. त्यानंतर डोंबिवली वाहतूक शाखेचे पोशि.स्वप्नील जाधव यांनी त्या रोडवरील साई पारिजात सोसायटी, गुरू छाया सोसायटी, डोंबिवली पूर्व या सोसायटीचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रिक्षा चा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कॅमेरा व रोडवरील अंतर जास्त असल्याने रिक्षा क्रमांक दिसत नव्हता. परंतु रिक्षा व रिक्षा चालकाच्या मिळालेल्या अस्पष्ट वर्णनावरून रिक्षा चालकाचा शोध घेऊन सदरचा मोबाईल शोधून आर.आर हॉस्पिटल चे प्रतिनिधी यांच्या ताब्यात दिलेला आहे.

डोंबिवली वाहतूक शाखेच्या या तत्परतेबद्दल आर.आर हॉस्पिटल चे संचालक डॉ.आमिर कुरेशी व डॉ.श्वेता सिंग यांनी वपोनि उमेश गित्ते यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

लसीकरणाच्या नियमाचा भंग केल्याप्रकरणी बाबा पेट्रोल पंप सील..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

औरंगाबाद जिल्ह्यात लसीरकणाबाबत अल्प प्रतिसाद असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपधारक व गॅस एजन्सी रास्त भाव दुकानदार व कृषी उत्पन्न बाजार समित्या यांनी ग्राहक व नागरिकांकाडून लसीकरण प्रमाणपत्राची खातरजमा केल्यानंतरच सेवा सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना व आदेश ९ नोव्हेंबरमध्ये जारी केले होते.

ह्या आदेशाची अंमलबजावणी बाबत संबंधित यंत्रणेला तपासणीचे आदेश देखील देण्यात आले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्वतः बाबा पेट्रोल येथे पाहणी केली. तेव्हा no vaccination no petrol या आदेशाचा भंग केल्याचे , मास्कचा वापर न करणे लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी न करणे , अशा गोष्टी आढळल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार श्रीमती सोनाली जोंधळे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी व श्री राजेंद्र शिंदे जिल्हा पुरवठा निरीक्षक औरंगाबाद यांनी सांयकाळी ८.३० वाजता बाबा पेट्रोल पंप सील केलेला आहे.

 

नाना पटोलेंना मंत्रिपद? काँग्रेस नेते दिल्लीकडे रवाना..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येत असून, विशेषतः काँग्रेसच्या काही मंत्र्यांच्या खात्यात अदलाबदल होण्याचे संकेत पुन्हा एकदा दिले जात आहे. त्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीला गेल्याने राजस्थानप्रमाणे राज्यातही काँग्रेस बदल घडविण्याच्या विचारात असल्याचे सांगण्यात आले. तेव्हाच पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षही निवडला जाणार असल्याने त्याच्या नावावरही काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विधानसभा अध्यक्षपदाचा नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून काँग्रेसच्या मंत्र्यांची खाते बदलले जाण्याची चर्चा आहे. एका कॅबिनेट मंत्र्याचा राजीनामा घेऊन, त्याजागी पटोले यांना आणि पश्चिम महाराष्ट्रातील एका आमदाराला राज्यमंत्रीपद दिले जाण्याचे बोलले गेले. त्यावरून मंत्र्यात नाराजीही दिसून आल्याने पक्षश्रेष्ठी बदलापासून लांब राहिली. मात्र, पंजाब आणि आता राजस्थानातील बदलानंतर महाराष्ट्रातही तसे घडू शकते, या चर्चा सुरू आहे. त्यात पटोले हे मंगळवारी सकाळीच दिल्लीला रवाना झाल्याने पक्षात नव्या घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत यांच्यातही भेट घडल्यानेही ठाकरे सरकारमध्ये नव्याने काही बदल होऊ शकतात काय? याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात होती. मात्र, अन्य काही महत्त्वाच्या विषयांवर पवार यांच्यासोबत चर्चा केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

अध्यक्षाच्या नावावर चर्चाविधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता असून, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष हमखास निवडला जाणार असल्याचे पटोले यांनी गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते. कोरोनाची साथही ओसरल्याने या पदासाठी निवडणूक घेण्यास मुख्यमंत्री आणि ठाकरे सरकारमधील प्रमुख नेते राजी आहेत. त्यामुळे पटोले यांच्या दिल्ली दौऱ्यात विधानसभा अध्यक्षाच्या नावावर चर्चा होऊ शकते.

मुंबईतील तरुणावर घाटकोपर येथे चेहरा सुधारण्यासाठी ११ तासांची सलग शस्रक्रिया

मुंबई: गेली २ वर्षे आपण कोविड -१९ महामारीशी दोन हात करीत असल्यामुळे अनेक शल्यचिकित्सा पुढे ढकलल्या होत्या यामध्ये प्लास्टिक व कॉस्मेटिक शस्रक्रियांचा समावेश होता, आता कोविड -१९ चा धोका कमी झाला असून मुंबईत अनेक शस्रक्रिया होत असून यामध्ये विविध शहरातून व इतर देशातून येणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे.

घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलमध्ये अशीच एक चेहरा सुधारण्यासाठी ३२ वर्षाच्या तरुणावर ११ तासाची सलग शस्रक्रिया करण्यात आली. लंडन येथिल प्रशिक्षित ओरल व मॅक्सिलोफेशियल सर्जन डॉ सम्राट तावडे व ओटोरहिनोलॅरिन्गोलॉजिस्ट डॉ. कौस्तुभ सरवदे यांनी हि शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. याविषयी अधिक माहिती देताना डॉ सम्राट तावडे म्हणाले, ” कुर्ला येथी राहणाऱ्या ३२ वर्षीय कुमारची जबड्याच्या सांध्याची वाढ आणि कानाच्या कालव्यांभोवती हाडांची वाढ जास्त झाल्यामुळे त्याची हनुवटी एका बाजूला वळली होती त्यामुळे जेवताना अथवा बोलताना खूप वेदना होत होत्या. कोणत्याही वेदनाशामक गोळ्यांनी या वेदना कमी होत नव्हत्या त्यात कोरोनाची साथ आल्यामुळे कुमार यां २ वर्षे या वेदना सहन कराव्या लागल्या.

कुमारच्या चेहऱ्याची शस्रक्रियाकरण्यापूर्वी संपूर्ण चेहऱ्याची ३D मॉडेलिंगद्वारे प्रतिकृती तयार करण्यात आली, त्याचा चेहरा सरळ करण्यासाठी नेमकी जी शस्त्रक्रिया करायची होती ती अंतिम परिणाम पाहण्यासाठी आम्ही या ३D मॉडेलवर केली त्यामुळे आम्हाला त्यात अचूकता कळली कारण अवास्तव वाढलेली जबड्याचे सांधे काढून टाकणे, जबड्याचा डावा कोन काढणे, कानाच्या हाडांची वृद्धी कमी करणे आणि कानाच्या कालव्याला पुरेशा आकारासाठी आकार देणे यासह अनेक प्रक्रियांचे नियोजन करण्यात आले होते.

यामध्ये त्याच्या दातांना सुरक्षित करणे गरजेचे होते. हि शस्त्रक्रिया सलग ११ तास चालली व आता कुमारच्या चेहऱ्यामध्ये चांगली सुधारणा झाली आहे.” शस्त्रक्रियेनंतर कुमार आनंदी असून तो आता आत्मविश्वासाने लोकांना भेटू शकतो अशी भावना त्यांनी व्यक्त केली.किशोरवयापासून कुमार याला चेहऱ्यामुळे मित्र मैत्रिणींच्या चेष्ठामस्करीला सामोरे जावे लागले होते. कुमार याने डॉ. सम्राट तावडे, डॉ. कौस्तुभ सरवदे, बिजनेस हेड आशिष शर्मा आणि संपूर्ण झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटल टीमचे आभार मानले.