Home Blog Page 195

मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर झाला गोळीबार! खांबीत किरकोळ जखमी!

संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी

भाईंदर, 29 सप्टेंबर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला आहे. मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञान इसमांनी हा गोळीबार केला असल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलीस उपायुक्तांसह अनेक पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

दीपक खांबीत गोळीबाराच्या सदरील घटनेत सुखरूप असले तरी त्यांच्या हाताला किरकोळ जखम झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान हा हल्ला कोणी केला? कसा केला? आणि का केला? याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. 

दीपक खांबीत आपले दिवसभराचे काम संपवून त्यांच्या कारने बोरिवली येथील घरी जात असताना सायंकाळी बोरिवली येथे महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली असताना आणि अत्यंत गर्दीच्या ठिकाणी अचानक झालेल्या या गोळीबारामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. सद्ध्या पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पाहात आहेत.

पोलीस आयुक्तालय अंतर्गत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या; पण ते बदलीच्या ठिकाणी हजर होणार कधी? अधिकारी-कर्मचारी वर्गात पसरली नाराजी!

संपादक : मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर, 26 सप्टेंबर: ठाणे शहर वगळता मिरा भाईंदर, वसई-विरार आणि संपूर्ण ठाणे जिल्हा यापूर्वी ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रा अंतर्गत येत होता. भरपूर मोठा परिसर, वाडा, जव्हार, मोखाडा सारखा अतिदुर्गम परिसर त्यातच अपुरा कर्मचारी-अधिकारी वर्ग त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांवर कामाचा खूपच ताण पडत होता. अनेक पोलीस अधिकारी-कर्मचारी बाहेरच्या शहरातून लांबून याठिकाणी कामावर येत असल्यामुळे त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक विपरीत परिणाम होत होते.

हा संपूर्ण विचार करूनच मिरा भाईंदर शहारा करिता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. अखेर मिरा भाईंदर आणि वसई विरार या दोन जुळ्या शहराला मिळून एक पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आलेला आहे. तर नव्यानेच स्थापन झालेल्या पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार अत्यंत शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिद्ध असलेले प्रथम पोलीस आयुक्त सदानंद दाते (भाप्रसे) यांचेवर सोपविण्यात आलेला आहे.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची नियुक्ती झाल्यानंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या मिरा भाईंदर आणि वसई विरार शहरातील पोलीस ठाण्यात त्यांनी अनेक सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. आता नुकतेच त्यांनी बिट मार्शल यांना अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज केले असून आपत्कालीन पोलीस मदत क्रमांक ‘112’ कार्यान्वित केला आहे. त्याच प्रमाणे शहरातील सर्व पोलीस ठाणे, बस स्थानक, रेल्वे स्थानक, शॉपिंग मॉल, महापालिका कार्यालय, शाळा, कॉलेज अशा मुख्य ठिकाणी ‘तक्रार पेटी’ ही संकल्पना देखील राबविण्यात येणार आहे.

ठाणे ग्रामीण पोलीस अस्तताना मिरा भाईंदर आणि वसई विरार परिसरातील पोलीस ठाण्यात तैनात असलेले अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, शहापूर अशा दूर दूरच्या ठिकाणावरून कामावर येत होते. एव्हढ्या लांबून कामावर येत असताना त्यांचा बराचसा वेळ प्रवासातच वाया जात होता, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर तर विपरीत परिणाम होतच होता परंतु त्यांना आपल्या परिवाराला देखील पुरेसा वेळ देता येत नसल्यामुळे त्यांच्यावर मानसीक तणाव देखील वाढत होता आणि या सर्वांचा एकूण परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर देखील होत होता.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची ही अत्यंत महत्त्वाची बाब ध्यानात घेऊन मिरा भाईंदर आणि वसई विरार शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील मिळून जवळपास 240 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या मागणीनुसार सोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या आहेत. या सर्व अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 23, 26 आणि 29  सप्टेंबर रोजी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी हजर होऊन तसा अनुपालन अहवाल सादर करायचा आहे. त्याच प्रमाणे बाहेरून या शहरात बदली झालेल्या अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या पोलीस ठाण्यात हजर व्हायचे आहे. परंतु मिरा भाईंदर शहरातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी अजूनही कार्यमुक्त केले नसल्यामुळे त्यांना बदलीच्या ठिकाणी अद्यापही हजर होता आलेले नाही आणि त्यामुळे पोलीस अधिकारी-कर्मचारी वर्गात नाराजी पसरलेली आहे.

नियमानुसार जर एखाद्या अधिकाऱ्याची अथवा कर्मचाऱ्याची बदली झाली असताना त्यांना बदलीच्या ठिकाणी 24 तासांच्या आत हजर होऊन तसा अनुपालन अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा लागतो. परंतु मिरा भाईंदर, वसई विरार शहराच्या पोलीस ठाण्यातील बदली झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केले नसल्यामुळे त्यांना अजूनही आपापल्या बदलीच्या ठिकाणी हजर होता आलेले नाही आणि तसा अनुपालन अहवाल सादर करता आलेला नाही त्यामुळे हे बदली झालेले अधिकारी व कर्मचारी काहीसे नाराज झाले आहेत.

पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन जवळपास 240 पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत परंतु जर हे अधिकारी-कर्मचारी वेळेवर बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत तर त्यांचेवर शिस्तभंगाची नोटीस बजावली जाऊ शकते आणि त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणामच अधिक होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ही बाब ध्यानात ठेऊन बदली झालेल्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांना त्वरित कार्यमुक्त करण्यासाठी संबंधित प्रभारी अधिकारी यांना निर्देश देण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.

आता पोलीस आयुक्त सदानंद दाते या गंभीर विषयावर काय निर्णय घेतात? आणि संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांना काय आदेश देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यातील तब्बल 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा

संपादक: मोईन सय्यद/मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह

मुंबई: वाहतूक पोलिसांकडे आगोदर पावती पुस्तिका होती. वाहतूक नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या नावे पावती फाडावी लागत होती. मात्र, सध्या नव्या ई-चलन नियमांचा राज्यात अधिक वापर होताना दिसत आहे. तर, ई-चलानाद्वारे वाहचालकांवर ठोठावण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचा दंड थकलेला आहे. या वसुलीसाठी लोकअदालत घेण्यात येणार असून जवळपास 10 लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा बजावल्या आहेत.

वाहतूक विभागाने 2016 साली ई-चलन प्रणाली सुरू करण्यात आली. वाहतुकीचा नियम मो़डणा-या वाहनचालकांवर पावती ऐवजी ई-प्रणालीच्या माध्यमातून दंड ठोठावण्यास सुरुवात केली. त्यामुळे पावतीच्या ऐवजी चलन मशिन वाहतुक पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे सध्या राज्यात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत. सिग्नल ठिकाणी बसवण्यात आलेले कॅमेरे वाहतुक नियमन डावलणा-यांच्या गाडीचा नंबर कॅच करते. या अशा सर्व कारणास्तव आता दंडाची रक्कम वाढली आहे. मात्र, वसुली अद्याप होताना दिसत नाही.

वाहतुक पोलिसांकडून आवाहन…

25 सप्टेंबरपासून लोकअदालत सुरू करण्यात येणार आहे. ही लोकअदालत 3 दिवस चालणार आहे. यामध्ये प्रकरणे मिटविण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांना नोटिसा मिळालेल्या नाहीत, त्यांनी वाहतूक पोलिसांच्या ॲपवर जाऊन थकीत रक्कम तपासून घ्यावी तसेच पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ही रक्कम तात्काळ भरावी असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

या सर्व प्रकारामुळे पूर्वीची पावती पुस्तिकाच बरी होती का? निदान त्यामुळे जागेवरच दंड वसूल केला जात होता, अशा प्रकारे लाखों लोकांना नोटीस बजावणे, त्यांना कोर्टात हजर करणे इत्यादी व्याप तरी वाढले नसते अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी केला बलात्कार! डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार! नऊ महिन्यांपासून आरोपींनी पीडितेला दिल्या नरक यातना!

संपादक: मोईन सय्यद/ प्रतिनिधी: मिलन शाह

डोंबिवली : काही दिवसांपूर्वी मुंबईतील साकीनाका याठिकाणी देशाला हादरवणारी महिला अत्याचाराची घटना घडली होती. येथील एका ३० वर्षीय महिलेवर अतिशय अमानुष पद्धतीने बलात्कार करून नराधमांनी तिची हत्या केली होती. ही घटना ताजी असताना, सामूहिक बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. डोंबिवलीतील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत २३ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास मनपाडा पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना डोंबिवलीतील भोपर परिसरातील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर तब्बल २९ जणांनी वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सामूहिक बलात्कार केला आहे. नराधमांनी जानेवारी २०२१ पासून २२ सप्टेंबर २०२१ पर्यंत पीडितेला नरक यातना दिल्या आहेत. आरोपींच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने काल रात्री मनपाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारसह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत २३ संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. संबंधित सर्व आरोपींनी पीडितेला डोंबिवली, बदलापूर, मुरबाड, राबळे अशा विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन आरोपी अल्पवयीन आहेत, बाकीचे सर्व आरोपी १८ वर्षांपुढील आहेत. पोलीस घटनेची गंभीरता ध्यानात घेऊन पुढील तपास करीत आहेत.

४० व्या कुमार-मुली ‘राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत’ महाराष्ट्राच्या मुलांची विजयी सलामी..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भुवनेश्वर येथे दि.२२ सेप्टेंबर (क्री. प्र.), बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान भुवनेश्वर, ओडीसा येथे सुरू झालेल्या ४० व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार-मुली खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी सलामीच्या सामन्यात नागालँडवर ३२-६ असा १ डाव राखून २६ गुणांनी सहज विजय मिळविला.

सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात महाराष्ट्राकडून सूरज जोहरे, विवेक ब्राह्मणे व भगतसिंग वसावे यांनी प्रत्येकी ५ गडी टिपत महाराष्ट्रचा विजय सोपा केला. भगतसिंगने नाबाद १.५० तर सौरभ अहिरने २.३० मिनीटे संरक्षण करून विजयाची पायाभरणी केली. रवी वसावे (१.२०मिनिटे संरक्षण व २ गडी ) व आदित्य कुदळे (१.३० मिनिटे संरक्षण व ४ गडी) यांनी अष्टपैलू खेळ करताना मोठा विजय साजरा केला.

मुलींचा नागालँड संघ न आल्यामुळे मुलींच्या संघाला पुढे चाल मिळाली.

महाराष्ट्रचे संघ सोलापूरहून रेल्वेने रवाना झाले होते. तत्पूर्वी येथील ह.दे. प्रशालेत निरोप समारंभावेळी महाराष्ट्राचे कुमार व मुलींचे दोन्ही खो-खो संघ यंदा सुवर्ण पदक कायम राखतील, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी शुभेच्छा देताना व्यक्त केला होता.

उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या वतीने दोन्ही संघास शुभेच्छा दिल्या गेल्या. रामचंद्र जाधव मित्र परिवाराच्या वतीने खेळाडूंना किट बॅग देण्यात आल्या. त्यांच्या आणि राज्य शासकीय प्रशिक्षक सत्येन जाधव, ह.दे. प्रशालेचे हनुमंत मोतीबने, खो-खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, दक्षिण तालुका खो-खो असोसिएशनचे तुळशीराम शेतसंदी, समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ संस्थापक अध्यक्ष संजय सावंत, रेल्वेचे जाकिर आत्तर, उमेश जाधव, उत्कर्ष क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष रविंद्र नाशिककर व खजिनदार उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते किट बॅग देण्यात आली. शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे यांनी प्रस्ताविक केले. अजित शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.