Home Blog Page 196

कल्याण डोंबिवलीतील नागरिकांच्या सोयीसाठी ‘बाहय रुग्ण सेवा’ (OPD) आता सायंकाळी देखील सुरु !


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यभरात गेली दिड वर्ष कोविड साथीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका अनेक विविध उपायोजना राबवित आहे. आगामी कालावधीत कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता तसेच सदयस्थितीत साथरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेच्या ‘आरोग्य सुविधा’ कल्याण-डोंबिवली च्या नागरिकांपर्यत पोहोचविणे आवश्यक आहे. महापालिकेच्या रुग्णालयात मोठया प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येते.

सदर गर्दी कमी करण्याच्या अनुषंगाने व रुग्णांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून रुग्णांच्या घरालगतच्या ‘नागरी आरोग्य केंद्रावर’ संध्याकाळी देख्रील ‘बाहयरुग्ण सेवा’ (ओपीडी) उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार कल्याण मधील महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र, चिकणघर नागरी आरोग्य केंद्र, मोहना नागरी आरोग्य केंद्र, कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्र , तिसगाव नागरी आरोग्य केंद्र, खडेगोळवली नागरी आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे डोंबिवलीतील पाटकर, मढवी, दत्तनगर, महाराष्ट्र नगर या नागरी आरोग्य केंद्रांवर सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत बाहयरुग्ण सेवा (ओपीडी) सुरु करण्यात येत आहे. डोंबिवली तील मंजूनाथ नागरी आरोग्य केंद्र लवकरच नवीन मोठया जागेत स्थलांतरीत होत आहे. तद्नंतर तेथेही बाहयरुग्ण सेवा नागरिकांच्या सेवेकरीता सुरु करण्यात येणार आहे. तरी या सुविधेचा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील व प्रतिभा पानपाटील यांचेमार्फत परिसरातील समस्त नागरिकांना करण्यात येत आहे.

 

नवी मुंबई पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत केले पाच आरोपींना जेरबंद; प्रतिबंधित गुटका, रोकड, देशी बनावटीचे अग्निशस्त्र, आयशर ट्रक व पिकअप टेम्पो मिळून ८० लाखांचा मुद्देमाल केला जप्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाशी येथे मा. पोलीस आयुक्त, पोलीस सह आयुक्त व अप्पर पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांचे “नशामुक्त नवी मुंबई” या विशेष मोहीम अभियाना अंतर्गत कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने दिनांक १७/०९/२०२१ रोजी गुन्हे शाखेचे वपोनि कोल्हटकर यांना मिळालेल्या बातमीवरून सेक्टर ३०/ए, ओरीसा भवन, वाशी नवी मुंबई परिसरात करण व त्याचे साथीदार हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला पानमसाला व तंबाखू (सुगंधीत) मालाची अवैधरीत्या विक्री करण्यासाठी आणून तेथे दुसऱ्या वाहनांमधून वितरित करणार आहेत बातमीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे दिनांक १७/०९/२०२१ रोजी पहाटेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी.कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापळा रचून कारवाई केली. ओरीसा भवन समोरील निर्जन रोडवर एका आयशर ट्रक मधून बोलेरो पिकअप जीप मध्ये काही इसम गोण्यामध्ये असलेला विमल पानमसाला व वी-१ सुगंधित तंबाखू भरत असताना पोलीस पथकाने त्यांना ताब्यात घेण्यासाठी घेराव घातला असता तेथील इसमांनी पोलीसांशी झटापट केली तसेच एक इसम पळून जात असताना शिताफीने त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यादरम्यान तेथील पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत आरोपी करण राम साळुंखे याने त्याच्याकडील अग्निशस्त्र पोलीसांवर रोखून धाक दाखवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत कायदेशीर कारवाईस अडथळा निर्माण करून सदर ठिकाणाहून अंधार व गोंधळाचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला.

सदर ठिकाणाहुन कारवाई दरम्यान आयशर टेम्पो, बोलेरो पिकअप जीप, फॉरच्युनर कार या वाहनांमध्ये २८,९३,८८०/- रुपये किंमतीचा मानवी जिवितास हानिकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या प्रकाराचा पानमसाला व तंबाखू (सुगंधीत) असा मालाचा साठा व त्यासाठी वापरण्यात आलेली वाहने फॉरच्युनर कारमध्ये मिळून आलेली रोख रक्कम, एक देशी बनावटीचे पिस्तुल, मोबाईल फोन व इतर सुमारे ७९,००,८८०/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याबाबत वाशी पोलीस ठाणे गु.र.नं ३२३/२०२१ भा.द.वि कलम ३०७, ३५३, १८८, २७२, २७३, ३२८, ३४ सह अन्नसुरक्षा कायदा कलम २६ (२)(I), २६ (२)(IV), २७ (३)(D), २७ (३)(E) भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), (३)/१३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील ०५ आरोपींना दि.१८/०९/२०२१ रोजी ०१:३४ वा. अटक करण्यात आली असून त्यांना दि.२३/०९/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

विश्वास वळवी याच्यावर जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

पालघर: ठाणे कोलशेत येथील एका जमीन खरेदी प्रकरणात आदीवासी कुटुंबाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता आणि समाजसेवक विश्वास वळवी याच्यावर ठाणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे.

ठाणे कोलशेत येथील दत्तू नथू बारे यांच्या नावे सर्वे क्र.२८२/१ मध्ये एकूण १६७९० चौमी कब्जे वहीवाटीची जमीन होती. ही जमीन दत्तू बारे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ४ वारसांकडून विश्वास दाविद वळवी याने १४,९४,३१,००० रुपयांना खरेदी केली होती. या व्यवहारामध्ये विश्वास वळवी याने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून जमीन खरेदी विक्रीची परवानगी मिळवण्यासाठी ४ वारसदाराना प्रत्येकी ३,७३,५७,८८५ रुपयांचे धनादेश देऊन पुन्हा ते धनादेश तुम्हाला नंतर देतो असे सांगून परत स्वत:कडे ठेवून घेतले होते.

त्यानंतर विश्वास वळवी यांनी ४ वारसदारांपैकी १ वारसदार असलेल्या बाजीबाई तुकाराम कोम यांना वारंवार मालाड येथील पंजाब नॅशनल बँकेत नेऊन त्यांच्या आशिक्षीतपणाचा फायदा घेत तुझे बँक खाते उघडून तुझ्या खात्यात कोलशेत येथील जमिनीचे तुझ्या हिश्श्याचे पैसे जमा करतो असे सांगून चेकबुक, कोरे कागद तसेच काही फॉर्मवर अंगठे घेतले व बाजीबाई कोमच्या खात्यावर जमा असलेली करोडोंची रक्कम इतर कंपन्यांच्या खात्यावर आरटीजीएसद्वारे वळती करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार बाजीबाई कोम यांचा मुलगा साजन कोम याने कापुरबावडी पोलिस स्टेशनमध्ये केली होती.

या तक्रारीनंतर जमीन खरेदी विक्री प्रकरणात आदीवासी कुटुंबाची करोडो रुपयांची फसवणूक झाल्याच्या या घटनेची गंभीर दखल घेत हे प्रकरण ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यात मोठी बँनरबाजी करत शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणवून घेणार्‍या विश्वास वळवी याच्यावर एका आदीवासी कुटुंबाच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी भा.दं.वि. ४२० आणि ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याने पालघर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या कोषाध्यक्षपदासाठी चंद्रजीत जाधव व धनंजय भोसले यांच्यात लढत; अध्यक्षपदी अजितदादा पवार व सरचिटणीसपदी नामदेव शिरगावकर तर ऊर्वरित कार्यकारिणी बिनविरोध..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुणे येथील ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटने’ च्या सरचिटणीसपदी ‘मॉडर्न पॅन्टॉथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ चे नामदेव शिरगावकर यांची बिनविरोध निवड झाली. जय कवळी, धनंजय भोसले, चंद्रजीत जाधव आणि नामदेव शिरगावकर हे चौघे सरचिटणीसपदासाठी इच्छुक होते. परंतु, जय कवळी, धनंजय भोसले, चंद्रजीत जाधव यांनी माघार घेतली आणि नामदेव शिरगावकर यांची सरचिटणीसपदी बिनविरोध निवड झाली.

गेल्या काही दिवसांपासून सरचिटणीसपदी कोणाची निवड होणार हा राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात चर्चेचा विषय होता. नामदेव शिरगावकर यांच्या बिनविरोध निवडीने या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला.

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीत शनिवारी अनेक घडामोडी नंतर विविध पदांची निवडणूक बिनविरोध झाली. सरचिटणीसपदासाठी दावेदारी असलेले चंद्रजीत जाधव आणि धनंजय भोसले यांच्यात कोषाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. कोषाध्यक्ष या एकमेव पदासाठी निवडणूक होणार आहे. अन्य पदांवर बिनविरोध निवड झालेली आहे.

गेली अनेक वर्षापासून सरचिटणीसपदी असणारे बाळासाहेब लांडगे यांनी वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेला नवा सरचिटणीस लाभणार हे स्पष्ट झाले होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची बिनविरोध निवडून आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे:

अध्यक्ष – उपमुख्यमंत्री अजित पवार (महाराष्ट्र कबड्डी संघटना),

वरिष्ठ उपाध्यक्ष – बाळासाहेब लांडगे (महाराष्ट्र राज्य कुस्ती संघटना),

उपाध्यक्ष (चार पदे)
संजय शेटे (महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना),
जय कवळी (महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना),
प्रदीप गंधे (महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना),
अशोक पंडीत (महाराष्ट्र रायफल संघटना),

सचिव – नामदेव शिरगावकर (मॉडर्न पॅन्टॉथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),

सहसचिव (चार पदे)
प्रशांत देशपांडे (महाराष्ट्र आर्चरी संघटना),
सुंदर अय्यर (महाराष्ट्र राज्य टेनिस संघटना),
प्रकाश तुळपुळे (महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना),
दयानंद कुमार (महाराष्ट्र ट्रायथलॉन संघटना)

कार्यकारी सभासद (नऊ पदे) : दीपक मेजारी (स्वीमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
संदीप चौधरी (रम्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
नीलेश जगताप (महाराष्ट्र व्हॉलिबॉल असोसिएशन),
अमेय छाजेड (महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटना),
सोपान कटके (ऑल महाराष्ट्र वुशू संघटना),
राजाराम राऊत (हँडबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र),
गोविंद मुथ्थुकुमार (महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना),
उदय डोंगरे (महाराष्ट्र तलवारबाजी संघटना), स्मिता यादव (महाराष्ट्र रोइंग संघटना).

कल्याण आरपीएफची मोठी कारवाई; कोणार्क एक्स्प्रेस मधून बारामद केला २१ किलो गांजा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण रेल्वे स्थानकात शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलेल्या ‘कोणार्क एक्सप्रेस’ च्या डी/२ बोगीतील एका सीट खाली सापडलेल्या बेवारस बॅगेतून २ लाख ७ हजार रुपये किंमतीचा २१ किलो अंमली पदार्थ (गांजा) कल्याण आरपीएफ च्या पोलीसांने जप्त केला आहे. हा अमली पदार्थ (गांजा) नारकोटिक्स विभागाला सुपूर्द करण्यात आला असून हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे याचा तपास कल्याण आरपीएफ पोलीसांकडून सुरू आहे.

शुक्रवारी पहाटे २ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास ‘उडीसा’ हून ‘कल्याण’ स्थानकात येत असलेल्या ‘कोणार्क एक्सप्रेस’ च्या डी/२ बोगीतील एका सीट खाली बेवारस बॅग असल्याची माहिती प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी आरपीएफ ला सूचना देण्यात आल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ‘कल्याण आरपीएफ’ चे स्टेशन प्रभारी भुपेंद्र सिंह आणि त्यांच्या टीमने ‘कोणार्क एक्सप्रेस’ रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकातील ७ नंबर फलाटावर दाखल होताच आरपीएफ ने सुरक्षेच्या कारणास्तव एक्स्प्रेस ची संपूर्ण बोगी रिकामी करत तपासणी सुरू केली असता सीट खाली ‘लाल रंगाची ट्रॉली बॅग’ आणि ‘काळ्या रंगाची सॅक बॅग’ आढळून आली.

आरपीएफ कल्याणचे एएसआय राजकुमार भारती यांच्यासह कल्याण स्टेशनचे आरक्षक एस एन.मुंडे यांच्या टीमने या बॅगेची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात हिरव्या रंगाचे गवतासारखे दिसणारा २० किलो ७८० ग्राम वजनाचा अंमली पदार्थ (गांजा) असल्याचे आढळून आले ज्याची अंदाजे बाजारभाव किमंत रुपये २ लाख ७ हजार ८०० इतकी असल्याचे आरपीएफ कडून सांगण्यात आले. हा गांजा ‘नारकोटिक्स’ विभागाला सुपूर्द करण्यात आला असून हा गांजा कोणी आणि कुठून आणला आहे याचा तपास कल्याण आरपीएफ पोलीसांकडून सुरू आहे.