Home Blog Page 198

डोंबिवलीत साकारली पुण्यातील श्रीमंत दगडूशेट हलवाई यांच्या गणपतीची हुबेहूब प्रतिकृती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेकडे मानपाडा रोडवरील आयकॉन हॉस्पिटल जवळ असणाऱ्या
‘श्री कॉम्प्लेक्स सोसायटी’ च्या गणपती चे यंदा १० वे वर्ष असून डेकोरेशन संकल्पना आणि निर्मिती श्री.संजय निकते यांची असून दरवर्षी वेगवेगळ्या थीम वर श्री. संजय निकते यांच्या संकल्पनेतून डेकोरेशन साकारले जाते.

या वर्षीची श्रीं ची मूर्ती ही पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या गणपतीची हुबेहूब मूर्ती आणि मंदिर साकारले असल्याने डेकोरेशन ही त्या मूर्तीला साजेसे असे बनविले गेले आहे. त्यामुळे ही कलाकृती पाहण्यासाठी आणि ह्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी डोंबिवलीकरांची गर्दी होत आहे.

‘श्री कॉम्प्लेक्स सोसायटी’ ने सध्याच्या कोविड परिस्थितीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत दर्शन घेणाऱ्या भक्तांना मास्क परिधान करून सॅनिटायझर व सामाजिक अंतर पाळत कोरोना सारख्या महाभयंकर रोगाची लागण अथवा त्याचा प्रसार होणार नाही याची पूर्णतः खबरदारी व काळजी घेतली आहे.

 

मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा; भाजपा आमदार अतुल भातखळकरांची पोलिसांत तक्रार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

साकीनाका निर्भया प्रकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावर आता भाजपाने आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. यामुळे या मुद्द्यावरून आता शिवसेना विरुद्ध भाजपा हा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्र्यांविरोधात कलम १५४अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असे अतुल भातखळकर यांनी सांगितले. तसेच, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला ‘सामना’ या दैनिकात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यामुळे सामानाच्या मुख्य संपादक रश्मी ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या राज्यात कायद्याचे राज्य नाही, त्यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र तीन दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयात जावू, असे भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

याचबरोबर, तक्रार दाखल करण्याआधी मुख्यमंत्री ठाकरे यांचा निषेध करताना भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता परप्रांतीयांचा हिशोब ठेवणार आहेत. परप्रांतीय कुठून येतात, कुठे जातात याबाबत पोलीस परप्रांतीयांच्या नोंदी ठेवतील असे मुख्यमंत्री म्हणतात. मुख्यमंत्र्यांना असे सांगताना लज्जा वाटायला हवी होती. कारण याच परप्रांतीयांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही ‘लाही-चणा’ हा कार्यक्रम ठेवता. ‘केम छो वरली’ म्हणता. काँग्रेसच्या सोबत जाण्यामुळे काय तुम्ही रोहिंग्यो मुसलमानांना विसरून गेलात का ? बांगलादेशी मुसलमानांच्या कारनाम्यांना विसरलात का ?, असा सवाल अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत.

उद्धव ठाकरे यांचे पोलिसांना निर्देश

१) गुन्ह्यात रिक्षांचा वापर झाल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले. त्यावर रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालण्यात यावा. त्याबाबत नोंदणी करतानाच, स्थानिक पोलीसांकडे माहिती देण्याचे संबंधित परवानाधारकाला बंधनकारक करावे.

२) इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागेल. ते येतात कुठून जातात कुठे यांची माहिती ठेवावी लागेल.

३) जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अमंलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत.

४) निती आयोगाच्या उद्या (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत जलदगती न्यायालयांच्या कार्यप्रणालीत धोरणात्मक सुधारणा करण्याची सूचना करण्यात यावी.

५) शक्ती कायद्यातही या अनुषंगाने सुधारणा करण्यावर भर दिला जाईल.

६) महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी संवाद साधून, विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये.

परवाना नसलेल्या ‘मोनालीसा बार आणि रेस्टॉरंट’ वर गुन्हे शाखा घटक-३ ची धडक कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १०/०९/२०२१ रोजी कल्याण गुन्हे शाखा घटक-३ च्या पोलिसांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंगगड येथील ‘मोनालीसा बार आणि रेस्टॉरंट’ कल्याण पूर्व येथे बार मालक व चालक हे विना नोकरनामा व कोणताही परवाना नसताना बार मध्ये ग्राहकांना लेडीज सर्व्हिस देऊन गिऱ्हाईकांना रिचवून आकर्षित करण्याकरिता महिलांना तोकडे कपडे परिधान करण्यास लावून सेक्सी हावभाव करून अश्लील कृत्य करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने कल्याण गुन्हे शाखा घटक-३ चे वपोनि विलास पाटील व पथकाने ‘मोनालीसा बार आणि रेस्टॉरंट’ मध्ये २०:५५ वाजण्याच्या सुमारास छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी एकूण २१ महिला विनामास्क तोकडे कपडे परिधान करून ३० गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील कृत्य व सेक्सी हावभाव करत असताना मिळून आल्या. तसेच बारमध्ये एकूण ६३,४१०/- रुपये रोख रक्कम व ग्राहकांचे मनोरंजन व महिलांना अश्लील हावभाव करण्याकरिता गाणी वाजवण्यासाठी मिक्सर व एम्प्लिफायर असे एकूण १४,५००/- रुपये किंमतीचे असे एकूण रुपये ७७,९१०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सध्या कोरोना रोगाचा संसर्ग पसरण्याचा धोका माहीत असताना व तसे समजण्यास कारण असताना वर नमूद बारचालक, मॅनेजर, वेटर, महिला व ग्राहक यांनी एकत्रित जमून मास्क परिधान न करता व परस्परांमध्ये योग्य ते अंतर दिसून आले नाही म्हणून त्यांच्या विरोधात सपोउनि व्ही.डी. मालशेटे नेमणूक गुन्हे शाखा घटक-३ यांच्या फिर्यादीवरून दि.११/०९/२०२१ रोजी मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गु.रजि.नं ४७७/२०२१ भादवि कलम २९४,१८८,२६९,२७०,३४ सह केडीएमसी मनाई आदेश सह कोविड-१९ उपाय ईजना नियम २४ चे नियम ११ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५२ सह साथीचा रोग प्रतिबंधक अधिनियम १९९७ चे कलम २,३,४ सह मपोकाक ३३(W)१३१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरील २१ महिला, बारचालक, वेटर असे मिळून ०५ इसम व ३० ग्राहक यांना पुढील कारवाई करिता मानपाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील, सपोनि दायमा, पोउनि कळमकर, सपोउनि मालशेटे, पोहवा शिर्के, पोहवा किशोर पाटील, पोहवा कामत, पोहवा प्रकाश पाटील, पोना सुरेश निकुळे, पोशि मिथुन राठोड, चापोशि राहुल ईशी, मपोशि मालती ठाकरे नेम-कोळशेवाडी पोस्टे, मपोशि जयश्री आंधळे नेम-कोळशेवाडी पोस्टे यांनी केली आहे असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

 

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत तात्काळ द्यावी – चंद्रकांत कारके


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबड तालुक्यात अतिवृष्टीमुळे ओढे,नद्या नाल्या वाहुन गेल्या असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे व पशुधांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे पडझडही मोठ्या प्रमाणात झाली आहे गोर-गरीब वंचित जनतेला विविध संकटाचा सामना करावा लागत आहे तेव्हा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसगट भरीव आर्थिक मदत तालुका प्रशासनाने करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अंबड तालुक्याच्या वतीने आज सकाळी ११.३० वा.अंबड चे तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा संघटक चंद्रकांत कारके, जिल्हा उपाध्यक्ष सतीष खरात, जिल्हा प्रवक्ते सुभाष ससाने, तुकाराम धाईत, शहराध्यक्ष अशोक साळवे, तालुका सहसचिव आनंद खरात, भिमराव तांबे, सुरेश वाहुळे, अंबादास जाधव,अतिश खरात, अभिजित शिरगोळे, विक्की डोंगरे, दिपक पिसुळे, सुधाकर कसार, विकास खरात, संदिप डोंगरे, अनिल उघडे, राजेंद्र राठोड, सौ.ताराबाई कांबळे, नन्नु सुतार, रामेश्वर केदार, गणेश उबाळे, तुकाराम माळी, प्रमोद कारके, सचिन तुपसैंदर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली.

नरेंद्र मोदींचे अपयश झाकण्यासाठी सीएम नाही, तर पीएम बदला ! – काँग्रेसचा टोला

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गुजरात मध्ये विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा
राजीनामा दिल्यानंतर आज भूपेंद्र पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पटेल पुढील काही दिवसांत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत भूपेंद्र पटेल यांचं नाव कुठेच नव्हतं. केंद्रीय मंत्री मनसुख मंडाविया, पुरुषोत्तम रुपाला, लक्षद्वीपचे प्रशासक प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गोरधन झडफिया यांची नावं चर्चेत होती. मात्र भाजपा नेतृत्त्वानं भूपेंद्र पटेल यांच्या नावाला पसंती दिली आहे. मुख्यमंत्री बदलण्यात आल्यानंतर आता भाजपा नेतृत्त्वाकडून गुजरात सरकारमध्ये आणखी काही बदल अपेक्षित आहेत. याच दरम्यान काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसने ट्विटरवर ‘#सीएमनहींपीएम_बदलो’ ही मोहीम सुरू केली असून मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचं अपयश झाकलं जाणार नाही, ‘सीएम नाही, तर पीएम बदला’ असं म्हणत सणसणीत टोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेसने याबाबत काही ट्विट्स केली आहेत. भाजपा सर्व ठिकाणी आणि सर्व राज्यांमध्ये अयशस्वी राहिली आहे. भाजपाने संपूर्ण भारतालाच अपयशी ठरवलं. मुख्यमंत्री बदलल्याने पंतप्रधानांचे अपयश काही झाकले जाणार नाही, असं म्हणत काँग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे. श्रेय स्वत:ला घ्यायचं आणि दोष दुसऱ्याला द्यायचा हाच मोदींचा मंत्र, असल्याचं देखील अन्य एका ट्विटमध्ये काँग्रेसने म्हटलं आहे.

देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणावरून देखील काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. आपल्या लोकांचं आधी लसीकरण करुन घेऊन कोरोनाच्या संकटावर मात करणे हा सर्वात खात्रीशीर उपाय आहे. मोदी सरकारला ही साधी गोष्ट का कळली नाही ? मोदी सरकार आपलं अपयश लपवण्याऐवजी ते स्वीकारण्याची भूमिका कधी घेणार ? असं काँग्रेसने एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच या ट्विटमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या देशांमध्ये भारत इतर प्रगत देशांपेक्षा फार मागे असल्याचं आकडेवारीतून दाखवण्यात आलं आहे. याआधी देखील काँग्रेसने विविध मुद्द्यांवरून मोदींवर निशाणा साधला आहे.

हरियाणाच्या कर्नालमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पाण्याच्या तोफांचा मारा करण्यात आला याचा काँग्रेसने निषेध केला आहे. “तालिबानशी चर्चा करणारे नरेंद्र मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी चर्चा का करत नाही ?” असा बोचरा सवालही काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलवावं आणि तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे. गेल्या १० महिन्यांपासून गांधीवादी मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना जाणूनबुजून भडकवून आणि आपापसात लढवण्याचा कट रचत आहे असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. हा कट इथेपर्यंतच मर्यादित नाही. तर जवान आणि शेतकऱ्यांमध्ये जुंपवून देण्याचं षड्यंत्र रचलं आहे. कर्नालमध्ये हजारो शेतकऱ्यांवर पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला गेला. पण शेतकऱ्यांनी संयम सोडला नाही, असंही सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.