Home Blog Page 199

टीका करण्यापेक्षा शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे : बाळासाहेब थोरात

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशात काँग्रेसची अवस्था उत्तर प्रदेशातील जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्याशी असहमत असल्याचे काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका करण्याने काही नुकसान होणार नाही. समविचारी असलेल्या लोकांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आल्यास काँग्रेसला चांगले दिवस येतील आणि देशाची लोकशाही वाचवण्यासाठीची लढाई एकत्र लढावी असे आवाहनच बाळासाहेब थोरात यांनी दिलं आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांनी पलटवार करत सदर आवाहन केलं आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. थोरात यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसची अवस्था जमीनदारी गेलेल्या जमीनदारासारखी झाली आहे. असे शरद पवार यांनी म्हटले असून त्यांच्या विधानाशी मी असहमत आहे. पवारांच्या वक्तव्याचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्यावर राजकीय फायद्यासाठी टीका केली तरी काँग्रेसचे त्याच्यामुळे नुकसान होणार नाही. त्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या विचाराचे जे लोकं आहेत त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी सोबत लढाव असे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी करत राष्ट्रवादीला आवाहन केलं आहे.

देशात धार्मिक भेदभाव करणारे लोकं अधिक झाल्यामुळे काँग्रेसच्या विचाराला कठीण दिवस आले आहेत. काँग्रेस हा एक विचार आहे. आपण सर्व एका विचाराचे आहोत, त्यामुळे पुन्हा एकत्र सर्व आले तर काँग्रेसला यापुढे चांगले दिवस येतील असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी विरोधकांना सोबत घेतलं आहे

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयावर चर्चा करुन कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसारच सर्व मिळून चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या जसं बोलतात तशी ‘ईडी’ कारवाई करते यामुळे भाजपच्या इशाऱ्यावर ‘ईडी’ चालते असा नागरिकांचा समज झाला आहे. यामुळे केंद्रीय यंत्रणांचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात येत असल्याचे जनता जाणून असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

ओबीसी आरक्षणावरुन निवडणुका पुढे ढकलता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकण्याबाबत जवळपास सर्वच पक्ष सकारात्मक आहेत. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा आणि पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं आहे.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील महानगर पालिका, नगर पालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होण्याचा अंदाज आहे.

९ वर्षाच्या मुलाचे ४० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौकडीला कल्याण क्राईम ब्रँच घटक-३ ने ठोकल्या बेड्या..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथमधील वडापाव विक्रेत्याच्या ९ वर्षीय मुलाचे ४० लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या चौघांना अटक करण्यात क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिट-३ ला यश आले आहे. अंबरनाथ पूर्वेकडे राहणाऱ्या सोनूकुमार बारेलाल सविता यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी ९ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.सोनू कुमार यांच्या कृष्णा नावाच्या नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. कृष्णा चौथ्या इयत्तेत ‘न्यू डेक्कन इंग्लिश स्कूल’मध्ये शिक्षण घेतो. सद्या शाळा बंद असल्यामुळे तो घरीच होता. परंतु जवळच असलेल्या ट्युशनसाठी जात होता. बुधवारी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ नंतर ‘परशुराम रेसिडेन्सी’ येथून येत असताना अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले. आई-वडिलांना कृष्णा सुखरूप परत हवा असेल तर चाळीस लाख रुपये खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी इंटरनेट कॉल वापरून अपहरणकर्त्याने दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संपूर्ण तपास यंत्रणा कामाला लागली. कृष्णाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणण्यासाठी क्राईम ब्रँचचा तपासाला वेग वाढला होता. त्यासाठी घटना घडलेल्या परिसरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यावरून संशयित इसमाचे फोटो तयार करण्यात आले. संशयिताच्या वर्णनाप्रमाणे कुणी व्यक्ती या परिसरात आली आहे अगर कसे याविषयी सर्व ठिकाणी स्थानिक पोलिसांसह क्राईम ब्रँचने सर्वत्र शोध घेतला. संगणक तज्ज्ञांची देखील मदत घेण्यात आली. तांत्रिक विश्लेषण व प्रत्यक्ष फिल्डवरील माहितीचे साह्य घेऊन कृष्णाचे अपहरण करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व यंत्रणांनी तपास चक्रांना वेग दिला.

क्राईम ब्रँचच्या युनिट-३ चे विनोद चन्ने, किशोर पाटील आणि बाळा पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली. त्यानुसार वपोनि विलास पाटील, सपोनि भूषण दायमा, फौजदार मोहन कळमकर यांच्यासह पथकाने सापळा रचला आणि अपहृत कृष्णाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणले. त्याचबरोबर खंडणीसाठी कृष्णाच्या अपहरणाचा कट रचणाऱ्या प्रभात कुमार अमरसिंह वय ३० वर्ष, अमजद मन्सूर खान २३ वर्ष, योगेंद्र जवाहरलाल सिंग २० वर्ष, सुनिल सिताराम लाड ५७ वर्ष या चार अपहरणकर्त्यांना ताब्यात घेतले. अपहरणकर्त्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कट रचून कृष्णाशी ओळख वाढवली. त्याच्यासोबत क्रिकेट खेळणे, चॉकलेट देणे, गप्पा मारण्याच्या माध्यमातून त्यातील एकाने कृष्णाशी मैत्री केली. मात्र स्वतःचे नाव कृष्णाला कळू दिले नाही. अपहरणकर्त्यांनी कृष्णाचे अपहरण केले मात्र त्याला काहीही कळू न देता त्याच्या आई-वडिलांकडे चाळीस लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाला ठार मारण्यात येईल, अशीही अपहरणकर्त्यांनी धमकी दिली होती. मात्र अपहरणकर्त्या चौघांच्या तावडीतून कृष्णाची सुखरूप सुटका करण्यात क्राईम ब्रँचला यश आले. सर्वच स्तरातून कल्याण क्राईम ब्रँच घटक-३ चे कौतुक होत आहे.

 

डॉ. उज्वला चक्रदेव यांची ‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

नागपूर येथील ‘मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’च्या प्राचार्या डॉ. उज्वला शिरीष चक्रदेव यांची ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी’ (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी शनिवारी दि. ११ सप्टेंबर रोजी डॉ. उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली.

डॉ. उज्वला चक्रदेव (जन्म २७.०८.१९६२) यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्हीआरसीई येथून वास्तुविद्याशास्त्र ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम.टेक तसेच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी प्राप्त केली. डॉ. उज्वला चक्रदेव यांनी ‘मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर’ येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर ३६ वर्षांचा अनुभव लाभला आहे.

‘एसएनडीटी’ महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शशिकला वंजारी यांचा कार्यकाळ २ जुलै २०२१ रोजी संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्याकडे त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती न्या. यतिंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. पुणे येथील आयआयटीचे महासंचालक डॉ. अनुपम शुक्ला व राज्याचे प्रधान सचिव ओमप्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. उज्वला चक्रदेव यांची पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कुलगुरूपदी नियुक्ती जाहीर केली आहे.

 

कसलाही विलंब न करता तात्काळ आरोपींना फाशी द्यावी; केंद्रीय पत्रकार संघ, (सी.पी.जे.ए) चे राज्य सरकारला निवेदन..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १० सप्टेंबर २०२१ रोजी मुंबईतील साकिनाका परिसरात अमानवी स्वरूपात जो एका महिलेवर बलात्कार केला गेला हे मुंबई सारख्या उच्च शिक्षित व विकसित शहरात घडणं हे अतिशय लज्जास्पद व घृणास्पद आहे असे केंद्रीय पत्रकार संघ, (सी.पी.जे.ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटले आहे. दुर्दैवाने त्या महिलेचा राजावाडी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

खरंच महिला या मुंबईत सुरक्षित आहेत का ?

हा प्रश्न एक मुंबईकर म्हणून सर्वांना नक्कीच पडला असणार. सध्या सर्वच राजकीय पक्ष राजावाडी रुग्णालयाच्या बाहेर उभे राहून आपआपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. पण फक्त प्रतिक्रिया देऊन, एकमेकांवर ताशेरे ओढून अश्या गुन्ह्यांवर आळा घालता येऊ शकतो का ? या अगोदरही अश्या बऱ्याच घटना घडल्या आहेत पण त्या नंतर काय झालं ? काही आंदोलन झाली… मेणबत्त्या लावून श्रद्धांजली वाहल्या गेल्या… झालं ? विषय संपला ? या मध्ये फक्त राजकारणी लोकांनी एकमेकांवर तसेच पोलीसांवर बोट दाखवत आपआपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या. या मध्ये बळी कोण पडला ? सामान्य नागरिक.
पण आता बस्स… भरपूर झालं…

आम्हाला कोणत्याही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या नाहीत. तुमच्या राजकारणाला आम्हाला बळी पडायचं नाही. आम्हाला फक्त आशा आहे ती तात्काळ न्याय मिळण्याची. अश्या सैतानवृत्ती असलेल्या नराधमांना भर चौकात फाशी द्या. म्हणजे पुन्हा असे कृत्य करताना असे नराधम थरथर कापतील.

माझे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्र्यांना हाथ जोडून निवेदन आहे की कृपया आपण कसलाही विलंब न करता आरोपींना फाशीचीच शिक्षा द्यावी असे केंद्रीय पत्रकार संघ, (सी.पी.जे.ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे तमाम महाराष्ट्र वासीयांना माझी विनंती आहे की आपल्या मुलांना, मुलींना तुम्ही उच्च शिक्षण तर देतच आहात पण सध्या समाजात ज्या गोष्टी घडतं आहेत त्या लक्षात घेता आपल्या मुलींना व मुलांना काही काळासाठी आपला मोबाईल बाजूला ठेवून स्व-संरक्षण कसे करता येईल त्यासाठी कराटे, ज्यूडो, लाठीकाठी, दांडपट्टा, ई. सारख्या शस्त्रांचे प्रशिक्षण सुद्धा द्यावे की जेणेकरून अश्या घटनांना आळा घालण्यास मदत होईल व आपली मुलं ही सुरक्षित राहतील असे केंद्रीय पत्रकार संघ, (सी.पी.जे.ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी म्हटलं आहे.