Home Blog Page 200

गुन्हे शाखा कल्याण घटक-३ कडून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नं ३२२/२०२१ भादवि कलम ३९३,३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक-३ कल्याण यांच्याकडून चालू असताना गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोबाईल फोनबाबत तांत्रिक तपास केला असता सदर मोबाईल फोन हा भिवंडी येथील राहणारा एक इसम वापरत असल्याची माहिती समोर आली. सदर उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे भिवंडी येथे गुन्हे शाखा घटक-३ कल्याण च्या पथकाने त्या इसमाचा शोध घेतला असता तो सापडला व त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीचा फोन जप्त केला.

त्यांनतर सदर इसमकडे चोरीच्या मोबाईल बाबत सखोल चौकशी केली असता तो मोबाईल त्यास त्याच्या एका ओळखीच्या इसमाने दिला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्या दुसऱ्या इसमाचा शोध घेतला असता तो सापडला व त्याच्याकडे विचारपूस केली असता तो उडवा-उडवी ची उत्तरे देत आहे म्हणून सदर दोन्ही संशयित इसमांना पुढील कारवाई करिता भिवंडी शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास भिवंडी शहर पोलीस स्टेशन करत आहेत असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

कल्याण गुन्हे शाखा घटक -३ कडून मटका जुगाराचा अड्डा उध्वस्त..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याणच्या गुन्हे शाखा घटक-३ चे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना आंबिवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला, मोहने गाव कल्याण येथे जुगाराचा अड्डा चालू असल्याची गुप्तरीत्या माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार आंबिवली रेल्वे स्टेशनच्या बाजूला मोहनेगाव येथे छापेमारी केली असता सदर ठिकाणी नऊ इसम जुगार खेळताना सापडले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराची साधने व मोबाईल फोन असा एकूण ८८,८५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

त्याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर मुंबई जुगार कायदा कलम ४ व ५, सह भादवि कलम १८८, २६९, २७० सह कोविड-१९ उपाय योजना नियम २०२० चे नियम ११ सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम १९९७ चे कलम २,३,४ अन्वये खडकपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर जुगाराच्या ठिकाणी मिळून आलेल्या मुद्देमालासह नऊ जणांना खडकपाडा पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी करत आहेत.

प्रस्तुत यशस्वी कामगिरी मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, सपोउनि विलास मालशेटे, सपोउनि संदीप भालेराव, पोहवा प्रकाश पाटील, पोहवा राजेंद्र खिलारे, पोहवा राजेंद्र घोलप, पोहवा मंगेश शिर्के, पोहवा अनुप कामत, पोना हरिश्चंद्र बांगारा, पोना सुरेश निकुळे, पोना विलास कडू, पोशि मिथुन राठोड, पोशि विलास चन्ने, पोशि विजेंद्र नवसारे यांनी केले आहे.

 

राज्य AJFC फोर्स पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार शहाजहान आत्तार यांची एक मताने निवड!

कोल्हापूर, (१० सप्टेंबर) : आज कोह्लापुर येथे संघटनेची बैठक मा.विवेक म्हमाने पाटील केंद्रीय खजिनदार यानी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार शहाजहान आत्तार  सोलापूर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
यावेळी केंद्रीय सचिव हाजी अब्दुलभाई शेख उपस्थित होते. नूतन राज्य अध्यक्ष शहाजहान आत्तार यांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मा.अशोक पद्मने साहेब उपस्थित होते.
आत्तार यांच्या नियुक्ती बद्दल संपूर्ण राज्यात अभिनंदन होत आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या. नियुक्ती नंतर बोलताना आत्तार यानी संपूर्ण राज्याचा दौरा करुन राज्यातील प्रत्येक तालुक्यात सदर संघटना पोहचविण्याचा निर्धार व्यक्त केला व जिल्हाअध्यक्ष निवड लवकर करणार असल्याचे जाहीर केले.

शासन दरबारी पत्रकारांना पेंशन योजना मोफत, एसटी बस, रेल्वे प्रवास, शासनाच्या खुल्या जागांवर प्रत्येक जिल्ह्यात संघटनेचे कार्यालय पत्रकार भवन पत्रकार घर संकुल हाती घेण्यात येणार असल्याचे सांगितले व राज्य अधिस्वीकृति समितीवर AJFC चे दोन प्रतिनिधी घेणे बाबत शासनास भाग पाडू व या सर्व मागण्या बाबत  तीव्र लढा संपूर्ण राज्यभर उभा करू असे जाहीर केले. याबाबत केंद्रीय अध्यक्ष व पदाधिकारी यांना घेऊन मा. मुख्यमंत्री व संबधित अधिकारी यांना शिष्टमंडळ घेऊन चर्चा करणार असल्याचे सांगितले.

तसेच AJFC पदाधिकारी व सदस्य यांचा अभ्यास दौरा शासन आयोजित करणार असल्याचे सांगितले. शेवटी केंद्रीय सचिव हाजी अंदुल भाई शेख यानी पुष्प गुछ देऊन त्याना शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले. केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांच्या मार्गदर्शना खाली एकमताने निवड केली.

सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोघांना लाच घेताना एसीबी कडून रंगेहात अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

फसवणूकीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्यासाठी एकाकडून पाच लाखांची लाच मागणाऱ्या विमानतळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पकडले.

एक लाख रुपये स्वीकारता ही कारवाई करण्यात आली

सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील आणि संतोष भाऊराव खांदवे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराने वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जामीनांस विरोध न करणे तसेच अनुकुल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती.

बपाटील यांनी त्यांचा ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी लोहगाव परिसरात पाठविले. दरम्यान, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले. पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा नितेश यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. राणे यांच्या पत्नी नीलम आणि मुलगा, भाजप आमदार नितेश यांच्याविरोधात पुणे क्राईम ब्रांचकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना विरुद्ध राणे कुटुंब असा वाद रंगला आहे. त्यात लुकआऊट नोटीसची आता भर पडली आहे.

आमदार नितेश राणे आणि त्यांच्या मातोश्री नीलम राणे यांनी ‘डीएचएफएल’ कंपनीकडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते. त्यातील २५ कोटी रकमेची परतफेड झाली नाही. त्यामुळे ‘डीएचएफएल’ कंपनीने राणे कुटुंबाविरोधात पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी नितेश राणे आणि नीलम राणे यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. राणे कुटुंबाने ‘डीएचएफएल’ कंपनीकडून ‘आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड’साठी कर्ज घेतलं होतं. या कंपनीच्या कर्जासाठी नीलम राणे आणि नितेश राणे हे सहअर्जदार आहेत.

महत्वाची बाब म्हणजे हे कर्ज खातं हे मुंबईचं आहे. मग पुणे पोलिसांनी कारवाई कशी केली? असा प्रश्नही विचारला जात आहे. दरम्यान, ‘डीएचएफएल’ने तक्रार दिली होती. त्यामुळे राहिलेलं कर्ज न देता राणे कुटुंब परदेशात पळून जाऊ शकतं, त्यामुळे हे लूकआऊट नोटीस देण्यात आल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.

याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, केंद्र सरकारकडून एक पत्र गृह विभागाला प्राप्त झालं होतं. त्यानंतर ते पत्र आम्ही पुणे पोलिसांना पुढील कार्यवाहीसाठी दिले.

दुसरीकडे राणे कुटुंबीयांना लुकआऊट नोटीस दिली असेल तर केवळ राजकीय सुडबुद्धीने राज्य सरकार कारवाई करतंय. ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक झाली तसेच हे राज्य सरकारचं पुढचं पाऊल आहे असा आरोप भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला.

आम्ही हायकोर्टात आव्हान देणार : नितेश राणे

दरम्यान, यावर नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, हे सर्क्यूलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. पण आमचे ‘डीएचएफएल’चे खाते मुंबई ब्रांचमध्ये आहे. त्यामुळे पुणे क्राईम ब्रांचला हा अधिकार कसा?, तसेच आम्ही ५ महिन्यापूर्वी सबंधित बँकेला आम्हाला लोन सेटल करायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलेलं आहे. त्यामुळे अशा नोटिसीचा उपयोग नाही. याप्रकरणात आम्ही हायकोर्टात जाऊन आव्हान देणार आहोत. नारायण राणेंच्या कुटुंबाच्या अडचणी नाही तर आता क्राईम ब्रांचच्या अडचणीत वाढ होणार आणि महाविकास आघाडीची अडचण होणार आहे.

हे सर्क्यूलर कुणी काढलं असेल यावर बोलतांना नितेश राणे म्हणाले, सर्क्यूलर कुणी काढलं हे या ठाकरे सरकारला विचारा. यांची झोप आम्ही उडवत आहोत. आता यांचे सगळे भ्रष्टाचाराचे विषय बाहेर निघणार आहेत. त्यामुळे अडचणी आमच्या वाढणार की ठाकरे सरकारच्या वाढणार हे तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात कळेलच. तसेच लुकआउट नोटिस संदर्भात आम्ही हायकोर्टात बोलू.