Home Blog Page 206

भाजपा नगरसेवकाला उल्हासनगर मध्ये आज काळे फासून चोपले..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आज उल्हासनगर महानगरपालिकेबाहेर शिवसैनिकांनी भाजपा नगरसेवकाला काळे फासून चोप दिल्याची घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा उल्हासनगर मधील सेना-भाजपा वाद उफाळून आला आहे. आज उल्हासनगर मधील सात ते आठ शिवसैनिकांनी भाजपा नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांच्या तोंडाला काळे फासत चांगलाच चोप दिला.

या हल्ल्याबद्दल रामचंदानी यांनी म्हटलं की उल्हासनगरचे शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी हा हल्ला केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, मी, चौधरी यांच्या अनधिकृत बांधकामाबद्दल तक्रारी करत होतो. याचा राग मनात धरून हा हल्ला चौधरी यांच्या माणसांनी केला आहे.

उल्हासनगर मध्ये नारायण राणेंवर टीका करताना सेनेच्या ‘या’ आमदाराची जीभ घसरली
दरम्यान, प्रदीप रामचंदानी यांनी केलेल्या आरोपाबद्दल राजेंद्र चौधरी यांना विचारलं असता त्यांनी अनधिकृत बांधकाम कोण करत आहे हे सर्वांना माहीत असून, प्रदीप हे ‘सोशल मीडिया’वर शिवसेनेची अनेकदा बदनामी करत असतात. तसेच नारायण राणें यांनी केलेल्या वक्तव्यावर आज आम्ही राणेंच्या पिलावळी शोधतच होतो, तेव्हा महानगरपालिकेबाहेर शिवसैनिकांना रामचंदानी भेटले आणि त्यांना शिवसेना स्टाईल मध्ये उत्तर दिलं आहे. असे, राजेंद्र चौधरी म्हणाले.

आता या मारहाण प्रकरणी उल्हासनगर मधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात प्रदीप रामचंदानी यांच्या फिर्यादीवरून सात ते आठ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे मध्यवर्ती पोलीस स्टेशन कडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

मुख्यमंत्री ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. मात्र पोलिसांकडे कोणतंही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला. अखेर नाशिक पोलिसांच्या सूचनेनुसार रत्नागिरी पोलिसांनी राणेंना अटक केली असून त्यांना रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

अटकपूर्व जामीनासाठी नारायण राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात जामीन अर्जाची याचिका दाखल केली होती. पण न्यायालायने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर तातडीनं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठीही राणेंच्या वकिलांनी प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणावर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला आहे.

नाशिक पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांना नारायण राणे यांना ताब्यात घेऊन नाशिक पोलिसांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांची सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे

*महिन्यातून एकदा महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम..*

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस ‘पार्किंग प्लाझा’ येथे महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरात आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणामध्ये महिलांची संख्या कमी असल्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला असून या उपक्रमाची सुरूवात येत्या सोमवारपासून करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेने आजपर्यंत ९ लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे.त्यामध्ये ४ लाख ७७ हजार ५५० पुरूषांचे तर ४ लाख २३ हजार ४८८ महिलांचे लसीकरण झाले आहे. महिलांसाठी विशेष लसीकरण मोहिम राबविण्याचा निर्णय महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी घेतला आहे. या निर्णयानुसार प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस ‘पार्किंग प्लाझा’ येथे महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिर आयोजित असणार आहे.

सेना – मनसे श्रेयवाद

ठाणे शहरातील महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिर आयोजित करण्याची मागणी १८ ऑगस्ट रोजी पालिकेकडे केली गेली होती. त्यांनतर महापौरांनी महिलांसाठी विशेष लसीकरण शिबिराची घोषणा केली, असा दावा मनसे च्या महिला ठाणे शहराध्यक्ष समिषा मार्कंडे यांनी केला आहे. ही घोषणा म्हणजे मनसे चे श्रेय लाटण्याचा उद्योग महापौरांनी केला. परंतु या घोषणेचे श्रेय फक्त आणि फक्त मनसे ला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेअरबँड मधून लपवून आणलेलं सोनं कस्टम विभागाच्या ताब्यात..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

विविध देशातून सोनं आणि इतर मौल्यवान वस्तूंची तस्करी करण्यासाठी तस्कर नवे नवे मार्ग शोधून कस्टम एजन्सींना चकवा देण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु, तस्करी विरोधात सज्ज असलेल्या कस्टम एजन्सी तस्करांच्या या नव-नवीन पद्धती आणि प्रयत्नांना वारंवार चुकीचं ठरवत असतात.

असंच एक ताजं प्रकरण कर्नाटकातील मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलं आहे. मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम विभागाने चक्क हेअर बँडद्वारे केली जाणारी सोन्याची तस्करी पकडली आहे. तस्करीची ही पद्धत अनोखी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दुबईहून एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाईट क्रमांक ‘आय एक्स ३८४’ मध्ये महिलांच्या हेअरबँड मध्ये बसवलेल्या मण्यांच्या आतमधून सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी कस्टम विभागाने मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका व्यक्तीला अटक केली आहे. ११५ ग्रॅम वजनाच्या हेअरबँडची एकूण किंमत ५ लाख ५८ हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, सोन्याची पुनर्प्राप्ती कमी असू शकते. परंतु, तस्करीची ही पद्धत अक्षरशः अनोखी आहे.

तस्करीच्या ‘या’ दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सोनं जप्त..

एका घटनेत अधिकाऱ्यांनी ब्लेंडरच्या आर्मेचरमधून सोन्याची तस्करी आणि इतर वैयक्तिक सामानासह केरळमधील कासारगोड येथील एका प्रवाशाला अडवलले. यावेळी त्याच्याकडून १६.८५ लाख रुपये किंमतीचं निव्वळ ३५०.३३ ग्रॅम वजनाचं सोनं जप्त करण्यात आलं आहे अशी माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली.

रक्षाबंधन उत्सवानिमित्त फॉर फ्युचर इंडिया संस्थेने राबविली कांदळवन स्वच्छता मोहिम

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: फॉर फ्युचर इंडिया ही संस्था प्रत्येक आठवड्याला समुद्र किनारा स्वच्छ करण्याची म्हणजेच आपल्या निसर्ग सौंदर्यात भर घालण्याची मोहीम अतिशय उत्साहाने राबवत आहे. प्रत्येक आठवड्याला शनिवारी व रविवारी कोणत्या न कोणत्या समुद्र किनाऱ्यावर साफ-सफाई करण्याचे उपक्रम राबवत आहे.

यावेळी रक्षाबंधन उत्सवाच्या निमित्ताने भाईंदर पुर्व खाडी येथील कांदळवन स्वछता मोहिम व कांदळवनास राखी बांधुन कांदळवनाचे रक्षण करण्याची जबाबदारी हाती घेतली. कांदळवन स्वछता मोहिम करताना मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा, घरगुती कचरा, इमारत, घर व इतर बाधंकामामध्ये तयार होणार कचरा काढण्यात आला.

सोबतच स्थानिक नागरिकांसोबत या उपक्रमात कांदळवनाविषयी जनजागृती करण्याचे कार्य केले. फॉर फ्यूचर इंडिया सह या उपक्रमात खेलो मिरा भाईंदर खेलो, महाराष्ट्र वनविभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मॅन्ग्रोव्ह फॉउंडेशन, चाईल्ड हेल्प फॉउंडेशन संस्थे सोबत मॅंग्रोव्हमॅन धीरज परब, पोलिस सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, महाराष्ट्र वनविभाग अधिकारी सुचित्रा पाले व सहकारी, मिरा भाईंदर महानगरपालिका स्वच्छता विभाग अधिकारी, भाईंदर पश्चिम येथील व्हिन्सेंट डी-पॉल हायस्कूल शाळा उपस्थित होते.