Home Blog Page 207

गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी उकळणाऱ्या पोलीस नाईकासह सात जणांना अटक!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर : चकमकीत ठार मारण्याची धमकी देऊन भाईंदर येथील गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. नवघर पोलिसांनी या प्रकरणी एका पोलिस नाईकसह, बोगस पत्रकार, माहिती अधिकार कार्यकर्ता असे एकूण ७ जणांना अटक केली असून आणखीन दोन आरोपी फरार आहेत.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेल्या माहिती नुसार भाईंदर पूर्वेकडील गांजा विकणारा व्यापारी समीर सकपाळ (वय ३५) यांचे १४ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तींनी अपहरण केले होते.

अपहरणकर्त्यांनी सकपाळ यांना अज्ञातस्थळी नेले आणि आपण पोलीस असून “तुझ्या इनकॉउंटरची ऑर्डर निघाली आहे तुला चकमकीत ठार मारू” अशी धमकी देत १२ लाखांची खंडणी मागितली.

यावेळी आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून सकपाळ याच्याकडील ५० हजार रोख रक्कम, भ्रमणध्वनी आणि सोन्याचे लॉकेट असा ऐवज काढून घेतला होता.
नवघर पोलिसांनी याप्रकरणी तपास करून ७ जणांना अटक केली.

आरोपी दादासाहेब दिनकर मिसाळ (वय ४१) हा नवी मुंबई पोलीस ठाण्यात पोलीस नाईक पदावर काम करतो.
या प्रकरणात एकूण ९ जणांवर गुन्हे दाखल केले असून ७ जणांना अटक केली आहे,
तर दोन आरोपी फरार आहे, अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

दिवसभरात जवळपास ११ लाख नागरिकांचे लसीकरण करत लसीकरणात महाराष्ट्र राज्याचा नवा विक्रम !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमे अंतर्गत महाराष्ट्राने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करीत दिवसभरात १० लाख ९६ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे ११ लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या कामगिरीची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. दिवसाला १० लाखापेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते हे आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असून याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची असल्याचे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले आहे. तसेच, आरोग्य विभागाच्या वतीने त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत सायंकाळी सात वाजेपर्यंत ५२०० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली आहे. राज्यातील आतापर्यंत दिलेल्या डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली असून देशभऱात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.

सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा कायद्याचा रक्षकच निघाला नराधम भक्षक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली सारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा पोलीस शिपाई हाच कायद्याचा रक्षक असून भक्षक बनल्याची घटना गुरुवारी दि.१९ ऑगस्ट ला नांदीवली परिसरात घडली आहे. एका पोलीस शिपायाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी शिपायाची रवानगी कारागृहात झाली आहे. तसेच आरोपी पोलीस शिपयाचे तडकाफडकी निलंबनही करण्यात आले आहे.

डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने तो राहत असलेल्या इमारतीमधील एका अल्पवयीन मुलीशी लगट करून तिचा विनयभंग केल्याची नुकतीच घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात ‘विनयभंग’ आणि ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली आहे. सतीश कार्ले (वय ३४ वर्षे), असे आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

इमारतीच्या जिन्यात पीडितेचा विनयभंग

रामनगर पोलीस ठाण्यात चार वर्षांपासून आरोपी पोलीस शिपाई सतीश कार्ले हा कार्यरत होता. तो कुटूंबासह डोंबिवली जवळील नांदीवली परिसरात एका सोसायटी राहण्यास आहे. गुरुवारी दि. २० ऑगस्टला दुपारच्या सुमारास पीडित मुलगी इमरतीच्या जिन्यातून जात असताना आरोपी पोलीस शिपायाने तिच्याशी लगट करत विनयभंग केला. या घटने नंतर त्याच रात्री पीडित मुलीने त्याच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. यावरुन पोलिसांनी पोलीस शिपायावर ३५४, ३५४ (अ), पोक्सोचे कलम १० व १२ नुसार मध्यरात्री दोनच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी शिपायाचे तडकाफडकी निलंबन

शुक्रवारी दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी अटक केल्यानंतर त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने एक दिवसाच्या पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली होती. पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा शनिवारी दि. २१ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी आधारवाडी कारागृहात केली आहे. तर दुसरीकडे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शिपाई सतीश कार्ले याला तडकाफडकी निलंबित केले आहे असे रामनगर पोलिसांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

स्टेशनवर हिसका देऊन मोबाईल पाळवणाऱ्या चोराला महिलेनेच पाठलाग करुन पकडले; चोरट्याला कल्याण पोलिसांनी केली अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण जीआरपीने झटापटीत महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे याच महिलेने नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र महिलेचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मुंबईत काम करणारी एक महिला काही कामानिमित्त शहाड येथे आली होती. ती शहाड रेल्वे स्थानकात थांबली होती. याच वेळी एक तरुण तिच्याजवळ आला. त्याने या महिलेच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला, यावेळी महिलेने प्रतिकार केला मात्र तिला हिसका देऊन मोबाईल हिसकावून चोरट्याने पळ काढला.

या झटापटीत महिलेचे काही दागिने गायब झाले. महिलेने पाठलाग करत चोराला पकडले. याच दरम्यान एक पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या चोरट्याला पकडले. शाहरुख गफूर शेख या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १४ ऑगस्ट २०२१ रोजी घडली असून अद्याप मोबाईल आणि दागिने सापडलेले नाहीत.

दरम्यान, मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन, तिचा महागडा मोबाईल हिसकावून पसार झालेल्या आरोपीला कल्याण पोलिसांनी गुजरातहून अटक केल्याची घटना गेल्याच महिन्यात उघडकीस आली होती. मूकबधीर तरुणीवरील बलात्काराच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. पहाटेच्या सुमारास मूकबधीर तरुणीवर बलात्कार करुन तिचा मोबाईल हिसकावून आरोपी पसार झाला होता. मात्र कल्याण स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता.

गॅसवर चालवला जाणारा हातभट्टी दारु बनविण्याचा अड्डा भाईंदर पोलिसांनी केला उध्वस्त, आरोपी राजू कोळी आणि अविनाश पाटील फरार!

संपादक मोईन सय्यद/भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: बुधवारी पहाटे चारच्या सुमारास भाईंदर पोलिसांनी धाडसी कारवाई करत भाईंदर पश्चिमेकडील मुर्धा गावाच्या आतील खाडीच्या दलदलीच्या भागात हातभट्टीची अवैध दारू बनवणारा अड्डा उध्वस्त केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पाटील यांच्या सूचनेनुसार एपीआय विश्वास बब्बर यांच्या नेतृत्वाखालील चमूने ही धाडसी कारवाई केली. या हातभट्टी दारूच्या अड्ड्याबद्दल पोलिसांना एक गुप्त सूचना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंदराव पाटील यांना घटनास्थळी पोहचण्यासाठी फायबर बोटीने प्रवास करावा लागला.

खारफुटीच्या घनदाट झाडांच्या आतमध्ये हा दारु बनविण्याचा अड्डा चालवला जात होता. पोलीस शिपाई शिंदे, मुल्ला आणि सानप यांना दलदलीतून होडी बाहेर काढण्यासाठी अक्षरशः हाफ पँट आणि टी-शर्ट घालून चिखलात जावे लागले. पुढे घटनास्थळी पोहचण्यासाठी त्यांना खाडीच्या खोल चिखलातुन चालत जावे लागले.

सर्वांत आश्चर्य म्हणजे याठिकाणी मद्यनिर्मिती करण्यासाठी लाकूड पेटुवून भट्टी लावण्या ऐवजी गॅसवर चालणारी भट्टी वापरत असल्याचे दिसून आले जेणेकरून लाकडांचा धूर आणि आग दिसणार नाही आणि पोलिसांची कारवाई टाळता येईल. पोलिसांनी येथील दारु बनवण्यासाठी वापरले जाणारी सर्व उपकरणे नष्ट केली असून भट्टीसाठी वापरले जाणारे 25 एलपीजी गॅस सिलेंडर, 200 लिटर रासायनिक द्रव्य भरलेले ड्रम जप्त केले.

ही अवैध दारुची भट्टी चालवणारे राजू कोळी आणि अविनाश पाटील फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती भाईंदर पोलिसांनी दिली आहे.