Home Blog Page 208

सेक्सटॉर्शनचे मुंबईतील मोठे रॅकेटचा पर्दाफाश; बॉलिवूड सेलिब्रिटीज पासून सामान्यांसह १०० जण अडकल्याचा अंदाज..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सेक्सटॉर्शनच्या या टोळीमध्ये दोन आरोपी व्यवसायाने अभियंता आहेत, तर एक अल्पवयीन आरोपी देखील सामील आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून मोबाईल, १२ बनावट खाती, ६ बनावट ई-मेल आयडी आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.

पोलिसांकडून चार आरोपींना अटक

गुन्हेगारी जगतात तुम्ही खंडणी वसुलीचे प्रकार अनेक वेळा ऐकले असतील. पण यावेळी मुंबई पोलिसांनी एक असे रॅकेट पकडले आहे, ज्याची व्याप्ती अत्यंत मोठी आहे. सामान्य माणसांपासून बॉलिवूडचे जवळपास १०० सेलिब्रिटीज यात अडकले आहेत. मुंबई पोलिसांनी सेक्सटॉर्शन प्रकरणात नागपूर, ओडिशा, गुजरात, कोलकाता येथून चार आरोपींना अटक केली आहे, वेगवेगळ्या राज्यात २५८ जणांची फसवणूक गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई पोलिसांसमोर सेक्स्टॉरशनची प्रकरणे समोर येत होती. कारवाई करताना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एका टोळीला पकडले आहे, ज्याने वेगवेगळ्या राज्यांतील २५८ जणांना त्याचा बळी बनवले आहे.

पीडितांकडून लाखो रुपये उकळले

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ज्या टोळीचा भांडाफोड केला आहे, त्याने आतापर्यंत सुमारे २५८ जणांची फसवणूक केली आहे, त्यापैकी बॉलिवूडमध्ये ‘ए’ श्रेणीमध्ये येणारे सुमारे १०० जण आहेत. याशिवाय ‘टीव्ही इंडस्ट्री’शी निगडीत असलेले अनेक अभिनेते आणि अभिनेत्री देखील या ‘सेक्स्टॉरेशन रॅकेट’चे बळी ठरले आहेत. या व्हिडीओच्या बदल्यात हे रॅकेट या सेलिब्रिटीज आणि पीडितांकडून लाखो रुपये घेत असत. या व्हिडिओंचे क्लिप्स नंतर ट्विटर, डार्कनेट आणि टेलिग्राम यासारख्या सोशल मीडिया ऍप्लिकेशनवर इतर लोकांना मोठ्या पैशांना विकले गेले जाते.

काय आहे मोडस ऑपरेंडी

‘सेक्स्टॉरेशन’ मध्ये एखाद्या व्यक्तीशी सोशल मीडियाद्वारे (स्नॅपचॅट आणि इंस्टाग्राम) ऍप वरून पहिल्यांदा मैत्री केली जाते. मग ६ महिने किंवा त्याहून अधिक काळानंतर ती व्यक्ती त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवली जाते. मग एखाद्या दिवशी व्हिडिओ कॉलवर त्या व्यक्तीला नग्न होण्यास सांगितले जाते. त्याचा नग्न व्हिडीओ रेकॉर्ड केला जातो. यानंतर ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू होते. सार्वजनिक व्यासपीठावर हे नग्न व्हिडिओ अपलोड न करण्याच्या अटीवर सेलिब्रिटी किंवा त्या व्यक्तीकडून मोठी रक्कम उकळली जाते.

नेपाळच्या बँक खात्यातून व्यवहार

‘सायबर सेल’ला त्याच्या तपासात कळले की या आरोपींनी तपास यंत्रणांना टाळण्यासाठी नेपाळच्या बँक खात्यातील पैशांच्या व्यवहारांसाठी वापर केला आहे. या लोकांना भीती वाटली की जर हे प्रकरण समोर आले तर त्यांचे खाते बंद पाडले जाईल. ‘सायबर सेल’ने आता नेपाळ प्रशासनाला या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि बँक खात्याशी संबंधित तपशील मागितला आहे जेणेकरून प्रकरणाचा तळ गाठता येईल.

७ वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून फरार असलेला आरोपी कल्याणच्या गुन्हे शाखा घटक-३ ने सापळा रचून शिताफीने केला अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. ८४७/२०१४ भादवि कलम ४२०,४६७,४६८,४७१,४०६,३४ प्रमाणे दि.२१/११/२०१४ रोजी गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील गेले ७ वर्षांपासून स्वतःचे अस्तित्व लपवून फरार असलेला तसेच मा.न्यायालयाने जाहीरनामा काढून त्याची लखनऊ येथील १.७५ करोड रुपयांची प्रॉपर्टी जप्त करून लिलावाच्या आदेश दिल्यानंतरही हजर न झालेला गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नामे माजिदअली उर्फ गुड्डू मन्सूरअली शेख रा. ए/३, चाळ नं.१०३, हिंदुस्थान चाळ, कामराजनगर, व्ही.एन.मार्ग घाटकोपर (पूर्व) मुंबई – ७७, याचा गुन्हे शाखा, घटक-३ कल्याण कडून समांतर तपास सुरू असताना नमूद फरारी व पाहिजे असलेल्या आरोपी बाबत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारा मार्फत माहिती काढून गोपनीय रित्या त्याचा मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषणावरून तो तिरुपती अपार्टमेंट ए/१०५, सेक्टर २०, कामोठे, नवी मुंबई या परिसरात राहत असले बाबत खात्रीशीर माहिती काढून त्याचा सध्याचा फोटो प्राप्त करून सापळा रचून त्याचा शोध घेवून पाहिजे आरोपी माजिदअली उर्फ गुड्डू मन्सूरअली शेख यास काल दि.१८/०८/२०२१ रोजी ताब्यात घेवून महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गुन्ह्याच्या पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आला आहे. प्रस्तुत गुन्ह्यातील यापूर्वी अटक आरोपी पैकी मा. न्यायालयाने एक आरोपीस ३ वर्षे कैद व दुसऱ्या आरोपीस ५ वर्षे कैद अशी शिक्षा ठोठावली आहे.

तसेच नमूद आरोपी याचे विरुद्ध १) महात्मा फुले चौक पो.स्टे. गु.रजि.नं. ८३९/२०१४
२) महात्मा फुले चौक पो.स्टे. गु.रजि.नं. ८६४/२०१४ भादवि कलम ४२० प्रमाणे २ गुन्हे दाखल आहेत.
तसेच खोडारे पोलीस ठाणे जिल्हा गोंडा उत्तरप्रदेश येथील गु.रजि.नं. १५७/२०१६ भादवि कलम ३०७,३२६,५०४,५०६,३४ या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पाटील, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, सपोउनि साळुंखे, विलास मालशेटे, दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा, पोशि अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

सराईत घरफोडी चोरी करणारा आरोपी यांस कल्याण गुन्हे शाखा घटक-३ कडून शिताफीने अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात घरफोडी चोरी चा गु.रजि.नं ४३५/२१ भादंवि कलम ४५७,३८० प्रमाणे दि.१८.०८.२१ रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

प्रस्तुत गुन्ह्याच्या कल्याण गुन्हे शाखा, घटक-३ कडून समांतर तपास सुरू असताना गुन्हे शाखा घटक-३ कल्याणचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुप्त बातमीदारा मार्फत संशयित आरोपीची खात्रीशीर माहिती काढून संशयित आरोपीची अत्यंत गोपनीय रित्या ओळख पटवून त्याचा शोध घेऊन त्याचे नाव तमन उर्फ नरेंद्र बाबू भंडारी वय १९ वर्षे रा. रूम नं.१, गायकवाड चाळ क्र.३, गणपती मंदिरा जवळ , टिटवाळा पूर्व असे असल्याचे निष्पन्न करून त्याचा वेळेतच शोध घेऊन तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास करून त्याच्याकडे वरील नमूद गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला आहे, त्याच्याकडे एकूण ३८,०००/- रु. किंमतीचे विविध कंपनीचे एकूण ६ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे.

प्रस्तुत गुन्ह्यातील आरोपी याने विविध ठिकाणी घरफोडी चोरी केली आल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद आरोपीच्या गुन्हा अभिलेखाची पडताळणी केली असता त्याच्यावर कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गु.रजि.नं १२८/२१ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी मिळून आलेल्या मुद्देमालासह मानपाडा पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे.

प्रस्तुत गुन्ह्याच्या तपासाची कामगिरी मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणचे पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील, सपोनि भूषण एम.दायमा, पोउनि मोहन कळमकर, सपोउनि साळुंखे, विलास मालशेटे, पोहवा दत्ताराम भोसले, सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, मंगेश शिर्के, सुरेश निकुळे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा, पोशि अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी यांनी यशस्वीरित्या केलेली आहे.

सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारची याचिका फेटाळून अनिल देशमुखांना आणखी एक दणका दिला..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख गृहमंत्री पदावर असताना केलेल्या बदल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या सीबीआय चौकशीविरोधातील महाराष्ट्र सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडे ‘ईडी’ देशमुखांना चौकशीसाठी समन्स पाठवत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर राजीनामा दिलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात झालेल्या बदल्या आणि नियुक्तांची चौकशी करण्यासाठी सीबीआयला चौकशी करण्याची परवानगी देण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात राज्याने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने आज फेटाळून लावली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेटरबॉम्ब टाकून अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, सीबीआय केवळ विशिष्ट तथ्यांसंदर्भात कायद्याच्या गैरवापराबाबत चौकशी करेल असं आपण कशी अधोतरेखित करू शकतो ? ज्या पद्धतीने नियुक्त्या केल्या गेल्या तो तपासाचा विषय आहेत, हायकोर्टाने तपासाचे आदेश दिल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिल्यानंतर त्यात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे सुप्रीम कोर्टाने नमूद केले. तसेच त्यामुळे ही याचिका फेटाळण्यात आली. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यास नकार देणाऱ्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाविरोधात अनिल देशमुख यांनी केलेल्या याचिकेवर आज याच खंडपीठाची सुनावणी सुरू राहील.

तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर शूरवीर चिमाजी आप्पांचा अश्वारुढ पुतळा स्थानापन्न! लवकरच होणार प्रतिष्ठापना!

संपादक: मोईन सय्यद/भाईंदर, प्रतिनिधी

भाईंदर: तब्बल वीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर भाईंदर पश्चिमेकडील उत्तन चौक येथे जंजिरे धारावी किल्ले येथे चिमाची आप्पा यांचे स्मारक उभारले जाणार असून त्याकरिता त्यांचा अश्वारुढ पुतळा शहरात मागविण्यात आला असून 18 ऑगस्ट चिमाजी आप्पा यांच्या जन्म शताब्दी दिनाचा मुहूर्त साधून हा पुतळा धारावी किल्ल्याच्या स्मारकावर बसविण्यात आला असून किल्ल्याच्या परिसरातील सर्व विकास कार्य पूर्ण झाल्यानंतर या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

शूरवीर चिमाजी आप्पांचा थोडक्यात इतिहास:

अनंत बाळाजी भट तथा चिमाजी आप्पा ऊर्फ चिमणाजी आप्पा हे पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते.
बाजीरावांना पेशवाई मिळाल्यानंतर चिमाजी आप्पा यांना सरदारकी मिळाली. काही वर्षे त्यांनी अंबाजी त्रिंबक पुरंदरे यांच्यासह सातार्‍यास पेशव्यांचा वकील म्हणून काम केले. तसेच काही वेळा त्यांना मोहिमांवर जावे लागे. त्यांनी केलेल्या पहिल्या मोठ्या मोहिमेत आमझरे येथे झालेल्या लढाईत त्या वेळचा माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादुर व त्याचा नातेवाईक दया बहादुर यांना ठार करून सबंध माळवा आपल्या ताब्यात आणला (१७२८) आणि तो शिंदे, होळकर व पवार या तीन सरदारांत वाटूनही टाकला.

त्यानंतर १७२९ मध्ये पावसाळा संपल्यानंतर गुजरात प्रांतात चौथाई वसूल करण्यासाठी म्हणून चिमाजी आप्पा यांची स्वारी झाली. चिमाजी आप्पांच्या पराक्रमामुळे तेथील मोगल सरदार सरबुलंदखानाने शरणागती पतकरून मराठ्यांच्या चौथाई व सरदेशमुखीचे हक्क कबूल केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या आदेशानुसार कोकणात मराठी राज्यास त्रास देणार्‍या जंजिरेकर सिद्दी सात याचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणात स्वारी केली (१७३६). या स्वारीत सिद्दी सात यास ठार केले व कोकणात कायमचा वचक बसविला.

यावेळी बाजीराव उत्तरेत होते. ते परत येत असता निजामाने भोपाळजवळ त्यांस अडविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चिमाजी आप्पांनी निजामाला दक्षिणेतून येणारी मदत बंद करून जेरीस आणले, तेव्हा तो बाजीरावांस शरण आला.

चिमाजी आप्पा यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे पोर्तुगीज सत्तेविरुद्धची मोहीम आणि वसई हस्तगत करणे, ही होय (१७३७-३९). वसई प्रांतातील पोर्तुगीजांच्या धार्मिक छळाला कंटाळून तेथील जनतेने पेशव्यांकडे रक्षण करण्याची विनंती केली.

बाजीराव पेशव्यांनी चिमाजी आप्पांना या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेत मराठ्यांनी सुरुवातीला ठाणे, घोडबंदर, मनोर, पारसिक, अर्नाळा इत्यादी ठाणी जिंकून घेत पोर्तुगीजांना शह दिला. या मोहिमेची जबाबदारी प्रामुख्याने अणजूरकर बंधूंवर होती. काही दिवसांनी चिमाजी आप्पा यांना भोपाळच्या लढाईत निजामाविरुद्ध जावे लागले होते, त्यामुळे वसईची मोहीम अर्धवट राहिली. पुढे पावसाळा संपल्यानंतर नोव्हेंबर १७३७ मध्ये पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले.

माहीमचे ठाणे घेतल्यानंतर चिमाजी आप्पा पुन्हा एकदा आपल्या फौजेसह वसई प्रांतात दाखल झाले. काही दिवस मुक्काम केल्यानंतर चिमाजी पुण्यास परतले. त्यानंतर १७३८ चा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा थोरले बाजीराव पुण्यात आले, तेव्हा पुन्हा एकदा वसईवर हल्ला करण्याचे ठरवले. यानंतर प्रचंड फौज घेऊन चिमाजी आप्पा हे वसई प्रांतात उतरले.

यावेळी त्यांच्यासोबत मल्हारराव होळकर वगैरे सरदार सामील झाले होते. डिसेंबर महिन्यात पोर्तुगीजांचा सेनापती पिड्रो ड मेल हा मारला गेला. यानंतर मराठ्यांनी तारापूरचे ठाणे जिंकून घेतले (१७३९). मराठ्यांनी बाजी रेठेकरसारखा योद्धा गमावला. यानंतर केवळ वसईचे ठाणे घ्यायचे बाकी राहिले होते. ते काही हातात येईना, त्यामुळे चिमाजी आप्पा यांनी सर्व सरदारांना एकत्र बोलावले व सांगितले की, “वसई ताब्यात येत नाही, माझा हेतू वसई घ्यावी असा आहे, तरी तोफ डागून माझे मेलेले शरीर तरी वसई किल्ल्यात पडेल असे करा.” हे वीरश्रीयुक्त बोलणे सर्व सरदारांनी ऐकले आणि वसईवर निकराचा लढा केला. अटीतटीचा संघर्षानंतर शेवटी चिमाजी आप्पांनी वसई जिंकली व पोर्तुगीजांचे तेथील बस्तान पार उखडून टाकले.

मराठ्यांना पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला ३४० गावांचा प्रदेश, २० किल्ले, २५ लाखांचा दारूगोळा वगैरे साहित्य मिळाले. तितक्यात बाजीराव वारल्याची खबर चिमाजी आप्पांना मिळाली, त्यामुळे ते लगेच पुण्यात परतले. पुढे सातारा येथे छत्रपती शाहू महाराजांच्या करवी बाजीरावांचा थोरला मुलगा बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब (१७४०-६१) यांस मुख्य प्रधानपद मिळाले, तसेच वसई येथे केलेल्या पराक्रमामुळे चिमाजी आप्पा यांचा सन्मान करण्यात आला.

पुढे चिमाजी आप्पांनी यांनी दीव दमण प्रांतावर हल्ला करून तेथील उरलेल्या पोर्तुगीज सत्तेचा पराभव केला (१७४०). त्यामुळे पोर्तुगीज फक्त गोव्यापुरतेच मर्यादित राहिले. त्यानंतर नानासाहेब पेशवे यांना घेऊन चिमाजी आप्पा उत्तरेच्या स्वारीवर निघाले. चिमाजी आप्पांना क्षयाचा त्रास होता, त्यात या सर्व दगदगीमुळे त्यांची तब्येत अतिशय बिघडून १७ डिसेंबर १७४० रोजी एदलाबाद येथे त्यांचे निधन झाले. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात त्यांची समाधी आहे.

चिमाजी आप्पा हे काही बाबतींत थोरल्या बाजीराव पेशव्यांपेक्षा श्रेष्ठ तसेच शूर, धोरणी व मनमिळाऊ होते. बाजीरावांच्या अनुपस्थितीत घर आणि खासगी कारभार त्यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळले. वसईच्या किल्ल्यात सापडलेल्या एका फिरंग्याच्या मुलीला त्यांनी सन्मानाने पाठविल्याची हकिकत प्रसिद्ध आहे.

तब्बल वीस वर्षांनी दुर्गप्रेमींच्या प्रयत्नाला आले यश!

चिमाजी आप्पा यांनी भाईंदर पश्चिमेकडील चौक गावाच्या समुद्रकिनारी जंजिरे धारावी किल्ला, बुरुज व तटबंदी बांधली होती. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात त्याकडे भारतीय पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष झाले होते.

मीरा भाईंदर नगरपालिका असताना तत्कालीन नगराध्यक्ष गिल्बर्ट मेंडोंसा असताना नियोजन समितीचे सभापती लिओ कोलासो यांनी चिमाजी आप्पा यांच्या स्मारकासाठी विकास आराखड्यात 0.70 हेक्टर जागा आरक्षित करून 25 लाख रुपयांची तरतूद केली होती.

त्याच वेळी समाजसेवक व दुर्ग प्रेमी रोहित सुवर्णा यांनी देखील शूरवीर चिमाजी आप्पा यांच्या स्मारकाच्या उभारणी साठी प्रयत्न सुरू केले होते आणि गेल्या वीस वर्षांपासून सतत पाठपुरावा करीत असून या किल्ल्याच्या संरक्षण आणि संवर्धन करणेकरिता पाठपुरावा केला होता. चिमाजी आप्पा यांचा पुतळा बसविण्याची सर्वप्रथम मागणी त्यांनीच केली होती. परंतु येथील काही विरोधकांनी नगरपालिका, पुरातत्व खाते आणि प्रशासनाकडे त्याच्या विरोधात तक्रारी केल्यानंतर या किल्ल्याचा विकास रखडला होता. त्यानंतर मात्र माजी नगरसेवक जॉजी गोविंद आणि नगरसेविका हेलन जॉजी गोविंद यांनी या स्मारकाच्या विकासासाठी महानगरपालिकेकडे सतत पाठपुरावा केला.

मध्यंतरी भाईंदरच्या युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते गणेश बामणे, श्रेयस सावंत, महेश चव्हाण या दुर्गप्रेमी युवकांनी जंजिरे धारावी किल्ल्याची साफसफाई केली होती. त्यावेळी पुन्हा या किल्ल्याच्या परिसराच्या विकासाची मागणी जोर धरू लागली होती.

अखेर शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी प्रयत्न करून जिल्हाधिकाऱ्याची परवानगी मिळवून दिली आणि चिमाजी अप्पाच्या स्मारकाच्या निर्मिती चा मार्ग मोकळा झाला असून 17 ऑगस्ट रोजी चिमाजी आप्पा यांचा पुतळा मागविण्यात आला आणि आज 18 ऑगस्ट त्यांच्या जन्म शताब्दी रोजी हा अश्वारूढ पुतळा स्थानापन्न करण्यात आला.

याप्रसंगी स्थानिक नगरसेविका हेलन जोजी गोविंद, शर्मिला अजित गंडोळी, माजी नगरसेवक जोजी गोविंद, पोलीस पाटील विलियम गोविंद, माजी नगरसेवक व दुर्गप्रेमी रोहित सुवर्णा, एलयास बांड्या, पत्रकार मयूर ठाकूर इत्यादी उपस्थित होते. स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि परिसरातील सर्व सुशोभीकरणाचे कार्य पूर्ण झाल्यानंतर या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे.

मीरा भाईंदर शहराला एक गौरवशाली असा ऐतिहासिक वारसा लाभला असून या ऐतिहासिक वारशाचे मुख्य शिलेदार शूरवीर चिमाजी अप्पा यांच्या स्मारक उभारला जाणार असल्यामुळे इतिहास प्रेमी आणि दुर्गप्रेमी यांनी समाधान व्यक्त केले आहे.