Home Blog Page 209

ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत नवीन पोलीस भरती..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पोलीस आयुक्ताला ,ठाणे शहर पोलीस शिपाई भरती व चालक पोलीस शिपाई भरती सन २०१९
पोलीस आयुक्त ठाणे शहर आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गात १४७ रिक्त पदे व चालक पोलीस शिपाई संवर्गांचे १२६ रिक्त पदे भरण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य ,मुंबई यांचेकडील दि.३० /०७ /२०२१ रोजीच्या पत्रान्वये पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदांच्या जाहिरातीमध्ये सुधारणा करण्याबाबत दि.०५/०८/२०२१ रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सदर शुद्धिपत्रकानुसार उमेदवारांनी ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ तसेच एसईबीसी प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा विकल्प निवडण्याची सुविधा दि.१५/०८/२०२१ पर्यंत उपलब्ध रहाणार होती.

काही उमेदवारांनी त्यांची ई-मेल आयडी विसरलेला आहे किंवा अन्य कारणास्तव हरविले आहे. अशा प्रकारच्या तक्रारी पोलीस महासंचालक कार्यालयास व या कार्यालयास प्राप्त झालेल्या आहेत. त्या दृष्टीने अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दि.११/०८/२०२१ रोजी उमेदवारांसाठी ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ बदलणे तसेच एसईबीसी वर्गाचे विकल्प देण्यासाठी प्रसिद्धपत्रक देण्यात आलेले असून त्याकरिता दि.२२/०८/२०२१ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत मुदत वाढून देण्यात आलेली आहे. उमेदवारांच्या माहिती करता खालील प्रमाणे ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ बदलण्याची क्रमवारी देण्यात येत आहे.

१) उमेदवाराने प्रथम www.mhapolice.gov.in या संकेतस्थळावरील पोलीस कॉर्नर पोलीस भरती >पोलीस भरती -२०१९ हा ऑप्शन सिलेक्ट करावा.
२) पोलीस भरती-२०१९ हा ऑप्शन सिलेक्ट केल्या नंतर ठाणे शहर (thane city ) नाव असलेल्या रिक्रुटमंट लिंक वर क्लिक करावे.
३) रिक्रुटमंट लिंक वर क्लिक केल्या नंतर दर्शनी भागावर (display) guide to the portal > या वर ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ बदलणे तसेच एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्या उमेदवारांना आवेदन अर्जाबाबत ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ बदलणे तसेच एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुला किंवा ईडब्लूएस असा विकल्प निवडणे याबाबत अडचणी येत असतील अशा उमेदवारांनी वरील सूचनांचा लाभ घ्यावा.
४) उमेदवारांना काही अडचणी असल्यास १८००२१००३०९ या टोलफ्री हेल्पलाईन क्रमांकावर सोमवार ते शनिवार सकाळी ११:०० ते सायं ६:०० या वेळेत संपर्क साधावा.

मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी काढले ६५० ग्रॅम केस..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण मध्ये एका १२ वर्षीय मुलीच्या पोटातून शस्त्रक्रिया करून ६५० ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा काढण्यात कल्याण स्थित ‘स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालया’चे लॅपरोस्कोपीक सर्जन डॉ. रोहित परयानी यांनी यश मिळवले आहे. दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर पोटात असलेल्या आतड्यांतून हा केसांचा गोळा काढण्यात आला. याविषयी कल्याण पूर्व येथील ‘स्टारसिटी मल्टीस्पेशालिटी रुग्णालया’चे लॅपरोस्कोपीक सर्जन डॉ.रोहित परयानी यांनी सांगितले की, मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच केस खाण्याची सवय लागली होती. या सवयीला ‘ट्रायकोफेगिया’ असे म्हणतात. या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय मोडण्यास खूप प्रयत्न केले परंतु ती सवय काही सुटली नाही. गेल्या आठवड्या पासून तीच पोट दुखणे सुरू झाले होते, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा तिचे वजन फक्त २० किलो होते. या वयात किमान मुलांचे वजन ४० ते ४५ किलो असायला हवे असते. सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस दिसुन आले व गेल्या दोन महिन्यापासून तिला जेवण जात नव्हते.

पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी ‘लॅपरोस्कोपी’ पद्धतीचा अवलंब केला जातो परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की हा गोळा काढताना केस ‘लॅपरोस्कोपी मशीन’ मध्ये अडकण्याची भीती होती म्हणूनच डॉक्टरांनी ‘ओपन सर्जरी’चा मार्ग निवडला व हा केसाचा गोळा काढण्यात यश मिळवले. शस्त्रक्रियेनंतर मुलीला जेवताना पाहून तिच्या पालकांना खूप आनंद झाला. या केसाच्या गोळ्याला वैद्यकीय भाषेत ‘ट्रायकोबीझोअर’ म्हणतात. या दुर्मिळ प्रकारात केस खाल्ल्यामुळे असे गोळे तयार होतात. या केसांमुळे पोटाला ईजा होऊन पस देखील तयार होतो. जसजसा या गोळ्याचा आकार वाढायला लागतो, तसतशी पोटदुखी सुरु होते. अनेक वेळा योग्य निदान झाले नाही तर ती व्यक्ती बेशुद्ध पडू शकते असे लॅपरोस्कोपीक सर्जन डॉ.रोहित परयानी यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

ठाणे- पालघर जिल्ह्यातील तंझिम संघटनेची महाड-चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांना मदत!

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

२२ जुलै २०२१ दरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने  रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील महाड, चिपळूण परिसरातील बहुसंख्य गांवाना महापुरांचा फटका बसला असून अनेक गावांतील कुटूंब उध्वस्त होऊन जीवीत हानी ही मोठ्या प्रमाणात झाली आहे, या महापुरात उध्वस्त झालेल्या लोकांना अनेक सेवाभावी संस्थानी मदतीचा हात दिला आहे.

सर्वत्र मदतीचा ओघ वाढत असून, ठाणे-पालघर जिल्हा ग्रामीण येथील मुस्लिम उत्कर्ष संघटना (तंझिम) या संघटनेने कोकणातील महापुरात नुकसान झालेल्या कुंटूंबियांना अन्नधान्य, कपडे, औषधी व गरजू वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत, असे तंझिम संघटनेचे अध्यक्ष समीर डांगे यांनी एका लेखी पत्राद्वारे सांगीतले आहे.


महाड आणि चिपळूण मधील मोहल्ले पुरग्रस्त झाले असून तंझिम संघटनेचे पदाधिकारी येथील पांसरे, खारखेड मोहल्ला, मधारी नाका, कोंडवीते, राजवाडी, पेठमाप, मिठानगरी, तरे मोहल्ला, काशीगांव, मेबल मोहल्ला ह्या ठिकाणी पुराचे पाणी उतरत असतांना त्यात अडकलेल्या लोकांना अन्न- धान्य, खाऊ, पिण्याचे पाणी उपलब्ध करून येथील चिखलमय परिसरातील लोकांना आरोग्याचे दृष्टिने मोबाईल व्हँनसह डॉक्टर व औषधांचे वाटप करण्यात आले.


तंझिम मदत कार्याचे, मुंबई जामा मशिदीचे मुफ्ती अशफाक, अहमद काझी यांचे मार्फत चिपळूणचे मौलाना इलियास, मौलाना सादिक व नगरसेविका हमिदा शेखनाग यांनी कौतूक केले.
या कामात तंझिमचे सरचिटणीस ईस्माईल खान, शाहिद मुल्ला, तकी नाचन, शादाब पटेल, मोहसीन मुरूमकर, जुबेर बोटके, डॉ. इरफान पटेल यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोरोना काळातील भत्ते व अनेक मागण्या प्रलंबित; अंबरनाथमध्ये मनसेच्या कामगार सेनेचं आमरण उपोषण..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंबरनाथ नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मनसेच्या कामगार सेनेने अंबरनाथमध्ये ‘आमरण उपोषण’ सुरु केलं आहे. कोव्हीड भत्ता, सातव्या वेतन आयोगाचा फरक आणि अन्य मागण्या पूर्ण करण्याची मागणी या उपोषणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात

अंबरनाथ नगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचारी मिळून ७१४ कामगार कार्यरत आहेत. तर सेवानिवृत्त झालेल्यांची संख्या २५० ते ३०० च्या घरात आहे. या कामगारांना सातव्या वेतन आयोगाचा फरक अजूनही मिळालेला नाही. सेवेची १२ आणि २४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणारा भत्ता अजूनही मिळालेला नसून निवृत्त कर्मचारीही या भत्त्याच्या प्रतिक्षेत आहेत. तर कोव्हीडच्या काळात अक्षरशः घरावर तुळशीपत्र ठेवून काम करणाऱ्या या कामगारांना ‘कोव्हीड भत्ता’ अजूनही मिळालेला नाही.

अनुकंपा तत्त्वावरील भरती रखडल्याचा मनसेचा आरोप

अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रियाही रखडलेली आहे. या सगळ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ‘मनसे कामगार सेने’च्या माध्यमातून अनेकदा पत्रव्यवहार आणि आंदोलनं करण्यात आली. मात्र तरीही दरवेळी फक्त आश्वासनंच मिळाल्याचा कामगार सेनेचा आरोप आहे. त्यामुळेच आता अखेरचा पर्याय म्हणून कामगार सेनेने ‘आमरण उपोषण’ सुरु केलं आहे.

आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते आणि कामगारही सहभागी

कामगार सेनेचे अंबरनाथ पालिका युनिटचे अध्यक्ष सूर्यकांत अनार्थे आणि उल्हासनगरचे मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात मनसेचे कार्यकर्ते आणि कामगारही सहभागी झाले आहेत. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांकडून
प्रसार माध्यमांसमोर देण्यात आला आहे.

कोविड लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी असून पण अद्याप ट्रेनला पहिल्यासारखी गर्दी नाही..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्य सरकारकडून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १५ दिवस झाल्यानंतर लोकांना ट्रेनचे ट्रॅव्हल पास दिले जात आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांचे प्रमाण फारच कमी आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे सरकारने १५ ऑगस्टपासून मुंबईकरांना लोकाग्रहात्सव ‘लोकल ट्रेन’ने प्रवास करण्याची परवानगी दिली होती. परंतु, पहिल्या दोन दिवसांत निर्बंध शिथील होऊनही ट्रेनमध्ये पहिल्यासारखी गर्दी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्य सरकारकडून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस होऊन गेलेल्या लोकांना ट्रेनचे पास दिले जात आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांचे प्रमाण फारच कमी आहे. सध्या लोकल ट्रेनने ‘ज्येष्ठ नागरिक’ आणि ‘अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी’ मोठ्याप्रमाणावर प्रवास करताना दिसून येत आहेत. मात्र, त्यांना पूर्वीपासूनच लोकल प्रवासाची अनुमती होती. त्यामुळे ‘१५ ऑगस्ट’नंतर लोकल ट्रेन सामान्यांसाठी खुली होऊनही अजूनही गर्दीचे प्रमाण फारसे वाढलेले दिसून येत नाही.

मुंबईत सध्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २०३०५४९ इतकी आहे. तर ६७२३४८ ज्येष्ठ नागरिकांनी आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. कोरोना लसीचा दुसरा डोस पूर्ण झालेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या ८६४७१४ इतकी आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील १७३८२९ नागरिकांना आतापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.