Home Blog Page 210

कोकणातील चिपळूणच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जन संग्राम संस्थेचे भरीव कार्य

संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर प्रतिनिधी

जुलैमध्ये आलेल्या महापुरात कोकणातील अनेक जिल्ह्यातील शेकडो गावं पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे हजारों कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहेत. अशाच प्रकारे कोकणातील चिपळूण मधील हजारो कुटुंब बाधित होऊन उध्वस्त झाले आहेत.

चिपळूणमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा म्हणून जन संग्रामचे अध्यक्ष सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली तांदूळ, दाळ, बटाटे, साखर, चहा पावडर, तेल, फिनाईल, साबण तसेच महिला आणि मुलींसाठी साडी, पंजाबी असे कपड्याचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी जन संग्रामच्या रुची मोरे, मांडवी दुबे, तृप्ती सावंत, यश मोरे, ऋषभ साठे, समीर देसाई, अखिल ब्राम्हण प्रतिष्ठाणचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेशजी पांडे, महिला अध्यक्ष सुषमा मिश्रा, गुरुब्रम्हांचे संजय वरेकर, सुधीर आठले, चिपळूणचे दाबके आणि सुनील कुलकर्णी यांनी उपस्थित राहून पूरग्रस्तांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम केले.
जन संग्रामच्या या मदत कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

मॉलमध्येही आता मिळणार १८ वर्षाखालील मुला-मुलींना रात्री १० वाजेपर्यत असा प्रवेश..

प्रतिनिधी: अवधुत सावंत

# ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत सुधारीत मार्गदर्शक सूचना जारी..

अखेर राज्य सरकारने मॉल्सनाही रात्री १० वाजेपर्यत सुरु ठेवण्यास मान्यता दिली असून १८ वर्षा खालील मुला-मुलींचे अद्याप लसीकरण सुरु झालेले नसल्याने त्यांना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये आरोग्य विभागाने आज सुधारणा करण्यात आली. यासंदर्भात राज्य सरकारने सुधारीत आदेश आज जारी केले.

राज्यात १८ वर्षाखालील मुला-मुलींचे लसीकरणास अद्याप सुरूवात न झाल्याने १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेश देतांना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा आणि महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक असणार आहे, असे आज निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व शॉपींग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये काम करणारे कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झाल्याचे लसीकरण प्रमाणपत्र मॉलच्या प्रवेशद्वारावर दाखविण्याबाबत यापूर्वीच निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे.

 

‘डेल्टा प्लस’ विषाणूचे तीन प्रकार महाराष्ट्रात आढळून संसर्गाचा धोका वाढला..’

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्यात एकीकडे कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण होत असताना दिसत आहे. आता दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या ही ५ ते ६ हजारांच्या आसपास असल्याचं समोर येत आहे. ही आकडेवारी जरी जास्त असली तरी गेल्या काही दिवसांपूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र, असे असले तरी आता चिंता पुन्हा एकदा वाढल्याचे दिसून येत आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटने महाराष्ट्राची चिंता वाढवली आहे. ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटच्या तीन वेगवेगळ्या विषाणूंनी तज्ज्ञांची चिंता वाढवली आहे. तज्ज्ञांच्या मते, ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे नवं रूप इतकं खतरनाक आहे की याच्या संक्रमण दराच्या संदर्भात अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

अलीकडेच व्हायरसच्या जीनोम सिक्वेंसींगमध्ये असे दिसून आले आहे की, महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटचे एकूण ६६ रुग्ण आढळून आले आहेत. ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट ग्रुपचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. Ay.1, Ay.2 आणि Ay.3. आता तज्ज्ञांनी ‘डेल्टा प्लस’ विषाणूच्या आणखी १३ उप-वंशांचा शोध लावला आहे जो Ay.1, Ay.2 आणि Ay.3 पासून सुरू होतो आणि १३ पर्यंत आहे. ‘डेल्टा’ व्हेरिएंटमध्ये म्युटेशन झाल्यावर ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंट तयार होतो.

राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६६ वर पोहोचली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव जिल्ह्यात असून त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात ‘डेल्टा प्लस’ विषाणूचे रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत आढळून आलेल्या ६६ ‘डेल्टा प्लस’ रुग्णांपैकी ३२ पुरुष असून ३४ स्त्रिया आहेत असे आकडे समोर आले आहेत.

७५ व्या ‘स्वातंत्र्य दिनी’ जन्मलेल्या नवजात बाळांना मोफत कपडे,मोजे व बाळंतीणींना मास्कचे वाटप..

संपादक: मोईन सय्यद / /प्रतिनिधी: अवधुत सावंत

७५ वा ‘स्वातंत्र्य दिना’ निमित्त दिनांक १५/०८/२०२१ रोजी ‘कुराश असोसिएशन महाराष्ट्र सलग्न पोलिस मित्र समिती, महाराष्ट्र राज्य’ या संस्थेच्या वतीने आणि संस्थेचे अध्यक्ष श्री.किरण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने, डोंबिवली पश्चिमेकडील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर शासकीय रूग्णालयात ‘७५ व्या स्वातंत्र्य दिनी’ नुकत्याच जन्माला आलेल्या नवजात बालकांना नवीन कपडे, मोजे, आणि त्यांच्या आईला मास्क चे मोफत वाटप करण्यात आले.

हा कार्यक्रम डोंबिवलीतील ‘पोलीस मित्र समिती’ सदस्य श्री.विशाल विठ्ठल शेटे यांनी आयोजित केला आणि एकूण ५० नवजात बालकांना नवीन कपडे व मोजे आणि त्यांच्या मातांना मास्क चे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांच्या सोबत श्री.नितिन पवार, श्री.साईनाथ घनपट, श्री.कैलास सणस यांनी सहभाग घेतला.

मृतदेहाचे तुकडे करुन बोअरवलेमध्ये फेकले; एका सिगारेटसाठी अंगावर धावलेल्या मित्रावर कोयत्याने केले सपासप वार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सिगारेट आणण्यासाठी उशीर झाला म्हणून अंगावर धावून गेलेल्या मित्राची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगलीतल्या मिरजेमधील भोसे गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. इतकंच नव्हे तर हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकण्यात आले होते.

यानंतर मित्रांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान उघड झालेल्या प्रकारानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. २९ जुलैला पंढरपूर महामार्गावरील बंद कारखान्यात मित्रांनी दारु, अंडी पार्टीचं आयोजन केलं होतं. यावेळी सागर सावंत आणि अमोल खामकर सिगारेट आणण्यासाठी गेले होते. दोघांनाही येण्यास उशिर झाल्याने दत्ता झांबरे त्यांच्या अंगावर गेला. यावेळी चिडलेल्या सागर सावंतने कोयत्याने दत्ता झांबरेवर वार केले. यावेळी अमोलने दगड घेऊन त्याच्या डोक्यात घातला. यानंतर दोघांनी मृतदेहाचे तुकडे केले आणि बोअरवेलमध्ये टाकले.

पीडित दत्ता झांबरे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. आरोपींनी पोलीस ठाण्यात दत्ता झांबरे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता हत्या झाल्याचं उघड झालं. पोलिसांनी सागर आणि अमोल या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अमोल करोनाबाधित असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान सध्या पोलिसांसमोर मृतदेहाचे तुकडे मिळण्याचं आव्हान आहे.