Home Blog Page 217

‘जेईई’ मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिल्ली येथील ‘नॅशनल टेस्टींग एजन्सी’ म्हणजेच ‘एनटीए’ ने ‘जेईई’ च्या जुलै २०२१’ च्या मुख्यम परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. आज रात्री ८ वाजता हा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात आला आहे.

परीक्षार्थींना परीक्षेचा हा निकाल jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

एप्रिल २०२१ मध्ये ‘जेईई’ ची मुख्य परीक्षा होणार होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर, मुख्य परीक्षेच्या तिसऱ्या सत्रासाठी जुलै २०, २२, २५ आणि २७ रोजी (२०२१) ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी देशभरातून ७.०९ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

दरम्यान, एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात येते. इंग्लिश, हिन्दी, गुजराती, आसामी, बंगाली, कन्नड़, मल्याळम, मराठी, ओड़िया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, उर्दू भाषांचा यामध्ये समावेश आहे.

येत्या १७ ऑगस्टपासून पहिली ते सातवी ची शाळा सुरू होण्याचे संकेत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता राज्यातील बहुतांश जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे, आता लवकरच शाळांची घंटा वाजणार असल्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. पहिली ते सातवीचे वर्ग येत्या १७ ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. मात्र, यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरच अंमलबजावणी होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंचवीस जिल्ह्यांत अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा विचार करूनच शाळा १७ ऑगस्टपासून सुरू करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे. राज्य सरकारने ०१ ऑगस्टला :ब्रेक द चेन’ अंतर्गत जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शिक्षण विभागाकडे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे, शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे, त्यानंतर या निर्णयाची घोषणा होऊ शकते. ८ वी ते १० वीच्या शाळा या आधीच म्हणजे १५ जुलैपासून सुरू झाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर मार्च २०२० पासून राज्यातील शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होत्या.

राज्यात शाळा सुरू करण्याचा विचार सुरू असला तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि ‘डेल्टा व्हायरस’चा प्रादुर्भाव लक्षात घेऊनच उपाययोजना आखण्यात येत आहेत. यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. त्यानंतर, ज्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, त्याच जिल्ह्यात स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनंतरच शाळा सुरू करण्यात येतील, असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

राज्यात शाळा सुरू करण्याची घाई नको, त्यासाठी अजून काही काळ थांबावं लागेल, असे आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. परदेशात आणखी नवीन स्ट्रेन सापडले आहेत, त्यातच महाराष्ट्रात कोविडच्या केसेस अधिक आहेत. दुसरीकडे लहान मुलांवर लसीकरण ट्रायल सुरू आहे. त्यामुळे, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल, असे पवार यांनी सांगितले. त्यामुळे, शाळेची घंटा वाजायला आणखी अवधी असणार असल्याचे स्पष्ट होताना दिसत आहे.

तृतीयपंथी आणि वारांगना वंचित महिला यांच्या करीता रोटरी तर्फे मोफत लसीकरण मोहीम..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यास सर्व नागरिकांना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु या लसीकरणात समाजातील तृतीयपंथी आणि वारांगना महिला वंचित राहिलेल्या दिसून येत आहेत. म्हणून त्यांना रोटरी ३१४२ यांच्या वतीने व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट यांच्या सहकार्याने दि.०७ ऑगस्ट २०२१ ला मोफत लस देण्यात येणार आहे.

स्थळ: ऑप्टिलाईफ हॉस्पिटल
मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व)
दिनांक: ०७ ऑगस्ट २०२१
वेळ: दुपारी २ वाजता

दोन्ही पक्षाचे आमदार श्रेय लाटण्यासाठी काहीही करू शकतात; शिवसेनेचा मनसे-भाजप वर हल्लाबोल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना सतत पाठपुरावा करून विकासकामे पूर्ण करते, सुज्ञ नागरिक त्या कामांचे श्रेय आपोआपच देतात..

शिवसेनेने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनसे व भाजपाच्या कोणत्याही कामाचे श्रेय लाटण्याचा प्रवृत्तीवर हल्लाबोल केला. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्याच्या मंजूर निधीवरून शिवसेनेने कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर सडकून टिका केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेली किती तरी विकासकामे जनता पहात असून आमदार राजू पाटील यांनी आपले किमान एकतरी केलेले विकासकाम दाखवण्याचे जाहीर आव्हानही शिवसेनेने दिले आहे.

कल्याण-शिळ रस्त्याच्या पाहणीदरम्यान आमदार राजू पाटील यांनी आपण मंजूर केलेल्या रस्त्याचे श्रेय घेत असल्याचा आरोप केला होता. त्यावर शिवसेनेकडून आज पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन करण्यासह आमदार राजू पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकी आधी भाजपा चे तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठा गाजावाजा करत निधी मंजूर नसतानाच शहरभर रस्त्यांच्या काँक्रीटीकरण सारख्या कामाचे नारळ फोडले व नागरिकांची दिशाभूल केली. त्यामुळे या दोन्ही आमदारांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही सेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे तालुका प्रमूख प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले की खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रस्त्यांसाठी ३६० कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला आणि काही लोकांचा पोटशूळ उठला. त्यापैकी तब्बल १११ कोटी निधी हा कल्याण ग्रामीणमधील रस्त्यांसाठी मंजूर झालेला आहे.

त्याआधी डोंबिवली एमआयडीसीसाठी ११० कोटी, डोंबिवली शहरासाठी ५ कोटी तर ‘पीडब्ल्यूडी’ कडून मानपाडा रोडसाठी २७ कोटी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंजूर करून आणले आहेत.लवकरच या कामांना सुरुवात होईल.आज जरी या रस्त्यांची परिस्थिती बिकट असली तरी संपूर्ण वर्षभरात कायापालट होणार असल्याचा विश्वास प्रकाश म्हात्रे यांनी व्यक्त केला. तर शिवसेना आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे श्रेयासाठी काम करत नाही. काम केल्यावर जनता आपोआप त्याचे श्रेय त्यांना देते. त्यासाठी खासदारांना धडपड करायची आवश्यकता नाही असेही ठामपणे सांगितले.

विकासकामे तडीस नेण्यासाठी सकाळी लवकर उठावे लागते, संबंधित शासकीय विभागाकडे पाठपुरावा करावा लागतो. केवळ पत्र देऊन कामे होत नसल्याचा टोलाही म्हात्रे यांनी लगावला. तर मानपाडा रोडसाठी ‘पीडब्ल्यूडी’ ने मंजूर केलेला २७ कोटींचा निधी केवळ आपल्या एकट्यामूळे आल्याचा आमदार राजू पाटील यांचा दावा खोटा असल्याचे सांगत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचाही त्यामध्ये मोठा पाठपुरावा असल्याचे यावेळी सांगत संबंधित पत्रात दोघांची नावे असताना पाटील यांनी फक्त स्वतःचे नाव दाखवून श्रेय लाटण्याचा चुकीचा प्रयत्न केल्याचे प्रकाश म्हात्रे यांनी सांगितले.

शिवसेनेचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी आणि माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांनी सांगितले की कल्याण ग्रामीण मतदारसंघ शापित असल्याची चर्चा लोकं करतात. या मतदारसंघाला सद्या निष्क्रिय आमदार लाभल्याची टिका त्यांनी केली. तसेच राजू पाटील यांच्या पत्रामूळे नाही तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजूर झाल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या एवढी दूरदृष्टी असणारा लोकप्रतिनिधी आपण आजपर्यंत बघितला नसल्याचे सांगत राजू पाटील यांनी काय काम केले आहे ते सांगावे असा प्रश्न उपस्थित केला. तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्थायी समितीत मंजुरीसाठी आलेले ३३ कोटींचे रस्त्याचे काम सुनील जोशी यांच्या करवी थांबवले.असाही आरोप केला .

या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, युवासेना कल्याण जिल्हाधिकारी दिपेश म्हात्रे, कल्याण तालुका प्रमूख प्रकाश म्हात्रे, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे यांच्यासह योगेश म्हात्रे, राजेश कदम आदी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

कोकणातील म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची घोषणा ! ९७ टक्के घरं अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी!..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या दीड वर्षापासून राज्यातील जनता कोरोना च्या भीषण महामारीमुळे त्रस्त झालेली असताना आर्थिक अडचणीमुळे देखील सर्वसामान्य जनता हवालदील झाली आहे. उद्योगधंदे आणि आर्थिक नियोजन कोलमडल्यामुळे सामान्यांचं आर्थिक गणित बिघडलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर केली. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या जवळपास ८ हजार २०५ हजार घरांची आज घोषणा केली. या घरांपैकी तब्बल ९७ टक्के घरं ही अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखीव असतील, असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलं आहे.

याआधीची लॉटरी २०१८ मध्ये निघाली होती !

म्हाडाच्या इतर ठिकाणच्या सोडतींप्रमाणेच कोकण मंडळाची सोडतही गेल्या तीन वर्षांपासून रखडली होती. याआधीची म्हाडाची कोकण मंडळासाठीची सोडत २०१८ मध्ये ९ हजार ०१८ घरांसाठी निघाली होती. आता या महिन्यात ८ हजार २०५ घरांसाठी म्हाडाकडून लॉटरी काढली जाणार असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे.

गोरगरीबांसाठी घरं देण्याचं स्वप्न !

“या महिन्यात आम्ही ८ हजार २०५ घरांची कोकणात लॉटरी काढणार आहोत. त्यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी ७० टक्के, अल्प उत्पन्न गटासाठी २७ टक्के घरं आहेत. त्यामुळे एकूण ९७ टक्के घरं ही अल्प आणि अत्यल्प गटासाठी असणार आहेत. गोरगरीबांसाठी घरं द्यायची हे म्हाडाचं स्वप्न कोकणासाठी पूर्ण होणार आहे”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. कोकण मंडळातील या घरांसाठी दसऱ्यादरम्यान सोडत काढण्यात येणार आहे. लवकरच या प्रकल्पाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी दिली.