Home Blog Page 219

पोलीसांच्या नियुक्त्या व बदल्यांतील भ्रष्टाचारांची माहिती देण्यास सरकारचा नकार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘सीबीआय’ची सरकारविरोधात उच्च न्यायालयात धाव..

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्ह्याच्या तपासाप्रकरणी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी ‘सीबीआय’ने उच्च न्यायालयाकडे केली. पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सादर केलेल्या अहवालाशी संबंधित तपशिलाची मागणी राज्याच्या गुप्तचर विभागाकडे पत्रव्यवहाराद्वारे केली गेली. परंतु ही कागदपत्रे फोन टॅपिंग प्रकरणाशी संबंधित असल्याने ती उपलब्ध करण्यास सरकारतर्फे नकार दिला जात आहे. त्यामुळे ही कागदपत्रे उपलब्ध करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी ‘सीबीआय’ने याचिके द्वारे केली आहे.

देशमुख यांच्यावर दाखल गुन्ह्यातील पोलिसांच्या नियुक्त्या व बदल्यांमधील भ्रष्टाचाराशी संबंधित असलेला भाग वगळण्याची मागणी करणारी राज्य सरकारची याचिका उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात फेटाळली होती. माजी गृहमंत्री देशमुखांशी संबंधित पोलिसांच्या बदल्या व नियुक्त्यांबाबतच्या आरोपांची सीबीआयने चौकशी करावी, असेही न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले. न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देण्यासही नकार दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेही आदेशाला स्थगिती दिलेली नाही. असे असतानाही राज्य सरकारने उपरोक्त तपशील देण्यास नकार देणे हे उच्च न्यायालयाच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन असल्याचा आरोपही ‘सीबीआय’ने केला आहे.

‘ओला टॅक्सी’ चालकाच्या मारेकऱ्याला भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलिसांकडून अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘ओला टॅक्सी’ चालकाच्या मारेकऱ्याला भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे.
इतर दोन आरोपी अजूनही फरार असून त्यांचा तपास सुरू आहे.
३१ जुलैच्या रात्री ११ वाजता माणकोली ब्रिज येथे एक ओला टॅक्सी चालकाचा खून करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यापासून खळबळ उडाली होती. भिवंडी पोलीस या प्रकरणाचा तपस करत होते. मयत ‘ओला टॅक्सी’ चालकाचे नाव प्रभाकर गंजी (वय ४३ वर्षे) असून तो भिवंडीचाच राहणारा होता. अज्ञाताने गळा आवळून त्याचा खून केला होता.

भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ च्या पोलिसांकडून तांत्रिक तपस केला असता यातील मुख्य आरोपी संतोष रेड्डी हा गायत्री नगर भागात राहत असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मयताची पत्नी आणि तिची मैत्रीण तसेच ओळखीचा एक इसम नितेश वाला यांनी संगनमत करून संतोष रेड्डी याला प्रभाकरला मारण्याची सुपारी दिली असल्याचे कळले. यासाठी ४ लाखांपैकी एक लाख ऍडव्हान्स संतोष रेड्डी याला दिले गेले होते. याआधीही २७ जुलै ला प्रभाकरला मारण्यासाठी हे आरोपी गेले असता त्यांचा प्रयत्न फसला होता. यानंतर प्रभाकरच्या पत्नीने त्याच्या खुनासाठी संतोष रेड्डी यांच्याकडे तगादा लावल्याने त्याने ३१ जुलै रोजी प्रभाकरला फोन करून भाड्याने गाडी करून जाण्याच्या बहाण्याने गाडीत बसला आणि माणकोली ब्रिज वर गाडी थांबवून गळा आवळून प्रभाकरचा खून केला.
नंतर हे सर्व आरोपी फरार होते. संतोष रेड्डी या आरोपीला आज अटक करण्यात आली असून इतर दोघांचा भिवंडी गुन्हे शाखा घटक-२ चे पोलीस शोध घेत आहेत असे प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

शैक्षणिक क्षेत्रात खाजगी शाळांत ‘१५ टक्के फी माफी’चा घोळ..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत 

गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला खासगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के सवलत देण्याचे निर्देश दिले होते. कोरोना काळात उत्पन्न घटलेल्या पालकांना हा मोठा दिलासा असल्याचे मानले जात होते. सर्वोच्च न्यायालयात पालकांनी दाद मागितली होती. राजस्थान सरकार खासगी शाळांना १५ टक्के फी माफ करण्याचा आदेश काढू शकते, तर महाराष्ट्र सरकार का नाही, असा पालकांचा युक्तिवाद होता. मुंबई उच्च न्यायालयाने जरी पालकांना दिलासा दिला नाही, तरी सर्वोच्च न्यायालयाने तो दिला. सर्वोच्च न्यायालयाने निर्देशाची अंमलबजावणी करण्यासाठी विहित मुदत घालून दिली असली, तरी राज्य सरकारने निर्देशाची तातडीने अंमलबजाणी करायला हवी होती, परंतु सरकारने फक्त २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांचे खासगी शाळांचे शुल्क १५ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्याने अवघ्या दोनच दिवसांत शासन आदेश काढले. परंतु १५ टक्के शैक्षणिक शुल्क माफीच्या निर्णयाचा कोणताही बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार नसताना राज्य सरकारने सात दिवसांत अजून आदेश काढलेला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर खासगी शिक्षण संस्थांनी त्याविरोधात काहूर उठविले. राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्याची भाषा वापरली. वास्तविक गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे ग्रंथालये, मैदान, परीक्षांसह अन्य सुविधांचा वापर होत नाही. आॅनलाईनच्या नावाखाली किती शिकविले जाते, कसे शिकविले जाते आणि त्याचा विद्यार्थ्यांना कितपत फायदा होतो, हा वेगळ्या संशोधनाचा भाग आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार १५ टक्के शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलायला हवी होती. महाधिवक्ता आशुतोष कुंभकर्ण यांचा सल्ला घेऊन राज्य सरकार तातडीने आदेश काढणार होते. ‘तातडी’ची व्याख्या काय हे एकदा राज्य सरकारने स्पष्ट करायला हवे. अगोदरच शाळा बंद असल्याने शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन करता येत नाही, विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी झाल्याने फी वसुलीही फारशी होत नाही, अशा तक्रारी खासगी शिक्षण संस्था चालक करतात. आतापुरत्या त्या खऱ्याही असतील. परंतु यापूर्वी त्यांनी मनमानी पद्धतीने वसूल केलेल्या शुल्काचे काय ? हा प्रश्न उरतोच. कोरोनामुळे आम्ही अगोदरच २५ टक्के शैक्षणिक शुल्क कमी केले आहे, असे संस्थाचालक म्हणत असतील, तर खरेच त्यांनी तसे केले का, शैक्षणिक शुल्क अगोदर वाढवून नंतर कमी केले का ? या प्रश्नांची उत्तरे सरकारला आधी शोधावी लागतील.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांत अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींचे पगार कमी झाले. अशा वेळी शैक्षणिक संस्थांनी पालकांची कोंडी केली. मुलांचे दाखले दिले नाहीत. पनवेलमध्ये तर पालकांना कोंडून ठेवण्याचा प्रकार घडला. राज्य सरकारने दाखले देण्याबाबत पालकांची अडवणूक करू नका, असे स्पष्ट आदेश देऊनही शाळा त्याची अंमलबजावणी करीत नाहीत. खासगी शैक्षणिक संस्थांच्या या मनमानीला चाप लावण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर शुल्कात १५ टक्के कपात करण्याबरोबरच शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांला ऑनलाइन किंवा तत्सम वर्गातून बेदखल करण्यास न्यायालयाने शाळांना मनाई केली आहे. ‘शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमा’त अध्यादेशाद्वारे सुधारणा करण्यात येईल,’ असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी सांगितले होते. ज्या पालकांनी वर्षांच्या सुरुवातीलाच संपूर्ण सत्राचे वा वर्षांचे शुल्क भरले आहे, त्यांनाही या अध्यादेशाद्वारे दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. हे अतिरिक्त शुल्क पुढील सत्रात किंवा वर्षांत समायोजित करण्याचे आदेश सरकार देऊ शकते. खासगी शिक्षण संस्थांच्या शैक्षणिक शुल्क माफीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला नाहीत, असे सांगितले गेले; परंतु कोरोना काळात राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळा बंद असल्याने शाळांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारला मर्यादित अधिकार आहे. शिवाय आता सर्वोच्च न्यायालयानेच निकाल दिल्याने तसा अधिकाराचा प्रश्न ही प्रश्न उरलेला नव्हता. राजस्थान सरकार विरुद्ध खासगी संस्थाचालक या निकालाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्याच मे, २०२१ मध्ये दिलेल्या निकालाचा संदर्भ न्यायालयाने दिला होता. कोरोनामुळे शाळा ऑनलाइन सुरू असल्याने शाळेतील अनेक भौतिक सुविधांचा वापर होत नाही. त्यामुळे या सुविधांचे शुल्क घेण्यात येऊ नये, अशी पालकांची मागणी आहे. त्यातच टाळेबंदीमुळे अनेक पालकांचे उत्पन्न बुडाल्याने शुल्कात कपात करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. काही शाळा तर वर्षभराचे शुल्क वसूल केल्याशिवाय मुलांना ऑनलाइन वर्गात सहभागी करून घेत नाहीत. त्या सर्व बाबींचा विचार करून सरकारने शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने जो अध्यादेश काढायला हवा होता, तो काढला नाही. कायद्यानुसार प्रत्येक शाळेत असलेल्या ‘पालक-शिक्षक संघटणा’च्या कार्यकारी समितीला संबंधित शाळेचे शुल्क ठरविण्याचे अधिकार आहेत. खासगी संस्थांसाठी खर्चावर आधारित शुल्क ठरते. शाळेच्या समितीने ठरवून दिलेल्या शुल्काबाबत वाद असल्यास ‘विभागीय शुल्क नियामक समिती’कडे पालकांना दाद मागता येते, तरीही शुल्कासंदर्भातील वाद न मिटल्यास ‘राज्यस्तरीय पुनरीक्षण समिती’कडे हा प्रश्न सोपविला जातो मात्र कायद्यातील काही तरतुदींमुळे पालक-शिक्षक संघाने ठरवून दिलेल्या शुल्करचनेविरोधात विभागीय किंवा राज्यस्तरीय समितीकडे दाद मागणे कठीण बनते. दुसरीकडे, या वादात राज्य सरकारलाही फारसा हस्तक्षेप करता येत नाही, असा बचाव शैक्षणिक संस्था करतात; परंतु त्याला काही अर्थ नाही.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी खासगी शाळांच्या शैक्षणिक शुल्कात (फी) पंधरा टक्के कपातीची घोषणा केली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे या घोषणेची अंमलबजावणी रखडल्याचे सूत्रांकडून समजते. शिक्षणमंत्र्यांची घोषणा अंमलात आणण्यासाठी अध्यादेश काढावा की शासन निर्णय जारी करावा याचा निर्णय अद्याप झालेला नाही. शासन निर्णय जारी केला, तर खासगी शिक्षण संस्थांचे चालक या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता आहे. अध्यादेश काढावा तर सर्वोच्च न्यायालयाने तशी स्पष्ट सूचना दिलेली नाही. यामुळे शिक्षण विभागाचे अधिकारी गोंधळात पडले आहेत. अधिकारी परस्पर चर्चेतून हा प्रश्न सोडवण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अद्याप मार्ग निघालेला नाही. जोपर्यंत अध्यादेश किंवा शासन निर्णय यापैकी काहीही जारी होत नाही तोपर्यंत खासगी शाळांवर शुल्क कपातीची सक्ती सरकारकडून होणार नाही. शिवाय निर्णय जारी झाला तरी ज्यांनी आधीच यंदाच्या शैक्षणिक वर्षाची फी भरली आहे, त्यांना सवलतीचा लाभ कसा मिळणार हा एक अनुत्तरित प्रश्न उपस्थित आहे.

मनसुख हिरेनला 45 लाखांची सुपारी देऊन ठार मारण्यात आले? फन्डिंग कुणी केली? केंद्रीय तपास यंत्रणांची दिल्लीत जाऊनही केली चौकशी

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ आढळून आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी एक नवीन खुलासा समोर आला आहे. मंगळवारी न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सांगितले की, मनसुखला ठार मारण्यासाठी 45 लाख रुपये देण्यात आले होते. एनआयएने या प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी 30 दिवसांची वेळ मागितली आहे.

9 जून रोजी विशेष न्यायालयाने एनआयएला मनसुख प्रकरणी आरोपपत्र सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली होती. एनआयएचे म्हणणे आहे की, या प्रकरणात पैसे कोणी दिले हे शोधण्याची गरज आहे. तपास यंत्रणेने असेही सांगितले की, आतापर्यंत 150 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. एका टीमने तपासासाठी दिल्लीला जाऊन काही लोकांची चौकशीही केली आहे.

मनसुख हिरेनच्या हत्येमुळे कुणाला फायदा होऊ शकतो? किंवा त्याचे कुणाशी काही वाद-विवाद होते का? या सर्व बाबी तपास यंत्रणा तपासून पाहात आहेत.

केरळमध्ये एव्हढ्या झपाट्यानं का वाढला कोरोनाचा संसर्ग?

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

भारताच्या दक्षिण टोकाला असलेल्या केरळमध्ये देशातल्या कोरोना रुग्णांपैकी निम्मे रुग्ण आहेत. लसीकरण मोहीम, नियमांचं पालन असं सगळं असतानाही केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे? हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी 2020 मध्ये केरळमध्ये भारताचा पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. चीनमधल्या वुहान इथे शिकत असलेला वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला होता. देशातल्या कोरोना संसर्गाची ती सुरुवात होती. केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली आणि ते हॉटस्पॉट बनलं. मार्च 2020 पर्यंत देशातल्या अधिक राज्यांमध्ये केरळपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती.

टेस्ट-ट्रेस-आयसोलेट या त्रिसुत्रीला प्रमाण मानत केरळने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कोरोना वाढीला आळा घेतला. कोरोनाचा आलेख घसरणीला लागल्याचं चित्र केरळने देशाने दाखवलं होतं. कोरोनाच्या पहिल्या लाटेत केरळने विषाणूला रोखण्यात यश मिळवलं. कोरोना मृत्यूदरही कमी होता. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केरळमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्याने वाढलं. ऑगस्ट महिन्यात देशाच्या अनेक भागांमध्ये कोरोना वाढीला आळा घातल्याचं चित्र असताना केरळमध्ये मात्र कोरोना शमण्याची चिन्हं नाहीत. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केरळमध्ये केवळ तीन टक्के लोकसंख्या राहते परंतु कोरोना रुग्णांच्या बाबतीत हेच प्रमाण व्यस्त आहे. देशातल्या कोरोना रुग्णसंख्येपैकी निम्म्यापेक्षा जास्त टक्के रुग्ण केरळमध्ये आहेत. कोरोना विषाणूची पुनरुत्पादनाच्या क्षमतेतून विषाणूची लोकांना संक्रमित करण्याची क्षमता वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. सोप्या शब्दात कोरोनाच्या एका विषाणूने एकापेक्षा जास्त माणसांना संक्रमित केलं आहे.

याचा परिणाम म्हणजे कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली झपाट्याने वाढ. हे रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि अन्य काही उपाय करणं आवश्यक आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह आढळणाऱ्या लोकांचं प्रमाण दर महिन्याला 10 टक्के एवढं आहे. केरळ राज्यात आतापर्यंत 3.4 दशलक्ष लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 16,837 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भीतीदायक वाटणारे हे आकडे खरी कहाणी उघड करून सांगत नाहीत असं संसर्गतज्ज्ञांचं म्हणणं आहे.