मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात सहआरोपी असलेले पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांना पुढील सुनावणीपर्यंत अटक केली जाणार नाही, अशी हमी राज्य सरकारतर्फे मे. उच्च न्यायालयात देण्यात आली. पठाण यांनी अटकेपासून दिलासा देण्याच्या आणि गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पठाण यांच्या याचिकेवरील पुढील सुनावणी ५ ऑगस्टला ठेवली आहे. तोपर्यंत पठाण यांना अटक केली जाणार नाही, अशी हमी मुंबई पोलिसां तर्फे देण्यात आली आहे. मीरा भाईंदरचे विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मरिन ड्राईव्ह पोलिसांनी परमबीर सिंह, अकबर पठाण आणि आणखी इतर चारजणां विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी मिरा भाईंदरच्या शिवसेनेच्या आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनमिया आणि विकासक सुनील जैन यांना अटक करण्यात आली असून या दोघांना आधी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यामध्ये आणखी सात दिवसांची वाढ करण्यात आली असून मुंबई पोलीस त्यांची कसून चौकशी करीत आहेत.
डोंबिवलीतील ‘नार्वेकर ज्वेलर्स’ यांच्या दुकानात सोन्याचे दागिने खरेदी करून दुकानदाराला बँकेतून ‘एनईएफटी’ द्वारे पैसे पाठवले आहेत असा मोबाईल वर खोटा संदेश दाखवून व बनावट धनादेश देऊन सोन्याची खरेदी करून अनोळखी आरोपी फरार झाला होता. त्याबाबत डोंबिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २९/०७/२१ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘सीसीटीव्ही’ फुटेज व मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हे शाखा घटक-३ कल्याणच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासांच्या आत आरोपी विनय राजेश लोहिरे (वय: ३८ वर्ष) राहणार: अंबरनाथ, जिल्हा: ठाणे याचा अंबरनाथ परिसरात शोध घेऊन शिताफीने पकडून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली नेमलेल्या पथकातील सपोनि भूषण दायमा, पोउपनि नितीन मुदगन, पोउपनि मोहन कळमकर, विलास मालशेटे, पोलीस हवालदार अरविंद पवार, निवृत्ती थेरे, सुरेश निकुळे, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, राजेंद्र घोलप, मंगेश शिर्के, अजित राजपूत, सचिन साळवी, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा हे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी कारवाई मध्ये उपस्थित होते.
राज्य शासनाचा २०२१ सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, या शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करणे हा राज्य सरकारचा बहुमानच असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी संगीतकार राहुल रानडे यांच्यासह सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. देशमुख यांनी यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुष्पगुच्छ, महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याचा शासन निर्णय, आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ हे पुस्तक आणि महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असलेल्या ‘लोकराज्य’ यावेळी भेट म्हणून देण्यात आले.
‘भारतरत्न’ लता मंगेशकर आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झालेल्या आशा भोसले या संगीतातील एक चमत्कार आणि दैवी शक्ती आहेत. आणि त्यामुळेच आशा भोसले यांची एकमताने या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. राज्य शासन महाराष्ट्रात संगीत विद्यापीठ सुरू करण्यासंदर्भात आग्रही असून यासाठी संगीतातले दिग्गज यांची मदत घेतली जाणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.
२२ रुग्णालयांनी अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत न केल्याचे झाले उघड
कोरोना बाधित रुग्णांकडून अतिरिक्त देयक वसूल केल्याची बाब लेखापरीक्षक विभागाच्या विशेष पथकाने केलेल्या तपासणीत उघड होताच महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित रुग्णालयांना नोटिसा बजावून रुग्णांना अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही शहरातील २२ खासगी कोरोना रुग्णालयांनी रुग्णांना एकूण १ कोटी १४ लाख २८ हजार १२३ रुपयांची रक्कम परत केली नसल्याचे समोर आले आहे.
अशा रुग्णालयांना आरोग्य विभागाने पुन्हा नोटिसा बजावून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर रुग्णांना पैसे दिल्यानंतरच रुग्णालयांची नोंदणी नव्याने करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णांवर उपचार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे पुरेशी आरोग्य यंत्रणा नव्हती. रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशातून महापालिका प्रशासनाने शहरातील काही खासगी रुग्णालयांना कोविड रुग्णालयाची मान्यता दिली होती. यापैकी काही रुग्णालयांकडून अवाजवी देयके आकारून रुग्णांची लूटमार केली जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने लेखापरीक्षक विभागाचे विशेष पथक नेमले होते. या पथकामार्फत रुग्णांकडून वसूल करण्यात आलेल्या सर्वच देयकांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये रुग्णांकडून जास्तीची रक्कम वसूल करण्यात आल्याचे समोर आले. या सर्वच रुग्णालयांना नोटिसा बजावून स्पष्टीकरण देण्याचे आदेश आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिले होते.
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून २५ जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.
राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात २५ जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथे सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.
राज्यातील दुकांनाच्या वेळेत बदल होऊ शकतात. तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे म्हणाले की, ‘राज्यात शनिवार, रविवार दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यात बदल करून शनिवारी दुकाने ३ ते ४ वाजेपर्यंत चालू ठेवता येऊ शकतात. तसेच आठवड्याला (सोमवार ते शुक्रवार) दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती त्यात वाढ करून रात्री ९ वाजेपर्यंत सुरू करता येऊ शकतात. रेस्टॉरंट, चित्रपटगृह, सलून, जिम हे ५० टक्के सुरू करता येईल. पण अशा ठिकाणी एसी नको, खेळती हवा असली पाहिजे. तसेच खासगी ऑफिस ५० टक्के सुरू करायला पाहिजे. रेस्टॉरंटमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यास काही हरकत नाही’.
अकरा जिल्ह्यांत निर्बंध कायम..
राज्यातील अकरा जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितले.
लोकल सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसात..
सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी यांच लसीकरण पूर्णपणे करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबत चा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे यांनी आवर्जून सांगितले. लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.