Home Blog Page 222

शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपात, पालकांना दिलासा; निर्णय खाजगी शाळांना देखील लागू.. !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य मंत्रिमंडळाने देखील शालेय शुल्क १५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भात निर्णय जाहीर केला आहे. महत्वाचे म्हणजे हा निर्णय खाजगी शाळांना देखील लागू असणार असल्याचा अद्यादेश राज्य सरकार लवकरच काढणार आहे.

राजस्थानमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या प्रकरणामध्ये जो निकष ठेवण्यात आला आहे. त्याच निकषानुसार राज्यातही शालेय शुल्क कपात करण्यता आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना फार मोठा दिलासा मिळेल याबाबत अध्यादेश राज्य सरकारद्वारे दोन दिवसांत जारी करण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे आता खासगी शाळांच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ८५ टक्के फी भरावी लागणार आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे खासगी शाळांच्या फी वाढीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील खासगी शाळा १५ टक्के फी कपात करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना प्रश्न केला असता त्यांनी राज्य सरकारचा हा निर्णय यंदा लागू असणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे खासगी शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपातीचा अध्यादेश काढण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खासगी शाळांच्या फी मध्ये १५ टक्के कपात करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दोन दिवसांत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. राज्य सरकारच्या आदेशामुळे खासगी शाळांची फी १५ टक्के कपात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला सुद्धा राजस्थानप्रमाणे १५ टक्के फी कपातीचा निर्णय घ्यावा असे आदेश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मोठी बातमी; साडेसात कोटी पीएफ ग्राहकांना.. जाणून घ्या..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक चांगली आणि मोठी बातमी आहे. मोदी सरकार या आठवड्यात साडेसात कोटी पीएफधारकांना चांगली बातमी देणार आहे.

बातमीनुसार, केंद्र सरकार पीएफ खात्यात व्याजाची रक्कम ३१ जुलैपर्यंत ठेवू शकते. खरेतर, अलीकडेच, केंद्र सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी ८.५ टक्के व्याज मंजूर केले. आणि आता अशी अपेक्षा आहे की या आठवड्यात ही रक्कम सुमारे ६.५ कोटी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा होईल.

कामगार मंत्रालयाच्या मंजुरीनंतर, ८.५% दराने ‘ईपीएफओ’ ग्राहकांच्या खात्यात पैसे जमा होतील. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये शेवटच्या वेळी KYC च्या गोंधळांमुळे बर्‍याच सदस्यांना बराच काळ थांबावे लागले.

नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित नाही – संजय राऊत

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

उत्तर प्रदेशात शिवसेना स्वबळावर लढणार..

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरण उचलून धरलं आहे. या प्रकरणावरुन आता शिवसेना नेते संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. संसदेत पेगासस प्रकरणावर चर्चा व्हावी आणि या चर्चेला पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेत उपस्थित रहावं एवढीच आमची मागणी आहे. पण देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकारकडे वेळ नसेल, तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर आरोप केले. मोदी सरकारचा संसदीय लोकशाहीवर विश्वासच नाही, हे तुम्हाला सरकार सत्तेत आल्यापासून जाणवत असेल. संसद चालवणं सरकारची जबाबदारी असते, पण त्यांची ही इच्छा दिसत नाही. पेगाससच्या चर्चेबाबत विरोधकांची मागणी साधी आहे. चर्चेवेळी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी उपस्थित राहावं, त्यानंतर न्यायालयीन चौकशी नेमायची किंवा जेपीसी नेमायची का हा नंतरचा विषय आहे, असं राऊत म्हणाले.

पेगासस हेरगिरी हा विषय राष्ट्रीय सुरक्षा, देशाची अंतर्गत सुरक्षा आणि नागरिकांचं स्वातंत्र्य याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ते ऐकलं पाहिजे. सरकार त्यापासून का पळ काढत आहे ? इतक्या गंभीर विषयावर देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेला तीन तास देऊ शकत नाही का? आम्ही त्यांचे फक्त तीन तास मागत आहोत तेही देशासाठी. आणि सरकार तीन तास देशासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी द्यायला तयार नसेल तर या सरकारच्या हातात राष्ट्र सुरक्षित नाही, अशी टीका राऊत यांनी यावेळी बोलताना केली.

अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधक संसद योग्यरित्या चालू देत नसल्याचा आरोप सरकारकडून होताना दिसत आहे. पण, संजय राऊत यांनी यासाठी सरकारलाच जबाबदार धरलं आहे. सरकार विरोधी पक्षांवर ठपका ठेवत हे, मुळात सरकारलाच संसद चालू द्यायची नाही. सरकारला पेगाससवर सत्य ऐकण्याची भिती वाटते. पेगासस असेल, कृषी कायदे असेल, विरोध पक्ष हा जनतेचा आवाज असतो. त्याचं ऐकणं लोकशाहीत प्रत्येक सरकारला बंधनकारक जरी असलं तरी केंद्रातलं सरकार त्या संदर्भात सतत माघार घेताना दिसतंय. विरोधकांना गोंधळ घालण्यास सरकारच प्रवृत्त करतंय, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.

उत्तर प्रदेशात शिवसेना स्वबळावर लढणार..

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाला पराभूत करण्यासाठी समाजवादी पार्टी, राष्ट्रवादी आणि राजदने आघाडी केली आहे. पण, या आघाडीपासून शिवसेनेनं दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीवरही बोलले. सपा, राष्ट्रवादी, राजदची आघाडी होत असली तरी उत्तर प्रदेश बाबत आमची काही भूमिका नाही. सपा, राष्ट्रवादी आणि राजदच्या आघाडीला पाठिंबा का द्यावा ? .. असा सवालच त्यांनी बोलताना उपस्थित केला. तसेच, शिवसेना निवडणूक लढवेल, पण स्वतंत्रपणे लढवेल. त्यांची आघाडी त्यांच्यापाशी. त्यांच्या आघाडीला शुभेच्छा. आम्ही उत्तर प्रदेशात आमच्या ताकदीनुसार निवडणूक लढवतोय, असंही ते म्हणाले.

मिरा भाईंदर महानगरपालिकेत कोरोना चाचणीच्या किट खरेदीमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार? आयुक्त दिलीप ढोलेंची भूमिका संशयास्पद?

संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी

भाईंदर: एकीकडे मिरा भाईंदर महानगरपालिका कोट्यवधीच्या कर्जात बुडालेली असताना आणि महानगरपालिका नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अपयशी ठरली असताना महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मात्र कोरोना महामारीच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जात असल्याचे आता उघड झाले आहे.

यापूर्वी भाड्याने घेतलेल्या रुगणवाहिका, वाहने, कोरोना सेंटर मधील साहित्य यांच्या खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे आरोप झाले आहेत तर अशाच प्रकारे आता मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून कोरोना चाचणीच्या टेस्टिंग किटच्या खरेदीत देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे उघड झाले असून कोरोना चाचणीच्या टेस्टिंग किट खरेदीवर गेल्या वर्षभरात जवळपास साडेसात कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती समोर आलेली आहे.

कोरोना आजाराचा प्रभाव आणि प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत त्यापैकी मुख्य म्हणजे शहरातील सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या कोरोनाच्या अँटीजेन व आरटीपीसीआर चाचणीवर जास्त भर देणे; त्याकरिता महानगरपालिकेकडून अनेक ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग किट खरेदी केल्या गेल्या आहेत. परंतु आता या टेस्टिंग किट बोगस नावावर नोंदवून किटचा वापर कागदोपत्री वाढवून दाखविले जात असून किटच्या खरेदीवर कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत.

ज्या नागरिकांना यापूर्वी कोरोना झालेला होता किंवा ज्या नागरिकांनी यापूर्वी कोरोनाची चाचणी करून घेतली आहे त्या नागरिकांची माहिती, उदा. मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, जन्म तारीख ई. पुन्हा वापरून त्यांची आता पुन्हा एकदा कोरोना चाचणी केल्याची नोंद करून टेस्टिंग किटचा वापर कृत्रिम रित्या वाढविला जात असल्याचे उघड झाले आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी अनेक नागरिक हे गेल्या अनेक महिन्यापासून शहराच्या बाहेर असून देखील आत्ता त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन कोरोना चाचणी केल्याची नोंद केली असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयातील वेगवेगळ्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे मोबाईल फोन वापरून नागरिकांच्या कोरोना चाचणीच्या नोंदी केल्या जात आहेत.

याबाबत आम्ही काही नागरिकांच्या नोंदणीची शहानिशा केली असता त्यांना आता नव्याने कोरोना चाचणी केली असल्याचे मेसेज आणि ईमेल दोन ते तीन वेळा आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर त्यापैकी काही जण तर म्हणाले की आम्ही गेली अनेक महिने शहराच्या बाहेर असूनही आमच्या नावाने पुन्हा कोरोनाची चाचणी कशी केली जात आहे? याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

या सर्व प्रकाराबद्दल आम्ही मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही डॉक्टर, परिचारिका आणि सार्वजनिक आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी या संदर्भात विचारणा केली असता ही नोंदणी आम्हांला आमच्या वरिष्ठांनी आमच्या मोबाईल वरून करण्यासाठी संगितले असल्याचे त्यांनी सांगितले तर त्याबद्दल काही लेखी आदेश आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला असता फक्त तोंडी आदेश देऊन ह्या सर्व नोंदी जुन्या आहेत फक्त त्यांची एन्ट्री करायची राहून गेली होती म्हणून ती आता केली जात असल्याचे थातुरमातुर उत्तर दिले आहे. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रकाश जाधव यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही आणि त्यांनी आमचा फोन देखील उचलला नाही.

महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भूमिका संशयास्पद!

तर अशा प्रकारे कोरोना चाचणीच्या नावावर नागरिकांच्या बोगस नोंदणी करून कोरोना चाचणीच्या किटचा वापर कागदोपत्री वाढवून दाखविला जात असून यामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कठीण काळात देखील शहरातील कोव्हीड सेंटर मधील साहित्य खरेदी आणि वाहनांचे भाडे यामध्ये 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा जाहीर आरोप माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेत केला होता त्याबाबत त्यांनी अनेक पुरावे देखील सादर केले होते परंतु त्या भ्रष्टाचारावर अद्यापही साधी चौकशी देखील करण्याची तसदी आयुक्तांनी घेतलेली नाही आणि आता कोरोना चाचणी टेस्टिंग किटच्या खरेदीत देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जात असून देखील या सर्व प्रकाराकडे आयुक्त ढोले ‘अर्थपूर्ण’ रित्या कानाडोळा करीत आहेत त्यामुळे या सर्व प्रकरणात आयुक्तांची भूमिका संशयास्पद दिसत आहे.

कर्जबाजारीपणामुळे आधीच महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शासनाकडून येणारे अनुदान आणि इतर निधी देखील आता येण्याचे बंद झाले आहेत. अशाच प्रकारे यापुढे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने भविष्यात देखील आणखीन कोरोना चाचणीच्या किट खरेदी केल्या जाण्याची शक्यता असून त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जर हा भ्रष्टाचार यापुढे ही असाच चालू राहिला तर महानगरपालिकेचा आर्थिक डोलारा कोणत्याही क्षणी ढासळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच प्रमाणे भविष्यात जर शहरात काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर महानगरपालिकेचा कारभार चालणार कसा? हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आता यापुढे तरी आयुक्त सार्वजनिक आरोग्य विभागातील या सर्व भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी काही ठोस निर्णय घेतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

डोंबिवलीत सेक्स रॅकेट चा पर्दाफाश; चार युवतींची दलालांच्या तावडीतून सुटका..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली पूर्वेला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. येथील एका लॉजिंग अँड बोर्डींगमध्ये सेक्स रॅकेट चोरी-छुपे चालू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे. या कारवाईत चौघा तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे.

लॉजिंग वर आधी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम केली खात्री

डोंबिवली पूर्वेकडील सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारत आहे. या इमारतीत हॉटेल विराज साईराज लॉजिंग अँड बोर्डींग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची गुप्त बातमी मिळताच ठाण्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिक सेलने सोमवारी रात्री अचानक तेथे छापा टाकला. यावेळी चार तरुणी तेथे वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या.

सर्वसामान्य रहिवाशांच्या वस्तीत, शिवाय भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रसिद्ध ‘बालाजी मंदिर’ परिसरात चालणाऱ्या या सेक्स रॅकेटचा ‘अँटी ह्युमन ट्रॅफिक सेल’चे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथकाने पर्दाफाश केला. साईराज उर्फ विराज लॉजिंग बोर्डींगमध्ये अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसायाचा घृणास्पद प्रकार चालू होता याची पोलिसांना गुप्तरीत्या बातमी मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर लॉजमध्ये पोलिसांकडून आधी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम खात्री करण्यात आली.

तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी

पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथकासह टिळकनगर पोलिसांनी या लॉजवर अचानक छापा टाकला. पोलिसांना पाहताच या लॉजमधील साऱ्यांची भंबेरी उडाली. पोलिसांनी छाप्यादरम्यान सदर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींचे पुरवठादार दोन दलालांच्या तावडीतून ४ तरुणींची सुटका केली. तर या कांडातून मुक्त करण्यात आलेल्या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली.टिळकनगर पोलीस ठाण्यात लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींचे पुरवठादार दोन दलालांच्या विरोधात ३७६ (२), ३७० (३), ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे टिळकनगर पोलिसांकडून सांगण्यात आले.

डोंबिवलीसारख्या सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीमध्ये अशाप्रकारे सुरू असलेल्या देहव्यापाराकडे या परिसरातील पोलीस दुर्लक्ष का करतात ? असा प्रश्न स्थानिक रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.