Home Blog Page 225

अहमदाबादला विमानतळ मुख्यालय अद्याप तरी हलविण्याचा निर्णय झालेला नाही; अदानी समुहाचे स्पष्टीकरण..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड (एएएचएल) कंपनीचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय अदानी समूहानं घेतल्याचं वृत्त समोर आल्यानं राजकीय वातावरण तापलं. मात्र आता अदानी समुहानं याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यालय अद्याप तरी हलवण्याबद्दलचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट करत तशा चर्चा निव्वळ अफवा असल्याचं अदानी समुहानं म्हटलं आहे.

‘मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला नेणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांची मुख्यालयं मुंबईतच राहतील. मुंबईच्या अभिमानात भर घालत राहू हा आमचा शब्द आहे. आमच्या विमानतळांच्या साखळीतून आम्ही रोजगारांच्या हजारो संधी तयार करू,’ असं अदानी समुहानं एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अदानी समूहानं विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्तानं राजकीय वातावरण ढवळून निघालं. तुम्ही गरबा कराल, तर आम्हाला झिंगाट दाखवावा लागला, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अदानी समुहाला इशारा दिला. त्यानंतर काँग्रेसनं थेट मोदी सरकारवर निशाणा साधला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात्यांचा मुंबईवर डोळा असल्याचे म्हटलं. तसंच, अदानींविरुद्ध राज्यभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे, मुंबईतील इन्स्टिटयूट गुजरातला नेली जात आहे. पण, महाराष्ट्राचा तुकडाही गुजरातला नेऊ देणार नाही, अशा शब्दात नाना पटोलेंनी मोदी सरकारला खरमरीत इशारा दिला.

राज्यात गर्भपातावरील औषधांच्या अवैध विक्रीप्रकरणी १४ गुन्हे दाखल..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांचा (Medical Termination of Pregnancy Kit) गैरवापर होत असल्याची शक्यता गृहीत धरून या औषधाची खरेदी विक्री करणारे ठोक विक्रेते, किरकोळ विक्रेते तसेच गर्भपात करणाऱ्या रुग्णालयावर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण राज्यभर दि. २६ जून २०२१ ते ९ जुलै २०२१ या कालावधीत तपासणी व धाडीची धडक मोहीम राबवून एकूण ३४८ ठिकाणी तपासणी केली. यात १४ गुन्ह्यांची नोंद झाली असून ११ व्यक्तींना अटक केली असल्याची माहिती औषध नियंत्रक प्राधिकारी व सहआयुक्त दा.रा.गहाणे यांनी दिली.

या तपासणीमध्ये काही किरकोळ विक्रेते गर्भपातासाठी लागणारी औषधे (MTP Kit) अवैधरित्या प्राप्त करुन घेत असल्याचे, तसेच काही विक्रेते चढ्या दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून संबंधित किरकोळ विक्रेत्यांना अवैधरित्या प्राप्त केलेले व चढ्या दराने, विना प्रिस्क्रीप्शन, विना बिलाने गर्भपाताची औषधे विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकुण ४७ हजार ३७८ किंमतीची औषधे जप्त करण्यात आली व त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.

अशा प्रकारच्या एकूण १३ किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध राज्यभरात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद या विभागामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मुंबईमधील पश्चिम उपनगरातील एका हॉस्पिटलच्या डॉक्टर विरुद्ध त्यांनी गर्भपातासाठी वापरलेल्या औषधाची माहिती न दिल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर नोदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अकरा व्यक्तींना अटक केली असून पोलिसांच्या वतीने पुढील कारवाई होत आहे. ज्या किरकोळ व ठोक विक्रेत्यांच्या तपासण्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, अशा ४२ विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात येत असून प्रशासन पुढील कारवाई करीत आहे.

या प्रकरणी प्रशासनाच्या वतीने सर्व औषध विक्रेत्यांनी गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची (MTP Kit) परवानाधारक संस्थेकडूनच खरेदी करावी. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच औषध विक्री करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच सर्व संबंधितांनी गर्भपातासाठी लागणारी औषधे अवैध मार्गाने न घेता, तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करून घ्यावेत, असे आवाहन औषध प्रशासन विभागाने केले आहे.

१५ लेडीज बारवर ठाणे महानगरपालिकेची धाड; कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना सारख्या भीषण महामारीच्या काळात सोशल डिस्टन्सींग, मास्क आणि सॅनिटायजर चा वापर तसेच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाणे शहरातील बारवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करीत १५ लेडीजबारवर कारवाई करत सील केले. ठाणे महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक करण्याचे तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिल्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग समिती निहाय महापालिकेच्या पथकाद्वारे धाडी टाकून कारवाई करण्यात येत आहे.

साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियम १८९७ तसेच आपत्ती व्यवस्था कायदा २००५ च्या साथरोग सर्व संबंधित तरतुदीनुसार शासनाने कोविड-१९ आजाराचा प्रसार रोखण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या त्रिसुत्रीचे पालन करणे, सर्व बार अँण्ड रेस्टॉरंट, लेडिज बार व इतर सोमवार ते शुक्रवार ५० टक्के बैठक क्षमतेने सायं ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे तसेच सायं ४ वाजल्यानंतर व शनिवार आणि रविवार फक्त टेक अवे, पार्सल सुविधा व होम डिलिव्हरी सेवा सुरु ठेवण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले असून या नियमांचे उल्लंघन केलेल्या १५ आस्थापनावर ठाणे महापालिकेने कारवाई करत आज सील केल्या.

बया कारवाई अंतर्गत ठाण्यातील तलावपाळी येथील आम्रपाली बार, तीन पेट्रोल पंप येथील अ‍ॅन्टीक पॅलेस बार, उपवन येथील नटराज बार, सिनेवंडर येथील आयकॉन बार, कापुरबावडी येथील स्वागत बार, नळपाडा येथील नक्षत्र बार, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील के-नाईट बार, ओवळा नाका येथील स्टर्लिंग बार, मॉडेला नाका येथील अ‍ॅन्जेल बार, उपवन येथील सुर संगम बार, भाईंदरपाडा येथील खुशी आणि मैफील बार, वागळे इस्टेटमधील सिझर पार्क बार, नौपाड्यातील मनिष बार आणि कापूरबावडी येथील सनसिटी बार असे एकूण १५ लेडीजबार सील करण्यात आले आहेत.

सदरच्या सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ.अनुराधा बाबर, प्रणाली घोंगे, शंकर पाटोळे आणि विजयकुमार जाधव यांनी यांनी महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केल्या.

पालघर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात प्रशासनाने लागू केलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन…

संपादक: मोईन सय्यद/पालघर प्रतिनिधी: प्रमोद तिवारी

पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या संपन्न झालेल्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडूनच करोना नियमांचा तसेच सोशल डिस्टनसिंगचा तीन तेरा वाजल्याचे दिसून आले. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोठी गर्दी केल्याने जिल्ह्यात सुरू असलेल्या कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे कोणालाच भान नव्हते.

उपस्थिति सर्व जेष्ठ मंत्राच्या तोंडावर मास्क मात्र राजकीय पक्षाचे पदाधिकारी मात्र मुखवटा दर्शक!

नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्षांच्या दालनात अनेक राजकीय नेत्यांच्या तोंडावर मास्क देखील नसल्याचे छायाचित्रांमध्ये दिसून येत आहे.

यामुळे सामान्य नागरिकांवर करोना नियमांचे पालन न केल्याने कारवाई करणारे पालघरचे जिल्हा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक पालघर आता या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांवर काही कारवाई करणार का? असा सवाल पालघर जिल्हावासीयांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे श्वान प्रजनन व विपणन केंद्राची नोंदणी करणे बंधनकारक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई शहर जिल्हाधिकारी..

मुंबईतील श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. यापुढे कोणतेही पाळीव प्राणी दुकाने, श्वान प्रजनन व विपणन केंद्र महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी केल्याशिवाय सुरु ठेवता येणार नसल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा मुंबई शहर प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटीचे अध्यक्ष यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

सर्व पाळीव प्राणी दुकान व श्वान प्रजनन व विपणन केंद्र चालवू इच्छिणाऱ्या व्यक्तीस आवाहन करण्यात येत की, प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम २०१८ व पाळीव प्राणी दुकानांची व श्वान प्रजनन व विपणन नियम २०१७ अन्वये श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. आपण आपल्या दुकान केंद्राची नोंदणी करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज Maharashtra State Animal Welfare Board यांच्या नावे रुपये ५०००/- (अक्षरी-पाच हजार रुपये मात्र ) च्या धनाकर्षासह (Demand Draft) महाराष्ट्र राज्य प्राणी कल्याण मंडळ, पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेज समोर औंध, पुणे. ६७ या पत्यावर दाखल करावा. हा अर्ज पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून जिल्हाधिकारी, मुंबई शहर तथा अध्यक्ष, प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी मुंबई शहर यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.