राज्यात १० वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर ११ वी प्रवेशाकरिता ऐच्छिक ‘सीईटी’ परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. यानुसार आता ११ वी प्रवेशासाठी होणाऱ्या सीईटी परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. २१ ऑगस्ट दिवशी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान ही सीईटी परीक्षा होणार आहे.
राज्यात एकाच वेळी ही परीक्षा सर्वत्र घेतली जाणार आहे, असे राज्य सरकार कडून जाहीर करण्यात आले आहे. यामुळे १० वी परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी आता ‘सीईटी’ करिता तयारीला लागण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार आता ११ वी प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी येणाऱ्या १९ जुलै दिवशी ऑनलाईन नोंदणीस सुरुवात करण्यात येणार असल्याची महत्वाची माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी यावेळी दिली आहे.
११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी ‘सीईटी’ परीक्षा ‘ओएमआर’ उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने या परीक्षा घेण्यात येणार आहेत. १९ जुलै या दिवसापासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्याकरिता ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी १० वी मधील गुणांच्या आधारे ११ वी ची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाच्या धोक्याचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यांनी मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील सूचना केल्या.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या, त्या पुढीलप्रमाणे आहेत :
विशेषत: दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता.
उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे.
काही ठिकाणी भूमिगत वाहनतळामध्ये पाणी घुसले व वाहनांचे नुकसा झाले आहे तसेच भांडूप येथे जल शुद्धीकरण केंद्रच बंद पडल्याची घटना घडली आहे हे पाहता अधिक सावधगिरी बाळगावी.
पावसाचा जोर रात्री वाढतो आहे हे ९ जून आणि आत्ता काल झालेल्या पावसाने लक्षात आले आहे हे पाहता रात्री देखील पाणी उपसा करणारी यंत्रणा, कर्मचारी काम करीत राहतील हे पाहावे.
पाऊस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते. मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा.
सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहण्यास सांगावे.
कोविड केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार ठेवावे.
अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो स्पायरोसिस सारखे रोग पसरु नये म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे.
फिव्हर क्लिनिक्स सुरु करा
यावेळी बोलतांना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असे सांगून महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले की, पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टो स्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका तर कायम आहे, यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन व्हावे. गृहनिर्माण संस्थांमधून देखील याविषयी जनजागृती करा.
मुंबईत दरडी कोसळण्याच्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत मात्र अशा सर्वच ठिकाणांचा आयआयटी किंवा इतर तज्ज्ञ संस्थेमार्फत अभ्यास करून आणखी काही पर्याय आहेत का किंवा त्यांच्या मजबुती करणासंदर्भात पाऊले उचलता येतील का ते पाहावे. रेल्वे आणि बेस्ट यामध्ये अधिक चांगला समन्वय साधून अशा आपत्तीच्या वेळी प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून हॉटलाईन सुरु करावी.
पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरु राहील याची काळजी घ्यावी व पर्यायी व्यवस्था करावी, असे सांगितले. वीज वाहिन्या व त्यांचे खांब सुस्थितीत राहतील आणि त्यातून विजेचा धक्का लागणार नाही याविषयी कंपन्यांना खबरदारी घेण्यास सांगावे असेही ते म्हणाले.
पालिकेचे अधिकारी-कर्मचारी २४ तास ड्युटीवर
मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल म्हणाले की, काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्या काही तासांमध्ये २०० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्य एक घटना मिळून एकूण २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्या स्थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्यात आले आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्यासह भेटी देवून यंत्रणांना आवश्यक ते निर्देश दिल्याचेही चहल यांनी नमूद केले.
उपनगरीय रेल्वे रुळांवर साचणाऱया पावसाच्या पाण्याच्या अनुषंगाने चहल म्हणाले की, माहूल येथील पर्जन्य जल उदंचन केंद्राचे बांधकाम लवकरच सुरु होणार असून हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर कुर्ला, शीव, चुनाभट्टी इत्यादी परिसरातील पाणी साचण्याचा प्रश्न निकाली निघेल.
मुंबईत पावसामुळे होणाऱ्या भूस्खलन घटना पाहता, संभाव्य ठिकाणांवर महानगरपालिका प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. अशा ठिकाणांवरील नागरिकांचे स्थलांतर व पुनर्वसन करण्याबाबतची कार्यवाही देखील करण्यात येत आहे, असेही आयुक्तांनी नमूद केले.
आजारांचा फैलाव होवू नये म्हणून काळजी
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी म्हणाले की, मलेरिया, डेंग्यू, लेप्टो स्पायरोसिसच्या डेंगी आणि डेंग्यू, लेप्टो स्पायरोसिस सारख्या या भयंकार आजारांचा फैलाव होवू नये म्हणून आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्याने सुरु आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे श्री. काकाणी यांनी नमूद केले.
जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित होत आहे
जोरदार पावसाचे पाणी भांडुप जलशुद्धीकरण केंद्रात शिरून समस्या निर्माण झाल्यासंदर्भात महानगरपालिकेचे उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोर म्हणाले की, भांडुप संकुलातील नवीन आणि जुन्या अशा दोन्ही उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू कार्यान्वित होत आहे. भांडुप येथील मुख्य जलसंतुलन (Main Reservoir) कुंभातील पाणीपातळी उंचावत आहे. असे असले तरी उद्या एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. सर्व यंत्रणा कार्यान्वित होताच पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती राठोर यांनी दिली.
हवामान विभागाचा ‘ऑरेंज अलर्ट’ चा इशारा
यावेळी बोलताना हवामान विभागाचे जयंता सरकार म्हणाले की मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ असून ५० ते ६० किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. २३ तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो.
याप्रसंगी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवासन, म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी देखील माहिती दिली.
बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी देखील मार्गदर्शन केले व यंत्रणांनी अधिक समन्वय ठेवावा असे सांगितले. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव असीम गुप्ता, मुंबई शहर व मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी, सर्व पालिका उपायुक्त उपस्थित होते.
शैक्षणिक बनावट प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण ८ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय यामुळे योग्य उमेदवारांचीही होणारी गैरसोय रोखली जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
यासाठी ‘क्रॉसफोर्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ द्वारा विकसित लेजीटडॉक हे इथरियम ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून या प्रणालीच्या मदतीने बनावटरहीत डिजिटल कागदपत्रे १० सेकंदात जगभरातून कोठूनही ऑनलाईन पडताळणी करता येऊ शकतील. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी मार्फत घेण्यात आलेल्या स्टार्टअप मेळाव्यातून ही संकल्पना पुढे आली असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाणपत्रांच्या हाताळणीकामी वापरले जाणारे मंडळाचे मनुष्यबळ आणि त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
या उपक्रमाची नुकतीच जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कौशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव, मंडळाचे सचिव कृष्णा शिंदे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील, लेजीटडॉक स्टार्टअपचे सहसंस्थापक फ्रान्सिस, नील, विष्णू आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री मलिक म्हणाले की, बनावटमुक्त शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले आहे. यामुळे सुमारे १० लाख टँपरप्रूफ, डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे ऑनलाईन पडताळणीसाठी त्वरित उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक दस्तऐवज नोंदणीची आतापर्यंत माल्टा, सिंगापूर आणि बाहरिन या तीनच देशामध्ये पूर्ण अंमलबजावणी झाली आहे. त्यांच्यात सामील होऊन महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास मंडळ हे जगातील सर्वात मोठे चौथे सरकारी संस्था बनले आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रांकरिता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचे अभ्यासक्रम वरदान..
मंत्री मलिक म्हणाले की, अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत विविध २८ गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार, तसेच सहा महिने कालावधीचे १५६, एक वर्ष कालावधीचे १०० आणि दोन वर्ष कालावधीचे ४५ अर्धवेळ (२३४) व पूर्णवेळ (६७) असे एकुण ३०१ अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीणभागात मंडळाने मान्यता दिलेल्या १ हजार २६९ संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. विशेषत: खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात, असे त्यांनी सांगितले.
मुंबई- वडोदरा या आठ पदरी द्रुतगती महामार्गासाठी पालघर जिल्ह्यात आवश्यक भुसंपादनाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.या द्रुतगती महामार्गाचे पालघर जिल्ह्यातील एकूण अंतर ७८ किमी असून यासाठी सुमारे ९०१ हेक्टर जमिनीचे संपादन करण्याचे काम सुरू असून ५१ गावातील शेतकर्यांच्या जमिनी बाधीत होणार आहेत. प्रस्तावित महामार्गाच्या भूसंपादन आणि मोबदला प्रक्रीयेसाठी पालघर आणि डहाणू प्रांत कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या प्रक्रीयेत गरीब अशिक्षित जमीन मालकांच्या अज्ञानाचा फायदा घेत संपादीत जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठी त्यांच्यासोबत दलालांच्या अनेक टोळ्या सक्रीय झाल्या असून यामध्ये राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी आणि आदीवासी संघटनांचे कार्यकर्ते यांचा देखील समावेश पाहायाला मिळत आहे.
डहाणू तालुक्यातील दाभोण येथील गट नंबर १९० मधील ३६२४६ चौ.मी.आणि गट नंबर १९१ मधील ८२५ चौमी जमीन संपादित होणार आहे. यापोटी एकूण ६ कोटी ९९ लाख ५० हजार ४४६ रुपये मोबदल्या पैकी ५० वर्षांपासून जमीन कसत असलेल्या व सध्या जमीन ताब्यात असलेल्या ४ कुटुंबांना फक्त ५६ लाख मोबदला मिळाला असून ज्यांचा या संपादित जागेशी सध्या काही संबध नाही अशा खातेदारांना उर्वरित ६ कोटी ४३ लाख रुपये वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे जमीन संपादनाचा मोबदला वाटप करताना मूळ मालकांवर मोठा अन्याय झाल्याची भावना आदिवासी समाज्यातील शेतकऱ्यानीं वेक्त केली आहे.
पालघर- आषाढी एकादशीला पंढरपूरची वारकरी संप्रदायची वारीसाठी शासनाने निर्बंध लावताना बंड्या तात्या कराडकर यांना अटक करून स्थानबद्ध केल्याप्रकरणी निषेध नोंदवत त्यांची तात्काळ मुक्तता करावी, यासाठी वारकरी संप्रदाय बजरंग दल विश्व हिंदू परिषद यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्या जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केल्या.
शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या वतीने महाराष्ट्र शासनाला पंढरपूरची वारी सुरू करण्यासाठी तसेच बंड्या तात्या कराडकर यांची तात्काळ मुक्तता करण्यासाठी मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या निवेदनात पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांचे भर रस्त्यात भगवे कपडे वस्त्रे उतरवायला लावले. तसेच वारकरी संप्रदयाची भगवी पताका काढायला लावल्याने वारकरी संप्रदायाने संबंधित पोलीस प्रशासनाचा निषेध करत केला ज्या वारकऱ्यांना जागोजागी ताब्यात घेतले आहे. त्यांची तात्काळ मुक्तता करून ५० वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी परवानगी द्यावी. यासाठी टाळ मृदुंग भजन करत हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालय इथपर्यंत मोर्चा काढला.
वारकरी संप्रदाय याकडून कोहरा महाराज तसेच प्रदीप महाराज यांच्यासोबत विश्व हिंदू परिषदचे मुकेश दुबे तसेच बजरंग दलाकडून चंदन सिंग यांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. तर पालघरच्या नगरसेवक अरुण माने, अलका राजपूत व इतर कार्यकर्ते या मोर्चासाठी सहभागी झाले होते. पंढरपुरात लग्न सोहळे राजकीय कार्यक्रम त्याच बरोबर पंढरपुरातील पोटनिवडणूक या काळात करुणा संकट नव्हते का? असा प्रश्न वारकरी संप्रदायाने विचारला आहे.