Home Blog Page 227

पंतप्रधान मोदींची सर्वपक्षीय बैठकीला फक्त तीन मिनिटे उपस्थिती; विरोधकांचा संताप..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्या (सोमवार) पासून सुरू होत आहे. त्या आधीच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ठिणगी पडली आहे. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ तीन मिनिटांसाठीच हजर राहिल्याने विरोधकांचा तीळपापड उडाला. पंतप्रधानांच्या या कृतीवर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला शेवटची तीन मिनिटे उपस्थित राहिल्याबद्दल बैठकीतच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे नेते, खासदार डेरेक ओब्रायन यांनी मोदींसमोरच नाराजी व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांच्या भावना समजून घेण्यासाठी पंतप्रधानांनी या बैठकीला सुरुवातीपासूनच उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु, पंतप्रधानांनी हा पायंडा मोडला, असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.

सरकारने पळ काढू नये
दरम्यान, देशातील कोव्हिड परिस्थिती, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि वाढती महागाई या विषयांवर आपल्याला चर्चा हवी आहे, सरकारने या मुद्यांपासून पळ काढू नये, अशी भूमिका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीत व्यक्त केली. दरम्यान या सर्वपक्षीय बैठकीला ३३ पक्षांचे ४० नेते सहभागी झाले होते. यावेळी अनेक नेत्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला सल्ले दिले. तसेच काही सूचनाही केल्या. बहुतेक सदस्यांनी कृषी कायद्यावरून सरकारला अनेक सूचना केल्याचं सूत्रांनी सांगितलं. उद्या १९ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून १३ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनात तीन अध्यादेशांसहीत २३ विधेयके मंजूर करण्यात येणार आहेत. त्यात १७ नवे विधेयक आहेत. दरम्यान, या बैठकीत सरकार प्रत्येक मुद्दयांवर चर्चा करायला तयार असल्याचं मोदींनी स्पष्ट केल्याचं सूत्रांनी सांगितले.

अंथरुणाला खिळून (बेड रिडन) असलेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागामार्फत लसीकरणाची सुविधा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

अंथरुणाला खिळून असणारे (बेड रिडन) रुग्ण, व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष सुविधा आरोग्य विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा व्यक्तींच्या माहितीची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर पथकामार्फत त्यांचे लसीकरण केले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

राज्यात ज्या ठिकाणी घरात अंथरूणाला खिळून असलेले रुग्ण, व्यक्ती आहे आणि ज्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करायचे आहे त्यांच्यासाठी आरोग्य विभागातर्फे लसीकरण नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जी व्यक्ती अंथरुणाला खिळून आहे व पुढील सहा महिने परिस्थिती तशीच राहण्याची शक्यता असेल अशा व्यक्तींचे लसीकरण करण्यासाठी ही विशेष सुविधा आहे.

अशा व्यक्तींची नावे व पत्ता, संपर्क क्रमांक, अंथरुणाला खिळून असण्याचे कारण आणि सदरची व्यक्ती, रुग्ण लसीकरण करून घेण्यास पात्र असल्याचे डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र इत्यादी माहिती covidvacc2bedridden@Gmail.com या ईमेलवर पाठविण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जेणेकरून अशा व्यक्तींचे लसीकरण पथका मार्फत करणे सोयीचे होईल.

अंथरूणाला खिळून असलेली व्यक्ती लसीकरणास पात्र असल्याचा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांचा दाखला तसेच या व्यक्तीचे जवळचे नातेवाईक किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तींने लसीकरणासाठीचे संमतीपत्र माहिती सोबत जोडणे आवश्यक आहे, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे ब्रिटनमध्ये थैमान; भारतासाठी चिंतेची मोठी बाब..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

लंडन येथील ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने रौद्ररुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. काल तिथे ५१,८७० नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे सहा महिन्यांपूर्वीची रुग्णसंख्या ब्रिटन ने गाठली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदा ५० हजारहून अधिक कोरोना बाधित सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे ब्रिटनचे आरोग्य मंत्रीच कोरोना बाधित झाले आहेत.

चिंतेची बाब म्हणजे ब्रिटनमध्ये ६८ टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे. असे असले तरी देखील तिसऱ्या लाटेने डोके वर काढल्याने युरोपसह भारताच्या चिंता वाढल्या आहेत. आरोग्य मंत्री साजिद जावेद यांना कोरोनाची लागण झाली आहे. वेगाने कोरोना पसरू लागल्याने माजी आरोग्यमंत्र्यांनी सरकारला पुन्हा कोरोनामुळे लॉकडाऊन करावे लागणार आहे, असा इशारा दिला आहे. तसेच १२०० हून अधिक तज्ज्ञांनी लॉकडाऊन पूर्णपणे हटविणे हे खतरनाक आणि अनैतिक असेल, असा इशाराही दिला आहे.

ब्रिटनमध्ये १९ जुलैपासून सर्व निर्बंध हटविण्याची तयारी सुरु आहे. याच काळात कोरोनाच्या रुग्णांच्या आकड्याने मोठी उसळी घेतली आहे. यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. माजी आरोग्य मंत्री जेरेमी हंट यांनी सरकारला पुन्हा लॉकडाऊन लावायची वेळ पडणार आहे, असे म्हटले आहे. कोरोनामुळे हॉस्पिटलाईज होणाऱ्या रुग्णांची संख्या दोन आठवड्यांत दुप्पट होत आहे. यामुळे परिस्थिती धोकादायक बनू लागली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमागे ‘डेल्टा व्हेरिअंट’ आहे. तिसरी लाट ज्या प्रकारे विक्राळ होत चालली आहे, त्यावरून सरकारने निर्बंध हटवू नयेत. असे केल्यास पाप ठरेल असा इशारा जगभरातील १२०० तज्ज्ञांनी दिला आहे. लॅन्सेटमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे.

एक्स्प्रेसच्या इंजिनखाली येऊनही मोटरमनच्या प्रसंगावधानामूळे वाचला आजोबांचा जीव; कल्याणातील थरारक प्रकार..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या आजोबांचे प्राण थोडक्याय वाचले. कल्याण रेल्वे स्टेशनवर आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

मुंबईहुन वाराणसीला जाणारी महानगरी एक्स्प्रेस कल्याणच्या प्लॅटफॉर्म नंबर ४ वरून सुटली. आणि त्याचवेळी काही अंतरावर पुढे एक वयोवृद्ध आजोबा रेल्वेरूळावर आत्महत्या करण्याच्या इराद्याने उभे होते. गाडीनेही अवघ्या सेकंदात वेग धरला होता. रुळांवर असणाऱ्या आजोबांना पाहून एक्स्प्रेसचे मोटरमन एस.के.प्रधान यांनी वारंवार हॉर्नही वाजवला. मात्र गाडी पुढे येईपर्यंत आजोबा अजिबात जागचे हलले नाहीत. मात्र मोटरमन एस.के.प्रधान आणि सहाय्यक मोटरमन रवी शंकर यांनी आपले सर्व कसब आणि अनुभव पणाला लावून एक्स्प्रेसचे अर्जंट ब्रेक दाबले. तोपर्यंत एक्स्प्रेसच्या इंजिनाचा पुढचा भाग आजोबांच्या अंगावरून गेला होता. मोटरमन आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत इंजिनखाली पाहिले असता हे आजोबा सुखरूप असल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी अत्यंत हळुवारपणे आजोबांना इंजिनाच्या पुढील भागातून बाहेर काढले आणि तातडीने रेल्वे स्टेशनवर घेऊन गेले. एक्स्प्रेसचे मोटरमन एस.के.प्रधान आणि रवी शंकर यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानाचे त्यांचे कौतूक होत आहे.

कल्याण लोकसभा समन्वयकपदी भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांची नियुक्ती..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीत भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कार्यरचना या सगळ्या गोष्टींकरिता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर लोकसभा आणि विधानसभा या क्षेत्रात काम करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून कल्याण लोकसभा समन्वयकपदी शशिकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी यापूर्वी लोकसभेचा विस्तारक म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या या नियुक्ती बरोबर डोंबिवली विधानसभा प्रमुख संजीव बिडवाडकर, सहप्रमुख मिहिर देसाई, समीर चिटणीस कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख नंदू परब, कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख नाना सूर्यवंशी, सहप्रमुख सुभाष मस्के, कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख स्वप्निल काटे, सहप्रमुख गौरव गुजर, संतोष शिंगोळे, अंबरनाथ विधानसभा प्रमुख अभिजीत करंजुले, सहप्रमुख संतोष शिंदे, राजेश कवठाळे अशी ह्या लोकसभेतील रचना असणार आहे. या नियुक्त्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली.