Home Blog Page 228

भाड्याच्या वादातून “अबोली” महिला रिक्षा चालकास मारहाण..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

रायगड जिल्ह्यात पनवेल येथे ‘अबोली’ महिला रिक्षा चालक महिलेस चार प्रवाशांनी रिक्षा भाडे यावरून झालेल्या वादात त्या चार जणांनी मिळून मारहाण केली असून त्या महिला चालक यांना मारहाण करणारे यातील प्रवासी हे एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगी आणि मुलगा असून या चार जणांकडून रिक्षा चालक महिलेला मारहाण करण्यात आली.

त्यावेळी ‘अबोली’ महिला रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष संतोष भगत व बेलापूर नेरुळ विभागीय ‘अबोली’ महिला रिक्षा संघटनेचे उपाध्यक्ष अंजना शिंदे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाम शिंदे यांच्याकडे भेट घेऊन त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एक पुरुषास अटक करण्यात आली आहे, तर त्या रिक्षा चालक महिलेस वाशी येथील MGM हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट करण्यात आले आहे.

असाच प्रकार अबोली महिला रिक्षा चालकांसोबत घडत राहिला तर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्या खेरीज पर्याय उरणार नाही असे मत संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी व्यक्त केले.

‘ईडी’कडून अनिल देशमुखांची ४ कोटी नव्हे, तर तब्बल ३५० कोटींची मालमत्ता जप्त..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ‘ईडी’ने ४ कोटी २० लाखांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती काल समोर आली होती. पण ‘ईडी’ने जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत ही ३५० कोटी रुपये इतकी असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे. ‘ईडी’ने काल अनिल देशमुख यांच्याशी संबंधीत दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी या मालमत्तेची किंमत ४ कोटी २० लाख असल्याचं म्हटलं होतं. पण ही किंमत खरेदीची किंमत आहे. या मालमत्तेची आजच्या बाजार भावाची किंमत तब्बल ३५० कोटी रुपयांच्या आसपास आहे.

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने ‘ईडी’ने मनी लाँन्ड्रिगचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात ‘ईडी’ने अनिल देशमुख यांना तीनदा चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. तर त्यांचा मुलगा ऋषिकेश याला एकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, दोघेजण चौकशीसाठी हजर न राहता चौकशी टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेले आहेत. त्यानंतर ‘ईडी’ने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावलं होतं. त्यांनी ही हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ‘ईडी’ला सादर केली आहेत.

या सर्व घडामोडींनंतर आता ईडीने अनिल देशमुख यांची मालमत्ता जप्त करायला सुरुवात केली आहे. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी काल अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. ‘ईडी’ने वरळी येथील एक फ्लॅट जप्त केला आहे. त्याची खरेदीच्या वेळची किंमत १ कोटी ५४ लाख रुपये आहे. तसेच अनिल देशमुख यांच्याशी संबंधित जमीनही जप्त करण्यात आली आहे.

‘ईडी’ने देशमुखांची रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावातील ८ एकर ३० गुंठे जमीन जप्त करण्यात आली आहे. ही जमीन मोक्याच्या ठिकाणी आहे. उरण पोर्ट आणि पळस्पे फाटा दरम्यान ही जमीन आहे. संबंधित जमीन ही नव्याने सुरु होत असलेल्या नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर आहे. मोक्याच्या ठिकाणी ही जमीन असल्याने तिचा भाव प्रचंड आहे. या ठिकाणी एका गुंठ्याचा भाव एक कोटी रुपये आहे. अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांची भागीदारी असलेल्या प्रीमियर पोर्ट लिंक प्रायव्हेट लीमिटेड या कंपनीने ही जमीन रोख रक्कम देऊन २००४ ते २०१५ या काळात विकत घेतली आहे. त्याकाळात त्यांनी ही जमीन २ कोटी ६७ लाख रुपयांना विकत घेतली आहे. ८ एकर ३० गुंठे म्हणजे एकूण ३५० गुंठे जमीन झाली. प्रत्येकी एक कोटी रुपये गुंठा इतकी किंमत असल्याने या जमिनीची किंमत सुमारे ३५० कोटी रुपये होते.

मुंबईतील काही बार मालकांनी आपण सचिन वाझे याला पैसे दिल्याचं म्हटलं आहे. ही रक्कम ४ कोटी ७० लाख रुपये आहे. हीच रक्कम अनिल देशमुख यांना मिळाली असावी आणि रक्कम त्यांनी अशा पद्धतीने मनी लाँन्ड्रिग केली असावी, असा ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळेच ‘ईडी’च्या आधिकाऱ्यांनी ४ कोटी ७० लाख रुपयांच्या बदल्यात खरेदी किंमत असलेली ४ कोटी २० लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जप्त केलेल्या या मालमत्तेची प्रत्यक्षात बाजार भावाने किंमत ३५० कोटी रुपये आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात कथित १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले आहेत. याच प्रकरणाचा तपास सध्या ‘ईडी’कडून सुरु आहे.

कल्याण पूर्वेतील ‘सम्राट अशोक’ शाळेचा सतत बाराव्या वर्षी शंभर टक्के निकाल; अंतर्गत मूल्यमापनात विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढली !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

नुकत्याच लागलेल्या शालांत परिक्षेच्या निकालात या वर्षीही १०० टक्के निकालाचे सातत्य राखत कल्याण पूर्व येथील ‘सम्राट अशोक’ विद्यालयाने सलग १२ व्या वर्षीही १०० टक्के निकालाचा इतिहास घडवला आहे. कोरोना महामारीच्या महाभयंकर संसर्गामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात शाळा भरल्याच नाहीत. मात्र इयत्ता नववीचा वार्षिक निकाल व इयत्ता दहावीचे अंतर्गत मूल्यमापनाद्वारे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत बाजी मारली. अनेक विद्यार्थ्यांना आवश्‍यक पेक्षा जास्त गुण मिळालेत. विद्यार्थ्यांना कोरोनाची भीती होती परंतु महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे परीक्षा रद्द करण्याच्या शासन निर्णयामुळे बहुतांश विद्यार्थी खूष होते. आता निकाल लागल्यावर भरमसाठ गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

‘पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट’ संचालित ‘सम्राट अशोक विद्यालयात’ शिक्षकांचा प्रयत्न व विद्यार्थ्यांच्या मेहनतीने सलग गेल्या बारा वर्षापासून शंभर टक्के निकाल लागत आहे.

याही वर्षी शंभर टक्के निकाल लावून ‘सम्राट अशोक विद्यालयाने’ आपले सातत्य ठेवले आहे. रश्मी तांबे ९२.६० टक्के गुण मिळवून प्रथम , जान्हवी गायकवाड ९१.६० टक्के गुण मिळवून द्वितीय तर विशाल कडू या विद्यार्थ्याने ९०.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. शाळेने गुणवंत मुलांचे पुष्प व मिठाई देऊन स्वागत केले. शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की पुढे कोरोना असो वा नसो आरोग्य सांभाळून पुढील शिक्षणाचा अभ्यास करत रहा. परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाइन होऊ द्यात परंतु आपलं वाचन-लेखनाच सातत्य कायम असू द्या. कोरोना काळातही शिक्षकांनी ऑनलाइन तासिका घेऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवली म्हणून संस्थेचे अध्यक्ष पी.टी.धनविजय यांनी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह शिक्षकांचे आभार मानले.

शिस्तबद्ध रितीने आरोग्याचे नियम पाळून चित्रीकरण करावे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे, यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे अशा सूचना दिल्या.

चित्रपट निर्मात्यांच्या सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स ‘गिल्ड’च्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पाडले जाईल अशी ग्वाही दिली.

या बैठकीस हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या प्रमुख संस्था असलेल्या प्रोड्युसर ‘गिल्ड’चे रितेश सिधवानी, स्तुती रामचंद्र, मधु भोजवानी, राकेश मेहरा, नितीन आहुजा हे सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे सुबोध भावे, नागराज मंजुळे, रवी जाधव यांनीही बैठकीत सहभागी होऊन सूचना केल्या. आदेश बांदेकर यांनी बैठकीचे सूत्रसंचलन केले.

बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे देखील सहभागी होते.

गेल्या काही महिन्यांपासून हिंदी व मराठी चित्रपट आणि मालिकांचे निर्माते कोरोना काळात नियमांचे पालन करून चित्रीकरण करीत आहेत परंतु चित्रीकरणाच्या वेळेत वाढ करणे गरजेचे आहे, सायंकाळी 4 नंतर देखील चित्रीकरण करण्यास परवानगी मिळाल्यास सर्वतोपरी काळजी घेऊन व नियमांचे पालन करून चित्रीकरण करता येणे शक्य आहे असे प्रोड्युसर ‘गिल्ड’चे म्हणणे होते.

पथकाचे लसीकरण व कोरोना तपासणी आवश्यक..

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, निर्बंध टाकून तुम्हाला अडविणे आम्हालाही आवडत नाही पण महारष्ट्र आणि केरळसह देशातील इतर काही राज्यांमधून कोरोनाचा संसर्ग अजूनही सुरूच आहे. संरक्षित अशा बायो-बबलची व्यवस्था करूनही काही क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमादरम्यान संसर्ग झालेला दिसतो आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून देखील आपण पूर्णपणे बाहेर आलेलो नसून जगातील इतर देशांत परत तिसरी लाट उसळल्याचे दिसते, त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेत राहणे आवश्यक आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील चित्रपट निर्मात्यांनी कोविड संदर्भात आपल्या कलाकार व कर्मचाऱ्यांची विशिष्ट दिवसानंतर कोरोना चाचणी करीत राहणे, पथकातील कुणाला ताप जरी आला असेल किंवा काही लक्षणे दिसत असतील तर त्वरित दखल घेणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांचे दोन्ही डोसेससह लसीकरण असणे गरजेचे आहे.

निर्बंध कायम न ठेवता कोरोना परिस्थितीची पाहणी करून टप्प्याटप्प्याने, सावधपणे, आणि सुरक्षितरित्या ते उठविण्याबाबत राज्य शासन पाउले टाकत आहे. पण यासाठी सर्वांचे मोठे सहकार्य लागणार आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

..तरच परवानगी..

मुंबई पोलिसांनी देखील प्रत्येक निर्मात्यांचे चित्रीकरणाचे वेळापत्रक, चित्रीकरण ठिकाण व वेळा याबाबतची माहिती निर्मात्यांकडून मागवून घ्यावी आणि एखाद्या अधिकाऱ्यावर समन्वयाची जबाबदारी टाकून व्यवस्थित व नियमांची काळजी घेत असल्याची खात्री करून परवानगी द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी टास्क फोर्सचे डॉ.संजय ओक, डॉ.शशांक जोशी, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ.प्रदीप व्यास यांनी देखील कोरोना सद्य परिस्थितीबाबत माहिती दिली. पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी देखील यावेळी पोलिसांतर्फे नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असल्याचे ग्वाही देत असल्याचे सांगितले.

‘इको’ कारचे सायलेंसर चोरी करणारी टोळी गजाआड; २५ गुन्हे उघड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

दि.६ जून २०२१ रोजी ठाण्याच्या खारेगाव येथील ‘कार्तिकी विला’ येथे राहणाऱ्या सौ.रोशनी राऊत यांनी त्यांची ‘इको’ कार सकाळी ७ वाजता त्यांच्या राहत्या घरासमोर सार्वजनिक रोड वर पार्क करून ठेवलेली असताना अज्ञात चोरट्यांनी या कारचा सायलेन्सर चोरी केला. याबाबत त्याच दिवशी कळवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.

पोलिसांनी लगेचच घटनास्थळी आणि आजूबाजूच्या परिसरातील “सीसीटीव्ही फुटेज” चे रेकॉर्डींवरून संशयित इसमाची पडताळणी आणि खातरजमा केली.

खारेगाव ते कुर्ला, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवरील “सीसीटीव्ही फुटेज” घेऊन पुन्हा पुन्हा पडताळणी करण्यात आली व हे आरोपी कुर्ला येथे वास्तव्यास असल्याचे समजले. याव्यतिरिक्त गुप्त बातमीदारांनी दिलेली माहिती आणि तांत्रिक माहिती मिळवून त्यांच्या नेमका ठावठिकाणा आणि इतर माहिती काढण्यात आली आणि त्यांच्यावर सापळा रचून –
१. शमशुद्दीन मोहोम्मदअदिस शहा (२१ वर्षे)
२. नदीम नवाब कुरेशी (२१ वर्षे)
३. शमशुद्दीन माजुद्दीन खान (२२ वर्षे)
४. सद्दाम मकाईस खान ( २६ वर्षे)
या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. या आरोपींचे इतर २५ गुन्हे ही उघड झाले असून ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड पुणे आणि गोवा राज्यातही त्यांनी असेच अनेक गुन्हे केलेले आहेत. त्यांच्याकडून कळवा पोलिसांनी ६,५०,०००/- रुपये किमतीचे २५ सायलेन्सर हस्तगत केले आहेत.