Home Blog Page 230

अखेर दहावीचा निकाल जाहीर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्याचा शिक्षण खात्याच्या अथक परिश्रमानंतर अखेर आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के, कोकण विभागाचा निकाल १०० टक्के, मुलांचा निकाल ९९.९४ टक्के, तर मुलींचा निकाल ९९.९६ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना निकाल http://result.mh-ssc.ac.in आणि http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

राज्यातल्या इतर विभागांचा निकाल खालीलप्रमाणे (निकालाची टक्केवारी)- पुणे ९९.९६, नागपूर ९९.८४, औरंगाबाद ९९.९६, मुंबई ९९.९६, कोल्हापूर ९९.९२, अमरावती ९९.९८, नाशिक ९९.९६, लातूर ९९.९६, कोकण १००.

राज्यातल्या एकूण २२ हजार ७६७ शाळांपैकी २२ हजार ३८४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत हा निकाल ४. ६५ टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राज्यात यंदाही दहावीच्या निकालामध्ये मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या आहेत. यंदाच्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींचा निकाल ९९.९६ टक्के लागला असून विद्यार्थ्यांचा निकाल ९९.९४ टक्के लागला आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांनीही उत्तम कामगिरी केली असून त्यांचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. तर खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्यांची संख्या २८ हजार ४२४ असून त्यांचा निकाल ९७.४५ टक्के लागला आहे.

कोविड-१९ लसींचे दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणी मधून सूट..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोव्हिड-१९ वरील ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र अशा व्यक्तींकडे केंद्र सरकारच्या ‘कोविन’ या पोर्टलवरून प्राप्त केलेले अधिकृत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जारी केले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ च्या अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिवांनी हा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांनाही ही सूट लागू असेल असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ही सूट लागू असली तरीही लसीकरण झालेल्या अथवा न झालेल्या सर्व प्रवाशांना कोव्हिड रोखण्यासाठी उचित नियमांचे (चेहऱ्यावर मास्क परिधान करणे, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे, शारिरीक अंतर राखणे इ.) पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

इतर सर्व नागरीकांसाठी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच्या वैधतेचा काळ ४८ तासांवरून वाढवून ७२ तास इतका करण्यात आल्याचे एका पत्रका मार्फत प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

एसएससी बोर्डाचा निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर..

संपादक: मोईनसय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १० वीचा ऑनलाईन निकाल आज शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे.

इयत्ता १० वीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १२ मे रोजी राज्य सरकारनं इयत्ता १० वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर इयत्ता १० वीच्या निकालासाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली होती. यासाठी १० जून रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार आयोजित करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून इयत्ता १० वीचा निकाल केव्हा लागणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. त्यानुसार आज दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

दहावीचा निकाल कुठे पाहणार ?

www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com

या वेबसाईट्स वर आणि मोबाईल फोनवरुन एसएमएसद्वारे देखील निकाल पाहता येणार आहे.

निकाल कसा पाहाल ?

  • निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
  • त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
  • त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
  • त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव सुवर्णा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच SUV असे लिहावे लागेल.
  • यानंतर लगेचच तुम्हाला निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

पालघर जिल्हाधिकारी दालनात राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार सुनील भुसारा व निलेश साबरे समर्थक यांच्यात तुफान राडा!

संपादक: मोईन सय्यद/पालघर, प्रतिनिधी

पालघर- जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत राजकीय दबावाखाली जिल्हा परिषद सदस्यांना दिवसभर बाहेर बसवून ठेऊन भेटण्याची वेळ न दिल्याने सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले तर आमदार सुनिल भुसारा व जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हाधिकारी दलनातच तुफान राडा केला.

येत्या २० जुलै रोजी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून राष्ट्रवादी- ६ व राष्ट्रीय काँग्रेस- १ असा ७ सदस्यांचा जिल्हा परिषद पालघर विकास आघाडी गट स्थापन करून मान्यतेसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे गट स्थापनेचा प्रस्ताव सादर करताना जिल्हाधिकारी हे राजकीय दबावाखाली २ महिला सदस्य व ५ पुरुष सदस्य यांना जाणूनबुजून वेळ देत नसल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केली आहे.

गट स्थापन करण्यासाठी ज्ञानेश्वर सांबरे, शीतल धोडी, संदेश ढोणे, गणेश कासट, मंदा घरत, देवानंद शिंगाडे, शैलेश करमोडा हे सात सदस्य सोमवारी म्हणजेच दोन दिवस आगोदर जिल्हाधिकारी यांच्याकडे भेटायला आले परंतु जिल्हाधिकारी दिल्लीला गेल्याने सदस्यांना जिल्याधिकारी यांना भेटता आले नसल्याने पुन्हा बुधवारी सकाळी आगोदर ११ ची वेळ देण्यात आली नंतर दुपारी १ व नंतर दुपारी ३ अशा वेळा दिल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी राजकीय दबावाखाली वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर हे सर्व सदस्य बसून असताना इतर लोकं भेटून जात होते परंतु जिल्हयाच्या लोकप्रतिनिधींना वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नसल्याचे सांगून जिल्हा परिषद सदस्यांनी सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

काही वेळाने जिल्हाधिकारी हे सदस्यांना भेट न देता तसेच निघून गेल्याने उपस्थित सदस्यांनी जिल्हाधिकारी दालनाच्या समोरच खाली बसून भेट मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले.

या सर्व प्रकारामागे राजकीय दबाव आसल्याचे सांगत जिल्हाधिकारी नक्की प्रशासन चालवतात की जिल्ह्याचे राजकारण? असा आरोप जिल्हा परिषद सदस्य व उपस्थित नागरिकांनी केला आहे.

आमदार सुनील भुसारे आणि निलेश सांबरे समर्थकांत बाचाबाची!

काही वेळात या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आमदार सुनिल भुसारा व त्यांचे समर्थक तिथे येऊन महिला सदस्य मंदा घरत यांना बळजबरीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले व इतर सदस्यांना दमदाटी व धक्काबुक्की केली विशेष म्हणजे हा प्रकार अप्पर जिल्हाधिकारी नवले यांच्या समोर जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाला आहे.

‘डेल्टा प्लस’ विषाणूची तिसरी लाट रोखण्यासाठी यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य – केंद्र सरकारचे निर्देश..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोविड च्या तिसऱ्या लाटेच्या नव्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूचा धोका पाहता तो रोखण्यासाठी केंद्र शासनाने यापुढे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्रथम प्राधान्य..

तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश..

कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी व तो रोखण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय व पर्याय आहे. त्यामुळे लसींचे दोन्ही डोस घेतल्यास कोरोनाच्या नव्या ‘डेल्टा पल्स’ व्हेरियंटपासून संरक्षण करता येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून राज्य सरकार आणि राज्य सरकारकडून प्रत्येक जिल्ह्यांतील लसीकरण यंत्रणांना दुसऱ्या डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्यावे अशा सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता जिल्ह्यात किती नागरिकांचे ‘कोव्हिशील्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’चा दुसरा डोस घेणे बाकी आहे याची माहिती लसीकरण यंत्रणेला दिली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना लस घेतल्याशिवाय परतावे लागत आहे. त्यामुळे लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल सुरु आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक, ठाणे, डोंबिवली, कल्याण लसीकरण केंद्रांबाहेर लस घेण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासूनच २ किलोमीटर रांगा लावून उभे राहत आहेत. असे असतानाही मर्यादित लसींच्या साठ्यामुळे शेकडो नागरिकांना लस न घेता माघारी घरी जाण्याशिवाय पर्याय उरत नाही व दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे ४ वाजता रांगेत उभं राहण्याशिवाय पर्याय उरलेला नाही त्यामुळे ते हतबल झाले आहेत.

यातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अपर सचिव डॉ. मनोहर अगनानी यांनी पत्राच्या माध्यमातून राज्य सरकाराला दुसऱ्या डोसचे प्रमाण वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र लसींच्य तुटवड्यामुळे अनेकांच्या दुसऱ्या डोसचा कालावधी लांबला असून असे असतानाही सर्व जिल्ह्यांमधील लसीकरण यंत्रणांनी दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राथमिक प्राधान्य द्यावे असे पत्रात नमूद केले आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ८०-९० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्य आहे. सध्या लसीकरण हा एकमेव उपलब्ध उपाय असून त्यामुळे लसीकरण प्रक्रिया जलद करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जात आहेत.