Home Blog Page 231

कंडोमपा च्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाने कल्याण पूर्वेतील फुटपाथवर रॅबीट टाकणाऱ्या व्यापाऱ्यावर केली दंडात्मक कारवाई..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

अनधिकृत बांधकाम केल्यानंतर उर्वरित शिल्लक राहिलेले रॅबीट नागरीकांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवर
टाकल्या प्रकरणी कल्याण-डोंबिवली “प्रभाग ५ ड” च्या प्रभागक्षेत्र अधिकारी श्री.सुधीर मोकल यांच्या निर्देशानुसार आरोग्य निरिक्षक श्री.शेख यांनी एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे .

पूना लिंक रोड वरील तिसगांव प्रवेशद्वारा च्या बाजुला असलेल्या ‘उज्वला कम्युनिकेशन’ या दुकान मालकाने अनधिकृतपणे केलेल्या बांधकामानंतर उर्वरित शिल्लक राहिलेले निकामी बांधकाम साहित्य अर्थात रॅबीट दुकानाच्या गाळ्या समोरील फुटपाथवरच टाकण्यात आले होते. या रॅबीट मुळे या ठिकाणच्या फुटपाथवरून ये – जा करण्यास मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला होता. हा प्रकार प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री.सुधीर मोकल यांच्या लक्षात येताच त्यांनी या भागाचे आरोग्य निरिक्षक श्री . सलीम शेख यांना संबंधीत दुकान मालकावर दंडात्मक कारवाईचे निर्देश दिले होते. त्या नुसार श्री.शेख यांनी संबंधीत दुकान मालकावर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करुन सदरचे रॅबीट त्वरीत हटविण्याची सुचना केली.

कल्याण पूर्वेतील पदपथांवर अशाच प्रकारे अनेक ठिकाणी अडथळे निर्माण केले जातात, त्यांचेवरही वेळीच दंडात्मक कारवाई केली गेली तर सर्व सामान्य नागरीकांना चालण्यासाठी असलेले फुटपाथ रिकामे होतील असे या परिसरातील नागरिकांत आपापसात बोलले जात आहे.

१६ जुलैपासून बुकींग सुरु; कोकणात गणेशोत्सवासाठी २२०० एसटी बसेस सोडणार..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील एसटी महामंडळाने यंदा कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी जादा २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून ४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. १६ जुलै २०२१ पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षणांस सुरुवात होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी दिली.

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा उत्सव आहे. ‍किंबहुना एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील अशी माहिती त्यांनी प्रसद्धी माध्यमांना दिली.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या जादा गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाश्यांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारांना फसविले..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर च्या पोलिसांनी गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे डबल करण्याचे आमिष दाखवून अनेकांना फसवल्याच्या गुन्ह्यात एका आरोपीला अटक केली आहे. सदर आरोपी चेतन जीवराज दंड याने २०१४ पासून ‘देसार इन्वेस्ट्मेन्ट्स’ या नावाने कंपनीची जाहिरात ‘फेसबुक’ आणि ‘गुगल’ वर प्रसारित केली. प्रत्यक्षात त्याने अशी कोणतीही कंपनी रजिस्टर केली नाही. रजिस्ट्रेशन न करताच त्या कंपनीच्या देसार इन्वेस्ट्मेन्ट्सच्या नावाखाली त्याने लोकांना यात गुंतवणूक करायला प्रवृत्त करण्यासाठी गुंतवणुकीच्या रकमेवर दरमहा ५% प्रमाणे परतावा देण्याचे आमिष दाखवीले.

फिर्यादी आणि इतर गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यावर काहीकाळ त्यांना ठरल्याप्रमाणे परतावाही दिला. मात्र नोव्हेंबर २०१९ पासून फिर्यादी व साक्षीदार यांना कोणताही परतावा दिलेला नाही तसेच त्यांची मुद्दलही त्यांना परत न करता २,१३,२५,०१७ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आणि ६ जुलै रोजी आरोपीला अटक करण्यात आली.

अशा बनावट कंपन्या गुंतवणुकीतून अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना फसवू शकतात त्यामुळे अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून जनहितार्थ करण्यात येत आहे.

आयुक्तांनी दिला सार्वजनिक स्वच्छतेवर भर, सार्वजनिक शौचालयाची नियमित पाहणी करण्याचे दिले निर्देश !

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

महापालिका क्षेत्रात लोकसंख्येची जास्त घनता चाळ परिसर व झोपडपट्टी परिसरात आहे. या परिसरात राहणारे नागरिक प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात आणि या सार्वजनिक शौचालयांमार्फत कुठल्याही संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर दिला असून महापालिकेच्या सर्व विभागिय उपायुक्तांना सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची नियमित पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या १० प्रभागात एकुण ४१९ शौचालयात ४२९२ सिटची सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दलितवस्ती सुधारणे अंतर्गत अजून 38 शौचालय (एकुण २४९ सिट) उभारण्याचे काम सुरु असून त्यापैकी २८ शौचालयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित १० शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या दैनंदिन साफसफाईसाठी मे.जनसेवा सुविधा संस्था यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत साफसफाई केली जाते. सदर संस्थेने प्रभागनिहाय शौचालयांची माहिती घेऊन शौचालयांच्या साध्यस्थितीबाबतचा अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. त्‍या अनुषंगाने नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्ती संदर्भातील निविदा काढण्यात आली असून सदर निविदा कार्यवाहीत आहे. महापालिका परिसरात ‘पे ॲण्ड युज’ ची एकुण २६ शौचालये (एकुण २३५ सिट) असून सदर शौचालयांच्या साफसफाईसाठी नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत तेथील दैनंदिन साफसफाई करण्यात येते.

विभागीय उपआयुक्तांनी केलेल्या शौचालयांच्या पाहणीच्या वेळेस आढळून आलेल्या अस्वच्छ शौचालयांची साफसफाई प्रभागातील आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या देखरेखीखाली करुन घेण्यात येत आहे.

निर्बंध आणखी शिथिल व्हायला हवेत ! अर्थचक्र गतिमान करण्यावर पालिकेची भर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

पालिकेची भूमिका : अर्थचक्र गतिमान करण्यावर भर

मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, रुग्णसंख्या थोडी वाढली तरी पुरेशा खाटा आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करावेत, अशी भूमिका पालिकेने राज्य सरकारच्या आरोग्य विभागाबरोबरच्या बैठकीत मांडली. ‘डेल्टा प्लस’च्या भीतीमुळे राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या स्तरात ठेवून २८ जूनपासून जुनेच निर्बंध लागू ठेवले आहेत. त्यामुळे सगळे व्यवहार थंडावले असून, अर्थचक्र मंदावले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काही निर्बंध शिथिल करण्यास हरकत नाही, असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राज्याच्या आरोग्य विभागासोबत झालेल्या बैठकीत मांडल्याचे समजते.

कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाने ही बैठक आयोजित केली होती. कोरोनामुळे लागू होत असलेले निर्बंध शिथिल करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. निर्बंधाबाबत कोरोना कृतिदलाशी चर्चा करून काही दिवसांत राज्य सरकार निर्णय घेईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईत आता ‘जम्बो’ रुग्णालयांची संख्या वाढली असून, पुरेशा खाटाही उपलब्ध आहेत. तसेच रुग्णांसाठी अन्य सुविधाही उपलब्ध असल्यामुळे थोडे निर्बंध खुले केल्यास रुग्णसंख्या वाढली तरी सुविधा उपलब्ध होऊ शकतील. आरोग्य व्यवस्था पुरेशी सक्षम असल्याने रुग्णसेवा पुरविणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात खुले केल्यास फारसा परिणाम होणार नाही असे मत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी झालेल्या बैठकीत व्यक्त केले.