Home Blog Page 232

वाहन पार्किंगसह ‘चार्जिग’ ची सुविधा नव्या इमारतींमध्ये लवकरच बंधनकारक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंची महत्वपूर्ण माहिती..

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांना (ई.व्ही.) प्रोत्साहन देण्याकरिता २०२२ पासून नवीन निवासी प्रकल्पात विकासकांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिग सुविधेचा पर्याय घर खरेदीदारांना देणे बंधनकारक करण्याचा विचार आहे. याशिवाय निवासी इमारतींच्या आवारात खासगी चार्जिग पायाभूत सुविधा उपलब्ध करता याव्यात, यासाठी मालमत्ता करातही सवलत देण्याचे २०२१ च्या ‘महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणा’त प्रस्तावित आहे. हे धोरण प्रत्यक्षात आल्यास राज्यात विकलेल्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना धोरणाचा कालावधी संपेपर्यंत (२०२५) रस्ते करातून माफी दिली जाईल.

या प्रस्तावित धोरणाला नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. नव्या धोरणानुसार २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांचा असावा, एप्रिल २०२२ पासून मुख्य शहरांमधील सर्व नवीन शासकीय वाहने इलेक्ट्रीक असावी, पाच प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे २५ टक्के विद्युतीकरण, सात शहरांमध्ये चार मुख्य महामार्गावर सार्वजनिक व निम सार्वजनिक चार्जिग सुविधांची (संख्या २५००) उभारणी, यासाठी प्रयत्न केले जातील. विविध स्तरावर प्रोत्साहन ही उद्दिष्टे साध्य करण्याकरिता इलेक्ट्रिक वाहन निर्मिती, विक्री, चार्जिग अशा वेगवेगळ्या स्तरावर प्रोत्साहन दिले जाईल. या अंतर्गतच नव्या निवासी इमारतीत २० टक्के, संस्थात्मक आणि व्यावसायिक संकुलात २५ टक्के तर शासकीय कार्यालयांमध्ये १०० टक्के इतके ई.व्ही. पार्किंग देण्याचे बंधनकारक करण्याचा विचार आहे. या शिवाय वाहन नोंदणी, नूतनीकरणातही या वाहनांना सूट दिली जाईल असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले.

११ गुन्हे दाखल असलेल्या चैन स्नॅचरला विष्णुनगर पोलिसांनी शिताफीने केला गजाआड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १६.०५.२०२१ रोजी सकाळी ०५.३० वाजताच्या सुमारास फिर्यादी सौ.अनिता अनिल राऊळ (वय: ५५ वर्षे), राहणार नीलकंठ विहार, सुभाष रोड, नवापाडा, डोंबिवली (पश्चिम) त्यांच्या पतीसह भागाशाला मैदान, डोंबिवली (पश्चिम) येथून चालत जात असता आरोपी फजल आयुब कुरेशी (वय: 25 वर्षे) राहणार सूचक नाका, टाटा पावर जवळ, कल्याण (पूर्व) याने सफेद रंगाच्या ऍक्टिवा गाडीवरून मागून येऊन फिर्यादी अनिता राऊळ यांच्या गळ्यातील ८ ग्रॅम व ८.५ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची मंगळसुत्रे खेचून घेऊन पळून गेला होता म्हणून त्याच्या विरुद्ध विष्णूनगर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास विष्णूनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि श्री. गणेश वडणे व त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने निश्चित करून आरोपीस गुन्हे शाखा नवी मुंबई यांच्याकडून त्याचा ताबा घेऊन त्यास अटक करत गुन्ह्याच्या तपासाअंती सदर आरोपीकडून गुन्ह्यामध्ये खेचलेले ८ ग्रॅम वजनाचे एक व ८.५ ग्रॅम वजनाचे एक असे एकूण १६.५ ग्रॅम वजनाची दोन मंगळसूत्रे हस्तगत केली आहेत.

सदरची कारवाई ही डोंबिवली विभागाचे मा. सहाय्यक आयुक्त श्री.जयराम मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. गणेश वडणे, पो.हवा पाटणकर, पो.ना कुरणे, पो.ना सांगळे, पो.ना लोखंडे, पो.कॉ कुंदन भामरे, पो.कॉ बडगुजर यांनी सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडली व संबंधित आरोपीवर यापूर्वी ११ गुन्हे दाखल आहेत व पुढील तपास सुरू आहे असे विष्णूनगर पोलीस यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांचा प्लास्टिक हद्दपार करण्याचा वसा…

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते या गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांमध्ये ‘कापडी पिशव्यांचा वापर करा’ अशी जनजागृती करीत आहेत. त्यांच्या या जनजागृतीला थोडे-फार यशही आले आहे.

प्लास्टिकचा कचरा हा राज्यात सर्वांनाच भेडसावणारा प्रश्न आहे. प्लास्टिक हजारो वर्षे नष्ट होत नाही. माणसाप्रमाणेच प्राणी आणि जलचर यांच्यासोबत सुपीक जमीन नापीक करीत आहे. प्लास्टिक बंदीसाठी पर्यावरणप्रेमी आणि ‘राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार श्री.अवधुत सावंत’ हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्लास्टिक होलसेल विक्रेत्यांवर कारवाई करून टन च्या हिशोबात प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्यांच्या कारवाई करत त्यातून महापालिकेला आर्थिकदृष्ट्या महसूल मिळवून देत अनेक वर्षांपासून लढा देत होते. त्यानंतर महाराष्ट्रात प्लास्टिकचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली. प्लास्टिक वापरण्याची सवय जुनी असल्याने ती लागलीच सुटणे तसे कठीणचं होते. त्यामुळे प्लास्टिक पिशवी वापरण्यावर कारवाई सुरू झाली की, फक्त पिशवी गायब होते.

पण नागरिकांना कापडी पिशवी वापरण्याची सवय लागावी, यासाठी ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून स्वाती मोहिते ह्या काम करीत आहेत. त्यांच्या या कामात त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेचीही साथ मिळाली. कल्याण-डोंबिवली महापालिकेने ‘शून्य कचरा’ मोहीम राबविण्यास सुरूवात केली आहे. त्यामध्ये सोसायटीतून येणारा ओला कचरा व सुका कचरा वेगळा गोळा केला जातो. तसेच सुका कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे ‘ड्राईव्ह’ केले आहेत. त्या ‘ड्राईव्ह’नुसार नागरिक आपल्या घरातील वस्तू आणून महापालिकेकडे जमा करतात. त्यामध्ये घरातील जुने कपडेही गोळा केले जातात. याशिवाय महापालिकेने ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रमही सुद्धा सुरू केला आहे.

या उपक्रमांतर्गत घरातील जुने पण वापरण्याजोगे कपडे नागरिकांनी महापालिकेच्या उभारलेल्या माणुसकीच्या भिंतीजवळ आणून द्यायचे आहेत. शहरातील गरजू व्यक्ती यातील काही कपडे घेऊन जातात. उर्वरित कपडे महापालिका ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेला देते. या संस्थेच्या माध्यमातून स्वाती मोहिते या बचतगटदेखील चालवितात. या बचतगटातील महिला महापालिकेकडून आलेले कपडे धुवून घेतात. त्यांना सॅनिटाईझ केले जाते. त्यानंतर त्या कपड्यापासून कापडी पिशवी बनविली जाते. कापडी पिशवी बनविण्याच्या या उपक्रमामुळे बचतगटातील ४५ महिलांना काम मिळाले आहे. या पिशव्या बाजारात पाच रूपये किंमतीने विकल्या जातात. या महिला महिन्याला १५ हजार पिशव्या तयार करतात. एक पिशवी शिवण्यासाठी त्यांना अडीच रूपये मिळतात. पण जुन्या कपड्याच्या पिशव्या तयार करताना मेहनत जास्त लागत असल्याचे ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते सांगतात.

स्वाती यांचे बालपण मुंबईतील घाटकोपर या परिसरात गेले. त्यांचे शिक्षण हे घाटकोपर येथील मराठा विद्यामंदिर या शाळेत झाले. त्यानंतर ‘एसएनडीटी’ महाविद्यालयातून त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बारावी झाल्यानंतर त्यांनी लगेचच नोकरी करण्याचा निर्णय घेतला. पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांचे २००५ मध्ये लग्न झाले आणि त्या कांजूरमार्ग येथे राहायला आल्या. २००८ मध्ये त्या डोंबिवलीकर झाल्या. डोंबिवलीत आल्यानंतर आपोआपच त्या सामाजिक कार्याकडे ओढल्या गेल्या. त्याकाळात बचतगटही मोठ्या जोमात चालत होते. त्यामुळे आपणही बचतगटाची स्थापना करावी असा विचार त्यांच्या मनात आला. त्यानुसार २०१२ मध्ये त्यांनी बचतगटाची स्थापनाही केली. ‘एकता बचतगट’ त्यांनी सर्वप्रथम स्थापन केला. त्यातून अनेक योजना राबवित गेले.

विधवा पेन्शन योजना, महाराष्ट्र घरेलु महिला कामगार नोंदणी असे विविध कार्यक्रम त्यांनी हाती घेतले. महाराष्ट्र घरेलु कामगार महिला नोंदणीतून त्यांनी १८०० ते २००० महिलांची नोंदणी केली आहे. २०१६ मध्ये ५५ वर्षांवरील २५० महिलांना त्यांनी दहा-दहा हजार रुपये मिळवून दिले होते. ५६ विधवा महिलांसाठी पेन्शन योजना राबविली होती. तरुण मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये ३०० ते ४०० तरूणांना नोकरी मिळाली. एक बचतगट स्थापन करून स्वाती मोहिते ह्या तेवढ्यावर थांबल्या नाहीत. त्यांनी ८० ते ९० बचतगटांची स्थापना केली. त्या बचतगटातील महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी मदत केली. महिलांना केवळ काम मिळवून दिले नाही तर व्यवसाय उभाह करण्यासाठी लागणारे कर्जही उपलब्ध करून दिले. ब्युटीपार्लर कोर्सचे प्रशिक्षणही महिलांना दिले. ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्था बचतगटाच्या माध्यमातून ज्या कापडी पिशव्या बनवितात त्या फेरीवाल्यांना दिल्या जातात.

या कामात त्यांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त रामदास कोकरे यांचे सहकार्य मिळाले आहे. याशिवाय नवीन कपड्यांच्याही पिशव्या या बचतगटातील महिला बनवितात. त्या पिशव्या दहा रूपयाला बाजारात विकल्या जातात. ‘लॉकडाऊन’च्या काळात घर कामगार महिलांच्या खात्यात सरकारतर्फे दीड हजार रूपये जमा करण्यात येणार होते. ती रक्कम महिलांना मिळावी याकरिता अर्ज भरण्याचे कामही स्वाती यांनी बचतगटांच्या माध्यमातून केले आहे. यामध्ये १८०० महिला लाभार्थी आहेत. त्यापैकी २७५ महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. १५० महिलांना त्यांचा लाभही मिळाला आहे. महिला या सक्षम आहेत, त्यांना सबल करण्याची खरी गरज आहे. त्यामुळे महिलांना सबल करणे, हेच आमचे पुढील उद्दिष्ट असल्याचे स्वाती मोहिते प्रसिद्धी माध्यमांना सांगतात.

घरकाम करणार्‍या महिलांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या,आपले शहर स्वच्छ राहावे म्हणून स्वच्छतादूत म्हणून काम करणार्‍या ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सन्मान देऊन गौरविले आहे. या व्यतिरिक्तही अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे. अशा निरलस जनसेवा करणार्‍या आणि महिलांना सबल करण्यासाठी झटणार्‍या ‘सक्षम नारी’ सेवाभावी संस्थेच्या स्वाती मोहिते यांना पुढील वाटचालीसाठी ‘राष्ट्रीय पदक’ विजेत्या पत्रकार अवधुत सावंत यांच्याकडून जाहीर रित्या भरभरून शुभेच्छा.

लसीकरण झाले नसल्याने धोका असल्याचे मत; त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांची अनुकूलता नाही..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाने पालकांची मते जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण चालू केले आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे मात्र शाळा सुरु करण्यास अनुकूल नसल्याचे समोर आले आहे. शाळा अद्याप सुरू करू नयेत, लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांना कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका जास्त आहे, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान १८ वर्षापेक्षा जास्त मुलांचे लसीकरण होत असल्याने महाविद्यालय सुरू करण्यास हरकत नसल्याचही ते म्हणाले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

राज्यात शाळा सुरु करण्यासाठी शिक्षण विभागाच्या हालचाली

शाळा सुरू करण्याबाबत राज्यातील पालकांची मते जाणून घेऊन यामध्ये आतापर्यंतच्या डेटावरून राज्यातील सुमारे ८५ टक्के पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार असल्याचे समोर आले आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे राज्यात शाळा बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील कोविडमुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. याचसोबत अनेक पालक, शिक्षक इतर वर्ग सुरु करण्याबाबत देखील वारंवार विचारणा करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरु करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे.

शाळा सुरू करण्याबाबत ८५ टक्के पालकांचा होकार; शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून माहिती समोर..

आरोग्यमंत्री राजेश टोपे हे राज्यात शाळा सुरु करण्यासाठी अनुकूल नाहीत त्यामुळे राज्यात शालेय शिक्षण विभाग तयारी करत असले तरी शाळा सुरु करू नयेय, असे मत खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नोंदवले आहे. अद्याप लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही. अशातच तिसरी लाटही तोंडावर आहे. लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भावाचा धोका सर्वाधिक आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्यास स्वतः मी तरी अनुकूल नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

राज्यातील कोविड मुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा १५ जुलै पासून सुरु होणार !

राज्यात बाहेरुन येणाऱ्यांसाठी ४८ तासांच्या आतील कोरोना आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचा
आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी म्हणून राज्यात प्रवेश करताना बाहेरून येणाऱ्या नागरिकांना ४८ तासांची मुदत असलेला कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य असणार आहे. तसा प्रस्ताव आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. दरम्यान, ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत. त्यांना मात्र राज्यात प्रवेश मिळणार आहे. आज जालनामध्ये प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

नियमांचे उल्लंघन करणारे कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, बार आणि दुकाने केडीएमसीकडून सील..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवलीत सध्या कोवीड ३ अंतर्गत निर्बंध लागू असूनही गेल्या काही दिवसांपासून त्याचे उल्लंघन सुरूच होते. त्यामूळे केडीएमसी प्रशासनाने कोवीड नियम उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, बार आणि दुकानांवर कारवाई केली.

कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका क्षेत्रात लेव्हल ३ अंर्तगत सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा असून अत्यावश्यक नसणारी दुकाने शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी कारवाई केली. तर कोवीड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व प्रभागामधील फेरीवाल्यांवरही कारवाई करत हे फेरीवाले हटवण्यात आले.

तर दुपारी ४ नंतरही नियमांचे उल्लंघन करून कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरातील हॅाटेल दिपक, दिक्षा बार आणि डोंबिवलीतील बंदिश पॅलेस बार, साई पूजा बार सुरूच असल्याचे निदर्शनास आल्याने ते सील करण्यात आले. जे प्रभागामधील पुना लिंक रोडवरील सिरॅमिकची दुकाने, मोमीन टेलीकॅाम आदी दुकानेही नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील करण्यात आली.

त्याचसोबत सार्वजनिक मैदाने, बगीचे येथे सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंतच सुरू ठेवणे आवश्यक आहे. तथापी त्यानंतरही अशा ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित असल्याचे दिसून आल्याने नागरिकांना बाहेर काढण्यात आले. ही कारवाई यापूढेही अशीच सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.