Home Blog Page 233

ईडीच्या ‘पीडा’ सोसल्यानंतर आमदार प्रताप सरनाईकांचे मीरा भाईंदर शहरात पहिल्यांदाच आगमन; ‘शिवसंपर्क अभियाना’ ची केली सुरुवात!

भाईंदर – ईडीच्या पीडा सोसल्यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आज पहिल्यांदाच मीरा भाईंदर शहरात दिसले. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्या पासून जवळपास गेल्या वर्षभरापासून प्रताप सरनाईक भूमिगत झाल्यासारखे गायब झाले होते.
आज अखेर मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आपल्या समर्थकांसह उपस्थित राहून ‘शिवसंपर्क अभियाना’चा शुभारंभ आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. यावेळी त्यांच्या हस्ते मीरा भाईंदर शहरावासियां करिता आपल्या आमदार निधीतून २ कार्डियाक ऍम्ब्युलन्स आणि २ मोक्ष रथ या दोन वाहनांच्या चाव्या महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
१२ जुलै ते २४ जुलै या काळात महाराष्ट्र राज्यात शिवसेनेकडून ‘शिवसंपर्क अभियान’ राबवण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचा शुभारंभ आज मीरा-भाईंदर शहरात झाला असून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मोक्ष रथाचे लोकार्पण भाईंदरमध्ये करण्यात आले. मीरा-भाईंदर शहराला या कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मोक्ष रथाची सुविधा २४ तास मोफत मिळणार आहे. मीरा-भाईंदर महापालिकेत शिवसेनेचे मीरा-भाईंदरमधील सर्व नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांना आमदार प्रताप सरनाईक यांनी कार्डियाक ऍम्ब्युलन्स व मोक्ष रथाच्या चाव्या सुपूर्द केल्या.

कोरोना साथरोगाच्या पहिल्या लाटेच्या काळात मोठ्या प्रमाणात अन्न-धान्य आणि आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे काम आमदार प्रताप सरनाईक यांनी केले होते. अनेक आरोग्य विषयक उपक्रम त्यांच्याकडून सातत्याने राबवले जात होत्या. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कठीण प्रसंगी मात्र सेनेचे आमदार प्रताप सरनाईक शहरात कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आमदार गायब झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या विषयी जी काही माहिती मिळत होती ती प्रसार माध्यमांकडूनच मिळत होती. मात्र आज अनेक दिवसां नंतर आज मीरा भाईंदर शहरात त्यांचे आगमन झाले आणि त्यांच्या आमदार निधीतून २ कार्डियाक ऍम्ब्युलन्स व २ मोक्ष रथ नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यासाठी जवळपास १ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या कार्डियाक ऍम्ब्युलन्स अत्याधुनिक असून त्याचा मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे. रुग्णाला घेऊन एखाद्या ठिकाणाहून हॉस्पिटलपर्यंत जाताना कार्डियाक ऍम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजनची सुविधाही असणार आहे. त्यात एक डॉक्टर नर्स यांची बसण्याची सोय, ऑक्सिजन सुविधा व आवश्यक त्या इतर आरोग्य सुविधा आहेत. ओवळा माजिवडा मतदारसंघात मीरा भाईंदर शहरात ही कार्डियाक ऍम्ब्युलन्स विनामूल्य लोकांना सेवा देणार आहे. त्याचा गरजू रुग्णांना आधार होईल.

मीरा भाईंदर शहरातील नागरिकांसाठी ‘मोक्ष रथ’

शहरातील एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे पार्थिव शरीर तिरडीवर स्मशानभूमीपर्यंत अनेक लोक नेत नाहीत, पार्थिव नेण्यासाठी वाहन उपलब्ध करावे लागते. अनेक वेळा महापालिकेची शववाहिनी उपलब्ध होतेच असे नाही व अनेकदा लोकांची गैरसोय होते. शहरात स्मशानभूमी दूर असल्यास मृताचे नातेवाईक व मित्रपरिवाराला तिथे चालत जाणे शक्य नसते. उन्हाळ्यात पावसाळयात अंत्ययात्रा चालत नेणे शक्य होत नाही. नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तिरडीवर मृतदेह न नेता अंत्ययात्रा वाहनात मृतदेह स्मशानात नेले जातात. त्यामुळे नागरिकांची हि गरज ध्यानात ठेऊन हा अत्याधुनिक ‘मोक्ष रथ’ तयार करण्यात आला आहे. मीरा-भाईंदर शहरात मोक्ष रथ २४ तास विनामूल्य सेवा देणार आहे.
त्याचबरोबर अनेकदा एखाद्याचे पार्थिव दूरवर आपल्या गावी अंत्यसंस्कारासाठी न्यायचे असते. त्यासाठी या मोक्ष रथात पार्थिव शरीर ठेवण्यासाठी बर्फ पेटी म्हणजेच ‘शीत शवपेटी’ याचीही सोय करून देण्यात आली आहे. त्याचा गरजेच्या वेळी लोकांना नक्कीच उपयोग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेच्या ‘शिवसंपर्क अभियाना’ ची सुरुवात!

शिवसेनेचे ‘शिवसंपर्क अभियान’ आजपासून सुरू झाले असून हे शिवसंपर्क अभियान १२ जुलै ते २४ जुलै या काळात राबवण्यात येणार आहे. जनतेची अधिकाधिक सेवा व कामे करा, आरोग्य सुविधा लोकांना मिळवून द्या, असे आदेश शिवसेना पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मतदारसंघातील नागरिकांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कटिबद्ध असून आम्ही आरोग्य सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत, आणखी काही उपक्रम लवकरच सुरु करू, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मात्र त्यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी ईडीची जी चौकशी सुरू आहे त्याबद्दल मात्र त्यांनी काहीही बोलणे टाळले आहे.

 

राजकीय हस्तक्षेपाची लागण आणि लसीकरणाला नियोजन शून्यता..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

देशाची राजकीय यंत्रणा नियोजनाच्या (Planning) बाबतीत उजवी असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या (Implementation) बाबतीत मात्र बहुतांश वेळेला माती खाते हा आजवरचा भारतीय राजकीय व प्रशासकीय व्यवस्थेचा इतिहास आहे. याच इतिहासाची पुनरावृत्ती लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत देखील होताना दिसत आहे.

कोरोना आपत्तीमुळे नागरिकांसमोर विविध प्रकारचे आव्हाने आहेतच आता त्यात भर पडते आहे ती लस मिळवण्याच्या आव्हानाची.

सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे नियोजनाच्या बाबतीत भारतीय राजकीय व प्रशासकीय व्यवस्था उजवी मानली जात असली तरी लसीकरणाच्या बाबतीत मात्र नियोजनात देखील ती अपयशी ठरल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. अन्य देश लस उपलब्ध होण्याच्या आधीच लसीकरणाचे नियोजन करत होते, तेव्हा भारत मात्र टाळेबंदी या एकमेव उपयाची दवंडी पिटत होता. भारताला जाग आली ती अगदी या वर्षाच्या सुरुवातीला. तेव्हापासून आजपर्यंत लसीकरण मोहीम नागरिकाभिमुख होऊ शकलेली नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे नियोजनशून्यतेचा संपूर्ण पणे दिसून येणारा अभाव.

अंमलबजावणी पातळीवर अभ्यासपूर्ण नियोजन निकडीचे

भारताची लोकसंख्या व उपलब्ध होणारी लसीची मात्रा यात मोठ्या प्रमाणात तफावत आहे हे नाकारता येणार नाही. अशा प्रकारची तफावत स्वभाविक आहे. कारण लसीचे उत्पादन हे मर्यादित स्वरूपाचे आहे. मागणी आणि पुरवठा यातील विसंगतीमुळे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु, खेदाची गोष्ट ही आहे की त्याचादेखील तुटवडा आहे. राजकीय व प्रशासकीय यंत्रणा दैनंदिन पातळीवर येणाऱ्या या अनुभवातून कुठलाही बोध घेताना दिसत नाहीत आणि त्याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे.

वस्तुतः लसीचा तुटवडा लक्षात घेत सरकारने टप्प्याटप्प्याने वयोमर्यादा खाली आणायला हवी होती. परंतु, श्रेय वादाच्या अभिलाशापायी सरकारला त्याचा देखील विसर पडलेला दिसतो. एकीकडे सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय योजत आहे. परंतु, आज मितीला सर्वाधिक गर्दी ही लस केंद्रावर होताना दिसत आहे. योग्य प्रकारच्या नियोजनातून ही गर्दी टाळता येऊ शकते.

असेल वशिला तर लसीकरणाला चला

गेल्या दहा-बारा दिवसात लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागात लसीकरणात वारंवार खंड पडत आहे. परिणामी लसीकरणाच्या दिवशी प्रत्यक्ष केंद्रावर शंभर/दोनशे लस उपलब्ध असताना पाचशे/हजार नागरिक जमा होत आहेत. प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नियोजनाचा बोजवारा उडालेला दिसत असल्यामुळे लसीकरण केंद्रात चार पाच तास उभा राहून देखील लस मिळेल याची शाश्वती नसते. परिणामी नागरिक अधिकच पॅनिक होताना दिसत आहेत.

नागरिकांची अनियंत्रित गर्दी हे प्रशासना समोरील एक आव्हान आहेच. पण त्यात वर्तमानात भर पडताना दिसते आहे, ती राजकीय हस्तक्षेपाची. राज्याच्या अनेक भागांमध्ये लोकप्रतिनिधी सर्रासपणे “आपल्या माणसांसाठी” लस मॅनेज करत आहेत. तालुका जिल्हा पातळीवर सरपंच, नगरसेवक थेट लसीकरण केंद्रात उपस्थित राहून लसीकरण मोहिमेत थेटपणे हस्तक्षेप करताना दिसतात. यामुळे रांगेतील लोकांना लस मिळत नाही. परंतु, ज्यांचे हात लोकप्रतिनिधीपर्यंत पुरत आहेत. त्यांना मात्र रांगे शिवाय मागच्या दाराने लस मिळत आहे. यामुळे आज परिस्थिती अशी निर्माण झाले आहे की “असेल वशिला तरच लसीकरणाला चला”.

अनेक नागरिक शहरातून आपले नातेवाईक जसे शिक्षक, आरोग्य कर्मचारी कार्यरत असणाऱ्या खेड्यामध्ये जाऊन लसीकरणाचा लाभ घेत आहेत. हे निश्चितपणे सुचिन्ह नव्हे.

लोकप्रतिनिधी आपण स्वतः लस शोधली आहे व स्वखर्चाने लसीची निर्मिती केली आहे, अशा अविर्भावात लसीकरण केंद्रात मुक्तपणे हस्तक्षेप करताना दिसतात. हा एक प्रकारे प्रशासकीय यंत्रणेचा पराभवच ठरतो. प्रशासकीय यंत्रणा लोकप्रतिनिधी समोर इतकी लाचार का होते आहे? हा संशोधनाचा विषय बनत चालला आहे.

ऑनलाइन मोहिमेचा पूर्ण फज्जा

Cowin App सातत्याने अपडेट केले जात नसल्यामुळे ऑनलाइन रजिस्ट्रेशन करताना प्रत्यक्ष पातळीवर लसीकरण उपलब्ध असताना ॲपवर मात्र लसीकरण केंद्राची माहिती उपलब्ध नसते. यामुळे ऑनलाइन लसीकरण नोंदणी मोहिमेचा पूर्णतः बोजवारा उडालेला आहे आणि बहुतांश नागरिक हे आता ऑफलाइन पद्धतीने लसीकरण केंद्रावर जाण्यास प्राधान्य देत आहेत.

सरकारी यंत्रणेकडून नागरिकांना लसीकरण उपलब्धतेबाबत रीतसर माहिती मिळत नसल्यामुळे नागरिकांनी नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आश्चर्याची गोष्ट ही की मोफत लसीकरण केंद्राबाबत ॲपवर माहिती अपडेट नसली तरी खाजगी केंद्राबाबत माहिती मात्र अपडेट असते. सरकारी केंद्रावर लसीकरणाचा तुटवडा असणाऱ्या दिवशी देखील खाजगी केंद्रात मात्र लसीकरण अखंडपणे सुरू असते. हा प्रकार म्हणजे हलवाईच उपाशी राहण्यासारखा आहे.

टोकन पद्धत अनिवार्य हवी

नागरिकांसाठी लसीकरण सुलभ होण्यासाठी संपूर्ण लसीकरण केंद्रावर शासनाने टोकन पद्धत अनिवार्य करायला हवी. प्रत्येक लसीकरण केंद्रावर नोंदणी विभाग स्वतंत्र निर्माण करावा व त्या त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची नोंदणी करून त्यांना टोकन नंबर द्यायला हवा. वर्तमानात काही ठिकाणी टोकन पद्धतीचा अवलंब केला जातोय. परंतु, टोकण केवळ दैनंदिन पातळीवर दिले जात असल्यामुळे रांगेत उभ्या असणाऱ्या नागरिकांना जर त्यादिवशी टोकन मिळाले नाही तर पुन्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेपासून रांग लावावी लागते. एवढे करून देखील दुसऱ्या दिवशीही टोकन मिळेलच किंवा लस मिळेलच याची शाश्वती नसते .

अशा नियोजनशून्य पद्धतीमुळे होणारी नागरिकांची ससेहोलपट टाळण्यासाठी टोकण हे केवळ दैनंदिन पातळीवर न देता ते सलग पद्धतीने द्यावेत व लस उपलब्ध होईल त्या त्या प्रमाणात टोकन प्राप्त होणारे नागरिकांना लसीकरण केंद्रवर येण्याचा मेसेज द्यायला हवा. अर्थातच प्रशासनाने प्रामाणिक इच्छाशक्ती दाखवली तर लसीकरणात सुलभीकरण आणत लसीकरण प्रक्रिया नागरिकाभिमुख केली जाऊ शकते.

ज्यांचा आवाज प्रशासनापर्यंत, राजकीय व्यवस्थेपर्यंत पोचू शकतो त्यांच्यासाठी लसीकरणाचे विविध माध्यम उपलब्ध आहेत, हा वर्ग येनकेन प्रकारे लस पदरात पाडून घेऊ शकत असल्यामुळे हा लाभार्थी वर्ग आवाज उठवण्याची शक्यता नाही. प्रसार माध्यमांच्या दृष्टीने हा विषय महत्त्वाचा नसल्यामुळे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया याबाबतीत “हाताची घडी तोंडावर बोट” अशा थाटात आहे.

वस्तूत: प्रसारमाध्यमांनी लसीकरण केंद्रावरील जमिनीवरील वास्तवाचे चित्रीकरण करून प्रशासकीय व राजकीय यंत्रणा यांच्या डोळ्यात अंजन घालने जरुरीचे आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणारी प्रसार माध्यमे देखील भरकटलेली दिसतात. परिणामी नागरिकांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचत नाही आणि व्यवस्था परिवर्तन होताना दिसत नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात

कागदावरील रिपोर्ट आणि जमिनीवरील वास्तव यात जमीन-अस्मानाचे अंतर असते ही प्रशासकीय संस्कृती ध्यानात येत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ खालून वर येणाऱ्या रिपोर्ट वर विश्वास न ठेवता आकस्मिकपणे लसीकरण केंद्राला भेट देऊन जमिनीवरील वास्तव जाणून घ्यावे व त्या अनुषंगाने व्यवस्था सुधारण्यासाठी उपाय योजायला हवेत. एकूणातच लसीकरणाच्या बाबतीत नागरिकांची अवस्था “भीक नको, पण कुत्रे आवर” अशी झालेले आहे व त्याच कारण आहे प्रशासन पातळीवरील असंवेदनशीलता.

नियोजनशून्य व असंवेदनशील कारभारामुळे अनेक नागरिक दुसऱ्या डोससाठी शासनाने आखून दिलेल्या 84 दिवसाची पूर्तता झाल्यानंतर देखील अनेक दिवस लसीपासून वंचित राहत आहेत. याचा परिणाम लसीकरणाच्या परिणामकारकतेवर होऊ शकतो याकडे देखील शासनाने लक्ष द्यायला हवे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी पंतप्रधान मोदींचा सज्जतेचा इशारा; देशभरात १५०० ऑक्सिजन प्लांट उभारा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. दुसऱ्या लाटेदरम्यान अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुडवडाही जाणवला होता. आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रानं तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूबाबतच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान मोदी यांनी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये १५०० ऑक्सिजन प्लान्ट्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. तसंच लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात यावं असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आहे. याशिवाय ऑक्सिजन प्लांट्सची देखरेख आणि त्यांच्या कामाबाबत रुग्णालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यावरही मोदींनी भर दिला.

दरम्यान, या ऑक्सिजन प्लांट्ससाठी पंतप्रधान मदत निधीमधून खर्च दिला जाणार आहे. तसंच यामुळे देशात ४ लाख ऑक्सिजन बेड्स उभारण्यासही मदत मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात अशी काही लोकं असली पाहिजे ज्यांना ऑक्सिजन प्लांट्सची देखभाल आणि त्याच्या कामकाजाबद्दल प्रशिक्षण दिलं जाईल, असंही मोदी बैठकीदरम्यान म्हणाले. सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी दुसऱ्या लाटेदरम्यान हाहाकार माजला होता. याशिवाय सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून खबरदारी घेतली जात आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबई, बंगळुरू, दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्स बेड्सची कमतरता जाणवली होती.

दुसऱ्या लाटेदरम्यान सरकारच्या कामाकाजावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. परंतु आता खरबदारी म्हणून सरकारनं उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे. तसंच लवकरात लवकर ऑक्सिजन प्लांट्स उभारण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीदरम्यान केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांना राज्य सरकारांसोबत मिळून काम करण्यास सांगितलं आहे. याशिवाय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही योग्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितलं आहे.

‘ईडी’ कडून परमबीर सिंग यांचीही लवकरच चौकशी !!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांचा तपास सध्या ‘ईडी’ कडून सुरु आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ‘ईडी’ने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव ‘ईडी’च्या कोठडीत आहेत. याप्रकरणी ‘ईडी’कडून तपास सुरुच असून आता ‘ईडी’ अधिकारी लवकरच परमबीर सिंग यांना चौकशीचे समन्स बजावणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेत मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते.

या प्रकरणी सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर ‘ईडी”ने आपला गुन्हा दाखल केला आहे. “ईडी’ने अनिल देशमुख आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर ‘ईडी’ने विशेष कोर्टातून सचिन वाझे याची जेलमध्ये जाऊन चौकशी करण्याची काल परवानगी मिळवली आहे.

‘ईडी’चे अधिकारी उद्या तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझे याची चौकशी करणार आहेत. सचिन वाझे याच्या चौकशीने तपासाची ही साखळी पूर्ण होत नाही. यातील मुख्य तक्रारदार परमबीर सिंग हे आहेत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावणं ‘ईडी’ला आवश्यक आहे. त्यामुळे सचिन वाझे याची चौकशी पूर्ण होताच परमबीर सिंग यांना ‘ईडी’चे अधिकारी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याचं ‘ईडी च्या सूत्रांच म्हणणं आहे

फडणवीसांनी भाजप मधील सर्वांनाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून संपवले; शिवसेनेची टीका..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भाजप नेत्या प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे प्रीतम मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यावरून शिवसेनेने भाजपवर टीका करण्याची संधी साधली आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केले, असं सांगतानाच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते त्यांना राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीसांनी केल्याची टीका शिवसेनेचे खा.विनायक राऊत यांनी केली आहे.

खासदार विनायक राऊत यांनी भाजपमधील धुसफुशीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. ओबीसी समाजाला आणि मराठवाड्यातील ऊसतोड कामगारांचा आधारवड म्हणून मुंडे कुटुंबीयांकडे पाहिले जाते. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे त्याच ताकदीने या वर्गाला न्याय देण्याचे काम करत आहेत. दुर्दैवाने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पंकजा यांचे पंख पूर्णपणे छाटून टाकले आहेत. त्याचबरोबर पक्षातलेच एकनाथ खडसे यांना बाद करून टाकलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे होते, त्या सर्वांना फडणवीसांच्या माध्यमातून राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करण्याचं काम झालं. आजही भाजपने पंकजा मुंडेना राजकारण आणि समाजकारणाच्या बाहेर फेकून दिलं आहे, असा सणसणीत टोला ही त्यांनी लगावला आहे.

भाजपाने शिवसेनेला टक्कर देण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रीपद दिलं असेल तर तो त्यांचा भ्रमनिरास असेल. नारायण राणे यापूर्वी मंत्री असताना देखील खुद्द त्यांना सिंधुदुर्गात पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे शिवसेनेचा जो हिसका आहे, त्याचा अनुभव राणेंनी घेतलेला आहे, असं सांगतानाच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत राणेंकडून काही फायदा होणार नाही. मागच्या ३० वर्षांपासून मुंबईत शिवसेना जे काम करते आहे, त्या विश्वासावर पुनश्च एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडी २०२४ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.