Home Blog Page 234

संजय राऊत यांची स्मृती इराणींच्या शैक्षणिक पात्रतेवर टीका; त्यावर चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी निषेध नोंदवला आहे. संजयजी, महिलांची तुलना करताना भान राखा. अन्यथा आम्हालाही आरेला कारे करता येते, असा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. संजयजी काल तुम्ही स्मृती ईराणींबद्दल बरळलात. मुळात तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादकपदाचा काय संबंध आहे ? ते आधी सांगा. मग मी तुम्हाला स्मृती ईराणी आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत मी नक्की खुलासा करेन. आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा खरमरीत इशारा वाघ यांनी दिला आहे.

दरम्यान, पुणे महापालिकेच्या शाळेतील एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावरून स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती. शिक्षणाचा कसा खेळखंडोबा आहे बघा. या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचं नाव धर्मेंद्र प्रधान. चांगले आहेत ते. कालपर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते ते. त्यांच्या आधी रमेश पोखरियाल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता भाजपला कळलं की त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती ईराणी. मॉडेलिंग करायच्या. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकं आपलं शिक्षण खातं सांभाळायचं पाहत आहे. म्हणून तो चित्रपट आला होता ‘शिक्षणाचा आयचा घो’ बरोबर आहे ते, असं संजय राऊत त्यांच्या ट्विट मध्ये म्हणाले होते.

सहा हजार पदे लवकरच भरणार, शिक्षण सेवक भरतीला हिरवा कंदिल..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील सुमारे सहा हजार शंभर (६१००) शिक्षण सेवकांची पदे भरण्यास हिरवा कंदिल मिळाला आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र (PAVITRA) प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांची माहिती.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये “अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेत उच्चतम गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.

डिसेंबर, २०१७ मध्ये आयोजित केलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी” (TAIT) परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र प्रणालीच्या माध्यमातून सुमारे १२ हजार ७० शिक्षक सेवक पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ५ हजार ९७० शिक्षण सेवक पदांवर नियुक्त्या देण्याबाबतची प्रक्रिया यापूर्वीच फेब्रुवारी, २०२० मध्ये पूर्ण झाली आहे. विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षण सेवक पदांसाठीच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही शालेय शिक्षण विभागामार्फत लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली.

रस्त्यावर वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत अरेरावी करणाऱ्याला खाकी वर्दीचा झटका..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

वाहतुकीचे नियम डावलून ‘नो पार्किंग’ मध्ये उभ्या असलेल्या गाडीला जॅमर लावल्याचा राग येऊन वाहतूक पोलिसाला ” थेट वर्दी उतरव, चिरून टाकेन ” व पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अशी मुजोरी करत गोंधळ घालणाऱ्या दाम्पत्यास पोलिसांनी अटक केल्यावर मात्र त्यांची मस्ती जिरून चक्क ढसाढसा रडायला लागले. मीरारोड मध्ये गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत.

वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्णत दबडे हे नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाई करत होते. दुपारी अडीचच्या सुमारास मीरारोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर ‘नो पार्किंग झोन’ मध्ये मोटारकार उभी केली होती. त्या ठिकाणी वाहन चालक दिसून न आल्याने त्यांनी जॅमर लावला.

तोच तेथील एका दुकानातून अरुण रतन सिंग (३६) व त्याची पत्नी मीना (३३) रा. साई आंगण, रामदेव पार्क, मीरारोड हे दोघे बाहेर आले. गाडीला जॅमर लावल्याचे पाहून दोघेही पोलिसावर तुटून पडले. वाट्टेल तश्या धमक्या, शिवीगाळ, मुजोरी आणि पैशांची मस्ती दाखवून तमाशा करू लागले.

अरुणने तर “तुझी वर्दी उतरव मग बघा तुला कसा चिरून टाकतो” असे धमकावले. मीनाने तर, तुला विकून गाडी दुरुस्त करेन अशी दमदाटी केली. लोकांची गर्दी जमली पण कोणी पुढे आले नाही. अखेर नया नगरचे पोलीस आल्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. दबडे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण व मीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

रस्त्यावर हिरोगीरी आणि भाईगिरी करणाऱ्या अरुण ला पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात अटक करताच तो ढसाढसा रडू लागला. त्याचा रडतानाचा आणि पोलिसांवर दांडगाई करतानाचा असे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुन्हा दाखल होताच पोलिसांना गयावया करून दोघेही नवरा-बायको माफी मागून पुन्हा आम्ही असे करणार नाही म्हणून गयावया करीत विनवण्या करत होते.

महाविकास आघाडीचा झेंडा पुणे महापालिकेवर फडकवण्याची तयारी करा : संजय राऊत

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

म्हाळुंगे ग्रामपंचायत इमारतीचं उद्घाटन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याहस्ते आज करण्यात आलं. त्यावेळी राऊत यांनी पुणे महापालिकेवरही महाविकास आघाडीचा झेंडा फडकवायला हवा, असा आदेशच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय. राज्यात महाविकास आघाडी आहे. मग महापालिकेवरही महाविकास आघाडी आणायला हवी, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही टोला लगावलाय.

महाराष्ट्रात वेगळा प्रयोग केला आणि तो आदर्श ठरलाय. राज्यातील प्रत्येक महापालिका, ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी झाली पाहिजे. आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं आहे. आम्हाला आता काही नको, तुम्हीही एकत्र येऊन मार्ग काढा, असा सल्ला संजय राऊत यांनी पुण्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलाय. महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका काहीही हातातून सोडू नका, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाजलेल्या वक्तव्याचा आधार घेतला. त्यावेळी उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला होता. मी पुन्हा येईन. मी दिल्लीत असलो तरी माती महाराष्ट्राची आहे. मी पुन्हा येईन, गावात पुन्हा येईन, प्रचारासाठी पुन्हा येईन, असं संजय राऊत म्हणाले. त्यावेळी उपस्थित लोक खळखळून हसत असल्याचं पाहायला मिळालं.

संजय राऊत कार्यक्रमाला पोहोचले आणि बोलायला उभे राहिले तोपर्यंत महापौर मुरलीधर मोहोळ कार्यक्रमस्थळी आले नाही. त्यावेळी बोलताना राऊतांनी महापौरांना टोला लगावला. महापौर अजून आले नाहीत, त्यांची वाट पाहतोय. महापौरांनी सगळीकडे जायला हवं. महापौरांना वाटतं की राज्य आपल्या हातात आलं आहे. ते त्यांना सोडायचं नाही, अशा शब्दात राऊतांनी मोहोळ यांना टोला हाणला.

पुण्यात आम्ही महाविकास आघाडी बनवू, याबाबत वाटाघाटी करु, एकत्र बसून चर्चा करु, असंही राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत आम्ही ८० जागा लढवू शकत नाही का ? असंही राऊत म्हणाले. यापूर्वीही राऊत यांनी आगामी महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीनं एकत्र लढवली तरी शिवसेना ८० जागांवर लढेल, असं राऊत म्हणाले होते. सध्या शिवसेना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटनात्मक काम करत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनमानसातील प्रतिमा दिवसेंदिवस उंचावत आहे. त्यामुळे पुण्यातील आगामी निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या एकेरी राहणार नाही, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.

आरोग्य केंद्राचा निर्णय : कोरोना संकटात २३१०० कोटींच्या आपत्कालीन हेल्थ पॅकेजची घोषणा..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विस्तार काल संपन्न झाला. काल रात्री खातेवाटप झाल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. हे निर्णय कोरोना आणि शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी २३ हजार १०० कोटी रुपयांच्या आपत्कालीन आरोग्य पॅकेजची घोषणा करण्यात आला आहे. याशिवाय एक लाख कोटी रुपये मंडयांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातील. कॅबिनेटची बैठक संपल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मनसुख मंडाविया आणि नरेंद्र सिंह तोमर यांनी कॅबिनेटमधील निर्णयांची माहिती दिली.

नव्या मंत्रिमंडळाची बैठक संध्याकाळी ५ वाजता बोलावण्यात आली होती. जवळपास तासभर ही बैठक चालली. मंडयांचं सशक्तीकरण करणं हा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच १ लाख कोटी रुपये मंडयांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. एपीएमसी मंडया आणखी मजबूत करण्यात येतील. कृषी मंडयांना अधिक संसाधनं दिली जातील. मंडया संपवल्या जाणार नाहीत, असं कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले.

कोरोनाचं संकट पाहता आरोग्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती नवनियुक्त आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली जात आहे. २० हजार नवे आयसीयू बेड तयार करण्यात येत आहेत. कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी २३१०० कोटी रुपयांचं आपत्कालीन हेल्थ पॅकेज तयार करण्यात आलं आहे, असं मंडाविया यांनी सांगितलं.