रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १४ बँकावर कडक कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विविध मानदंडांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बंधन बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांसह १४ बँकांना आर्थिक दंड आकारला आहे. या १४ बँकांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका, विदेशी बँका, सहकारी बँका आणि एक लहान वित्त बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेनेच जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, “नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना बँक फायनान्सच्या काही तरतुदींचे पालन न करणे, ‘कर्ज-आगाऊ आणि इतर निर्बंध’ यासाठी ही कारवाई केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बँकांवर आरबीआयने आकारलेला दंड हा प्रामुख्याने अडचणीत असलेल्या दीवान हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन आणि त्याच्या गट कंपन्यांसह बँकांच्या व्यवहारांशी संबंधित आहे.
रिझर्व्ह बॅंकेच्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेच्या कंपन्यांच्या गटाच्या खात्यांच्या तपासणीत असे आढळले की, आरबीआयने दिलेल्या वरीलपैकी एक किंवा अधिक निर्देशांच्या तरतुदींचे पालन करण्यास बँका अपयशी ठरल्या आहेत. तसेच बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या तरतुदीचे उल्लंघन केले आहे. यासंदर्भात बँकांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि कारण दाखवा नोटीस देण्यात आली आहे. तसेच याचे उत्तर समाधानकारक न मिळाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
मिरारोड- जमिनीच्या एका प्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुजफ्फर हुसैन यांचेवर आरोप करणे भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांना आता चांगलेच महागात पडण्याची चिन्हं दिसत असून पत्रकार परिषदेत मुजफ्फर हुसैन यांचे नाव घेऊन बिन बुडाचे आरोप केल्याचा दावा करून काँग्रेस नेते मुजफ्फर हुसैन यांनी दिनेश जैन यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. या नोटीस मध्ये स्पष्ट उल्लेख केला आहे की जर दिनेश जैन यांनी ४८ तासांत पत्रकार परिषद घेऊन जाहीर माफी न मागितल्यास त्यांचे विरुद्ध न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला जाईल.
याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, मीरारोड पूर्वेकडील शांती नगर सेक्टर- ९ मधील मौजे पेणकर पाडा, सर्व्हे क्र. ३८/२ जुना, २०६/२ नवीन या आरक्षित भूखंड प्रकरणी स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांनी जून महिन्यात पत्रकार परिषद घेऊन मीरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुझफ्फर हुसैन व त्यांच्या मालकीच्या असलेल्या अस्मिता बिल्डरवर आरोप केले होते. दिनेश जैन यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रे सादर करून आरोप केला होता की, मुजफ्फर हुसैन यांनी मीरा भाईंदर महानगरपालिके कडून संबंधित जागेचे विकास हस्तांतरण प्रमाणपत्र (TDR) घेतले परंतु महानगरपालिकेला ती जागा हस्तांतरित केली नाही त्यामुळे महानगरपालिचे फार मोठे नुकसान झाले असून महानगरपालिकेने या संदर्भात तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली होती.
त्याला प्रत्युत्तर म्हणून मुजफ्फर हुसैन यांनी हे सर्व आरोप खोडून काढीत आपली बाजू स्पष्ट करीत स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांना जाहीर आवाहन केले होते की दिनेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन ७ दिवसाच्या आत जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने मुझफ्फर हुसैन यांनी आता स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांना मानहानीची नोटीस बजावली असून नोटीस प्राप्त झाल्याच्या ४८ तासात सदर प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करीत विनाअट जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असे नोटीसीद्वारे कळविण्यात आले आहे.
याबाबत स्थायी समितीचे सभापती दिनेश जैन यांचेशी संपर्क साधला असता मला अजून तरी अशा प्रकारची कोणतीही नोटीस मिळालेली नाही, जेव्हा नोटीस मिळेल तेव्हा माझ्या वकिलांशी सल्लामसलत करून पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता पुन्हा हे प्रकरण चांगलेच तापणार असणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.
भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागण्याने बुधवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मतदारसंघातील भाजप कार्यकत्यांनी ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. ठाणे जिल्ह्याचा विचार करता केंद्रीय मंत्रीमंडळात अद्याप पर्यंत जिल्ह्याच्या कोणत्याही नेत्याला स्थान मिळालेले नव्हते. कपील पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिपद मिळाले आहे.
ठाणे जिल्ह्यात आगरी समाजाचे असलेले राजकीय वर्चस्व आणि दि.बा.पाटील यांच्या नामकरणाचा प्रस्ताव सर्वात आधी खासदार कपिल पाटील यांनी लोकसभेत मांडला. तसेच आगामी सर्वच निवडणुकांमध्ये जिल्ह्यात शिवसेनेसह पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी भाजपने आगरी समाजाच्या रूपात भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून निवड केली आहे.
अनेक भाजपा नेत्यांचे खासदार कपिल पाटील निकटवर्ती
विशेष म्हणजे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी खा.कपिल पाटील यांना मंगळवारीच दिल्लीला बोलावून घेतले होते. तेव्हापासूनच भिवंडी मतदारसंघात मंत्रीपदाबद्दल भाजपच्या गोटात चर्चा सुरु झाली होती. खा.कपिल पाटील हे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यातच अल्पावधीतच खा.कपिल पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी संपादन केली असल्याने अनेक भाजपा नेत्यांचे खा. कपिल पाटील हे निकटवर्ती मानले जातात.
व्यासपीठावरून शिवसेनेच्या शिंदे पिता पुत्रांवर अनेक वेळा टीका
ठाणे जिल्ह्याचा विचार करता केंद्रीय मंत्रीमंडळात अद्याप पर्यंत जिल्ह्याच्या कोणत्याही नेत्याला स्थान मिळालेले नव्हेत. त्यातच ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य वाढत असून मराठा समाजाचे आक्रमक नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी खा.कपिल पाटील यांना केंद्राची ताकद दिल्यास जिल्ह्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्राबल्य कमी करण्याचा प्रयत्न भाजपचे खासदार कपिल पाटील हे करतील म्हणून त्यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्याचे स्पष्ट झाले. खा.कपिल पाटील यांना शिवसेनेच्या शिंदे पिता पुत्रांकडून आडकाठी येत असल्याच्या चर्चा होत होत्या. त्यातच खासदर कपिल पाटील यांनी अनेक वेळा जाहीर कार्यक्रमांमध्ये व राजकीय व्यासपीठावरून शिंदे पिता पुत्रांवर अनेक वेळा टिका देखील केल्या आहेत.
दि. बा. पाटील यांच्या नामकरणासाठी भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावं लागते हे दुर्दैव
खा.कपिल पाटील हे आगरी समाजाचे असून नवी मुंबई विमानतळाला स्व.लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीवरून आगरी समाज मोठ्या प्रमाणात एकत्र आला आहे. त्यातच शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपदेखील या आंदोलनांमध्ये आपली राजकीय पोळी भाजत असल्याने सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप पक्षश्रेष्ठींकडून खा.कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळू दिली. तसेच नवी मुंबई विमानतळाला जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय खासदार दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी काही दिवसापूर्वीच हजारो भूमिपुत्रांना रस्त्यावर उतरावे लागते हे दुर्दैव असल्याची खंत खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली होती.
२०१५ सालीच नामांतराचा विषय मांडला होता
खासदार कपिल पाटील यांच्या म्हणण्यानुसार २०१५ सालीच विमानतळाला जिल्ह्यातील भूमिपुत्रांचे दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तसेच २०१६ साली दिल्लीतील संसद अधिवेशनात केंद्र सरकारकडे मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र दिल्लीला पक्षाच्या कामासाठी जावे लागल्याने आपण नवीमुंबईतील घेराव आंदोलनात सहभागी होऊ शकलो नाही. याबाबत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. भिवंडी लोकसभा मतदार संघात भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापूर असे सहा विधानसभा मतदार संघ येतात. तसेच पालघर, ठाणे, रायगड, या तीन जिल्ह्यात आगरी – कोळी समाजाचे राजकीय प्राबल्य असल्याने त्यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ पडली आहे असे म्हटले जात आहे.
लसीकरणाच्या वादतून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही घटना बदलापूर-कुळगाव नगर पालिकेच्या दुबे रुग्णालयात घडली. हा हाणामारीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
राजकीय श्रेयातून हाणामारी
काही महिन्यांत बदलापूर कुळगाव नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर बदलापूर शहरात सध्या लसीकरण केंद्रांवर सर्वच राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठी चढाओढ पाहायला मिळते आहे. सेना- भाजप कार्यकर्त्यांमध्ये अशाच लसीकरणाच्या वादातून पालिकेच्या दुबे रुग्णालयात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीत एका कार्यकर्त्याने दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी बेंच टाकला. त्यात एक जण जखमी झाला आहे.
परस्परविरोधी गुन्हे दाखल
याप्रकरणी भाजप – शिवसेना कार्यकर्त्यांकडून बदलापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, अशा प्रकारे लसीकरणावरून राजकीय संघर्ष यापुढेही वाढत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.
‘तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं’ अशा शब्दांत राहुल यांनी बोचरी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. आज पुन्हा दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. दिल्लीत पेट्रोलची किंमत १००.२१ रुपये आहे, तर डिझेल प्रति लिटर ८९.५३ रुपयांवर पोहोचले आहे अशी बातमी शेअर त्यांनी केली आहे. यासोबतच ‘तुमची गाडी पेट्रोल-डिझेलवर चालत असेल पण मोदी सरकार कर वसुलीवर चालतं’ असं देखील राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर याआधीही कित्येकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याचं म्हणत टीकास्त्र सोडलं होतं. ‘निवडणुका संपल्या, पुन्हा लूट सुरू’ असं ट्विट केलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी ‘मोदी सरकारच्या विकासाची अशी परिस्थिती आहे की, जर एखाद्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत तर ती जास्त मोठी बातमी होते’ असं देखील म्हटलं होतं.
केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी या इंधन दरवाढीबद्दल खुलासा केला आहे. जनकल्याणाच्या योजनांमुळे इंधनाचे भाव वाढत असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन दरवाढीबद्दल अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र आता एका मुलाखतीत त्यांनी दरवाढीचं नवं कारण सांगितलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना, मला मान्य आहे की, इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. पण एका वर्षात कोरोना प्रतिबंधक लसीच्या मात्रांवर ३५ हजार कोटींहून अधिक खर्च झाला आहे. गरीबांना आठ महिन्यांचा किराणा मोफत देण्यासाठीच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेवर एक लाख कोटी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये काही रक्कम पाठवण्यात आली. तसंच तांदूळ आणि गव्हाच्या एमएसपी ची घोषणा करण्यात आली. त्याशिवाय देशात रोजगारासाठी, विकासकामांसाठी पैशांची गरज आहेच. अशावेळी आम्ही पैसे वाचवून ते पैसे लोककल्याणासाठी वापरत आहोत, असं म्हटलं आहे.