पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे जबरीने सोनसाखळी चोरणाऱ्या एकास बोईसर पोलिसांनी अटक करून एकूण ३ चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणून ३ मंगळसूत्र जप्त करून एकूण रुपये २,२१,७००/- चा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, बोईसर चित्रालय येथील बी.ए.आर.सी कॉलोनी समोर बोईसर तारापूर रोडवर दोन अज्ञात इसमांनी मोटार सायकलवर येऊन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले म्हणून दिलेल्या फिर्यादीवरून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून एका इसमास अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ३ गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्या ताब्यातून २,२१,७००/- रुपये किंमतीचे ६२.०० ग्रॅम सोने (३ मंगळसूत्र) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे.
नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांना बातमी मिळताच एनआरआय सागरी पोलीस ठाणे हद्दीतील सीवूड येथे असलेल्या धनलक्ष्मी अपार्टमेंट मधील लक्ष्मी किराणा स्टोअर्स आणि प्लाझो अपार्टमेंट, रूम नं. ००१, शांताराम विठ्ठल स्मृती या दोन ठिकाणी छापा टाकला असता २० लाख ४६ हजार रु. किमतीचा पान मसाला आणि सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित मुद्देमाल आढळून आला.
सदर गुन्ह्यात राजू आसाराम देवासी (२० वर्षे) याला अटक करून एनआरआय सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोरोना परिस्थिती नियंत्रणात असलेल्या गावांमध्ये शाळा सुरु व्हावी अशी मागणी जोर धरु लागल्यानंतर शिक्षण विभागाने यावर सकारात्मक निर्णय घेतला आहे. १५ जुलैपासून शासनाच्या नियम आणि अटींसह शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावात राज्य सरकारच्या शिक्षण विभागातर्फे काही ठिकाणी शाळा सुरु करण्याचा प्रयत्न झाला. पण दुसरी लाट आल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. आता आमचे संपूर्ण लक्ष हे येणाऱ्या तिसऱ्या लाटेवर आहे. कोरोना काळात मुलांवर परिणाम होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. शाळा सुरु होणार असल्या तरी त्यासाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. या नियमात बसणाऱ्या ठिकाणच्या शाळाच सुरु होऊ शकणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या. शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करताना काही सूचना देण्यात आल्या आहेत.
त्या सूचना पुढीलप्रमाणे आहेत.
ज्या गावात एक महिन्यापासून कोरोना नसेल व कोरोना संदर्भात गावकऱ्यांमध्ये जागृकता असेल त्यात परिस्थिती अनुकूल असेल तर गाव पातळीवरील समिती म्हणजेच सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, वैद्यकीय अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्या माध्यमातून निर्णय गावात भविष्यात देखील कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची योजना असेल अशा ठिकाणी शाळा सुरु करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
१५ जुलैपासून महिनाभर कोरोना नसलेल्या आणि शासनाने दिलेल्या नियमानुसार ग्रामीण भागातील शाळा सुरु होणार आहेत. शासनाने दिलेल्या एसओपीची अंमलबजावणी याठिकाणी व्यवस्थित होणे गरजेचे असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुलांचे आरोग्य आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन शिक्षणमंत्र्यांनी केले आहे.
काही गाव आणि शहरांमध्ये कनेक्टीव्हीटी किंवा इलेक्ट्रीसिटी नसल्याने डिजीटल शिक्षण देण्यात अडचणी आल्या. यामुळे विद्यार्थी, शिक्षकांना त्रास सहन करावा लागला. अशा ठिकाणी देखील नियमांचे पालन करुन ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला. कोविडमुक्त गावातील शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारने ५ जुलैला परिपत्रक जाहीर केले होते. या परिपत्रकानुसार आखून दिलेले नियम शाळांना पाळणे बंधनकारक आहे.
कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात जून २०२१ मध्ये १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो.
अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले, तर चालू वर्षात जानेवारी ते जूनअखेर ७८ हजार ३९१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले. मंत्री मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे, महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९० हजार २६० इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.
मुंबईत जूनमध्ये ६ हजार ३३० बेरोजगारांना रोजगार
मंत्री मलिक म्हणाले की, माहे जून २०२१ मध्ये विभागाकडे ३३ हजार ३२९ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ९ हजार १०९, नाशिक विभागात ६ हजार ५९४, पुणे विभागात ९ हजार ६०४, औरंगाबाद विभागात ५ हजार १४१, अमरावती विभागात १ हजार २९४ तर नागपूर विभागात १ हजार ५८७ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
माहे जूनमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १५ हजार ३३६ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार ३३०, नाशिक विभागात ३ हजार १११, पुणे विभागात ४ हजार ०७८, औरंगाबाद विभागात १ हजार ६५२, अमरावती विभागात ७९ तर नागपूर विभागात ८६ इतके बेरोजगार उमेदवारांना नोकरी मिळाली.
कल्याण पुर्वेतील ‘आय’ प्रभाग कार्यालय येथे मोबाईलव्हॅन लसीकरणाचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आला. लोकसंख्येची जास्त घनता असलेल्या या भागात तुलनेने कमी लसीकरण झाले असल्यामुळे आज या परिसरापासून मोबाईल लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. लोकांचा प्रतिसाद पाहून हळू हळू लसीकरणाचा टप्पा वाढविला जाईल, या भागातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, या हेतूने ही सुविधा उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली. या वेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली काशीकर, प्रभाग अधिकारी दिपक शिंदे उपस्थित होते.
‘आय’ प्रभाग कार्यालयाजवळ तसेच जाईबाई विद्यामंदिर, साई नगर, कल्याण पूर्व येथेही आज उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्याहस्ते आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप निंबाळकर व डॉ.पूर्वा भानूशाली यांच्या प्रमुख उपस्थितीत मोबाईल लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. या लसीकरणासाठी ४ बसेस उपलब्ध करुन देण्यात आल्या असून २ बसेस मध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध असेल आणि उर्वरित २ बसेस नागरिकांना लसीकरणानंतर देखरेखीखाली ठेवण्यासाठी उपलब्ध राहतील. दोन्ही ठिकाणी सुमारे ७०० नागरिकांचे लसीकरण आज दिवसभरात करण्यात आले.
महापालिकेच्या महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्रातही आज धान्य बाजारातील माथाडी कामगारांसाठी विशेष लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. तेथे सुमारे १५० माथाडी कामगारांचे लसीकरण करण्यात आले.