लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी राजीव कानिटकर यांची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची कुलगुरुपदावर नियुक्ती जाहीर केली. लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर या सध्या एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (DCDIS) (Medical) म्हणून नवी दिल्ली येथे कार्यरत आहेत.
लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने एमबीबीएस पदवी प्राप्त केली असून त्यांनी बालरोगशास्त्र या विषयात एमडी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी २०१७ ते २०१९ या काळात सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन व संशोधनाचा एकूण २२ वर्षांचा अनुभव आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे २००८ साली त्यांना सर्वोत्तम शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ नियत वयोमानानुसार १० फेब्रुवारी २०२१ पूर्ण झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांचेकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी ओरिसा उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती न्या.कल्पेश झवेरी यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. दिल्लीच्या अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (एम्स) महासंचालक डॉ.रणदीप गुलेरिया व राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय हे समितीचे सदस्य होते.
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी त्यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं.
दिलीपकुमार यांनी बॉम्बे टॉकिजनं १९४४ साली निर्माण केलेल्या ज्वार भाटा या सिनेमातून हिंदी सिनेमात पदार्पण केलं. तर १९९८ ला आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत.
अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर देशातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीप कुमार यांच्या परिवाराच्या प्रति सांत्वना व्यक्त केल्या आहेत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप कुमार यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात केला जाईल अशी माहिती दिली आहे.
गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी सेंट्रल रेल्वेने स्पेशल ट्रेन्सची सोय केली आहे. ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्याने विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
जसजसा गणोशोत्सव जवळ येतो तशी चाकरमान्यांना आपल्या जाण्याची ओढ लागते. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम कडक असल्याने अनेकांना गावी जाता आलं नाही. मात्र यंदा नागरिकांना कोकणात आपल्या गावी जाता यावं यासाठी सेंट्रल रेल्वेने विशेष ट्रेन्सची सोय केली आहे. ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्याने विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
गणपतीसाठीच्या विशेष टेन्सची माहिती
१. मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी-मुंबई सीएसएमटी (आरक्षित)
मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी पूर्ण आरक्षित स्पेशल ट्रेन ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान दररोज चालवली जाईल. रात्री १२.२० मिनिटांनी ही ट्रेन मुंबई सीएसएमटी येथून रवाना होईल आणि त्याच दिवशी दुपारी २ वाजता ही ट्रेन सावंतवाडी येथे पोहचेल. त्यानंतर ही ट्रेन सावंतवाडी येथून २.२० वाजता रवाना होईल. ही ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहचेल.
मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, आरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडावली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकांवर थांबेल.
२. मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी (पूर्णपणे आरक्षित)
मुंबई सीएसएमटी- रत्नागिरी स्पेशल ट्रेन ६ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान मुंबईहून दर सोमवारी आणि शुक्रवार चालवली जाईल. मुंबई सीएसएमटी स्थानकातून दुपारी १ वाजून १० मिनिटांनी ही ट्रेन सुटेल. त्याचदिवशी रात्री ही गाडी १०.३५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. त्यानंतर रत्नागिरीहून पुन्हा ही गाडी ११.३० वाजता मुंबई सीएसएमटीसाठी रवाना होईल. जी दुसऱ्या दिवशी ८.२० वाजता पोहचेल. रत्नागिरीहून दर रविवारी आणि गुरुवार ९ ते २३ सप्टेंबर दरम्यान ही ट्रेन चालवली जाईल.
मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी -मुंबई सीएसएमटी ही गाडी संगमेश्वर रोड, आरावली रोड, सावर्दा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि दादर स्थानकांवर थांबेल. मुंबईहून सुटणारी गाडी मागील सर्व स्थानकांवर थांबेल आणि ठाणे स्थानकात अतिरिक्त थांबा असेल.
३. पनवेल – सावंतवाडी रोड – पनवेल (पूर्णपणे आरक्षित)
पनवेल – सावंतवाडी स्पेशल दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी ०७ ते २२ सप्टेंबर दरम्यान पनवेल येथून सकाळी ८ वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी सावंतवाडी रोडला रात्री ८ वाजता पोहोचेल. सावंतवाडी-पनवेल स्पेशल ट्रेन सावंतवाडी रोड येथून दर मंगळवार, बुधवार आणि शनिवारी रात्री ८.४५ वाजता सुटेल दुसर्या दिवशी सकाळी ७.१० वाजता गाडी पनवेलला पोहोचेल.
पनवेल – रत्नागिरी स्पेशल ट्रेन पनवेल येथून ९ ते २३ सप्टेंबर दरम्यान दर गुरुवार आणि रविवारी सकाळी ८ वाजता सुटेल. त्याच दिवशी गाडी ३.४० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरी – पनवेल गाडी ६ ते २० सप्टेंबर दरम्यान दर सोमवारी व शुक्रवारी रात्री ११.३० वाजता रत्नागिरीहून सुटेल. दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता ही गाडी पनवेलला पोहोचेल.
पनवेल-रत्नागिरी-पनवेल ही विशेष गाडी रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्दा, आरावली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबेल.
वरील गाड्यांच्या सविस्तर वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा. वरील सर्व प्रवासी गाड्यांसाठी ८ जुलै २०२१ पासून बुकिंग करु शकतात. Passenger Reservation System (PRS) काऊंटर आणि IRCTC च्या वेबसाईटवर ही बुकिंग होणार आहे.
मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भातील पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करण्यासाठी भारतीय संविधानात यथोचित सुधारणा करण्याची केंद्र शासनाला शिफारस करण्याचा ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत हा ठराव मांडला.
सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ५ मे, २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण अधिनियम २०१८ (सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. ६२) मधील कलम २ (ञ), कलम ४(१)(क) आणि कलम ४(१)(ख) अवैध ठरवितांना न्यायालयाच्या निकालांमध्ये नमूद केलेली ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला आहे.
केंद्र सरकारने पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य आहे. तसेच आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असून त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरीत करणे आवश्यक आहे.
त्या अन्वये न्यायालयांच्या न्यायनिर्णयांमध्ये निश्चित केलेली आरक्षणाची पन्नास टक्के इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला करण्याचा हा ठराव विधिमंडळात पारित करण्यात आला आहे.
मनी लॅान्ड्रींगच्या आरोपात अडचणीत आलेल्या शिवसेनेच्या आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळत आहे. मनी लॅान्ड्रींग प्रकरणी ईडीने सुडबुद्धीने कारवाई करु नये यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक करु नये अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. दरम्यान सरनाईक यांच्यासह त्यांचा मुलगा पूर्वेश, विहंग आणि मेहुणा योगेश चांदेगला यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकांवर आज हायकोर्टाने सुनावणी देत आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीने २८ जुलैपर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश दिले आहेत.
मनी लाँड्रिंग प्रकरणी आज शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या सभागृहातच आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवत दाद मागितली आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असून माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहे. त्यामुळे सरकारने मला क्लिन चिट द्यावी, अशी मागणीच सरनाईक यांनी आज केली आहे.
मला ईडी कडून विनाकारण त्रास दिला जात आहे. लोकांना भुजबळ, अनिल देशमुख करेन अशी धमकी दिली जात आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या घोटाळ्याचा तपास हा ईडी ने घेतला. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझ्यावर आरोप होत आहे म्हणजे सरकारवरही आरोप होत आहे, असं सरनाईक म्हणाले. तसेच ‘मी गृहमंत्र्यांना ते पत्र लिहिलं आहे की, घोटाळा केला असेल तर प्रताप सरनाईकला अटक झाली पाहिजे पण जर घोटाळा झाला नसेल तर तो अहवाल बाहेर आणा नाहीतर क्लिनचिट द्या. जर मी गुन्हा केला असेल तर मला फासावर लटकवले पाहिजे, असंही सरनाईक म्हणाले. सरनाईक यांनी सभागृहात ईडी कडून होत असलेल्या कारवाईबद्दल आपली भूमिका मांडली.