Home Blog Page 240

प्रतिविधानसभेवर मार्शलची कारवाई; ही तर आणीबाणीच : फडणवीस आक्रमक..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधूत सावंत

आघाडी सरकारने १२ आमदार निलंबित केल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी विधानसभेबाहेरच प्रतिविधानसभा भरवली. त्याचे विधानसभेतही पडसाद उमटले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी प्रतिविधानसभेला देण्यात आलेला माईक काढून घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलांनी प्रतिविधानसभेच्या ठिकाणी पोहोचून माईक काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजप आमदारांनी गोंधळ घातल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मार्शलने केलेल्या या कारवाईमुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त करत ही तर आणीबाणी असल्याचा आरोप केला.

भाजप आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत थेट विधानसभेच्या पायरीवरच अभिरुप विधानसभा भरवली. भाजपचे आणि भाजपच्या मित्रपक्षाचे सर्वच आमदार विधानसभेच्या पायरीवर बसले होते. त्याचवेळी विधानसभेतही या अभिरुप विधानसभेचे पडसाद उमटले. सत्ताधारी आमदारांनी अभिरुप विधानसभा बरखास्त करण्याची मागणी केली. तसेच विरोधकांना बाहेर माईक कुणी दिला ? माईक देण्याची परवानगी कुणी दिली ? असा सवाल करतानाच विरोधकांना देण्यात आलेला माईक काढून घेण्याची मागणी करण्यात आली. आमदार भास्कर जाधव आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हा मुद्दा ठासून मांडला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी तत्काळ माईक काढून घेण्याचे आदेश दिले.

अध्यक्षांच्या आदेशानंतर मार्शल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आमदारांना माईक परत देण्याची विनंती केली. विधानसभा अध्यक्षांचे आदेश आहेत. त्यामुळे आम्ही माईक जप्त करण्यासाठी आलो आहोत, असं मार्शल भाजपच्या आमदारांना सांगत होते. मात्र, भाजपचे आमदार ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती झाली. त्याचवेळी मार्शल माईक काढून घेत असताना मीडियाचे प्रतिनिधी पुढे आले आणि त्यांनाही धक्काबुक्की झाली. मीडियालाही दूर जाण्यास मार्शल सांगत होते. त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला.

देवेंद्र फडणवीस संतप्त

या संपूर्ण प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. मार्शल पाठवून आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला. मार्शलशी आमचं भांडण नाही. ते आमचे शत्रू नाहीत. माईक काढला तरी आमचा आवाज बंद केला जाऊ शकत नाही. सरकारच्या विरोधात आम्ही बोलतच राहणार. माध्यमांवर मार्शल करवी मुस्काटदाबी करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे, असं फडणवीस म्हणाले.

चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करा : जयंत पाटील

मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो. मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे असेही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी तयार; पंतप्रधानांचे सर्व कार्यक्रम रद्द..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्रीय मंत्रिमंडळाचा येत्या १-२ दिवसांत विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. नव्या मंत्र्यांची यादी जवळपास अंतिम झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अनेक नेते ज्यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा आहे. त्यांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. काही नेत्यांना फोनही करण्यात आले आहेत.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वांनंद सोनोवाल यांना दिल्लीत बोलावण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा संध्याकाळपर्यंत हिमाचलवरून दिल्लीत परतणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे देखील इंदूरहून दिल्लीला रवाना झाले आहेत.

सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण ५३ मंत्री आहेत. नियमांनुसार मंत्र्यांची संख्या ८१ असू शकते. अनेक नावांची यासाठी चर्चा सुरू आहे. विशेषत: ज्या राज्यात पुढील वर्षी निवडणूका होणार आहेत येथील कोणत्या नेत्याची मंत्रिपदी वर्णी लागणार हे यंदा पाहणं गरजेचे आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया, सर्वानंद सोनोवाल आणि वरूण गांधी या तीन नावाची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार पाडण्यामध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे ज्योतिरादित्य सिंधिया यांचा कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश नक्की असल्याचं बोललं जात आहे. आसाममध्ये सोनावाल यांनी हिमंता बिस्व सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनोवाल यांना दिल्लीत बोलावण्यात येईल असं म्हटलं जात होतं. आसाममधील भाजपमधील अंतर्गत वाद संपुष्टात आणण्यासाठी सोनोवाल यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं. तसेच आक्रमक चेहरा असलेल्या वरूण गांधीं यांचाही केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान यांचे निधन झाले होते. त्यानंतर आता पक्षात दोन गट पडले आहेत. पशुपति पारस आणि मुलगा चिराग पासवान यांच्यात मतभेद झाल्यानंतर आता पशुपति पारस यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होईल असं बोललं जात आहे. बिहारमधून माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

त्याचसोबत मनमोहन सरकारमध्ये रेल्वे मंत्री राहिलेले दिनेश त्रिवेदी यांच्याही नावाची चर्चा आहे. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी त्रिवेदी यांनी भाजपात प्रवेश घेतला होता. ओडिसा येथून बैजयंत पांडा यांनाही केंद्रात संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्रातून गोपीनाथ मुंडे यांची कन्या खासदार प्रीतम मुंडे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या प्रीतम मुंडे यांनी बीडमधून विजय मिळवला होता. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत प्रीतम यांनी ७ लाखांच्या फरकाने निवडणूक जिंकली होती.

महाराष्ट्रातील आणखी एक कॅबिनेटसाठी चर्चेत आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना दिल्लीतून फोन आला असून केंद्रीय कॅबिनेटमध्ये त्यांनाही संधी दिली जाऊ शकते. शिवसेनेतून काँग्रेस, काँग्रेसमधून स्वाभिमान पक्ष, त्यानंतर भाजपा असा नारायण राणेंचा राजकीय प्रवास झालेला आहे.

कॅबिनेटमध्ये फेरबदल होण्याच्या चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ५ वाजता ज्येष्ठ मंत्री आणि भाजपा अध्यक्षांसोबत बैठक घेणार होते मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.

जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षेस तयार, नसेल तर सरकारने मला क्लीनचिट द्यावी : प्रताप सरनाईक

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होत आहे. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल तर मला ईडीच्या तपासानंतर राज्याच्या गृहविभागाकडून पर्यायाने राज्य सरकारकडून क्लीनचिट देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत केली.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. विधिमंडळात विविध विषयांवर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्ष भाजपने १२ आमदारांच्या निलंबनाप्रकरणी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान आज अधिवेशनाचं काम सुरु झाल्यानंतर दुपारी सव्वा बाराच्या सुमारास प्रताप सरनाईक आपलं म्हणणं मांडण्यासाठी उभा राहिले. यावेळी माझ्यावर होणाऱ्या आरोपांनी सरकारची बदनामी होतेय. त्यामुळे गुन्हा केला असेल तर मी शिक्षेला तयार आहे पण केलाच नसेल तर मला क्लीनचिट देण्यात यावी अशी मागणी यावेळी सरनाईक यांनी केली.

माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. घोटाळा झालेला आहे की नाही हे तपासणे राज्य सरकारची जबाबदारी आहे. एमएमआरडीए हे खातं सुद्धा राज्य सरकारकडेच आहे. माझ्यावर आरोप म्हणजे ते राज्य सरकारवर आरोप आहेत. कारण मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. पर्यायाने महाविकास आघाडीचा एक घटक आहे. त्यामुळे मी गृहमंत्र्यांना काल एक पत्र दिलं आहे, असे सरनाईक सांगितले.

माझ्यावर आरोप झाल्याने राज्य सरकारची कुठेतरी बदनामी होत आहे, हे या पत्रातून मी गृहमंत्र्यांना सांगितलं. तसंच आज विधानसभेत बोलताना मी आज गृहमंत्र्यांना विनंती करु इच्छितो, की मी जे काल पत्र दिलं होतं त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेकडून तो अहवाल आपण मागून घ्यावा. जर मी घोटाळा केला असेल तर मी गजाआड जायला तयार आहे. मिळेल ती शिक्षा भोगायला देखील तयार आहे. पण जर घोटाळा केलाच नसेल आणि आर्थिक गुन्हे शाखेचा जर तपास पूर्ण झाला असेल तर मला मात्र राज्य सरकारकडून क्लिनचिट देण्यात यावी, अशी मागणी यावेळी प्रताप सरनाईक यांनी केली.

आर्थिक गुन्हे शाखेने लवकरात लवकर तो अहवाल गृह मंत्रालयाकडे सादर करावा आणि गृह खात्याने तो अहवाल लोकांपर्यंत पोहोचवावा. जेणेकरून लोकांच्या समोर सत्य परिस्थिती येईल, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.

आटगावजवळ घुसला रेल्वे ट्रॅकवर गॅस टँकर; मोठी दुर्घटना टळली..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

आग्रा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा एचपी गॅस टँकरचा पुढचा टायर फुटल्याने चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. त्यानंतर महामार्गावरील डिव्हायडर तोडून टँकर थेट आटगावजवळील रेल्वे ट्रॅकवर जाऊन धडकला. हा अपघात दिनांक ५ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी घडला.

दरम्यान, टँकर रेल्वे मार्गात घुसल्याने संपूर्ण रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वेची कसाराकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या व लोकल ट्रेन आसनगांव, वाशिंद, खडवली स्थानकात थांबवण्यात आल्या होत्या. संध्याकाळी घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे. दोन तासानंतर सदर टँकर क्रेनच्या सहाय्याने काढण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. सध्या घटनास्थळी रेल्वे पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम, स्थानिक ग्रामस्थ, रेल्वे अधिकारी दाखल झाले आहेत.

मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा ! – भास्कर जाधव

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

भास्कर जाधवांकडून विरोधकांची पोलखोल

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना काही सदस्यांनी आज सभागृहात गदारोळ केला. विरोधी सदस्य आत घुसले त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. गावगुंडाप्रमाणे हे सदस्य वागत होते, असं सांगतानाच संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. माझ्यासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारं नाही. महाराष्ट्रात असं कधीच घडलं नव्हतं, अशा शब्दात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी विरोधकांचे कान उपटले.

विधानसभेचं कामकाज सुरू होताच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाच्या ठरावावरील चर्चे दरम्यान झालेल्या घटनेचा तपशील दिला. महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. काही आमदारांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला. सभागृहात ताणतणाव होत असतात. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक बसून तोडगा काढत असतात. सत्ताधारी विरोधकांवर धावून जातात. पण एकदा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं तर विषय तिथेच संपतो. मी सभागृहात कधीही कटुता ठेवत नाही. ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. आपण लोकशाहीच्या मंदिरात बसतो. आपण साधनसुचितेच्या गोष्टी करतो. सभ्यतेचा आव आणतो, पण आपण कसं वागतो?, असा सवाल करतानाच विधानसभा अध्यक्षांनी मला खुर्ची बसायला दिली. मी बसलो नाही. कारण मी अध्यक्ष-उपाध्यक्ष नाही म्हणून मी बसलो नाही. त्यानंतर फडणवीस आले. मी त्यांना बसायला खुर्ची दिली. चंद्रकांत पाटलांना खुर्ची दिली, याकडे जाधव यांनी लक्ष वेधलं.

विरोधकांचा गोंधळ गदारोळ सुरू होता. विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. हे आमदार घुसले तर घुसले, ते गावगुंडांप्रमाणे अंगावर तुटून पडत होते. तुमच्या सदस्यांना आवरा, आपण बसून चर्चा करू, असं मी त्यांना सांगितलं. पण विरोधी पक्षनेते त्यांना आवरायला तयार नव्हते. आम्ही आवरणार नाही, आम्हाला राग आलाय, असं विरोधी पक्षनेते म्हणाले, असं त्यांनी सांगितलं.

ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासणारी आहे. त्यामुळे म्हातारी मेल्याचं दुख नाही, पण काळ सोकावला जाता कामा नये, म्हणूनच संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यावर पावलं उचलावीत, असे आदेश जाधव यांनी दिले. मी जर एकही असंसदीय शब्द बोललो असेल किंवा शिवी दिली असेल तर मी स्वत:हून शिक्षा घ्यायला तयार आहे. तुम्हाला जी शिक्षा वाटत असेल ती मी घेईन. मी आक्रमक आहे. पण कधीच असंसंदीय शब्द वापरला नाही. आजचा दिवस माझ्या आयुष्यात काळा दिवस आहे, असंही ते म्हणाले.

झाल्याप्रकारबद्दल आशिष शेलार यांनी माझी माफी मागितली आहे. फक्त त्यांनीच दोन-तीन वेळा माझी माफी मागितली. हे म्हणजे आधी लाथ लावायची आणि मग सॉरी म्हणायचं असा प्रकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.