Home Blog Page 244

बारावी निकालाचा फॉर्म्युला ठरला, शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी ३० टक्के, अकरावी साठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील.

इयत्ता १० वीच्या गुणांना ३० टक्के भारांश

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यानं सर्वाधिक गुण मिळवलेल्या तीन विषयांचे सरासरी गुण ग्राह्य धरले जातील.

इयत्ता अकरावी ३० टक्के भारांश

इयत्ता अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण

इयत्ता बारावीसाठी ४० टक्के भारांश

बारावीच्या वर्गासाठी ४० टक्के बारांश निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये प्रथम सत्र निहाय परीक्षा, सराव परीक्षा , सराव चाचण्या आणि तस्तम मूल्यमापन यामधील विषय निहाय गुण यावर विद्यार्थ्यांना गुण दिले जातील.

बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज

बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे.

बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.

बारावी निकालाचा फॉर्म्युला सविस्तर वाचण्यासाठी शासन निर्णय वाचा, शासन निर्णय वाचण्यासाठी क्लिक करा

विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन परीक्षा रद्द

सन २०२१-२१ या शौक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा विचार करता रद्द करण्यात येत आहे. इयत्ता १२ वी च्या परीक्षेसाठी प्रविष्ठ सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात यावे. इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून त्याचा संकेतांक क्रमांक 202106111 720454121 असा आहे.

उच्च शिक्षित महिलांना लग्नाचे आमिष दाखवून हनी ट्रॅपमध्ये अडकवणारा भामटा केला विष्णूनगर पोलिसांनी गजाआड..

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी:अवधुत सावंत

थोडक्यात हकीगत अशी की यातील आरोपीत याने फिर्यादीशी ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या वेबसाईट वर ऑनलाईन रेजिस्ट्रेशनद्वारे खोट्या नावाने ओळख करून माहे जुलै २०२० ते दिनांक १५ जानेवारी २०२१ पावेतो फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून फिर्यादीचे राहते घरी जाऊन अनैतिक शारीरिक संबंध ठेवला. तसेच फिर्यादी यांच्याकडून १० तोळे ५ ग्राम सोन्याचे दागिने घेऊन जाऊन अपहार केला. त्याचप्रमाणे यातील तीन महिला साक्षीदार यांच्याशी देखील लग्न करणार आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ४ तोळे सोने व साडेसहा लाख रुपये इत्यादी घेऊन अपहार करून त्यांची फसवणूक केली म्हणून विष्णूनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर ७८/२०२१ भ.द.वि.क ३७६, ४२०, ४१७, ४०६ अन्वये दिनांक.१६/०४/२०२१ रोजी दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा महिला अत्याचाराचा असल्याने श्री.दत्ता कराळे सो, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण, श्री.विवेक पानसरे सो, पोलीस उपायुक्त परिमंडल-३ कल्याण व मा. सहा पोलीस आयुक्त श्री.जयराम मोरे सो, डोंबिवली विभाग यांनी विशेष प्रयत्न करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना केल्या होत्या.

सदर गुन्ह्यातील आरोपीत हा आपले नाव बदलून, आपल्या राहण्याची जागा नेहमी बदलून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. विष्णूनगर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी श्री.गणेश वडणे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि गुप्त बातमीदार यांच्या आधारे आरोपीत नामे शैलेश प्रभाकर बांबार्डेकर उर्फ प्रथम चंद्रकांत माने (वय ३५ वर्षे) राहणार ए/१०६, जीवदानी प्लाझा, अमिनाबाई चाळ कंपाऊंड, मनवेल पाडा रोड विरार (पूर्व) यांस समतानगर कांदिवली, मुंबई येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता नमूद आरोपीत याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास नमूद गुन्ह्यात अटक केली असून तो सध्या न्यायालीन कोठडीत आहे.

अटक आरोपीत याच्याकडे पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान गुन्ह्या संबंधी चौकशी करता, त्याने फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून घेतलेले १४० ग्राम वजनाचे दागिने (सोने) हस्तगत करण्यात आले आहे.

गुन्ह्याची पद्धत (Modus Operandi)

सदर गुन्ह्यातील आरोपी याने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या मेट्रोमोनियल वेबसाईटवर प्रथम चंद्रकांत माने या खोट्या नावाने अकाउंट तयार करून त्यात स्वतःला उच्च शिक्षित असल्याचे भासवून ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या मेट्रोमोनियल वेबसाईटवर उच्च शिक्षित महिला व खास करून घटस्फोटित व विधवा महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून त्यांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवत असे, तसेच त्यांच्याकडून वैय्यक्तिक अडचण भासवून भावनिक जवळीक साधून पैशांची गरज असल्याचे सांगून सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेऊन फसवणूक करत होता.

आरोपी याने या अगोदर सुद्धा अश्या प्रकारे गुन्हे केले आहेत किंवा कसे याबाबत तपास चालू असून आरोपीत याने प्रथम चंद्रकांत माने या नावाने ‘जीवनसाथी डॉट कॉम’ या मेट्रोमोनियल वेबसाईटवर कोणाला फसवले असल्यास तात्काळ विष्णूनगर पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे याबाबत माहीती घेत आहोत. आरोपी यांच्यावर या अगोदर गुन्हे दाखल आहेत किंवा कसे याबाबत पुढील तपास चालू आहे.

सदरची कारवाई विष्णूनगर पोलीस ठाण्याचे मा.वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.संजय साबळे, पोलीस निरीक्षक श्री. आर.एम.खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. योगिता पी.जाधव व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि. गणेश आर.वडणे, मपोना/८४४६ मिथिला मिसाळ, पोशि/६५०५ कुंदन भामरे, पोशि/७५९७ मनोज बडगुजर यांनी सदरची कारवाई यशस्वी रित्या पार पाडली आहे.

लसीकरण अभावी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करा, लशींचा साठा वाढविण्याची काँग्रेसची मागणी

संपादक: मोईन सय्यद/ मीरा भाईंदर, प्रतिनिधी

मिरारोड- मीरा भाईंदर शहरात महापालिकेने सुरू केलेल्या लसीकरण केंद्रांवर आठवड्यातून ४ दिवस लसच मिळत नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होत असल्याने प्रशासनाने लशींचा साठा वाढवून घेण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.

कॉवाक्सिन २८ दिवसांनी तर कोव्हीशिल्ड ८४ दिवसांनी घेण्याची नियोजित तारीख उलटून गेली तरी ज्येष्ठ नागरिक,महिला आदींसह सर्वच घटकांना दुसरा लशींचा डोस मिळत नाही. या केंद्रावरून त्या केंद्रावर जाण्याची धावपळ करीत आहेत, त्यात पहिला डोस घेण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत असे नागणे यांनी सांगितले. दररोज प्रशासन परिपत्रक काढून ‘त्या’ विशिष्ट गटातीलच लोकांचे लसीकरण केले जाणार असल्याचा फतवा काढते, त्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंदच झाले आहे, काँग्रेसचे नेते माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व लसीकरण केंद्रावर काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी सामाजिक बांधिलकी समजून नागरिकांना मदत करीत आहेत, लशींचा साठा कमी येत असल्याने तीन चार दिवसांनी सुरू झालेल्या केंद्रांवर झुंबड उडते.

आजमितीला २,३८,८०६ जणांनी पहिला तर फक्त ७६,७३७ जणांनी दोन्ही घेतले आहेत. लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण कमी आहे, लशींचा साठा वाढवून केंद्रे उघडली तर योग्य आहे परंतु लसी कमी येत असताना भरमसाठ केंद्र उघडून एकाही केंद्रावर योग्य प्रकारे सेवा सुविधा मिळत नसल्याने जनतेमध्ये नाराजी आहे, तर दुसरीकडे खाजगी सोसायट्यांमध्ये आठ- नऊशे रुपये मोजून लसींचे डोस घेतले जात असून ही लूटमार थांबविण्यासाठी त्याचा दरही वाजवी असावा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते प्रकाश नागणे यांनी केली आहे.

मीरा भाईंदरच्या सरकारी जागेतील १०३६ हेक्टर कांदळवन क्षेत्राला अखेर महानगरपालिकेचे संरक्षण!

संपादक: मोईन सय्यद/मीरा भाईंदर, प्रतिनिधी

भाईंदर- मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मीरा भाईंदर शहरातील सरकारी १०३६ हेक्टर इतक्या जमिनीवरील कांदळवन हे वनखात्याला हस्तांतरित झाल्याने अखेर महापालिकेने या वनक्षेत्रात कोणत्याही प्रकारची विकास कामे करू नये असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदळवन नष्ट करून सरकारी जागा बळकावून स्वतःच्या तुंबड्या भरणारे अधिकारी, भू-माफिया, नगरसेवक-राजकारणी आणि बोगस पत्रकार व दलालांच्या ‘वरच्या कमाईवर’  संक्रांत आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.

मीरा भाईंदर शहरातील सरकारी जमिनी हडप करून त्यावरील कांदळवन मोठ्या प्रमाणात नष्ट केले गेले आहे. या सरकारी जमिनी हडप करणारे भूमाफीयां, काही स्थानिक नगरसेवकां सह काही राजकारणी- महापालिका अधिकारी, बोगस पत्रकार, दलालांचे भ्रष्टचक्र चालत असते. कांदळवन नष्ट करून त्याठिकाणी भराव केले जातात. त्यावर कच्ची – पक्की अनधिकृत बांधकामे करून त्याची विक्री केली जाते. या बांधकामांची तक्रार करू नये म्हणून काहींचे खिसे भरले जातात. पालिका अधिकारी, स्थानिक नगरसेवक आदींचा वरदहस्त असल्याने या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई होत नाही.

कांदळवन नष्ट करून सरकारी जमिनी लाटायच्या आणि त्या विकून त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवायच्या अश्या ह्या भ्रष्ट साखळी मुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. कांदळवनाचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेता ते कायद्याने संरक्षित असून देखील त्याचा ऱ्हास सुरूच आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देखील कांदळवन हे वन म्हणून संरक्षित करण्याचे वेळोवेळी आदेश दिले होते.

कांदळवन क्षेत्राला नागरी सुविधा पुरविल्यास विभाग प्रमुखावर होणार कारवाई!

अखेर मीरा भाईंदर मधील १०३६ हेक्टर इतके सरकारी जागेतील कांदळवन वन कायद्या खाली संरक्षित केल्याने महापालिके मार्फत कोणत्याही सार्वजनिक सुविधा देऊ नये. या वन क्षेत्रात कोणतेही बेकायदेशीर, नियमबाह्य काम झाल्यास त्याला संबंधित विभाग प्रमुख, खाते प्रमुख जबाबदार असेल असा इशारा आयुक्तांनी सर्व अधिकारी, विभागांना दिला आहे. या क्षेत्रात कर आकारणी, हस्तांतरण सुद्धा बंद केले आहे. कर आकारणी केली, कामे केली म्हणून अन्य महापालिका अधिकाऱ्यांवर वन कायद्याने गुन्हे दाखल झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. या मुळे कांदळवन नष्ट करून सरकारी जमिनी हडप करत कोट्यावधी रुपयांची भ्रष्टसाखळी चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक भू-माफियांच्या संगनमताने केले जाते अतिक्रमण!

मीरा भाईंदर शहरातील अनेक ठिकाणी सरकारी जागेवरील अतिक्रमणाला महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि भू-माफिया यांचे साटेलोटे जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आधी सरकारी जागा शोधायची मग त्या जागेवर स्थानिक नगरसेवक, राजकीय नेते, भू- माफिया यांच्या मदतीने झोपड्या उभारायच्या आणि मग विशेषतः त्या झोपड्या दलित-मुस्लिम समाजातील लोकांना विकून मोकळे व्हायचे असा एक कलमी कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि स्थानिक झोपडी दादा यांच्या संगनमताने अव्याहतपणे चालू आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अशा प्रकारे शहरातील मोकळ्या जागेवर अतिक्रमण बसविण्यात विशेष रस यासाठी असतो कारण जेव्हढे अतिक्रमण वाढेल तेव्हढी लोकसंख्या वाढेल मग त्या ठिकाणी नाले, गटारं, रस्ते, शौचालयं, शाळा, समाजमंदिर, दिवा-बत्ती अशा नागरी सुविधा पुरविण्याच्या नावाखाली निविदा काढायच्या आणि मग ठेकेदारांकडून कमिशनच्या रुपात सर्वानी मिळून मलिदा खायचा असा नियमच ठरलेला आहे आणि त्यासाठी प्रतिबंधित कांदळवन, सीआरझेड सारख्या सारख्या जागा बाळकावण्याचे दुष्टचक्र शहरात चालू आहे परंतु आता महापालिका आयुक्तांच्या या आदेशामुळे त्यावर काही प्रमाणात आळा बसेल अशी अपेक्षा शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोविड रुग्णाची दिड वर्ष सेवा करून टाटा आमंत्रा क्वारंटाईन सेंटर बंद!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोविड रूग्णांची संख्या कमी झाल्यामुळे महानगरपालिकेने टाटा आमंत्रा येथील कोविड सेंटर बंद करायचा निर्णय घेतला, त्यामुळे टाटा आमंत्रात दिड वर्ष सेवा देण्याऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय इ. कर्मचारी वर्गासाठी छोटेखानी समारंभ आयोजित केला होता . टाटा आमंत्रा बंद करणे म्हणजे तिसरी लाट येणार नाही, असा शुभ शकून मानायला हरकत नाही असा आशावाद महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवंशी यांनी व्यक्त केला. टाटा आमंत्राच्या निर्जिव इमारतींचा आत्मा म्हणजेच या इमारतीमध्ये कोविड रुग्णांसाठी काम करणारा सर्व कर्मचारी वर्ग. या कर्मचारी वर्गाने लोकांच्या मनामनात घर निर्माण केले आणि हे चांगली सेवा दिल्याशिवाय घडत नाही. येथील कर्मचारी वर्गाने अत्यंत कठिण परिस्थितीत काम केले. कोविडच्या पहिल्या लाटेत स्वत:च्या मनातील भितीवर मात करुन, कोविड रुग्णांच्या मनातील भिती घालवून एक कुटूंब म्हणून काम केले, हे निश्चितच खुप कौतुकास्पद आहे अशा शब्दात तेथे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाचे आणि दिड वर्ष सातत्याने तेथील कर्मचारी वर्गाबरोबर कार्यरत असलेल्या कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ, प्रमोद मोरे, डॉ.दिपाली मोरे यांचेही आयुक्तांनी भरभरून कौतुक केले. टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर सध्या बंद केल्यामुळे तेथील कर्मचारी वर्गास वसंत व्हॅली आणि महापालिकेच्या इतर रुग्णालयांत पोस्टिंग दिले जाईल,असे आश्वासन आयुक्तांनी यावेळी बोलताना दिले.

महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी हे केवळ आयुक्तच नव्हे तर आपले फिलॉसॉफर, गाईड, फ्रेन्ड आहेत. त्यांच्या मुळेच आपण कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेला समर्थपणे तोंड देवू शकलो, असे उद्गार महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी आपल्या भाषणात काढले.भिती न बाळगता काम केल्याबाबत टाटा आमंत्रातील कर्मचारी वर्गाचे आणि त्यांना काम करण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या कुटूंबियांचे कौतुक देखील त्यांनी आपल्या भाषणात केले. आम्ही येथे निरोप समारंभासाठी आलेलो नसून कोविड कालावधित येथे काम केलेल्या कर्मचारी वर्गाचे आभार मानायला आलेलो आहोत,असेही पुढे ते म्हणाले.

कोविडच्या पहिल्या लाटेत टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर सुरु करतांना अनंत अडचणींना तोंड दयावे लागले, सुरुवातीला तेथे काहीही सुविधा नव्हत्या, काम करण्याकरीता येण्यास माणसे घाबरत होती. अशा परिस्थितीत अडचणीतून मार्ग काढत काम सुरु ठेवले आणि टाटा आमंत्रा क्वॉरंटाईन सेंटर हे महाराष्ट्रातील एक उत्तम क्वारंटाईन सेंटर म्हणून वाखाणले गेल्याची माहिती शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी यावेळी आपल्या भाषणात दिली.

टाटा आमंत्रामध्ये आतापर्यंत ४० हजार कोविड रुग्णांवर उपचार केले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. त्याचप्रमाणे टाटा आमंत्रात संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी जलनि:सारण, पाणी पुरवठा, केटरिंग सुविधा पुरविण्यासाठी अनेकांचा मोलाचा हातभार लागला आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी उपायुक्त रामदास कोकरे, उपायुक्त सुधाकर जगताप वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ.प्रतिभा पानपाटील, डॉ.सरवणकर, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.