Home Blog Page 246

महिलेच्या छातीतून आरपार गेली दीड फुटाची सळई; मुंबई महानगरपालिकेच्या शीव रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया!

संपादक: मोईन सैय्यद/मुंबई प्रतिनिधी

सलग तीन तास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी वाचविले महिलेचे प्राण

शीव येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात करण्यात आली शस्त्रक्रिया

विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या वरच्या मजल्यावरून पडलेली सुमारे दीड फूट लांबीची सळई (कांब) ही खालच्या मजल्यावर काम करत असलेल्या एका २९ वर्षीय कामगार महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्या ठिकाणी असलेल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना. मात्र, शीव परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी सलग तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान अथक प्रयत्न करून महिलेच्या छातीतील सळई कौशल्यपूर्वक काढून सदर महिलेचा जीव वाचविला असून आता महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनात ही अत्यंत अवघड कामगिरी यशस्वीपणे पार पाडण्यासह समर्पित भावनेने काम करणाऱ्या डॉक्टरांच्या चमूचे आणि संबंधित परिचारिका, वॉर्डबॉय इत्यादी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी आणि उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. देविदास क्षीरसागर यांनी कौतुक केले असून सदर चमूला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व प्रमुख रुग्णालये ही अनेक गरजूंसाठी नवजीवन देणारी रुग्णालये असल्याची बाब नुकतीच पुन्हा एकदा या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या शनिवारी म्हणजेच दिनांक १९ जून २०२१ रोजी विक्रोळी पूर्व परिसरात निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम सुरू होते. या ठिकाणी एक पती-पत्नी कामगार म्हणून कार्यरत आहेत. यातील कामगार असणारी महिला खालच्या मजल्यावर आपले नेमून दिलेले बांधकाम विषयक काम करीत होती. हे काम करत असतानाच साधारणपणे दुपारी ३ वाजताच्या सुमारास वरच्या मजल्यावरून एक सळई पडली. ही सळई दुर्दैवाने महिलेच्या छातीत आरपार घुसली. त्यानंतर या अत्यंत गंभीर अवस्थेतील महिलेला तात्काळ महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचारानंतर सदर महिलेची गंभीर परिस्थिती बघून तिला शीव परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास हलविण्यात आले.
..
सदर महिलेची असलेली अत्यंत गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या महिलेच्या छातीत सळई आरपार घुसलेली असल्यामुळे या महिलेला शस्त्रक्रिया गृहातील (Operation Theatre) ‘बेड’वर झोपवणेही शक्य होत नव्हते. बऱ्याच प्रयत्नानंतर या महिलेस एका कुशीवर झोपवून ही शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. साधारणपणे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास सुरू झालेली ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया रात्री १० वाजेपर्यंत म्हणजेच सलग ३ तास सुरू होती.
..
या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयातील तीन विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांचा समावेश असलेली १२ व्यक्तींची चमू अथकपणे कार्यरत होती. सदर दुर्दैवी घटना घडली, त्याच दिवशी रात्री १० वाजताच्या सुमारास अत्यंत अवघड शस्त्रक्रिया पूर्ण झाली आणि महिलेच्या छातीतून सळई यशस्वीपणे काढण्यात येऊन महिलेचे प्राण वाचविण्यात आले. आता सदर दुर्दैवी घटनेच्या एका आठवड्यानंतर महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती रुग्णालयाद्वारे देण्यात आली आहे.
..

ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणाऱ्या चमूमध्ये शल्यक्रिया विभागातील डॉक्टर विनीत कुमार, डॉक्टर रणजीत कांबळे, डॉक्टर पार्थ पटेल; हृदयशस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर कुंतल सुराणा, भूलतज्ज्ञ डॉक्टर तेजस्विनी जांबोटकर यांच्यासह डॉक्टर अमेय, डॉक्टर प्राजक्ता आणि परिचारिका श्रीमती तेजस्विनी गायकवाड आणि सहाय्यक भास्कर लहानगे यांचा समावेश होता, अशीही माहिती शल्यक्रिया विभागाचे प्रमुख तथा अधिष्‍ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी दिली आहे.

मिरा भाईंदरच्या युएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी दिलीप घेवारे सुरतहून ताब्यात; ठाणे गुन्हे शाखेचे यश

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील भाईंदर पुर्व येथील सर्वे क्र. ६६३ आणि ६६४ या भूखंडावरील गैरव्यवहाराबाबत पाच वर्षांपूर्वी ठाणे नगर पोलीस ठाण्यात २६ नोव्हेंबर २०१६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. युएलसीचे बिगरशेती बनावट कागदपत्र बनवून कसल्याही कोर्ट फी, स्टॅम्प ड्युटी, आवक जावक नोंदीशिवाय सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून बांधकामे करताना या बिल्डरांनी सरकारचा अब्जावधींचा महसूल बुडवला होता.

या कोट्यवधींच्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिकेत नगररचना विभागात कार्यरत असलेला सहाय्यक नगर रचनाकार दिलीप घेवरे याला आज सकाळी गुजरातच्या सुरत येथे ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. दिलीप घेवारे गेल्या दोन आठवड्यांपासून फरार होता आणि अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी त्याचे आटोकाट प्रयत्न चालू होते. आज त्याच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी सत्र न्यायालयात ठेवण्यात आली होती मात्र सुनावण्यापूर्वीच त्याला गुन्हे शाखा ठाणे पोलिसांनी मोठ्या शिताफीने गुजरातमध्ये सुरत येथून अटक केली आहे.

डिजिटल साधनाचा अति वापर डोळ्यांच्या आजाराला निमंत्रण, वेळीच उपचार घेण्याचा नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांचा सल्ला

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या संकटा मुळे राज्य सरकारने जून २०२० पासून ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर भर दिला. एकीकडे विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून सरकारने डिजीटल पद्धतीचा अवलंब स्विकारला. या शिक्षणासाठी मोबाईल आणि संगणकचा वापर वाढला असल्याने डोळ्यांचे आजार वाढत आहेत. लहान मुलांमधील डोळ्याचे आजार वाढू नये यासाठी वेळीच उपचार घ्यावे असा सल्ला प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. अनघा हेरूर यांनी यावेळी डोळ्यासंबंधी आजारांवर आणि म्युकर मायकोसीसवर माहिती दिली. त्या म्हणाल्या, सध्या कोविड काळात सर्वच परिस्थिती बदलली आहे. कोविड नियंत्रणात यावा म्हणून शासन-प्रशासनाने कठोर निर्णय घेऊन वर्क-फ्रॉम-होम व ऑनलाईन शिक्षण सुरू केले. परंतु याचा परिणाम म्हणून डोळ्यांच्या आजारात वाढ झाली आहे.

सध्या म्युकर मायकोसीस हा रोग जोर धरत असून त्यावर नियंत्रण मिळावे याकरता डोळ्यांची तपासणी तात्काळ करून घेणे हिताचे आहे असे त्यांनी सांगितले. आजकाल काम आणि खेळ दोन्हीसाठी एकच तंत्रज्ञान वापरलं जातं. खेळ असो वा काम समोर एक स्क्रीन असतेच. मग ती मोबाईलची, कॉम्प्युटरची किंवा लॅपटॉप, टॅबलेट ची असो. या स्क्रीन वर खूप काळ सातत्याने बघत राहिल्याने डोळ्यांचे विकार बळावतात. स्क्रीनवर एकटक बघत राहिल्याने डोळ्यांची उघडझाप कमी होवून डोळ्यांवर ताण निर्माण होतो. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, ताण येणे, डोळे जड होणे, डोकेदुखी असे त्रास होतात. जर ही सवय सोडली नाही तर आपल्याला अनेक त्रासांना सामोरे जावे लागेल. जर डिजिटल साधने वापरायची असतील तर कमीत कमी एक तासामध्ये तीन वेळा २० सेकंदाच्या ब्रेक घेणे आवश्यक आहे. याबरोबर बैठे काम करतांना बसण्याच्या पध्दतीवर लक्ष ठेवले पाहिजे. सध्या लाईफस्टाइल बदलल्याने कमी वयातही मोतीबिंदूचे रुग्ण दिसून येतात.

म्युकर मायकोसीस प्रकारात प्रथम नाकावाटे विषाणूचा शिरकाव होतो त्यामुळे वेळीच जागरूक राहिले पाहिजे. नाक, डोळे आणि मेंदुवर याचा परिणाम होतो. डोळे सुजणे, नाकातून घाण वास येणे, डोळ्यांची बाजू दुखणे, डोळा पुढे येणे अशी लक्षणे दिसून येतात यासाठी जनजागृती करणे खुप महत्वाचे असून यासाठी आमची तयारी आहे. यासाठी आमच्याकडून शाळांना तसेच शासकीय कार्यालयांना पत्रव्यवहार केला गेला पण त्याकडे दुर्लक्ष झाले याचे आश्चर्य वाटते असेही त्यांनी सांगितले.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारावर वाढ झाली आहे. असे आजर होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यावर माहिती देण्यासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरूर यांनी डोंबिवलीतील शाळांना संपर्क केला होता. लहान मुले आणि पालवर्गासाठी आठवड्यातून एकदा माहितीपर ऑनलाईन जनजागृती करू या. यासाठी आम्ही कोणतेही शुल्क आकारणार नाही असे डॉ.अनघा हेरूर यांनी शाळा व्यवस्थापनांना सांगितले होते. मात्र एकही शाळेने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला नाही अशी खंत त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

कोरोना काळात आई-वडील गमावलेल्या अनाथांना मिळणार बीपीएल शिधापत्रिका!

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील अनाथांना स्वतंत्र शिधापत्रिका मिळावी अशी मागणी अनेक वर्ष केली जात होती. याबाबत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अनाथांना वयाच्या २८ वर्षापर्यंत तात्पुरती पिवळी (बीपीएल) शिधापत्रिका वितरण करण्याबाबतचा निर्णय प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत घेतला आहे.

राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिकेबरोबर त्याचे लाभ मिळतील व २८ वर्षावरील अनाथांना उत्पन्नाप्रमाणे शिधापत्रिका मिळेल व त्याप्रमाणे त्याचे लाभ देण्यात येतील. या निर्णयामुळे राज्यातील अनाथ मुलांना मोठा आधार होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. कोरोनाकाळात अनेक मुलांच्या पालकांचे मृत्यू झाल्यामुळे ते अनाथ झाले आहेत अशा मुलांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर शिधापत्रिका मिळवताना कागदपत्रांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अनाथ असल्याचा पुरावा म्हणून महिला व बालविकास विभागाने वितरित केलेले अनाथ प्रमाणपत्र किंवा आई व वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे माहिती देखील छगन भुजबळ यांनी दिली. अनाथांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची भावना देखील भुजबळ यांनी व्यक्त केली.

नाल्याच्या त्रासाला कंटाळून भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी नाल्यात बसून केले आंदोलन

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले नगरमध्ये नाल्याचे काम होत नसल्याने कंटाळून शेवटी भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी नाल्यात उतरून आंदोलन केले. नाल्याचे काम न झाल्याने पाणी तुंबून परिसरातील नागरिकांच्या घरात जाते. याचा त्रास नागरिकांना होत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती एकदम वाईट असते, वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकारी सुशील पायल आणि स्थानिक काही नागरिक नाल्यात उतरले, नाल्यात बसून अनोखे आंदोलन करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ‘अ’ प्रभागक्षेत्र हद्दीतील वार्ड क्र.१३ मोहने गावठाण परिसरात बहुचर्चित नाल्याचे रखडलेले काम अनेक वर्षांपासून होत नसल्याने भाजपचे मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशिलकुमार पायल यांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा नाले गटाराचे काम मार्गी लागत नसल्याने २१ जून रोजी नाल्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्राव्दारे दिला होता. पालिकेला इशारा देऊन सुद्धा याची दखल न घेता नाल्याचे काम सुरु न झाल्याने अखेर आज सुशील पायल यांनी स्थानिकांसमवेत याठिकाणी नाल्यात बसून आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. दरम्यान त्या नाल्याचे काम सुरु झाले होते. मात्र त्याठिकाणी काही लोकांनी जागेसंदर्भात हरकती घेतल्या, सध्या प्रक्रिया सुरु असून जागेचा वाद मिटल्यानंतर नाल्याचे काम पूर्ण केले जाईल अशी प्रतिक्रिया महापालिकेचे ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.