Home Blog Page 247

राज्यस्थान येथे जिवे ठार मारण्याची सुपारी देणाऱ्या आरोपीला डोंबिवली येथून अटक

संपादक: मोईनसय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिनांक १६/०६/२०२१ रोजी आदित्य पन्नालाल जैन, वय -४१ वर्ष, राहणार:- अवधपुरी, गांधीपथ, जिल्हा:- जयपुर, राज्य:- राजस्थान हे त्यांचे गाडी साफ सफाई चे काम करत असताना त्यांचेवर दोन अनोळखी इसमाने मोटरसायकलीवर येऊन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राने तीन गोळ्या झाडल्या त्यातील एक गोळी आदित्य जैन यांचे हाताला लागून ते गंभीर जखमी झाले त्याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करणी विहार पोलीस ठाणे, जिल्हा :- जयपूर, राजस्थान येथे गुन्हा रजिस्टर नंबर २३६/२०२१ भा.द. वि. कलम ३०७,१०९,३४ शस्त्र कायदा ३,२५ प्रमाणे दाखल आहे.

सदर गुन्ह्याच्या तपासात आदित्य जैन हे त्यांचे पत्नी व परिवारासह २०१८ ते २०२० या कालावधीत डोंबिवली येथे राहत होते. त्या दरम्यान डोंबिवली येथे राहणारा कमलेश शेषराव शिंदे हा नेहमी त्यांचे दुकानात येत जात असायचा व फिर्यादी यांची पत्नी शेफाली हिचेवर एकतर्फी प्रेम करून तिला त्रास देऊ लागला त्यामुळे फिर्यादी परिवारासह राजस्थान येथे राहण्यास गेले. परंतु कमलेश शिंदे याने फिर्यादी याना जीवे ठार मारण्याकरिता एका इसमाला सुपारी दिली त्या नुसार दोन इसमानी राजस्थान येथे जाऊन आदित्य जैन यांचेवर वरील प्रमाणे जीवघेणा हल्ला केला सदर गुन्ह्याचे तपास कामी दिनांक २१/०६/२१ रोजी राजस्थान पोलिसांचे पथक डोंबिवली येथे आले असता गुन्हे शाखा, घटक ३ कल्याण व घटक ४ उल्हासनगर कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कमलेश शेषराव शिंदे यास देवीचा पाडा डोंबिवली पश्चिम येथून तांत्रिक विश्लेषण करून ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास कामी राजस्थान पोलीस पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई गुन्हे शाखा, ठाणे शहरचे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शना नुसार वपोनी तरडे, वपोनी संजू जॉन यांचे नेतृत्वाखाली पोउनि नितीन मुदगुन, पोउनि गणेश तोरगल, पोउनि मोहन कळमकर, स.फौ. पालांडे, पोहवा घोलप, दत्ता भोसले, राजेंद्र खिलारे, शिर्के, पोशि जरग, राजपूत, कोरडे यांचे पथकाने केली.

कोविन ऍपवरील नवीन बदल; ५० टक्के ऑनलाईन नोंदणी तर ५० टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने लस देण्यात येणार

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविन ऍपवर झालेल्या नवीन बदलामुळे शहरात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ५० टक्के ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून ५० टक्केच ‘वॉक इन’ पध्दतीने लस देण्यात येणार आहे. त्यानुसारच सर्व केंद्रावरील दैनंदिन लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोविन ऍपवर नोंदणी करणे बंधनकारक असून ऍपमधील नवीन बदलानुसार ५० टक्के ऑनलाईन नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यानंतरच उर्वरीत ५० टक्के वॉक इन पध्दतीने लसीरकरणास मुभा देण्यात आली आहे.

यासाठी दररोज सायंकाळी ६ वाजता दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणाचे वेळापत्रक कोविन ऍपवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी न करता कोविन ऍपवर जास्तीत जास्त संख्येने ऑनलाईन नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

दरम्यान महापालिका क्षेत्रातील ४५ वर्षावरील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने आता दर मंगळवार आणि शनिवार या दोनच दिवशी सर्वच लसीकरण केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना लस देण्यात येणार असून इतर दिवशी ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना सर्वच केंद्रावर लस देण्यात येणार आहे तरी नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन देखील महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

तब्लिगी जमात बद्दल बदनामीकारक बातमी केले प्रकरणी ३ न्यूज चैनल यांना दंड व प्रेक्षकांची जाहीर माफी मागण्याची निर्देश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

न्युज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड अथॉरिटी अर्थात ‘एनबीएसए’ कडून टाइम्स नाऊ, टीव्ही 18 कन्नड आणि सुवर्णा न्युज या ३ वृत्तवाहिन्यावर कारवाई करण्यात आली असून या चॅनेल्स ना दंडासह प्रेक्षकांची जाहीर माफ़ी मागण्यांचे आदेश एनबीएसए ने दिले आहेत.

देशात २०२० मध्ये कोविड-१९ कोरोनाने शिरकाव केल्यानंतर प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असतानाच यादरम्यान दिल्लीस्थित निजामुद्दीन येथे झालेलं तब्लिकी जमात मरकज चर्चेत आलं होतं दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमानंतर उपस्थित असलेले लोक वेगवेगळ्या राज्यात परतले त्यानंतर कोविड-१९ कोरोना प्रसारासाठी या घटनेला जबाबदार धरण्यात आलं होतं. या घटनेबद्दल करण्यात आलेल्या वार्तांकनावरुन टाइम्स नाऊ, टीव्ही 18 कन्नड आणि सुवर्णा न्युज या ३ वृत्तवाहिन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच बरोबर प्रेक्षकांची माफी ही मागण्यास सांगण्यात आलं आहे.

न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅंडर्ड अथॉरिटी अर्थात एनबीएसए ने ही कारवाई केली आहे. १३ ते २४ मार्च २०२० च्या दरम्यान निजामुद्दीन मध्ये धार्मिक कार्यक्रम झाला होता  या कार्यक्रमात तब्लिगी जमातच्या १६.५०० हजार नागरिकांनी भेट दिली होती. त्यानंतर ३० मार्च २०२० रोजी हा परिसर सील करण्यात आला होता. त्यानंतर कोविड – १९ कोरोनाचा प्रसाराचा ठपका या कार्यक्रमावर ठेवण्यात आला होता.

याच दरम्यान काही वृत्तवाहिन्यांनी आक्षेपार्ह वार्तांकन केल्याचं मत विविध मा. न्यायालयाने नोंदवलं होतं. त्यानंतर आता ‘एनबीएसए’ ने ही कारवाई केली आहे. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला या प्रकरणात दोषी धरण्यात आलं असून टीव्ही 18 कन्नड आणि सुवर्णा न्युज या प्रादेशिक वृत्त वाहिन्यांना देखील दंड ठोठावण्यात आला आहे. टाइम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीने तब्लिगी जमात कार्यक्रमाबद्दल आणि नंतर प्रसारित केलेल्या दृश्य जुळतं नसल्याचंही एनबीएसए ने स्पष्टपणे नोंदवले आहे.

ताब्लिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुसलमानांनी देशात जाणीवपूर्वक कोरोना हा रोग पसरवला असा खोटा प्रचार करून मुसलमानांची बदनामी करण्याच्या उद्देशाने अनेक टीव्ही चॅनेल्स आणि प्रसार माध्यमातून खोट्या आणि अतिरंजित बातम्या त्यावेळी प्रसारित केल्या गेल्या होत्या परंतु नंतर मात्र त्या सर्व बातम्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले होते.

विविध उपक्रमांनी गाजला पाचवा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रतिवर्षी ‘१५ जून’ हा दिवस आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. यानिमित्ताने यंदा विश्व मल्लखांब संघटनेच्या वतीने दोन महिने चालणाऱ्या साप्ताहिक ‘ऑनलाईन’ व्यायाम वर्गाचे उदघाटन करण्यात आले. सध्या कोरोनामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगात सगळीकडेच मैदानी सराव बंद आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत ‘मल्लखांब फेडरेशन यू. एस. ए. यांचेतर्फे न्यूयॉर्क येथे दुसऱ्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी तीस देशांनी यापूर्वीच त्यांच्या सहभागाबाबत लेखी कळविले आहे.

सर्व देशातील मल्लखांबपटूंना प्रत्यक्ष मल्लखांब सराव सुरु करण्यापूर्वी घरच्या घरी, कोणत्याही साधन-सामुग्रीशिवाय कोणते कोणते व्यायाम करता येतील, शरीरतापनाचे सूक्ष्म व्यायाम, शरीराची लवचिकता वाढविणारी योगासने, फुप्फुसांची कार्यक्षमता वाढविणारे प्राणायामाचे प्रकार, अष्टांग प्रणिपातासन सूर्यनमस्कार, ताकद व दम वाढविण्यासाठी साधनविरहित व्यायाम याचे विनामूल्य ‘ऑनलाईन’ प्रशिक्षण व मार्गदर्शन विश्व मल्लखांब संघटनेच्या वतीने छत्रपती, दादोजी कोंडदेव व जीवन गौरव पुरस्कार विजेते उदय देशपांडे व त्यांचे सहकारी यांनी पाचव्या आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिनाच्या निमित्ताने सुरु केले. या प्रसंगी विश्व मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार अॅडव्होकेट व श्री. महेंद्र चेम्बुरकर, श्री. श्रेयस म्हसकर, डॉ. नीता ताटके हे संचालक हजर होते. कलिना पावेल (झेक रिपब्लिक), विवेक साबळे (जपान), फिलिपा फ्रिस्बी (यू. के.), नेव्हल फर्नांडिस (जर्मनी), प्रवर ओभान (नेदरलँड्स), कमला देवी (मलेशिया), निमेश देसाई (ऑस्ट्रेलिया), हँसन यिप (सिंगापूर), डॉमनिक बेकर (फ्रान्स) तसेच भारतातील उत्तराखंड, पुणे, मुंबई येथील राष्ट्रीय प्रशिक्षक अशा एकूण तीस जणांनी पहिल्या सत्राला हजेरी लावली. श्री. उदय देशपांडे यांनी सर्वांचे स्वागत केले व कोरोनानी आपल्यातून ओढून नेलेल्या ‘मल्लखांबाचा अनभिषिक्त सम्राट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कै. दत्ताराम दुदम यांना श्रद्धांजली वाहून सत्राला सुरुवात केली. दि. १४ ऑगस्ट २१ पर्यंत दर शनिवारी भारतीय वेळेप्रमाणे सायंकाळी ६ ते ६.३० या वेळात चालणाऱ्या या विनामूल्य कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला विश्व मल्लखांब संघटनेतर्फे ‘ई सहभाग प्रमाणपत्र’ देण्यात येणार आहे.

संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाचवा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन उत्साहाने सजरा करण्यात आला. मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेतर्फे ‘मल्लखांब किंग’ दत्ताराम दुदम यांना हा दिवस समर्पित करण्यात आला होता. ओळीने ११ वर्षे जिल्हा अजिंक्यपद, आठ वर्षे राज्य अजिंक्यपद व सहा वर्षे राष्ट्रीय अजिंक्यपद पटकावणारा ‘अजिंक्यतारा’ म्हणून दत्ताराम संपूर्ण भारतात ओळखला जातो. १९८७ साली भारत सरकारतर्फे रशिया येथे गेलेल्या प्रदर्शनीय संघातून मॉस्को, लेनिनग्राड व कीव या ठिकाणी त्याने उत्कृष्ट मल्लखांब प्रदर्शन करून रशियन लोकांची मने जिंकली होती. गेल्या जून मध्ये घेतलेली त्याची मुलाखत ‘मल्लखांब कट्टा’ या ‘यू ट्यूब चॅनलवर’ या निमित्ताने पुनर्प्रसारित करण्यात आली. कै. दत्ताराम यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या समर्पित जीवनावरील सुंदर लघुध्वनिचित्रफीत प्रकाशित केली. महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षांतील स्पर्धांमध्ये मल्लखांबवर एखादा नवीन क्रीडा प्रकार सर्वप्रथम सादर करणाऱ्या मल्लखांबपटूंच्या मुलाखती प्रसारित करण्यात आल्या. खासदार, आमदार, मंत्री महोदयांपासून अगदी नगरसेवकांपर्यंत विविध राजकीय नेत्यांनी व अभिनेत्यांनीही सोशल मिडियावरून मल्लखांबपटूंना जागतिक मल्लखांब दिनाच्या शुभेच्छा दिल्या. चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, वृक्षारोपण असेही उपक्रम बऱ्याच संस्थानी राबविले. भारतीय मल्लखांब महासंघाच्या वतीने तामिळनाडू येथील बुजुर्ग मल्लखांब प्रशिक्षक श्री. उलगा दुराई यांना ‘उत्कृष्ट मल्लखांब प्रशिक्षक’ पुरस्कार तसेच दत्ताराम दुदम यांना ‘किंग ऑफ मल्लखांब’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कल्याणात पोलिसांची जबरदस्त कारवाई; मॉडीफाईड सायलेंसरवर चालवला रोडरोलर

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कधी दिवसा तर कधी बहुतांश वेळा रात्रीच्या वेळेस कानाचे पडदे फाटतील इतके कर्णकर्कश्श आवाज करणाऱ्या बाईक स्वारांना कल्याणच्या वाहतूक पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. कानठळ्या बसवणारे आवाज करणारे तब्बल ११८ हून अधिक मॉडीफाईड सायलेन्सर पोलिसांनी चक्क रोडरोलर चालवून ते नष्ट केले आहेत.

कोरोनामुळे आलेले निर्बंध शिथिल होताच कल्याणात पुन्हा एकदा अशा कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाच्या बाईकस्वारांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता. दिवसासह विशेषतः रात्रीच्या वेळेस तर मोकळ्या रस्त्यांवर सुस्साट बुलेट चालवण्यामुळे परिसरातील नागरिकांना खूपच त्रास होत होता. कोरोनामुळे अनेक नागरिकांना रक्तदाब, हृदयाचे आजार किंवा मानसिक आजार जडले आहेत. अशा व्यक्तींसाठी तर या मॉडीफाईड सायलेन्सरचा आवाज जणू काही जीवघेणा ठरू लागला होता.

कंपनीकडून बसवण्यात आलेले मर्यादित आवाजाचे सायलेन्सर काढून त्याजागी आवाजाने डोकं फुटेल इतक्या कानठळ्या बसवणारे मॉडीफाईड सायलेन्सर लावण्याकडे तरुणांचा कल वाढत चालला आहे. वाहतूक पोलिसांनी अशा बाईकस्वारांना वारंवार सूचना देऊनही ‘पालथ्या घड्यावर पाणी’ याम्हणीप्रमाणाचे त्यांचे वर्तन झाले होते. परिणामी लोकांना विनाकारण त्रास देणाऱ्या या बुलेट बाईक स्वारांना अखेर वाहतूक पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून अद्दल घडवायचा निर्णय घेतला. आणि आज तो अंमलातही आणल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बुलेटच्या तब्बल ११८ मॉडीफाईड सायलेन्सरवर रोडरोलर चालवण्यात आला. कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरातील चौकात ही कारवाई करण्यात आली.