Home Blog Page 248

जाहीर दिलगिरी!

लोकहीत न्युज आणि संबंधित मीडिया समूह नेहमीच सत्य आणि विषासार्ह माहिती आणि बातम्या प्रसारित करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत आले आहे. परंतु दिनांक 16 जून 2021 रोजी केंद्रीय माहिती प्रसारण राज्य मंत्री राज्यावर्धन राठोड यांच्या पत्रकार परिषद संबंधित एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लोकहीत न्युजकडे देखील ही बातमी एका प्रतिनिधीच्या माध्यमातून आली आणि ती लोकहीत न्यूजच्या मराठी वेबसाईटवर जशीच्या तशी प्रसारित करण्यात आली. परंतु नंतर आम्ही याबाबत शहानिशा केली असता ही बातमी खूप जुनी असून खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. आणि म्हणून आम्ही ती बातमी आमच्या लोकहीत न्यूज या मराठी वेबसाईटवरुन काढून टाकली आहे.
लोकहीत न्युज कधीही खोट्या बातम्या अथवा कोणत्याही प्रकारचे खोटे साहित्य प्रसारित करण्याचे समर्थन करीत नाही आणि करणार नाही. कोणताही दुष्ट हेतू न ठेवता अशा प्रकारे खोटी बातमी प्रसारित झाल्यामुळे आम्ही जाहीर दिलगिरी व्यक्त करीत आहोत.
– संपादक : मोईन सय्यद

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मराठी कलाकार मयुरेश कोटकर याला अटक

संपादक: मोईन सय्यद / मुंबई प्रतिनिधी: मिलन शाह

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी मराठी कलाकार मयुरेश कोटकर याला ठाण्यातील श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. मयुरेशला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार केली होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट करण्यात आला. पालकमंत्र्याविषयी असलेला हा आक्षेपार्ह शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात कोटकर यांच्याविषयी तक्रार केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कोटकर याला तत्काळ अटक केली.

नवी मुंबईच्या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सध्या होत आहे. मयुरेशने सुद्धा हीच मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्याने फेसबुकवर याबाबत अनेक पोस्ट्स केल्या आहेत. दरम्यान ही पोस्ट फेसबुकवरून हटवण्यात आली आहे.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यानीं साकेत येथील पम्पिंग स्टेशनला केली “सप्राईज व्हिजिट” पाणी पुरवठ्यासंबंधित जाणून घेतली माहिती!

संपादक: मोईन सय्यद/ मिरा-भाईंदर प्रतिनिधी

मिरा भाईंदर शहरातील पाण्याच्या समस्येचे निवारण करण्याच्या हेतूने, पाठपुरावा करत मिरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने आज मि. भा. म. न. पा. च्या ठाणे येथील साकेत पम्पिंग स्टेशन येथे “सप्राईज व्हिजिट” केली. एकंदरीत या पम्पिंग स्टेशनवर नेमक्या काय अडचणी आहेत? MIDC कडून येणाऱ्या पाण्यामध्ये पुरवठा नीट होण्यातील तांत्रिक बाबी सविस्तर पणे चर्चा करून समजून घेतल्या. दररोज येणाऱ्या पाण्याच्या व्हॉल्युम वरील फ्लकच्युएशन, प्रेशर मधील फरक, पाण्याचे फिल्टरेशन, शटडाऊनची कारणे, पाण्याच्या पाईपलाईन मधील गळती आणि अन्य महत्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा केली.

मिरा भाईंदर शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार मुझफ्फर हुसैन यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने साकेत येथे कुठलीही पूर्व सूचना न देता कार्यरत पाहणी केली. याप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष लीलाताई पाटील, नगरसेविका रुबिना फिरोज, मर्लिन डीसा, गीता परदेशी, माजी नगरसेवक फरीद कुरेशी, मिरा भाईंदर युवक काँग्रेस अध्यक्ष दीप काकडे व ओवळा माजीवडा युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल काटकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

MIDC कडून मिरा भाईंदर शहराला होणारा पाणी पुरवठा शहरात व्यवस्थित येत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी सत्ताधारी भाजप पक्षाची आहे, महापौर, उपमहापौर यांची आहे. केवळ महानगरपालिका भवनात बसून सगळी काम होत नसतात. सत्ताधाऱ्यांना लोकहितासाठी चेंबर मधून बाहेर पडून खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरून काम करणं गरजेचं आहे. मात्र मिरा भाईंदर शहराच्या दुर्दैवाने सत्ताधारी सध्या केवळ आपआपसांत हेवेदावे सांभाळण्यात मग्न आहेत. शहरातील सर्व नागरिकांना सुयोग्य पाणी मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे, असे मत यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांनी व्यक्त केले असून शहराला होणारा पाणी पुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठी आम्ही यापुढेही असेच वेळोवेळी या साकेत येथील पंपिंग स्टेशनला भेट देत राहू असे म्हंटले आहे.

उत्तर मुंबईत पहिल्यांदाच ‘अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपीद्वारे कोविड-१९ रूग्णांवर उपचार
मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयानं वाचवले कोरोनाबाधित रूग्णांचे प्राण


संपादक: मोईन सय्यद/मीरारोड प्रतिनिधि

मीरारोड येथील वॉक्हार्ट रूग्णालयात कोविड-१९ ची हलक्या-मध्यम स्वरूपातील लक्षणं असणाऱ्या रूग्णांना ‘अँटीबॉडी कॉकटेल’ उपचार दिले जात आहे. त्यानुसार कोविड-१९ विषाणूची लागण झालेल्या दोन रूग्णांवर ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपीद्वारे उपचार करण्यात आले असून उत्तर मुंबईत पहिल्यांदाच कोरोना रूग्णांवर या नवीन उपचारपध्दतीने या संसर्गावर मात करण्यात आली आहे.


कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांसाठी अँटीबॉडी कॉकटेल उपचारांना भारतात मंजुरी देण्यात आली होती. अशाच अँटीबॉडी कॉकटेल उपचारपध्दतीचा डोस अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देण्यात आला. त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानुसार आता वॉक्हार्ट रूग्णालयात कोरोना रूग्णांवर या उपचारपद्धतीचा वापर करण्यात येत आहे.


६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या दोन्ही कोरोना रूग्णांना मे महिन्यात उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्हीही रूग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा त्रास होता. या रूग्णांवर अँटीबॉडी कॉकटेल थेरपीद्वारे उपचार करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. त्यानुसार कुटुंबियांची परवानगी घेऊन उपचार करण्यात आले आहे. या थेरपीनंतर रूग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. लवकर दोन्ही रूग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांसाठी आता ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ थेरपी एक प्रभावी उपचार ठरत आहे.


मीरारोड येथील वोकहार्ट हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजिशियन डॉ. जिनेंद्र जैन म्हणाले, “ ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या कोरोना रूग्णांना ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ ही थेरपी देण्यात येत आहे. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी (एसओपी २) ९३ टक्के आहे पंरतू ते आँक्सिजन सपोर्टवर नाहीत परंतू त्यांना अन्य लठ्ठपणा, मधुमेह, यकृताचे आजार, हृदयरोग आणि फुफ्फुसाचे आजार असल्यास संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. तसेच, अतिगंभीर स्वरूपाच्या कोरोनाबाधित रूग्ण आणि एखादी अँलर्जी असणाऱ्या रूग्णांना या थेरपीची शिफारस केली जात नाही ”


डॉ. जैन पुढे म्हणाले, “’मोनोक्लोनल अँटीबॉडी’ हे कोरोनाशी लढण्यासाठी प्लाझ्मामधून काढलेले आहे. रुग्णांना ‘कासिरिविमॅब’ (६०० एमजी) आणि ‘इम्डेविमॅब’ (६०० एमजी) या दोन्ही औषधांचे गुण असलेलं औषध दिले जाते. हे औषध इंजेक्शनद्वारे दिले जाते. अँटीबॉडी कॉकटेलची संपूर्ण डोस 30 मिनिटांत रुग्णाला दिली जाते. त्यानंतर एक तास रूग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येते. या औषधांमुळे कोरोना रूग्णांच्या प्रकृतीत पटकन सुधारणा होत आहे.”


“कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आता वॉक्हार्ट रूग्णालयात ‘मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल’ ही थेरपी सुरू करण्यात आली आहे. ही थेरपी विषाणूची तीव्रता कमी करण्यास आणि उच्च-जोखीम रूग्णांची प्रकृती खालावण्यापूर्वी त्यांच्या उपचारासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. आम्ही जास्तीत जास्त रूग्णांना ही थेरपी घेण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, ”असे डॉ. जिनेंद्र जैन म्हणाले.

शैक्षणिक कर्जासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ

संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: अवधुत सावंत

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. आतापर्यंत ही उत्पन्न मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये इतकी होती. आता उत्पन्न मर्यादा वाढविल्याने जास्तीत जास्त अल्पसंख्याक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतील, असे मलिक यांनी सांगितले.

अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक म्हणाले, राज्य शासनाकडून मिळालेल्या भागभांडवलाच्या निधीतून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन आणि ज्यू समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक कर्ज योजना राबविली जाते. १८ ते ३२ वयोगटातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना व्यावसायिक तसेच उच्च शिक्षणासाठी अडीच लाख रुपये मर्यादेपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. ३३ टक्के इतक्या व्याजदराने हे कर्ज दिले जाते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिन्यानंतर ५ वर्षे कालावधीमध्ये विद्यार्थ्याने या कर्जाची परतफेड करावयाची असते. या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी महामंडळाच्या जिल्हास्तरीय कार्यालयाशी किंवा जुने जकातगृह, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.

महामंडळाच्या www.mamfdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा https://malms.maharashtra.gov.in
या लिंकवर क्लिक करावे. पुढील शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

याशिवाय, केंद्र शासनाच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्यात येते. या योजनेतून लाभासाठी शहरी भागाकरिता विद्यार्थ्याची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा १ लाख २० हजार रुपये तर ग्रामीण भागाकरिता कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ९८ हजार रुपये इतकी आहे. यासाठीही विद्यार्थी अर्ज करु शकतात, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.