कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज असून कोरोना संक्रमित बालकांकरीता शाळांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करून ‘माझा विद्यार्थी माझी जबाबदारी’ संकल्पना केडीएमसीच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी महापालिका अविरत विविध उपाययोजना करीत आहेत, तथापी वैदयकीय तज्ञांच्या अंदाजानुसार कोविड-१९ ची तिसरी लाट अपेक्षित असून त्यामध्ये मुले विशेषत: लहान बालके कोरोना विषाणूमुळे संक्रमित होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे. या अनुषंगाने बालकांचे शाळेशी असलेले वेगळे नाते विचारात घेता, कोविड संक्रमित काळात त्यांचे भावनिक व मानसिक संतुलन पोषक राहण्यासाठी मुलांच्या शाळांच मुख्य भूमिका पार पाडू शकणार आहे.
त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार कोरोना संक्रमित बालकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची आवश्यकता भासल्यास मोठया व्यक्तिंसाठी असलेल्या विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटरपेक्षा मुलांना त्यांच्या शाळेत विलगीकरण कक्ष निर्माण करुन तेथे व्यवस्था केल्यास त्यांचे मन तेथे सहज रमेल याच दृष्टीने महापालिका क्षेत्रातील कोविड-१९ संसर्गाची लागण होणा-या ८ ते १२ वयोगटातील बालकांची काळजी घेण्यासाठी आणि वैद्यकीय उपचारासाठी महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेची प्राथमिक विद्यालये आणि खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयांमध्ये बालकांकरीता “विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर ” ची संकल्पना आता राबविण्यात येणार आहे.
त्यानुसार महापालिकेची सर्व प्राथमिक विद्यालये, खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालये यांच्या मुख्यध्यापकांकडून शाळेची संपूर्ण माहिती (मुख्यध्यापकांचे नाव, मेल आयडी, व्हॉट्सॲप क्रमांक, शाळेचा संपूर्ण पत्ता, शाळेतील मुलांची संख्या इ.) उपलब्ध करुन घेणेबाबत तसेच “बालकांकरीता विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर “या संकल्पनेची माहिती संबधित मुख्याध्यापकास उपलब्ध करुन देणेबाबत प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग यांस कळविण्यात आले आहे.
यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांना, त्यांनी ” माझा विदयार्थी ,माझी जबाबदारी ” या संकल्पनेस अनुसरून राष्ट्रीय कर्तव्याचा भाग म्हणून विलगीकरण कक्ष/कोविड केअर सेंटर मध्ये भरती होणाऱ्या मुलांच्या मनोरंजनासाठी आवश्यक उपाययोजना (वाचनालये, भिंतीवर कार्टुनची चित्रे, लहान बालकांची गाणी , बैठी सुरक्षित खेळणी इ.) करणेबाबत कळविण्यात आले आहे. या सेंटरमध्ये दाखल असलेल्या मुलांची मानसिकता व मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने सर्व प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांना वेळोवेळी दुरदृश्य प्रणालीद्वारे महापालिका आयुक्त यांचेमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दाखल भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातील काही भाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारने केलेल्या याचिकेला सी.बी.आय सह मूळ तक्रारदाराने आक्षेप घेतला. अॅड.जयश्री पाटील यांनी याप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेत उच्च न्यायालयाने सी.बी.आय ला देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
ही याचिका करण्यामागील सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केला गेला होता. न्यायालयाने यावेळी मूळ तक्रारदाराची हस्तक्षेप याचिका करण्याची मागणी मान्य करताना राज्य सरकारला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. अशी याचिका राज्य सरकार कशी काय करू शकते ? राज्य सरकारला अशी याचिका करण्याचा अधिकार नाही, असा दावा पाटील यांनी केला.
सी.बी.आय तर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही सरकारच्या याचिकेला विरोध केला. तपास रोखण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
दिनांक ३० मे रोजी डोंबिवलीतील विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकात मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे गाडीखाली पडून मृत्यू झाला होता. पाटील यांची घरची परिस्थिती तशी बिकट असल्याने त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न उभा ठाकला होता. पाटील यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी शिवसेना पुढे आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहरशाखेतर्फे शिवसेना शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे ह्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मॉडेल शाळा आणि कॉलेजचे व्यवस्थापक बांबर्डे ह्यांची भेट घेऊन मुलीच्या मोफत शिक्षणाबद्दल निवेदन दिले. पाटील यांची मुलगी ज्या मॉडेल शाळेत शिकत आहे, त्यांच्या घरात कमावते कोणी नसल्यामुळे व्यवस्थापनाने त्यांचे शालेय व पुढे महाविद्यालयीन पदवी पर्यंतचे शिक्षणाची फी माफ करावी अशी विनंती शिवसैनिकांनी केली.
या महाभयंकर कोरोना संसर्गाच्या महामारीत शाळेने व कॉलेजने फी भरण्याकरिता विद्यार्थी व पालकांना कोठेही दबाव न आणता त्यांना फी मध्ये सवलत देवून ती टप्या टप्यात जमा करावी तसेच ज्याची सध्या परिस्थिती अत्यंत बिकट आहे अश्या विद्यार्थ्यांना जमल्यास फी माफ करावी अशीही विनंती करण्यात आली. त्यावेळी बांबर्डे साहेब ह्यांनी सदर मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही नक्कीच योग्य तो निर्णय घेवू अशी ग्वाही दिली. या शिष्टमंडळात शहरप्रमुख राजेश गोवर्धन मोरे, कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक कविता गावंड, महिला शहरासंघटक मंगला सुळे, किरण मोंडकर, उपशहरप्रमुख संतोष चव्हाण, किशोर मानकामे, माजी परिवहन सभापती सुधीर पाटील, कार्यालयप्रमुख सतीश मोडक, उपशहरसंघटक संजय पावशे आदी सामील होते.
उद्या जर का ही ४५ कुटूंब अपघातात दुर्दैवी मृत्यू पावली तर त्याला सरकार जबाबदार.. ?
चुनाभट्टीतील टाटानगर परिसरातील गिरणी कामगारांची इमारत मालवणी इथल्या घटनेनंतर पुन्हा चर्चेत आली आहे. मागच्या १५ वर्षांपासून इथले रहिवाशी जीव मुठित घेवून राहत आहेत. दुसरा पर्याय नसल्यानं करायचं काय असा प्रश्न इथल्या रहिवाश्यांसमोर आहे. त्यामुळे हे रहिवासी याच अतिजीर्ण इमारतीत आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.
स्वदेशी मिलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी १९६० मध्ये ही तीन मजली इमारत बांधण्यात आली. त्यावेळी या ईमारतीमध्ये एकूण १२२ कुटुंब राहत होती. मुंबईतल्या गिरण्या हाळू हाळू बंद पडू लागल्या. त्यातच २००१ मध्ये स्वदेशी मिल ला देखील टाळे लागले. गिरणी बंद झाल्यानं या इमारतीकडे कंपनीने लक्ष्य देणं टाळलं. आणि काही वर्षातच या इमारतीची अवस्था अत्यंत दयणीय झाली. या ईमारतीला बाहेरून पाहिलं की आता मध्ये जाण्याची हिंमत होत नाही. बाल्कनीचे तुटलेले कठाडे , तुटलेलं सिलिंग या ईमारतीच्या दयनियतेची साक्ष देतात.
ज्या रहिवाश्यांकडे पैसे होते ते रहिवासी दुसरीकडं रहायला गेले. मात्र ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नाही असे रहिवासी जुण्याच ठिकाणी राहू लागले. या इमारतीमध्ये सध्या ४५ कुटुंब वास्तव्य करत आहेत. जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या इमारतीचे पिलर गंजले आहेत. पिलरमधून बाहेर येणाऱ्या गंजलेल्या सळ्या या इमारतीची दयनीय कहाणी सांगण्यास पुरेश्या आहेत. एखादा वयोवृद्ध व्यक्ती काठीचा आधार घेवून जसा उभा असतो तशीच ही ईमारत टेकूचा आधार घेवून उभी आहे. पावसाळ्यात जरी डोक्यावर छत असलं तरी छताच्या तुटक्या फटीतून पाऊस घरात प्रवेश करतोच. पावसाळा आला की इथल्या नागरिकांचे भय दुनावतं. वारा सुटला की काळजाचा ठोका चुकतो. पावसाळ्यात मनपा नोटीस देते पण पर्यायी राहण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत नाही असे इथल्या नागरिकांचे म्हणणे आहे.
ठाणे जिल्ह्यात नागरिकांची गर्दी होऊ नये आणि परस्पर संपर्क वाढून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये,म्हणून १४ जून २०२१ ते २१ जून २०२१ पर्यंत नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे.
विविध भागांमध्ये कोविड १९ बाधितांची कमी-अधिक प्रमाणातील रुग्ण संख्या विचारात घेऊन राज्य शासनाने विभागनिहाय वेगवेगळ्या स्वरूपात निर्बंध लागू करण्याचे निर्देश जारी केलेले आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रत्येकी १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्हयातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलो महानगरपालिकांचे क्षेत्र हे तीन स्वतंत्र प्रशासकीय घटक (Separate Administrative Unit) म्हणून विभागण्यात आले आहेत.
तर उर्वरित मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव.बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे एक एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक (Single Separate Administrative Unit) निर्माण करणेत आला आहे.
ठाणे, नवी मुंबई व कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र स्वतंत्र प्रशासकीय घटक वगळून उर्वरित) एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रामध्ये Levels of Restrictions for Breaking the Chain अंतर्गत स्तर ३ (Level 3) या स्तराचे निर्बंध खालीलप्रमाणे लागू करत आहे.
१) सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. २) अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. ३) मॉल्स / सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रिन / नाटयगृहे इत्यादी बंद राहतील. ४) रेस्टॉरेंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. मात्र, सायं. ४.०० वा. नंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/ पार्सल सर्व्हीस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील. ५) उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील. ६) सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५.०० वा. पासून सकाळी ९.०० वा. पर्यंत सुरू राहतील. ७) खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायं. ४.०० वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून )सुरू राहतील. ८) कार्यालयीन उपस्थिती शासकीय कार्यालयांसह (खाजगी जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील. ९) क्रिडा सकाळी ५.०० वा. पासून सकाळी ९.०० वा. पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील. १०) चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू ठेवता येईल व सायं. ५.०० नंतर कोणासही हालचाल करता येणार नाही. ११) सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा पर्यंत सुरू राहतील. १२) लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील. १३) अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल. १४) बैठका स्थानिक संस्थांच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका हॉलच्या सभागृहाच्या ५०% बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील. १५) बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायं. ४.०० वा. पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल. १६) कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सुरु राहतील. १७) ई-कॉमर्स साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील. १८) जमावबंदी सांय. ५.०० वा. पर्यंत व संचारबंदी सायं ५.०० वा. नंतर लागू राहील. १९) व्यायामशाळा/ केश कर्तनालय / ब्यूटी सेंटर्स / स्पा / वेलनेस सेंटर्स सायं. ४.०० पर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील, परंतु गिर्हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही. २०) सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतु, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. २१) मालवाहतूक जास्तीत जास्त ३ व्यक्तीसह वाहन चालक हेल्पर स्वच्छक किंवा इतर असे एकूण ३ लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील. २२) खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५० मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील. २३) उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील. २४) उत्पादनाच्या अनुषंगाने १. अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह २) सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते.ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही) ३) राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन ४) अत्यावश्यक गंभीर स्वरूपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील. २५) उत्पादन सेक्टरमधील इतर सर्व उत्पादन युनिट, जे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले नाहीत, परंतू निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहेत, असे युनिट केवळ ५०% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. या आदेशाची अंमलबजावणी ठाणे जिल्हयातील मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद / शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये करण्यात येणार आहे. सदरचे आदेश दि.१४ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पासून दि.२१ जून २०२१ रोजी सकाळी ७.०० वा. पर्यंत लागू राहतील. वरील आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. सदरहू आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ ते ६०, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम, १८९७ व भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन ठाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राजेश नार्वेकर यांनी केले आहे.