आज पडणाऱ्याभर पावसातही एनडीआरएफ पथकासमवेत महापालिका आयुक्तांनी धोकादायक इमारतींची पाहणी केली. हवामान खात्याने येत्या ३ दिवसांसाठी दिलेल्या संभाव्य अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, विभागीय उपायुक्त विनय कुलकर्णी, उपायुक्त पल्लवी भागवत यांनी कल्याण मध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाबरोबर कल्याण पश्चिम मधील जोशीबाग येथील दाटीवाटीच्या वस्तीतील अतिधोकादायक इमारतींची भर पावसात समक्ष पाहणी केली आणि तेथील रहिवाशांची विचारपूस करुन या ३ दिवसाच्या अतिवृष्टीच्या कालावधीसाठी त्यांना जवळच्या नातेवाईकांकडे किंवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरीत होणेबाबत सूचना दिल्या.
कल्याण मधील कचोरे टेकडीवरील दरडी अतिवृष्टीच्या काळात कोसळून दुर्घटना होण्याचा संभव असतो. त्यामुळे आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी स्वत: टेकडीवर पाहणी करुन तेथील रहिवाशांना देखील सुरक्षित स्थळी अथवा महापालिकेच्या संक्रमण शिबीरात स्थलांतरित होण्याबाबत सूचना दिल्या. त्यानंतर आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी डोंबिवली पूर्व येथील संत नामदेव पथ व दत्तनगर येथील धोकादायक इमारतीची देखील पाहणी केली.
तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्याने धोकादायक इमारती मधील रहिवाशांना दुसरी कडे स्थलांतरीत करण्यासाठी आज एनडीआरएफचे टिम बरोबर आम्ही पाहणी केली. त्याच प्रमाणे कचोरे टेकडी वर लॅन्डस्लाईड सारखी दुर्घटना घडली तर रेस्क्यु करण्यासाठी काय करावं लागेल याची तयारी करण्यासाठी आज आम्ही कल्याण आणि डोंबिवली परिसरामध्ये एनडीआरएफच्या टिम सोबत पाहणी केली असल्याची माहिती आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.
सद्या मोठ्या प्रमाणात ऑनलाईन माध्यमाने फसवणुकीचे प्रमाण वाढले असून पोलिस विभागा तर्फे ऑनलाईन फसवणुक करणाऱ्या आरोपिंवर नजर ठेवून कारवाई केली जात आहे.
बजाज फायनान्स कंपनीचे लोन देण्याचे नावाने लोकांना आगाऊ पैसे भरण्यास लावून फसवणूक करणाऱ्या टोळी बाबत नांदेड जिल्ह्यातील सायबर सेलच्या महिला पोलीस उप निरीक्षक अनिता चव्हाण (सद्या स. पो.नि/ ए. टी. एस. नांदेड ) यांनी काही तक्रारदार यांना ज्या मोबाईल क्रमांकावरून कॉल आले त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर टोळी डोंबिवली, जिल्हा- ठाणे येथे असल्याची माहिती मिळवून पोउनि/नितीन मुदगुन, गुन्हे शाखा, ठाणे युनिट ३, कल्याण यांना संपर्क साधला त्या नंतर गुन्हे शाखा, ठाणे युनिट कल्याण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करून केवळ मोबाईल लोकेशन वरून अनेक कमर्शियल कॉम्प्लेक्स असलेल्या परिसरात सुमारे १५ ते २० दिवस पाळत ठेऊन बनावट कॉल सेंटर निश्चित शोधून काढले त्या नंतर इतवारा पो.स्टे. नांदेड येथे फसवणूक झालेल्या तक्रारदार यांची एफ आय आर नोंद केली परंतु त्या दरम्यान लॉक डाउन सुरू झाल्याने नमूद कॉल सेंटर चे कामकाज त्या ठिकाणी बंद करून वेगवेगळ्या लोकेशन वर सुरू असल्याने कोणत्याही प्रकारची घाई न करता वारंवार तांत्रिक विश्लेषण सुरू ठेवले.
मागील १० ते १२ दिवसा पूर्वी पुन्हा पूर्वीच्या ठिकाणचे कॉल सेंटर चालु झाल्याने नांदेड येथील पोलीस पथकाला संपर्क करून दिनांक ०९/०६/२०२१ रोजी नांदेड येथील पो उ नि /काळे व पथक तसेच गुन्हे शाखा, ठाणे युनिट कल्याणचे, सपोनि/दायमा, पो उ नि /मुदगुन, पो उ नि /कळमकर व पथक यांनी गुन्हे शाखा, ठाणेचे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शना नुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांचे नेतृत्वाखाली मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत सिटी मॉल पहिला माळा ११६, पेंढारकर कॉलेज जवळ, डोंबिवली या ठिकाणी इतवारा पोलिस ठाणे, नांदेड गुन्हा रजिस्टर नंबर 80/20 भादंवि कलम 420,406 प्रमाणे दाखल गुन्ह्यात बनावट कॉल सेंटरवर संयुक्तपणे छापा कारवाई केली असता सदर ठिकाणी आरोपी नामे दिनेश मनोहर चिंचकर, वय- ३१ वर्ष, राहणार- न्यू साईनाथ कॉलनी, रामदास वाडी, कल्याण व रोहित पांडुरंग शेरकर, वय- २८ वर्ष, राहणार- काकाच्या ढाब्याजवळ, कल्याण पूर्व हे १८ ते २० कर्मचारी नोकरीस ठेऊन उत्तर प्रदेश राज्यातील काही साथीदाऱ्यांचे मदतीने बनावट कॉल सेंटर चालवीत असताना मिळून आले आहेत. त्यांनी मोबाईल क्रमांकाचा ऑनलाईन डाटाबेस मिळवून नोकरीवर ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना प्राप्त मोबाईल क्रमांकाच्या डाटाबेस मधील क्रमांकावर फोन करण्यास लावून बजाज फायनान्स कंपनीमार्फत लोन मिळवून देतो असे सांगून लोकांना लोन पास करणे करिता आगाऊ रक्कम भरण्यात लावून फसवणूक केली आहे.
सदर ठिकाणाहून २६ मोबाईल, एक लॅपटॉप, अनधिकृतरित्या मिळवलेला मोबाईल क्रमांकाचा डाटाबेस, इतर कागदपत्र असे एकूण रुपये १,१०,०००/- कींमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर बनावट कॉल सेंटर स्थापन केलेला इसम व मॅनेजर म्हणून काम पाहणारा इसम यांना अटक करण्यात आली असून सदर ठिकाणी नोकरी करणारे कर्मचारी यांचे कडे अधिक तपास सुरू आहे. सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त सो.ठाणे शहर, श्री. जय जीत सिंग, मा. पोलीस सह आयुक्त सो. श्री. मेकला, मा. अपर पोलीस आयुक्त सो. श्री. येनपुरे, मा. पोलीस उप आयुक्त सो. श्री. पाटील, मा. पोलीस अधीक्षक सो. श्री. शेवाळे, नांदेड मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो. श्री. कदम यांचे मार्गदर्शना खाली गुन्हे शाखा, ठाणे घटक -३ कल्याण चे व इतवारा पोलीस ठाणे नांदेड चे पोलीस पथकाने केली.
कल्याण येथे वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या वृद्धाला हिललाईन पोलिसांनी अखेर अटक केली आहे. संबंधित प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आरोपी विरोधात कारवाई करण्याची मागणी वाढली होती. अखेर हिललाईन पोलिसांनी आरोपी विरोधात सु मोटोने गुन्हा दाखल केला. तसेच एक पथक आळंदीला रवाना केले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
हा प्रकार कल्याण मलंगगड जवळील द्वारली गावातील हद्दीत घडला होता.पाण्याच्या वादातून वृद्धाने आपल्या पत्नीला जाब विचारत बादलीने तसंच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. महिला वारंवार मला मारु नका, अशी विनंती करत होती. मात्र वृद्ध अमानुषपणे मारहाण करत होता. दरम्यान,घरातील कोणीही मध्यस्थी करत मदतीसाठी येत नव्हते, असे व्हायरल झालेल्या व्हिडीओ वरून दिसत होते. तर वृद्ध महिलेच्या नातवाने हा व्हिडीओ रेकॉर्ड करून, सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.
संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्धेला भेटून तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. मात्र वृद्धेने पतीच्या विरोधात कुठलीही तक्रार नसल्याचं सांगितलं. अखेर पोलिसांनी सु मोटोने मारहाणीचा गुन्हा दाखल केला. तसेच, आरोपी आळंदीला गेला होता. त्यामुळे एक पथक आळंदीला रवाना केले, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा येत्या १० जून पासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यास परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येईल. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्याबद्दल प्रयत्न (attempt) मोजण्यात येऊ नयेत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोविड-१९ परिस्थितीच्या अनुषंगाने, विद्यार्थी दि.१० जून २०२१ पासून सुरु होणाऱ्या विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० लेखी परीक्षेस कोविड-१९ आजाराचा अहवाल सकारात्मक (Positive) आल्यामुळे अनुपस्थित राहतील, अशा विद्यार्थ्यांची सदर हिवाळी-२०२० लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर, विशेष परीक्षा घेण्यात येईल. सदरील परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्यांचा प्रयत्न (Attempt) ग्राह्य धरला जाणार नाही. विशेष परीक्षेचा दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्या आहेत. या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापिठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या वैद्यकीय परीक्षेस बसणारे विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालय तसेच शासनमान्य कोविड रुग्णालयात स्वतःची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेऊ शकतात, तसेच जे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात राहण्यास इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहात वैयक्तिक अंतर राखून राहण्याची सोय करण्यात यावी, वसतिगृहाच्या मेस मध्ये भोजनाची सोय करण्यात यावी. वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण वेळोवेळी करण्यात यावे आणि सर्व प्रकारची काळजी घेऊनच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असेही वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना कळविण्यात आले आहे.
कोरोना आणि लसीकरणावरून लोकांच्या मनात अनेक प्रश्न सध्या उठत आहेत. कारण ही महामारी सर्वांसाठी नवीन आहे. यामुळे हळू-हळू लोकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न येत आहेत. आता नवा प्रश्न असा आहे की, जर तुम्ही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले तर कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे का ? अमेरिकेच्या सीडीसीने यावर उत्तर दिले आहे.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शन (सीडीसी) नुसार जर तुम्ही कोरोनाच्या दोन्ही लसी घेतल्या असतील तर तुम्हाला कोरोना टेस्ट करणे किंवा क्वारंटाईन होण्याची गरज राहणार नाही. जरी तुम्ही एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला असाल तरी देखील याची गरज राहणार नाही.
कोरोनावर नवीन संशोधनातून हे नवीन गाईडलाईन देण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना कोरोनाचे गंभीर संक्रमण होण्याचा धोका कमी आहे. संशोधनाच्या दाव्यानुसार जरी तुम्हाला कोरोना झाला तरी देखील तुमच्यापासून तो दुसऱ्यांना होण्याचा आणि लक्षणे दिसण्याचा धोका कमी असतो.
सीडीसीनुसार जर कोणत्याही व्यक्तीने दोन्ही व्हॅक्सिन (कोव्हीशिल्ड/कोव्हॅक्सीन/स्पटणीक) घेतल्या असतील तर त्याला स्क्रिनिंगचीदेखील गरज नाही. कोरोनाचा धोका पाहून आजही अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांची तपासणी करतात. अॅमेझॉनने आजपासून यावर वेळ घालवू नका असे आदेश दिले आहेत. अॅमेझॉनने कर्मचाऱ्यांची स्क्रीनिंग याच सूचनेवरून थांबिविली आहे. असे असले तरी देखील परदेशातून अमेरिकेत येणाऱ्या अमेरिकी नागरिकांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आणण्याची सूचना केली आहे.
यावरून अमेरिकेमध्ये तज्ज्ञांचे दोन गट प़डले आहेत. सीडीसीने काही टेस्टिंग गाईडलाईन्स थोड्या बदलाव्यात. सध्याच्या संकटात सामान्य ताप आणि व्हायरसदेखील कोरोना व्हायरसकडे इशारा करतात. यामुळे टेस्टिंग क्षमतेवर दबाव वाढतो.