कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या धोरणामध्ये महत्त्वपूर्ण बदल करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील १८ वर्षांवरील सर्वाचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली आहे. नवे धोरण २१ जूनपासून लागू होणार असून, संपूर्ण लसखरेदी केंद्राकडूनच करण्यात येईल. त्यामुळे लसीकरणाच्या आर्थिक ओझ्यातून राज्यांची मुक्तता होणार आहे.
केंद्राच्या लसीकरणाच्या दुहेरी धोरणावर मे.सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवडय़ात ओढलेले कठोर ताशेरे आणि राज्यांच्या वाढत्या दबावानंतर आता केंद्राने ‘एक देश, एक लसीकरण’ धोरण स्वीकारले आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सायंकाळी ५ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. आता राज्यांना लसखरेदी करावी लागणार नसून, लसनिर्मिती पैकी ७५ टक्के लसमात्रा केंद्र सरकार लस उत्पादकांकडून थेट खरेदी करेल व ती राज्यांना वितरित करेल. उर्वरित २५ टक्के लसमात्रा खासगी रुग्णालयांना उत्पादकांकडून खरेदी करता येतील, असे मोदींनी स्पष्ट केले.
विद्यमान विकेंद्रित धोरणानुसार, ४५ वर्षांपेक्षा जास्त वर्षे वयोगटातील व्यक्तींचे केंद्राकडून मोफत लसीकरण केले जाते. १८-४४ या वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणासाठी राज्य सरकारांना लसउत्पादकांकडून लसखरेदी करावी लागते. देशांतर्गत लसनिर्मितीतील ५० टक्के वाटा केंद्र सरकार खरेदी करत असून उर्वरित २५ टक्के लसमात्रा प्रत्येकी राज्य सरकार व खासगी रुग्णालयांना खरेदी करता येतात. पण, आता फक्त केंद्र सरकार लसखरेदी करणार असल्याने राज्यांना जागतिक निविदेद्वारे वा अन्य राज्यांशी स्पर्धा करून जास्त किमतीला लसखरेदी करावी लागणार नाही.
विविध कारणांनी अपात्र असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानांना (होमगार्डसना) पुन्हा कामावर सामावून घेण्याबाबत गृहरक्षक दलाने परिपत्रक काढले होते. परंतू त्या परिपत्रकाची माहिती सर्वांना मिळाली नाही. त्यावर प्रधान सचिव यांनी सर्व जिल्ह्यातील वस्तुस्थिती तपासून त्वरित निर्णय घ्यावा, असे निर्देश गृह (शहरे) राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील यांनी गृहरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील गृहरक्षक दलाच्या विविध समस्यांबाबत राज्यमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. काही जिल्ह्यांमध्ये गृहरक्षक दलाचे बंदोबस्त मानधन अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. ते देण्याच्या दृष्टीने वित्त विभागाकडून प्राप्त निधी बीडीएसवर प्राप्त झाल्यावर पाच दिवसात ते मानधन होमगार्डसना देण्याबाबत परिपत्रक काढावे, असे निर्देशही राज्यमंत्री श्री. पाटील यांनी दिले.
होमगार्डसना विमा योजनेचा कशाप्रकारे लाभ देता येईल यासंदर्भात विमा कंपनीशी तांत्रिक बाबींवर चर्चा करावी. अपर पोलिस अधीक्षक यांनी होमगार्ड समस्यांबाबत प्रत्येक महिन्यात किमान एक बैठक घेऊन होमगार्डसच्या समस्यांचा आढावा घ्यावा. सद्यस्थितीत राज्यात कोविड-१९ परिस्थितीमुळे वय वर्षे ५० ते ५८ वर्षे वयाच्या होमगार्डसना कोविड-१९ चा धोका पाहाता बंदोबस्तकामी बोलाविण्यात आलेले नाही. तथापि ५० ते ५८ वर्षांवरील होमगार्ड सदस्यांना कोविड संसर्ग कमी असलेल्या भागात (विशेषत: लेव्हल १) त्यांची सुरक्षा विचारात घेऊन बंदोबस्त देण्याबाबत विचार करण्यात यावा, असे निर्देशही राज्यमंत्री श्री. पाटील यांनी दिले. या बैठकीस प्रधान सचिव (विशेष) संजय सक्सेना, गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक प्रशांत बुरडे, बसव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, होमगार्ड विकास समितीच्या अध्यक्ष श्रीमती आर.डी. लाखन आदी मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे भेटीच्या वेळी उपस्थित होते.
या भेटीनंतर महाराष्ट्र सदन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे..
राज्याच्या प्रलंबित विषयांसाठी पंतप्रधानांची भेट घेतली. या दरम्यान व्यवस्थित चर्चा झाली. पंतप्रधानांनी सर्वच विषय गांभीर्याने ऐकले. केंद्राकडे प्रलंबित आहेत अशा प्रश्नांवर ते सकारात्मक निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. मी पंतप्रधानांना धन्यवाद देतो.
कुठेही राजकीय अभिनिवेश नव्हता. मी आणि माझे सहकारी समाधानी आहोत. या प्रश्नांवर पंतप्रधान माहिती घेऊन पुढील कार्यवाही निश्चितपणे केली जाईल.
ज्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदने दिली तसेच चर्चा झाली ते असे आहेत:
एसईबीसी मराठा आरक्षण
इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण
नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे
१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक)
१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था)
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काही महत्त्वाच्या विषयांवरील निवेदने पंतप्रधानांना दिली. या पत्रांचा सारांश पुढीलप्रमाणे आहे..
एसईबीसी मराठा आरक्षण..
केंद्र सरकारने मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षणासंदर्भात न्याय मागण्या विचारात घेऊन भारतीय राज्य घटनेच्या कलम १५ (४) आणि १६ (४) मध्ये घटनात्मक दुरुस्ती करण्यासाठी पाऊले टाकावीत, जेणेकरून इंद्रा सहानी प्रकरणामुळे ५० टक्के आरक्षणाचा मुद्दा शिथिल होईल. राज्य शासन देखील मराठा आरक्षणासंदर्भात एक सर्वंकष फेर याचिका सादर करणार आहे केंद्र सरकार १०२ व्या घटनादुरुस्तीच्या मर्यादेत सर्वोच्च न्यायालयात फेर विचार याचिका सादर करणार आहे याचे मी स्वागत करतो.
इतर मागासवर्गीयांचे पंचायत राज संस्थेच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण..
आरक्षणाची तरतूद आली व गेली २०-२५ वर्ष ही तरतूद राज्यात लागू आहे. परंतु, माननीय सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींसाठीच्या राजकीय आरक्षणाबाबत काही घटनात्मक मुद्दे उपस्थित केले आहेत व त्यामुळे ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे.
राज्यातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधून जवळजवळ ५६ हजार जागांवर याचा परिणाम होणार आहे
माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्र देताना राजकीय प्रतिनिधीत्वासाठी मागासपणा निश्चित करण्यासाठी Rigorous Empirical Inquiry करायला सांगितली आहे. यासाठी जणगनणेतील माहितीची आवश्यकता आहे.
भारत सरकारने २०११ मध्ये SECC केला आहे त्याची माहिती राज्यसरकारला मिळाल्यास आरक्षणासाठी अभ्यास करून अहवाल करता येईल.
तसेच या निकालपत्रात SC+ST+OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित केली आहे. त्यामुळे ST/SC बहुल जिल्ह्यांमध्ये OBC प्रवर्गाला २७ टक्के पेक्षा कमी किंवा एखाद्या परिस्थिती आरक्षण मिळणारच नाही. त्यामुळे SC+ST+OBC यांच्या एकत्रित आरक्षणाची मर्यादेची ५० टक्केची तरतूद शिथिल करणे आवश्यक आहे.
SC, ST यांचे आरक्षण घटनात्मक (Constitutional) आहे तर ओबीसी आरक्षण वैधानिक (Statutory) आहे. त्यामुळे आपणास विनंती आहे की SC ST प्रमाणे OBC आरक्षणही Constitutional करण्यासाठी घटनेत दुरुस्ती करावी.
तसेच हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी २०२१ च्या जनगणने मध्ये ओबीसींचीही जनगणना करावी.
मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण..
पदोन्नतीमध्ये आरक्षण या महत्त्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्यांवर केंद्र सरकारने पाऊले उचलली पाहिजे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांना न्याय दिला पाहिजे.
भारतीय राज्य घटनेच्या कलम १६ (४ ए) प्रमाणे हे कर्मचारी पदोन्नतीतील आरक्षणासाठी पात्र आहेत. मात्र सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या अनेक निर्णयांमुळे त्यांना न्याय मिळण्यास उशीर लागू शकतो. हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही तर इतरही अनेक राज्यांचा आहे. यासाठी संपूर्ण देशासाठी एकसारखे सर्वंकष धोरण आवश्यक आहे. यासंदर्भातील प्रलंबित याचिका लवकरात लवकर निकाली निघण्यासाठी केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली पाहिजे.
मेट्रो कारशेड डेपो करण्यासाठी राज्य सरकारने कांजूरमार्ग येथे जागा निश्चित केली आहे जी मेट्रो लाईन ३, मेट्रो लाईन ४, मेट्रो लाईन ४ ऐ, मेट्रो लाईन ६ आणि मेट्रो लाईन १४ या पाच मेट्रो लाईनला जोडण्यासाठी उपयुक्त आहे. मोठे मेट्रो जंक्शन म्हणून ही जागा विकसित होईल. मात्र या भुखंडाच्या जागेबाबत खटला सुरु असून यात केंद्र सरकारलाही प्रतिवादी करण्यात आले आहे. कांजूरमार्ग येथे कारशेड डेपो केल्यास मेट्रो लाईन ३, मेट्रो लाईन ४, मेट्रो लाईन ४ ए, मेट्रो लाईन ६ आणि मेट्रो लाईन १४ ला एकात्मिक कार शेड डेपोचे फायदे मिळणार आहेत. हा डेपो मेट्रो लाईन ३ साठीच उपयुक्त नाही तर संपूर्ण मेट्रो जाळ्यासाठी उपयुक्त आहे हे यावरून लक्षात येईल. याप्रकरणी सर्व संबंधितांना तातडीने निर्देश देऊन सर्वमान्य तोडग्यासाठी सांगावे जेणेकरून मेट्रो डेपोचे काम लवकरात लवकर सुरु होऊन तो कार्यान्वित होऊ शकेल.
राज्यांना देय असलेली जीएसटी भरपाई..
सन 2020-21साठी महाराष्ट्र राज्यास जीएसटी कराची भरपाई देतांना सुमारे रुपये 46 हजार कोटी रुपयांची होती. आतापर्यंत राज्यास फक्त 22 हजार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्राला २४ हजार ३०६ कोटी रुपये जीएसटी भरपाईपोटी मिळणे बाकी आहे. ते लवकरात लवकर मिळावे म्हणजे कोविडच्या या अभूतपूर्व संकटात आर्थिक दिलासा मिळेल. २०२१-२२ मध्येही कोरोनाचे संकट कायम राहील असे वाटते त्यामुळे राज्याचे उत्पन्न कमी होण्याची भीती आहे. कोविड काळात लागू लॉकडाऊन परिस्थीतीमुळे राज्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम लक्षात घेऊन राज्यांना पुरेसी भरपाई मिळण्यासाठी संबंधित निकषांचा फेरविचार करावा. लॉकडाऊनमुळे झालेल्या महसूल हानी व आर्थिक दुष्प्रभावांचे निराकरण येत्या एक-दोन वर्षात होणे शक्य नाही. त्यामुळे महसूल संरक्षण आणि भरपाई यांचा कालावधी पुढील 5 वर्षांसाठी वाढविण्यात यावा.
पिक विमा योजना : बीड मॉडेल..
प्रधानमंत्री पिक विमा योजनेत गेल्या 5 वर्षांत विमा कंपन्यांना प्रीमियम पोटी २३ हजार १८० कोटी रुपये दिले. या कंपन्यांनी केवळ १५ हजार ६२२ कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे दावे मंजूर केले. राज्य शासनाने Cup and Cap मॉडेल प्रस्तावित केले आहे ज्यात विमा कंपन्यांना २० टक्क्यांपेक्षा जास्त नफा घेता येणार नाही तसेच जमा केलेल्या प्रीमियमच्या जास्तीत जास्त 10 टक्के रिस्क असेल. हा प्रस्ताव अंमलात आणण्यासाठी कृषी मंत्रालयाला आवश्यक ती सूचना द्यावी.
बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी..
महाराष्ट्रासाठी बल्क ड्रग पार्क लवकरात लवकर मंजूर करावे तसेच १००० कोटी रुपये अर्थसहाय्य यासाठी द्यावे. दिघी बंदराजवळ एमआयडीसीने यासाठी २५० एकर जागा निश्चित करून ठेवली आहे. राज्य सरकारने बल्क ड्रग पार्कसाठी काही प्रोत्साहने देखील जाहीर केले आहेत. हा पार्क सुरु झाल्यास औषध निर्मितीस मोठे प्रोत्साहन मिळेल.
नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे..
राज्य सरकारने निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना सुधारित दराने नुकसान भरपाई दिली एसडीआरएफ आणि एनडीआरएफ मधील निकष बदलण्यासाठी केंद्राने नेमलेल्या समितीला निर्देश देऊन महाराष्ट्र शासनाने केलेल्या सुधारित निकषांचा विचार व्हावा चक्रीवादळे वारंवार येत असून सागरी किनारपट्टी भागात भूमिगत विद्युत वाहिन्या टाकणे, स्थलांतरित नागरिकांसाठी निवारे उभारणे, किनारा संरक्षक भिंती बांधणे या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे आहे. याकरिता ५००० कोटी रुपये आवश्यक आहेत. केंद्राने यावर विचार करून एक वेळचा निधी यासाठी द्यावा ही विनंती आहे.
१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (शहरी स्थानिक )..
महाराष्ट्र सरकारने सन १४ व्या वित्त आयोगांतर्गत मिळणाऱ्या २०१८-१९ तसेच २०१९-२० च्या परफॉर्मंस ग्रॅण्ट (कामगिरी अनुदाने) राज्याला देण्याबाबतचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या गृहनिर्माण तसेच शहरी व्यवहार मंत्रालयाकडे पाठवले आहेत. यासंबंधीची सर्व उपयोगिता प्रमाणपत्रे (युटीलायझेशन सर्टिफिकेटस) भारत सरकारकडे पाठविण्यात आली आहेत. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने यापूर्वी महाराष्ट्रास २०१८-१९ वर्षासाठी ६२५.६३ कोटी आणि २०१९-२० साठी ८१९.२१ कोटी अशी १४४४.८४ कोटी रुपयांच्या परफॉर्मंस ग्रॅण्ट वितरीत करण्याची शिफारस केली आहे. हे अनुदान २०१९-२० या वर्षातच राज्याला मिळणे अपेक्षित असतांनाही ती अजून वित्त मंत्रालयाकडे प्रलंबित आहेत. महाराष्ट्राला परफॉर्मंन्स ग्रॅण्ट स्वरूपात मिळणारे हे १४४४.८४ कोटी रुपयांचे अनुदान तातडीने मंजूर करण्या बाबत वित्त मंत्रालयाला सुचना देण्यात याव्यात ही विनंती.
१४ व्या वित्त आयोगातील थकीत निधी मिळण्याबाबत (पंचायत राज संस्था)..
केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने महाराष्ट्रास २०१६-१७ वर्षासाठी २९४.८४ कोटी देण्याची शिफारस केली आहे. २०१७-१८ वर्षासाठी ३३३.६६ कोटी, २०१८-१९ साठी ३७८.९१ कोटी, २०१९-२० साठी ४९६.१५ कोटी रुपये अद्याप वित्त विभागाकडे प्रलंबित आहेत. विनंती आहे की एकूण १२०८.७२ कोटी रुपये थकीत निधी तातडीने मंजूर करण्या बाबत वित्त मंत्रालयाला सुचना देण्यात याव्यात ही विनंती.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे..
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी विनंती आहे. साहित्य अकादमीच्या भाषाविषयक तज्ञ समितीची यासंदर्भातील बैठक पुनश्च एकदा आयोजित होणे बाकी आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सर्व निकषांची पूर्तता झाली आहे अशी आमची खात्री आहे. हा विषय बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असल्याने यावर तातडीने निर्णय घ्यावा.
दिनांक ३१ मे रोजी डोंबिवलीतील रहिवाशी विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकादरम्यान मोबाईल चोरट्याने धक्का दिल्याने रेल्वे खाली पडून दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी भारतीय जनता पार्टीचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच यावेळी भाजपच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी पाटील कुटुंबियांकडे सुपूर्द केला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे, भाजपा डोंबिवली पश्चिम मंडल सरचिटणीस समीर चिटणीस, माजी नगरसेवक विकास म्हात्रे,माजी नगरसेविका कविता म्हात्रे, विद्या म्हात्रे, डॉ.सुनीता पाटील, कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा रेखा चौधरी, भाजपा डोंबिवली पूर्व मंडल महिला आघाडीच्या अध्यक्षा पूनम पाटील, डोंबिवली ग्रामीण मंडल महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा राणे, तसेंच पदाधिकारी अमोल दामले, सुरेश जोशी, दिलीप धुरी, मनीष शिंदे, रुचिता चव्हाण, गीता नवरे, सुरेश नेमाडे, कृष्णा परुळेकर, हर्षद सुर्वे, देवेश शुक्ला, महेंद्र ठाणेकर, हेमंत वैद्य, रोहित शुक्ला आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्या म्हणाल्या, रेल्वे यंत्रणेत मनुष्यबाळाची कमतरता आहे हे आपल्या सर्वाना माहित आहे. हायकोर्टने दिलेले निर्देश पोलिसांकडे २००० होमगार्ड असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र आजमितीला फक्त ४०० होमगार्ड कार्यरत आहेत. यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली. डोंबिवलीतील विद्या पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पाटील यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहायक मिळावे म्हणून भाजपा पाठपुरावा करत आहे.
तसेच आज भाजपा प्रदेशाच्या वतीने पाटील यांच्या कुटुंबियांना १ लाख रुपये धनादेश सुपूर्द केला. मला माहित आहे कि हि मदत तुटपुंजी आहे. आज तीन मुले आईच्या प्रेमाला आणि मायेला पोरकी झाली आहेत. सामाजिक बांधलकी म्हणून पाटील कुटुंबियांना मदत केली आहे. विद्या पाटील यांना ज्या मोबाईल चोरट्याने धक्का दिला तो चोरटा पकडला आहे. पण आजही रेल्वेच्या महिला डब्यात महिलांच्या सुरक्षततेचा प्रश्न सुटला नाही. कोरोना काळात रेल्वेच्या महिला डब्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यत सुरक्षा रक्षक नेमावे अशी भाजपची मागणी आहे. तसेच कर्त्यव्यावर कसूर करणाऱ्यांवरही कारवाही झाली पाहिजे.
दरम्यान भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशीनुसार सुरू झालेल्या डोंबिवली पश्चिमेकडील कान्होजी जेधे (भागशाळा) मैदान जवळील सरस्वती हायस्कुल येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन लसीकरण केंद्राच्या नियोजनात सहभागी झालेल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केले. तसेच महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्राच्या व्यवस्थापनाबद्दलही समाधान व्यक्त केले.
रस्त्यात लोकलमध्ये मांगती मागून जगणाऱ्या समाजातील उपेक्षित घटक समजल्या जाणाऱ्या तृतीय पंथीयांसाठी केंद्र सरकारच्या निधीतून महाराष्ट्रातील पहिले निवारा केंद्र कल्याणात सुरु करण्यात आले आहे. कल्याण मलंग गड रोड वरील तमन्ना रेसिडन्सी या इमारती मधील तिसर्या आणि चौथ्या माळ्यावरील या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. किन्नरांसाठी मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या किन्नर अस्मिता संस्थेकडून हे केंद्र चालविले जाणार आहे. किन्नर अस्मिता संस्थेच्या संस्थापिका नीता केणे यांनी याबाबत बोलताना आजपर्यत समाजातील उपेक्षित राहिलेल्या घटकाला समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.
या समाजातील किन्नरांना उदर निर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने त्यांना भिक मागावी लागते. नृत्य करून इतरांचे मनोरंजन करावे लागते किंवा शरीर विक्री व्यवसाय करावा लागतो. त्यांना त्यांच्या पायावर सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी निवारा केंद्राची संकल्पना राबविली आहे. या केंद्रात केवळ राहण्याची आणि जेवणाची सोय केली जाणार नसून समाजातील किन्नरांना शिक्षणाबरोबरच रोजगारासाठीचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे सांगितले. इतर राज्यात किन्नरांना शिक्षणासाठी रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जात असून पेन्शन दिली जाते मात्र महाराष्ट्रात हा समाज उपेक्षित राहिला असून सरकारने इतरा प्रमाणेच किन्नरांना देखील सन्मानाने जगण्यासाठी मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. नीता केणे (अध्यक्षा किन्नर अस्मिता) यांनी मागणी केली आहे हा घटक सुद्धा समाजातील भाग आहे हे सरकारने ओळखले पाहिजे अशी आम्हाला आशा आहे .
दरम्यान किन्नरासाठी सुरु करण्यात आलेल्या गरिमा होमच्या उद्घाटनासाठी ठाणे जिल्ह्यातील तृतीयपंथीयांनी मोठी गर्दी केली होती. अशा प्रकारच्या निवासाची व्यवस्था झाल्याबद्दल त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला.