Home Blog Page 254

रेल्वे प्रवासाकरीता बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या इसमास अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रेल्वे प्रशासनाची फसवणूक करण्याच्या इराद्याने फेसबुकद्वारे लोकांना संपर्क करून रेल्वे प्रवासाकरीता बृहन्मुंबई महानगर पालिकेचे बनावट ओळखपत्र बनविणाऱ्या इसमास गुन्हे शाखा, कल्याण युनिट, लोहमार्ग मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, लोहमार्ग मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत फेसबुकद्वारे लोकांना संपर्क करून रेल्वे प्रवासाकरीता बनावट ओळखपत्र बनवून देण्याचे प्रकार वाढत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली होती. सदर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर कल्याण रेल्वे स्थानक हद्दीत सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेतले.

त्याच्याकडून मोबाईल फोन, बृहन्मुंबई महानगर पालिका, उप निबंधक, सार्वजनिक आरोग्य विभाग या कार्यालयाचा रबर स्टॅम्प, बनावटीकरण करण्याकरीता वापरात असलेले कोरे व काही भरलेले फॉर्म व बनावटीकरण केलेली ओळखपत्रे, ओळखपत्रे देऊन मिळालेली रोख रक्कम १,८००/- असा एकूण ३,३००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच सदर प्रकरणी त्याच्याविरुद्ध कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट निवडणूक ओळख पत्र मिळाल्याने कल्याण मध्ये खळबळ

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल.. आरोपीच्या पत्नीने उघडकीस आणला प्रकार

कल्याण शहरात एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणाऱ्या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे बनावट कोरे निवडणूक मतदार ओळखपत्र मिळून आल्याने येथे खळबळ उडाली असून निवडणूक शासकीय अधिकारी यांनी याबाबत कामेश मोरे या इसमाविरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण मधील नायब तहसिलदार वर्षा राजेश थळकर यांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा येथील माधव संसार मधील फ्लॅट नंबर बी-२ या ठिकाणी ही ओळखपत्रे आढळून आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नोव्हेंबर २०२० रोजी नगरसेवकांचे राजवट संपुष्टात आली असून कोरोनामुळे निवडणूक लांबणीवर पडली आहे. मात्र कोणत्याही क्षणी निवडणुका घोषित होण्याचीही शक्यता असून या दृष्टिकोनातून ही बनावट मतदार ओळखपत्र बनवली गेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कामेश मोरे याच्या विरुद्ध त्याच्या पत्नीने हुंड्याची केस दाखल केली होती. या गुन्ह्यात कामेश याला कोर्टाने घरी न जाण्याच्या आणि पत्नीला त्रास न देण्याच्या अटीवर जामीन दिला होता. यानंतर कामेश याने आपल्या मुलींना फोन करून घरात असलेले कार्ड घ्यायला येत असल्याचे सांगितले. सदर बाब त्याच्या पत्नीला समजताच तिने याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांना दिली. आकडे यांनी नायब तहसीलदार वर्षा थळकर यांना कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार नायब तहसीलदार थळकर यांनी कारवाई करत या घरातून सुमारे ४०० ते ५०० बनावट कोरे मतदार ओळखपत्र जप्त करत कामेश मोरे याच्या विरोधात खडकपाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती खडकपाडा पोलीस स्टेशनचे वपोनि अशोक पवार यांनी दिली.

ठाणे महापालीकेने दिली १०२ रूग्णालयांना लसीकरण केंद्रांची परवानगी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाणे महापालिकेच्यावतीने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना व गृहसंकुले यांच्यासाठी निश्चित केलेल्या लसीकरण धोरणा अंतर्गत ठाणे शहरातील जवळपास १०२ रूग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे या उद्देशाने ठाणे महापालिकेच्यावतीने सर्व खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना व गृह संकुले यांच्यासाठी लसीकरण धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत महापालिकेने आतापर्यंत १०२ खासगी रूग्णालयांना लसीकरण केंद्राची परवानगी दिली आहे.

केंद्र-राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टास्क फोर्सच्या माध्यमातून ठाण्यात आतापर्यंत १०२ नवीन खासगी हॉस्पिटलना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्यात आली असून यामध्ये १८ क्लिनिक आणि ८४ रुग्णालयांचा समावेश आहे. महापालिकेच्या टीमच्या माध्यमातून सर्व क्लीनिक तसेच रुग्णालयांची कायदेशीर तपासणी करून लसीकरणासाठी सक्षम असल्याची पडताळणी करूनच रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना येथे यापूर्वीच लसीकरण सुरू करण्यात आले असून खासगी गृहसंकुलांमध्ये ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे पहिले खासगी लसीकरण करण्यात आले आहे.

आस्थापनांमध्ये १ लाख युवकांना मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी, ५ हजार रुपये विद्यावेतनही मिळणार ! प्रशिक्षणाबरोबरच रोजगारही मिळणार, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्यातील युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (महाराष्ट्र ऍप्रेंटीसशीप प्रोमोशन स्कीम – MAPS) राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत चालू वर्षात राज्यातील विविध उद्योग, आस्थापना यामध्ये १ लाख युवकांना ॲप्रेंटीसशीपची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. पुढील पाच वर्षांत ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुणांना या योजनेतून रोजगार आणि प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्याचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

या योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५ हजार रुपये यापैकी कमी असलेले विद्यावेतन अनुज्ञेय राहील, अशी माहितीही त्यांनी दिली. या योजनेसंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना उपयोगी पडतील अशा ७१५ व्यवसायांना ही योजना लागू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री मलिक म्हणाले की, कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत राज्यातील युवक-युवतींना रोजगारक्षम करुन प्रत्येक हाताला काम देणे हे शासनाचे ध्येय आहे. राज्यातील किमान दहावी उत्तीर्ण झालेल्या युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी व अनुभव उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवार भरतीसाठी आस्थापनांना प्रोत्साहित करून पाच वर्षात ५ लाख सुशिक्षित बेरोजगार तरुण प्रशिक्षित होतील. त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राप्त होतील.

उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्याबरोबरच राज्यातील युवक-युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मधील तरतुदीनुसार पारंपारिक व नवीन उद्योगक्षेत्रांमध्ये उमेदवारांना ठराविक कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येईल.

मुलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस (Basic Training Provider) प्रति प्रक्षिणार्थी प्रशिक्षण खर्च प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील. तसेच ज्या मुलभूत प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेस केंद्र शासनाकडून प्रशिक्षण प्रतिपूर्ती मिळणार नाही अशा संस्थांना प्रशिक्षण खर्च रक्कम प्रतिपूर्ती प्रति प्रशिक्षणार्थी अनुज्ञेय राहील. यासंदर्भातील सविस्तर माहिती आज निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात देण्यात आली आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

राज्यातील 6 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांची गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्ती

राज्य सरकारकडून 6 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) महानगर आयुक्तपदी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. MMRDA च्या महानगर आयुक्तपदी कार्यरत असलेल्या आर.ए. राजीव यांचा कालावधी संपुष्टात आला होता. त्यानंतर या पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

राज्याच्या गृहनिर्माण प्रधान सचिवपदी नियुक्त झालेले मिलिंद म्हैसकर हे 1992 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, याशिवाय ते महसूल आणि वन विभागातही प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. तर MMRDA महानगरच्या आयुक्तपदी नियुक्त झालेले एस.व्ही.आर. श्रीनिवास हे 1991 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. एमएमआरडीए महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आल्याने ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरु झाली होती.

बदली झालेल्या IAS अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे बदली झाली

1) एस व्ही आर श्रीनिवास – प्रधान सचिव, गृहनिर्माण यांची नियुक्ती महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,  मुंबई या पदावर

2) लोकेश चंद्रा – प्रधान सचिव र.व का. यांची नियुक्ती महाव्यवस्थापक, बेस्ट, मुंबई पदावर.

3) मिलिंद म्हैसकर – प्रधान सचिव (वने) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (गृहनिर्माण) या पदावर

4) विकास चंद्र रस्तोगी – यांची नियुक्ती प्रधान सचिव (र.व का.) सामान्य प्रशासन विभाग पदावर

5) बी वेणुगोपाल रेड्डी – व्यवस्थापकीय संचालक, सिकॉम् यांची नियुक्ती प्रधान सचिव वने या पदावर

6) सुमंत भांगे – व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळ यांची नियुक्ती सचिव, सा.वि.स. आणि वि.चौ.अ.(2) या पदावर