Home Blog Page 256

ठाण्यातील मोटार सायकल चोरी करणाऱ्यास अटक; ३ गुन्हे उघडकीस

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाण्यातील वर्तक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटार सायकल चोरी करणाऱ्या इसमास वर्तक नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक करून मोटार सायकल चोरीचे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

याबाबत हाती आलेले वृत्त असे आहे कि, फिर्यादी यांची ठाण्यातील शास्त्री नगर भागातील गंगातारा बिल्डिंग, मिलन हिल्स जवळ सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली स्कुटर चोरी झाली असल्याबाबत वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरु असता, सदर स्कुटरची चोरी करणारा इसम हा स्कुटरसह यशोधन शाळा, शास्त्री नगर, ठाणे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळाली. सदर मिळलेलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकणी सापळा रचून वर्तक नगर पोलिसांनी सदर इसमास अटक केली.

त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी केलेली स्कुटर आणि मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. तसेच त्याच्याकडे खडसावून केलेल्या अधिक चौकशीत त्याने त्याच्या साथीदारासोबत केलेले मोटार सायकल चोरीचे आणखी दोन गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

‘ब्रेक दि चेन’ चे आदेश १५ जूनपर्यंत राज्यभरलागू

 

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार!

‘ब्रेक दि चेन’चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.

२९ मे २०२१ च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली .

पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील…

२०११ च्या जनगणनेनुसार १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी…

वरील ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ४० टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (१२ मे २०२१ ‘ब्रेक दि चेन’ आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.

सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.

सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील

अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील

दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील

कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते

पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी…

वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.

उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश माहिती व संदर्भासाठी…

कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त ४८ तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

यापूर्वी १८ एप्रिल आणि १ मे २०२१ रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.

कोविड-१९ व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.

स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या ४८ तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

पेट्रोलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

आज (शनिवार) पुन्हा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात २६ पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटरला विकल्या जात आहे.
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर येथे पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विकले जात आहे.

मे महिन्यात आतापर्यंत १६ दिवस इंधनाच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. परंतु कपात एकदाही झालेली नाही. एप्रिलमध्ये अधून-मधून कपात केली गेली. ज्यामुळे पेट्रोल ७७ पैसे आणि डिझेल ७४ पैसे स्वस्त झाले. पण ४ मेनंतर पुन्हा किंमती वाढण्यास सुरवात झाली आणि मे महिन्यात पेट्रोल ३.५९ रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर या महिन्यात डिझेलमध्ये प्रतिलिटर ४.१३ रुपयांची वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरांत पेट्रोल १०० रुपयांच्या पलीकडे विकले जात आहे.

हे तर अधिकच गंभीर, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना दि. ९ एप्रिल २०२१ रोजी जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानूष, रानटी मारहाणीचा व्हिडिओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता.

शिवराज नारियलवाले हे ९ एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याचसुमारास गवळी समाजाचा एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक धुडघूस घालत होते. त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलीस हे गवळी समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य शब्दात शिविगाळ करीत असल्याने, शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिविगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. आपल्या समाजाबद्दल इतक्या आपत्तीजनक शब्दात कुणी बोलत असेल तर त्याचे चित्रीकरण करणे एवढाच काय तो त्यांचा गुन्हा. पण, त्यांना त्याची जी जबर शिक्षा उपस्थित पोलिसांनी दिली, ते या व्हीडिओतून दिसून येते. गणवेशातील सहा आणि गणवेशात नसलेले दोन असे आठ पोलीस त्यांना घेरून अमानूष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली.

वस्तुत: रूग्णालयात धुडगूस घालणार्‍या अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजे नारियलवाले यांचा त्यात समावेश नव्हता. त्यांनी केवळ ती शिवीगाळ कॅमेराबद्ध केली, म्हणून संतापाच्या भारात कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांच्या हातात आहे, त्यांनीच कायदा हाती घेतलेला दिसून येतो. यात डीवायएसपी पदावरील व्यक्तीचाही समावेश असणे, हे तर आणखी गंभीर आहे.

तसेच, जर नारियलवाले यांचा कुठे दोष असेल तर गुन्हा दाखल करून रीतसर कारवाई पोलिसांना करता आली असती. पण, सराईत गुन्हेगाराला सुद्धा मारहाण करण्यात येत नाही, अशा पद्धतीने नारियलवाले यांना मारहाण करण्यात आली आहे. जवळजवळ दीड महिने नारियलवाले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब प्रचंड दहशतीत होते. शिविगाळीचा व्हीडिओ बाहेर न आणण्याची धमकी त्यांना पोलिसांनी दिली होती. अखेर हे डीवायएसपी अ‍ॅट्रासिटीच्या एका प्रकरणात लाच घेताना सापडून निलंबित झाल्यानंतर त्या कुटुंबाला थोडा धीर आला आणि दीड महिन्यांनी हा प्रकार समोर आला. अन्यथा हा प्रकारही कधीच उघडकीस आला नसता.

राज्यात कायद्याचे राज्यच नसल्याप्रमाणे अशा घटना घडत असताना त्यावर सरकारचे मौन हे तर अधिकच गंभीर आहे. असंही फडणवीस म्हणाले आहेत.

याचबरोबर विशेषत: राज्य सरकारविरोधात भाजपाचे कार्यकर्ते अथवा कुणी सामान्य माणसाने सुद्धा काही प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर दिली, तर अशा व्यक्तींना कधी पोलिसांकडून तर कधी राजकीय कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकार अलिकडच्या काळात प्रचंड वाढले आहेत. कायद्याचा धाकच उरलेला नाही. आपण स्वत: या प्रकरणात लक्ष घालून दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. अशी मागणी देखील देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारणीच्या तक्रारी

संपादक; मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना च्या भीषण महामारीत खासगी रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात बिल आकारणी केली जात आहे. त्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे यापुढे प्रत्येक खासगी रुग्णालयात दररोज नेमून दिलेले ऑडिटर जातील आणि रोजच्या रोज बिलांची तपासणी करतील. कोणत्याही हॉस्पिटलकडून जर बिलाच्या बाबतीमध्ये गफलत केली आणि रुग्णाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम ‘उपमुख्यमंत्री मा.अजित पवार’ यांनी सातार्‍यात दिला. दरम्यान, मी मज्जा करायला आलेलो नाही, मला रिझल्ट हवा आहे. यंत्रणा हलवा, नाही तर कारवाई होणारच, असा “इशारा” त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिला.

या बैठकीस आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे, पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई, खा.श्रीनिवास पाटील, खा.रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.शिवेंद्रराजे भोसले, आ.मकरंद पाटील, आ.जयकुमार गोरे, आ.महेश शिंदे, आ.दीपक चव्हाण, आ.अरुण लाड, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.