Home Blog Page 257

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा शासन निर्णय जाहीर

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात इयत्ता १०वी च्या बोर्डाची परीक्षा घ्यावी की घेऊ नये यासाठी कोर्टात गेलेल्या भांडणाचा वाद मिटावा यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता १० वीची परीक्षा रद्द केल्यामुळे, इयत्ता १० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कशाप्रकारे करण्यात यावे, याबाबत शिक्षण विभागाच्या अखत्यारितील विविध संस्थाच्या प्रमुखांसोबत व शिक्षण क्षेत्रातील काही अनुभवी व्यक्तींसोबत चर्चा करण्यात आली होती. यामध्ये इयत्ता १० वीच्या परीक्षेसंदर्भात व विद्यार्थ्यांच्या मुल्यमापन याबाबत विविध पर्यायांचा विचार करण्यात आला. याबाबत सर्वंकष विचार करण्यात येऊन आयुक्त (शिक्षण विभाग) महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखालील समन्वय समितीच्या बैठकीत विविध पर्यायांमुळे होणारे परिणाम व करावयाची कार्यवाही याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. उपलब्ध सर्व पर्यायांचा विचार करण्यात आला व सद्यस्थितीत मूल्यमापन योजनेचा सर्वात योग्य पर्याय निश्चित करण्यात आला व त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करण्याचा निश्चय समन्वय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संदर्भ क्र.4 येथील दिनांक १८ मे २०२१ च्या पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालाांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार आज मंत्रिमंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा शासन निर्णय जाहीर केला आहे.

मूल्यमापनाचा तपशील असा असेल

1) विद्यार्थ्याच्या इ.९ वीचा विषय निहाय अंतिम निकाल ५० गुण..

2)विद्यार्थ्याच्या इ.१० वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण..

3) विद्यार्थ्याचे इ.१० वी चे अंतिम तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा अंतर्गत मूल्यमापन २० गुण असे मिळुन एकूण १०० गुण असणार आहेत.

विद्यार्थ्याचे प्रथम सत्र परीक्षा, सराव (पूर्व) परीक्षा यामधील एकच परीक्षा दिली असल्यास त्या परीक्षेतील विषय निहाय ८० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांचे ३० पैकी गुणांत रुपांतर करण्यात येणार असल्याचे जाहीर केलेल्या शासन निर्णयात म्हंटले आहे.

१ जूनपासून मासेमारी बंद, प्रशानाकडे मच्छीमारांकडून मुदतवाढीची मागणी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ नुसार १ जून ते ३१ जुलै दरम्यान मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने गेल्याच आठवडय़ात दिले आहेत.
परंतु यंदा माशांचा अभाव आणि तौक्ते चक्रीवादळाचा फटका यामुळे मच्छीमारांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून १ जून ऐवजी १५ जूनपासून मासेमारी बंदी लागू करावी,
अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.

जून-जुलै महिन्यात येणारे वादळी वारे, सोसाटय़ाचा पाऊस यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी दोन महिने मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश दरवर्षी सरकारकडून दिले जातात.
शिवाय हा माशांचा प्रजनन काळ असल्याने मासेमारी करणे योग्य नसल्याचे मच्छीमार सांगतात.
परंतु कोरोनामुळे कठीण काळ आल्याने नियमापेक्षा अधिक दिवस मासेमारी करण्यास परवानगी द्यावी, असे मत मच्छीमारांकडून व्यक्त होऊ लागले आहे.

‘मासेच उपलब्ध नसल्याने वर्षभर मच्छीमारांनी तोटा सहन केला. शिवाय वादळापूर्वी आणि वादळानंतर काही दिवस मासेमारी बंदच होती. यात जवळपास दहा दिवस गेले. आताही मासेमारी करताना पुरेसे मासे हाताला लागत नाहीत.
त्यामुळे किमान १५ जूनपर्यंत मासेमारी करता आली तर आम्हाला दिलासा मिळेल,’ असे मढ येथील मच्छीमार संतोष कोळी यांनी सांगितले. त्या संदर्भात सरकारला निवेदनही देण्यात आले आहे.

मच्छीमार कृती समितीने मात्र या मागणीला विरोध केला आहे.
आधीच तौक्ते चक्रीवादळात मच्छीमारांना नुकसान झाले आहे.
त्यात जूनमध्ये मासेमारी सुरू ठेवली आणि त्यावेळी नैसर्गिक आपत्ती ओढवली तर मच्छीमारांच्या जीवाला धोका होऊ शकतो. शिवाय तसे झाल्यास जबाबदारी कुणाची असाही प्रश्न येतो. त्यामुळे मच्छीमारांनी पुढचा विचार करून या मागणीचा पुनर्विचार करावा,
अशी विनंती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे.

कोरोना महामारीच्या संकटकाळात बचतगटांतील महिलांनी केली ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोरोना महामारीच्या संकटकाळात राज्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानांतर्गत सहभागी बचतगटांतील महिलांनी मास्क, सॅनिटायझरची निर्मिती व विक्री यासह विविध उपक्रम राबवून सुमारे ६० कोटी ०३ लाख रुपयांची विक्रमी उलाढाल केली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोरोनामुळे आर्थिक संकट असताना राज्यातील या महिलांनी स्वत:च्या कुटुंबाला आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याबरोबरच लोकांसाठी मास्क, सॅनिटायझरसारख्या जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करुन दिली आहे.

३४ जिल्ह्यातील ७३० स्वयंसहायता समुहामधील १ हजार ९८१ महिलांमार्फत नुकतेच ८.७८ लाख मास्क बनविण्यात आले असून ७.७६ लाख मास्कच्या विक्रीमधून १ कोटी १९ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. कोरोना संकटाच्या पहिल्या लाटेत या बचतगटांनी सुमारे १ कोटी १० लाख मास्कची निर्मिती करुन त्यांच्या विक्रीतून सुमारे १३ कोटी ३० लाख रुपयांची उलाढाल केली होती.

कोरोना संकटकाळात आवश्यक असणाऱ्या सॅनिटायझरची निर्मिती आणि विक्रीही बचतगटांमार्फत करण्यात आली. राज्यातील १९ जिल्ह्यातील ४० स्वयंसहाय्यता समूहांमधील १९९ महिलांमार्फत ८ हजार ०५९ लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली असून ५ हजार ०४९ लिटर सॅनिटायझरच्या विक्रीमधून ११ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.

कोरोना संकटकाळात शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाजीपाला पुरवठा करण्याचे काम स्वयंसहाय्यता समुहांनी केले आहे. यामध्ये ३४ जिल्ह्यातील १ हजार ९६६ समुहातील ४ हजार १९६ महिला सहभागी असून त्यांनी ८ हजार ६४९ क्विंटल भाजीपाला विक्रीतून २ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. पहिल्या लाटेच्या काळातही महिला बचतगटांनी यामाध्यमातून १६ कोटी ७५ लाख रुपयांची उलाढाल केली होती.

फळे खरेदी-विक्रीमध्ये ३४ जिल्ह्यातील १ हजार २२५ समुहातील ३ हजार २०५ महिला सहभागी असून त्यांनी ६ हजार ७७५ क्विंटल फळे विक्रीतून ३ कोटी ७१ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. पहिल्या लाटेच्या काळात या माध्यमातून ३ कोटी ०६ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.

राज्यातील २९ जिल्ह्यातील एकूण ७९६ स्वयंसहाय्यता समुहांनी २ हजार ११६ महिलांच्या माध्यमातून धान्य खरेदी व विक्री केली असून आजअखेर ४१ हजार ३४४ क्विंटल धान्याची विक्री झालेली आहे, त्यामध्ये ९ कोटी ६८ लाख रुपयांची उलाढाल झालेली आहे. पहिल्या लाटेच्या काळात या माध्यमातून ४ कोटी २२ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.

कोविड केंद्रांना स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिलांनी जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये १६ जिल्ह्यातील ४० ठिकाणी जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. १ हजार ७७९ गावातील ५१७ महिला स्वयंसहाय्यता समूहातील ३ हजार १२५ महिलांनी सामूहिक खरेदीचा अवलंब करून बी-बियाणे, खते आणि औषधांची एकत्रित खरेदी केली. यातून ४ कोटी ७२ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. पहिल्या लाटेच्या काळात या माध्यमातून सुमारे ५६ लाख रुपयांची उलाढाल झाली होती.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहांनी बनविलेल्या मालाला ऑनलाईन बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत स्थापित समूहांची उत्पादने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यातून १२.२५ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

या सर्व महिलांचे मंत्री मुश्रीफ यांनी अभिनंदन केले असून समाजाला कोरोना संकटाच्या काळात आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच झालेल्या व्यवसायातून कुटुंबाला आर्थिक आधार देण्यात या महिलांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. महिलांना यापुढील काळातही बचतगटांच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले

उल्हास नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत घर वाटणीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

घर वाटणीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना उल्हासनगर (कॅम्प नंबर १) परिसरातील भीमनगर येथील हिम्मत चौकात घडली आहे. खून करणाऱ्याला उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घर वाटणीच्या वादातूनच सख्ख्या भावाचा डोक्यात लोखंडी पाईप घालून भर रस्त्यात खून करणाऱ्या भावाला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोष पांडुरंग कदम असे ताब्यात घेतलेल्या भावाचे नाव आहे. तर, विठ्ठल पांडुरंग कदम असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. दोघा भावांमध्ये आईचे घर वाटणीवरून बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. मृत विठ्ठल हे कल्याण पश्चिम परिसरातील योगीधाम परिसरात कुटुंबासह राहत होते. तर, आरोपी संतोष हा कल्याण तालुक्यातील म्हारळगावात राहतो. या दोघांची आई जनाबाई ह्या उल्हासनगर (कॅम्प नंबर १) परिसरातील घरात राहतात. येथील घराच्या वाटणीवरून दिनांक १९ मे रोजी आरोपी संतोष याने आई राहत असलेल्या घरावर हक्क सांगत दारू पिऊन वाद केला होता. यामुळे कल्याणला राहत असलेल्या विठ्ठलने घरी जाऊन संतोषची समजूत काढली होती. दरम्यान, संतोषने विठ्ठलला तुला बघून घेईन अशी धमकी दिली होती. आईचे घर आपल्या वाटणीत येत नसल्याचे पाहून आरोपी संतोषने विठ्ठलला मारहाण करण्याचा कट रचला होता.

दरम्यान, काल रात्री विठ्ठल काही कामासाठी उल्हासनगर (कॅम्प नंबर १) परिसरातील भीमनगर येथील हिम्मत चौकात आला होता. दरम्यान, संतोषणे विठ्ठलचा पाठलाग करत, येथील चौकातच लोखंडी पाईपने त्याला मारहाण केली. यामध्ये विठ्ठल गंभीर जखमी झाला. त्यानंतर विठ्ठलला जखमी अवस्थेत रुग्णालय दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान विठ्ठलचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृत विठ्ठलचा मुलगा विशाल (वय २४) याच्या फिर्यादीवरून संतोषवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर पोलिसांनी संतोषला अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक एस. एस. गोरे करत आहेत.

आजपासून उत्तन येथील अरबी समुद्रातील खडकांवर दीपस्तंभ सुरू – खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याला यश

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी

भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथील अरबी समुद्रातील खुट्याची वाट येथील दीपस्तंभ आज पासून सुरु झाले. याचे उद्घाटन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये करण्यात आले. त्यावेळी आमदार गीता जैन, जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख राजू भोईर, विरोधीपक्ष नेते प्रवीण पाटील, गटनेत्या व महिला शहर संघटक नीलम धवन, उपशहर संघटक तेजस्वी पाटील, शहर प्रमुख लक्ष्मण जंगम, पप्पू भिसे, बर्नाड डिमेलो, उप शहर प्रमुख केशीनाथ पाटील, अशोक मोरे, नगरसेवक एलियस बांड्या, हेलन जॉर्जी गोविंद, शर्मिला बगाजी, माजी नगरसेवक जॉर्जी गोविंद, स्थानिक मच्छीमार संस्थेचे पदाधिकारी, मॅक्सी व इतर शिवसैनिक पदाधिकारी व स्थानिक मच्छिमार, मेरिटाइम बोर्डाचे अभियंता शेलार, नायब तहसीलदार नंदकुमार देशमुख इत्यादी उपस्थित होते.

भाईंदर पश्चिमेकडील उत्तन किनारपट्टीवर अनेक मच्छीमारांचा पारंपारिक व्यवसाय मासेमारी हा आहे. ते आपली उपजीविका समुद्रात मासेमारी करून चालवितात. अनेक मासेमारी करणारे छोटे-मोठे मच्छीमारांच्या आपल्या स्वतःच्या बोटी आहेत. या उत्तन किनारपट्टीवर मासेमारी करून येत असताना खुंट्याची वाट या खडकावर पूर्वी एक दीपस्तंभ होता तो गेल्या अनेक वर्षापासून कोसळून पडल्याने बंद होता. त्यामुळे या खडकावरती अनेक मच्छीमारांच्या बोटी आदळून त्यांच्या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे. खासदार राजन विचारे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना दि. 5 जुलै 2019 रोजीला पत्र देऊन दीपस्तंभासाठी 56 लाखाची परवानगी मेरिटाईम बोर्डाला मिळवून दिली होती. परंतु या ठिकाणी काम करण्याकरिता तांत्रिक अडचणी व अपुऱ्या निधीमुळे याचे काम सुरू करणे शक्य होत नव्हते. या साठी पुन्हा जिल्हाधिकारी व ठाणे जिल्हा पालकमंत्री पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन याकामासाठी आवश्यक लागणारा 16 लाखाचा वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. या कामासाठी खासदार राजन विचारे यांनी एकूण 72 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यासाठी अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग यांचीही भेट घेऊन दालनात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत मेरीटाईम बोर्ड कडून हे काम जलद गतीने मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. या कामाचे भूमिपूजन दि. 15 मार्च 2021 रोजी करण्यात आले होते. याचे काम दोन महिन्यात पूर्ण करून येथील अनेक मच्छिमारांना दिलासा मिळाला आहे. तसेच या ठिकाणी कातल्याची वाट, वाशी खडक, सऱ्याची वाट या तीन खडकांवर दीपस्तंभासाठी निधी उपलब्धतेसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी या कामासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करू असे खासदार राजन विचारे यांना आश्वासन दिले आहे. यासाठी त्यांनी मेरिटाइम बोर्डाला या तिन्ही खडकांच्या प्रस्ताव तातडीने सादर करावे असे आदेश पत्राद्वारे करण्यात आले आहे.

खासदार राजन विचारे यांनी या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब तसेच ठाणे जिल्हाधिकारी यांचेही आभार मानले आहेत.

तसेच या उत्तन परिसरात मच्छीमारांसाठी नवीन मच्छी मार्केट, बर्फ कारखाना, कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी त्याचबरोबर मच्छिमारांना पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयात जावे लागते हि त्यांची गैरसोय दूर व्हावी यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाचे कार्यालय उत्तन येथे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले आहे.