Home Blog Page 259

मीरा भाईंदर महापालिकेच्या दोघां कार्यकारी अभियंत्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळले; कांदळवनाचा ऱ्हास करणे पडले महागात

संपादक: मोईन सय्यद / मीरारोड, प्रतिनिधी

मिरा भाईंदर शहरातील कांदळवन क्षेत्रात पर्यावरणाचा ऱ्हास करून मोठे काँक्रीट नालेचे बांधकाम केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी मीरा भाईंदर महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित आणि सुरेश वाकोडे यांचा जामीन अर्ज मंगळवारी ठाणे न्यायालयाने फेटाळून लावला . महापालिकेला न्यायालयाने दिलेला चांगलाच दणका आहे . पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात महापालिका आघाडीवर असून पालिका अधिकारी – ठेकेदारांवर आता पर्यंत अनेक गुन्हे दाखल आहेत .

कांदळवन व कांदळवन पासून ५० मीटर पर्यंतच्या बफर झोन मध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम , भराव आदी करण्यास मनाई आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने कांदळवन हे अतिशय महत्वाचे असल्याने त्याच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयाने देखील वेळोवेळी आदेश दिलेले आहेत.

तसे असताना मीरा भाईंदरमध्ये मात्र महापालिके पासून खाजगी विकासक , राजकारणी , झोपडी माफिया आदीं कडून सर्रास कांदळवनाचा ऱ्हास केला जातो . कांदळवन तोडणे , जाळणे , भराव करणे , विविध बांधकाम करणे , भरतीच्या पाण्याचे मार्ग बंद करणे आदी प्रकार सर्रास केले जातात . या प्रकरणी अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल असले तरी पोलीस मात्र ह्या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहण्या ऐवजी आरोपीना सोयीची भूमिका घेत असल्याचे चित्र आता पर्यंत पहायला मिळाले आहे .

त्यातच मीरारोडच्या नेमिनाथ हाईट्स व पालिका पाण्याच्या टाकी मागील परिसरात कांदळवनाचा ऱ्हास करून कांदळवन आणि ५० मीटर क्षेत्रात महापालिकेने काँक्रीट मोठ्या नाल्यांची बांधकामे चालवली होती . खाडीच्या नैसर्गिक प्रवाहाचे स्तोत्र बंद करून काँक्रीट नाल्या द्वारे कांदळवनात थेट सांडपाणी महापालिका सोडत आहे . त्या आधी ८ फेब्रुवारी २०१९ रोजी कोकण विभागीय कांदळवन उपसमितीने पाहणी करून कारवाईचे आदेश देऊन सुद्धा पालिकेने कार्यवाही केली नाही .

या प्रकरणी पर्यावरणा साठी कार्य करणारे पत्रकार धीरज परब सह स्थानिक जागरूक रहिवाशी रुपाली श्रीवास्तव आदींनी अनेक तक्रारी केल्या होत्या . त्या अनुषंगाने तालुका स्तरीय कांदळवन समितीने पाहणी करून ह्या दोन्ही ठिकाणी कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास होत असल्याचे स्पष्ट करत पालिकेस काम बंद करण्याचे निर्देश दिले होते . परंतु तरी सुद्धा पालिकेने सतत येथे काम सुरूच ठेवले होते . २५ मार्च रोजी अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या परवानगी नंतर मंडळ अधीकारी प्रशांत कापडे यांनी मीरारोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर दीपक खांबित आणि सुरेश वाकोडे सह ठेकेदार आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता .

मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन कोतमिरे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे . मंगळवारी ठाणे न्यायालयात खांबित व वाकोडे यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता . ह्यावेळी सरकारी वकील विवेक कडू यांनी जामिनास हरकत घेऊन शासनाच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला . खांबित यांच्यावर ह्या आधी पर्यावरण संरक्षण कायद्या खाली कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास केल्याचे ५ गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले . तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचा संदर्भ देतानाच जामीन मंजूर करू नये अशी विनंती केली . न्यायाधीश पी . पी . जाधव यांनी गुन्हा आणि एकूणच गांभीर्य पाहता खांबित व वाकोडे यांचे जामीन अर्ज फेटाळून लावत चांगलाच दणका दिला आहे .

कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांच्यावर आधीच कांदळवन ऱ्हासाचे ५ गुन्हे दाखल असून अन्य ५ गुन्ह्यात सुद्धा त्यांना थेट आरोपी केले नसले तरी पालिकेच्या बांधकाम विभागाचे ठेकेदार व अधिकारी आरोपी आहेत . कांदळवनच्या गुन्ह्यात पोलिसांची भूमिका आता पर्यंत आरोपीना पाठीशी घालणारी राहिली असून आज मंगळवारी न्यायालयात सुद्धा पोलिसांनी जामीन अर्ज रद्द करण्यास फारसा आग्रह धरला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे .

न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने आता तरी पोलीस ह्या बड्या अधिकाऱ्यांना ताबडतोब बेड्या ठोकणार का? एखादया छोट्याशा गुन्ह्यात देखील ज्या पद्धतीने सामान्य नागरिकांना अटक करून पोलीस कोठडीत डांबले जाते त्याच पद्धतीने ह्या बड्या अधिकाऱ्यांना देखील कोठडीत डांबणार का? असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत .

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव द्या – संतोष केणे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षीय कृती समितीसोबत बैठक आयोजित करुन देणार असल्याचे आश्वासन सर्वपक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

लोकनेते दि.बा.पाटील नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची त्यांच्या मंत्रालय समोरील निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली यावेळी नाना पटोले बोलत होते. शिष्टमंडळात सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष, माजी खासदार रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर, उद्योजक जे एम. म्हात्रे, कार्यकारिणी सदस्य जे. डी. तांडेल, काॅग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे, सहचिटणीस दीपक म्हात्रे, ॲड. मनोज भुजबळ, जासईचे सरपंच मेघनाथ म्हात्रे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

६७ लाख रूपये किंमतीचे बनावटी विदेशी मद्याचे ६२५ खोके ट्रकसह जप्त

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची या महिन्यातील अशा प्रकारची तिसरी मोठी कारवाई आहे.

सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६३५ खोके असलेला ट्रक पकडला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे.

गेल्या सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे ५६ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ५०० खोके तर २० मे रोजी उस्मानाबाद येथेही ४३ लाख ९३ हजार रुपये किमतीचे अवैध मद्याच्या ५७५ खोक्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे.

डोंबिवलीत सोन्याचे दागिने चोरणाऱ्याला अटक

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवलीत टिळक नगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत सोन्या-चांदिचे दागिने चोरणाऱ्या एका इसमास टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादींच्या कपाटात ठेवलेल्या ४१,०००/-रू. कि.च्या ९ ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ३ ग्रॅम वजनाच्या) व एक चांदीचे कर्णफुल असे सोन्या-चांदीचे दागिने चोरी झाले असल्याबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने व.पो.नि नारायण व्हि.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. व्हि.एस.कडलग, पो.उ.नि. एन.टि.वाघमोडे, पो.ह.श्याम सोनावणे, पो.ना.गोरखनाथ घुगे, पो.ना.दिपक भावसार, पो.शि.कृष्णा दुमाडा यांनी तपास करून सदर इसमास अटक केली.

त्याच्याकडून गेलेल्या मालापैकी ४०,५००/-रू.कि.च्या ३ सोन्याच्या अंगठ्या हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पो. ह. श्याम सोनावणे करीत आहेत.

लशींचा पुरेपूर वापर,वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प; महापालिकेचे यशस्वी नियोजन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त ठाणेकरांचे लसीकरण करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून आखले जात असले तरी लस तुटवडय़ामुळे लसीकरण मोहिमेत सातत्याने व्यत्यय येत आहे.
त्यामुळे लस तुटवडा लक्षात घेऊन उपलब्ध साठय़ातून लस वाया जाणार नाही याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. महापालिका हद्दीत लस वाया जाण्याचे प्रमाण २.५१ टक्के आहे. हे राज्यातील सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागली असली तरी येत्या काही महिन्यांत तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
यामुळे दुसऱ्या लाटेनंतर महापालिकांनी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर देण्यास सुरुवात केली असून त्यासाठी शहरात लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविली आहे.
त्या तुलनेत लशींचा पुरवठा होत नसल्यामुळे पालिकांना अनेक केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे.

लस तुटवडय़ामुळे लसीकरण मोहिमेत वारंवार व्यत्यय येत असल्यामुळे उपलब्ध साठय़ातील लशींचा पुरेपूर वापर करण्यावर पालिकांकडून भर दिला जात आहे. अशाचप्रकारे ठाणे महापालिका प्रशासनानेही लशींचे पुरेपूर वापर केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ५५ लसीकरण केंद्रे आहेत.
या केंद्रांवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशी नागरिकांना देण्यात येतात.
शहरात आतापर्यंत एकूण ३,४१,९५० लशींचे डोस उपलब्ध झाले आहेत.