Home Blog Page 262

उल्हासनगर च्या सेक्शन-१७ मध्ये चालणारा जुगाराचा क्लब उध्वस्त, १० ते १२ जणांची धरपकड

उल्हासनगर च्या सेक्शन-१७ मध्ये चालणारा जुगाराचा क्लब उध्वस्त, १० ते १२ जणांची धरपकड

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्या कोरोनाच्या संकटात एकीकडे जिथे राज्यातील सगळ्या महापालिका कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व तो संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी तारेवरची कसरत करत असतानाच दुसरीकडे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन च्या हद्दीतील उल्हासनगर सेक्शन-१७ येथील ‘हिल क्वीन’ बिल्डिंग मध्ये चालत असलेल्या जुगाराच्या क्लब वर भीमसेना नशामुक्ती अभियान च्या अध्यक्षा नितीका राव व त्यांचे सहकारी भरत तोलानी यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना क्लब कायमस्वरूपी बंद करण्यासाठी लेखी पत्र देऊन पोलिसांना त्या क्लबवर कारवाई करण्यास भाग पाडत आणि विठ्ठलवाडी पोलिसांना सोबत घेत त्या क्लबवर धाड मारली. या धाडीत १०-१२ जुगारींना ताब्यात घेण्यात आले तर ७-८ जण पळ काढण्यात यशस्वी झाले.

या क्लबमध्ये जुगरींना मनसोक्त खेळण्यासाठी २ एसी व ५ टेबल असून ५-६ सी.सी.टीव्ही ने आधुनिकरित्या तो उभारला आहे म्हणूनच दररोज ३० ते ३५ लोकं या कोरोनाच्या महाभयंकर काळातही सोशल डिस्टनसिंग चे पालन न करता व मास्क न वापरता आपल्या जीवाशी खेळण्याकरता या क्लब मध्ये येत आहेत. पोलिसांनी या धाडीतून घटनास्थळातून काही चोपड्या, पत्त्यांचे ३०-४० कॅट अशी सामग्री जप्त केली आहे व गुन्हा नोंदवण्याची व पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.

विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन च्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या जुगाराच्या क्लब विरोधात आधीपासून स्थानिकांच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रारी आल्या असून पोलिसांनी कारवाई करून सुद्धा हा क्लब दोनतीन दिवसांनी पुनश्च सुरू होत होता असे तेथील राहणाऱ्या एका स्थानिकाने पत्रकारांशी बोलताना सांगितले व या धाडीनंतर तरी उल्हासनगर पालिका प्रशासन व झोन-४ चे उपयुक्त यांनी कठोर कारवाई करून हा क्लब कायमस्वरूपी बंद होईल अशी अपेक्षा बाळगली.

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातून ८६१ कोटी रुपयांचा निधी प्राप्त – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी ; कोरोना रुग्णांकरिता त्वरीत मदतकार्यासाठीही करता येणार खर्च

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष २०२१-२२ मधील पहिल्या हप्त्यापोटी ८६१ कोटी ४० लाख रुपयांचा बेसिक / अनटाईड (अबंधीत) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्याच्या कोरोना साथीच्या काळात रुग्णांसाठी त्वरीत मदतकार्य उपलब्ध करण्यासाठी या निधीचा उपयोग करता येईल.

८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना

राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या योजनेतून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या विकासकामांची निर्मिती करावी, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे. विशेष म्हणजे या निधीतील सर्वाधिक ८० टक्के भाग थेट ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढणार आहे. उर्वरित निधीपैकी १० टक्के निधी हा जिल्हा परिषदेस तर १० टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळणार आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

विविध मुलभूत सुविधा,स्थानिक गरजांनुसार खर्च करता येणार 

या निधीचा वापर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक गरजांनुसार आवश्यक बाबींवर करावयाचा आहे. वादळ पाण्याचा निचरा आणि पाण्याचा साठा व्यवस्थापन, मुलांचे लसीकरण (रोग, संसर्ग इ.पासून सुरक्षितता), मुलांचे कुपोषण रोखणे, ग्रामपंचायतींदरम्यानचे जोडरस्ते आणि ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, दुरूस्ती व देखभाल आणि स्मशानभूमीचे बांधकाम, स्मशानभूमीसाठी जमीन अधिग्रहण आणि मृत शरीर दफनभूमीची देखभाल, एलईडी पथदिवे व सौर पथदिव्यांचे बांधकाम, दुरूस्ती व देखभाल (सौर पथदिवे “वैयक्तिक खांब आधारित प्रणाली” किंवा “केंद्रीकृत सौर पॅनेल प्रणाली” असू शकते), ग्रामपंचायतीमध्ये पुरेशी व उच्च बँडविडथसह वाय-फाय डिजिटल नेटवर्क सेवा उपलब्ध करणे, सार्वजनिक वाचनालय, मुलांसाठी उद्याने तसेच इतर मनोरंजन सुविधा, खेळाचे मैदान, क्रिडा व शारीरिक फिटनेस उपकरणे, ग्रामीण बाजारहाट इ. राज्य कायद्यानुसार राज्य शासनाने केलेल्या इतर मूलभूत सुधारित / वर्धित सेवा, वीज, पाणी, कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, सुका व ओला कचरा व्यवस्थापन उपकरणे, कंत्राटी तत्वावर (आऊटसोर्सिंग) मनुष्यबळ यांसाठी होणारा आवर्ती खर्च आणि इतर आवश्यक प्रशासकीय खर्च, नैसर्गिक आपत्ती, साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावावेळी त्वरीत मदतकार्य, पंचायतींना देण्यात आलेल्या इतर जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी जसे की, जैवविविधता अधिनियम २००२ अंतर्गत लोकांची जैवविविधता नोंदवही (PBR – Peoples Biodiversity Register ) तयार करणे व अद्ययावत करणे इत्यादी बाबींवर हा निधी खर्च करता येईल. कर्मचारी पगार किंवा आस्थापना विषयक बाबींवर हा निधी खर्च करता येणार नाही.

मृत्यूनंतरही कोरोनाग्रस्तावर उपचार सुरूच; नांदेड मधील धक्कादायक प्रकार!

संपादक: मोईन सय्यद / नांदेड प्रतिनिधी

मराठवाड्यातील नांदेड शहरातील एका खाजगी रुग्णालयानं कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे उकळण्यासाठी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतरही 3 दिवस उपचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित रुग्णालयानं कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर विविध औषध आणि उपचाराच्या नावाखाली पीडित नातेवाईकांचे लाखो रुपये उकळले आहेत. त्याचबरोबर रुग्णावर काय उपचार केला, याचा तपशील मागितला असता आणखी 40 हजार रुपयांची मागणी केली.

याप्रकरणी मृत रुग्णाच्या पत्नीनं न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्यानंतर संबंधित रुग्णालयातील सर्वच डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. यानंतर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गोदावरी हॉस्पिटल तसंच येथील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक करणे, उपचारात निष्काळजीपणा करणे, अशा विविध कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करत आहेत.

पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील मुजामपेठ येथील रहिवासी असणाऱ्या अंकलेश पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यानंतर अंकलेश यांना 16 एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकानी गोदावरी कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. 19 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. दुसरीकडे, नातेवाईकांकडून पैशांसाठी डॉक्टरांचा तगादा सुरूच होता. 21 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यानच्या तीन दिवसांत डॉक्टरांनी फिर्यादी शुभांगी पवार यांच्याकडून दीड लाख रुपये घेतले.

महानगरपालिका आणि नगरसेवकांच्या बेजबाबदारपणामुळे पडला बळी; पालिकेच्या वाहन चालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

संपादक: मोईन सय्यद / मिरारोड: प्रतिनिधी

मीरारोड (18 मे) – मीरारोडच्या इंदिरा गांधी पालिका रुग्णालयात पत्राच्या खोलीत विजेचा प्रवाह वाहत असल्याची कल्पना नसल्याने दाराशी हात लावलेल्या शववाहिनीच्या चालकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन कर्मचाऱ्यांना सुद्धा विजेचा धक्का लागण्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. महापालिकेच्या हलगर्जीपणा मुळे हा बळी गेल्याचा आरोप होत आहे.

मीरा भाईंदर महापालिकेचे मीरारोडच्या पूनम सागर वसाहत भागात भारतरत्न इंदिरा गांधी रुग्णालय आहे . सदर रुग्णालयात प्रभाग समिती कार्यालय आदी सुरु केले असून इमारतीवर मजले वाढवण्याचे काम सुरु आहे. ह्या कामासाठी रुग्णालयात असलेली वाहन चालकांसाठीची पक्की खोली पालिकेच्या बांधकाम विभागाने चक्क ठेकेदारास सिमेंट आदी सामान ठेवायला दिली आहे. तर वाहन चालकांना पत्र्याची खोली बांधून देण्यात आली आहे .
तौक्ते चक्रीवादळा मुळे मुसळधार पाऊस पडत असल्याने पत्र्याच्या खोलीत व बाहेर पाणी साचले होते. सोमवारी रात्री ११. ३० च्या सुमारास शववाहिनीचे चालक धर्मलिंगम गोविंदन मुत्तू ( ६० ) रा. डॉ. आंबेडकर नगर, भाईंदर पश्चिम हे कामाची पाळी संपल्याने पत्र्याच्या खोलीत नोंदवही वर नोंद करून घरी जायला निघत होते. तर रात्रपाळी असल्याने राजेंद्र खेडेकर हे पालिका रुग्णवाहिकेची कर्मचारी आत येऊन बसले होते.

त्याचवेळी पत्र्याचे दार आणि पाण्याशी स्पर्श होताच धर्मलिंगम ह्यांना विजेचा जबर धक्का बसला आणि ते खालीच कोसळले. खेडेकर हे प्लास्टिक खुर्ची वरून पाय खाली ठेवत नाही तोच त्यांना सुद्धा विजेचा धक्का बसून ते सुद्धा खाली पडले. त्यांनी सुरक्षा रक्षकास कळवले असता वॉर्डबॉय धावून येताच त्याला सुद्धा विजेचा शॉक लागला. त्या नंतर मुख्य स्विच बंद केला. परंतु तो पर्यंत धर्मलिंगम यांचा मृत्यू झाला होता. खेडेकर याना भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. धर्मलिंगम हे पालिकेच्या सेवेत होते. निवृत्ती नंतर ते ठेकेदारा मार्फत ठेक्यावर पालिकेत काम करत होते.

तलाठी अभिजित बोडके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत त्याचा अहवाल तहसीलदार यांना सादर केला आहे. नया नगर पोलिसांनी घटनेची नोंद केली असली तरी या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

महानगरपालिका आणि नगरसेवकांच्या बेजबाबदारपणाचा ठरला बळी

इमारतीचे मजले वाढवण्याच्या कामासाठी वाहन चालकांची पक्की खोली ठेकेदारास सिमेंट ठेवण्यासाठी देऊन वाहन चालकांना मात्र पत्र्याची असुरक्षित खोली बांधून दिली, त्याच बरोबर विजेच्या तारांचे योग्य नियोजन देखील नाही आणि म्हणूनच पाऊस पडून पाणी वाहिल्यामुळे पत्र्याच्या खोलीत विजेचा प्रवाह उतरला आणि त्यामुळेच हा बळी गेला असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून या घटनेची सखोल चौकशी करून संबंधितां वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

एका दिवसात कोरोनामुळे ५० डॉक्टरांचा मृत्यू

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून रुग्णसंख्येसोबतच मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनेही यंदा उच्चांक गाठले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका सर्वसामान्यांसोबतच कोरोनाविरोधातील लढाई लढणाऱ्या लढवय्या डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २४४ डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे.

रविवारी ५० डॉक्टरांच्या मृत्यूची नोंद झाली. सर्वाधिक मृत्यू बिहार (६९), उत्तर प्रदेश (३४) आणि दिल्लीत (२७) झाले आहेत. यापैकी फक्त तीन टक्के डॉक्टरांचं लसीकरण झालं होतं. कोरोना रुग्णांसाठी काम करणाऱ्या दिल्लीमधील ‘गुरु तेग बहादूर’ रुग्णालयातील २६ वर्षीय डॉक्टर अनस मुजाहिदला कोरोनामुळेच आपला जीव गमवावा लागला. कोरोनाची लागण झाल्यानंतर काही तासांतच त्याचं निधन झालं.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीव गमावणाऱ्या २४४ डॉक्टरांमधील अनस सर्वात तरुण डॉक्टर आहे. पहिल्या लाटेत गेल्यावर्षी ७३६ डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे जवळपास एक हजार डॉक्टरांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनसच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र आणि सहकारी डॉक्टर आमीर सोहेलला मोठा धक्का बसला आहे.

अनसला घसा दुखणे अशी काही मध्यम लक्षणं जाणवत होती. रुग्णालयात चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. काही वेळातच अनस खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याचं लसीकरण झालं नव्हतं. “हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. त्याला कोणतीही व्याधी नव्हती. तसंच आरोग्यासंबंधित कोणतीही समस्या नसल्याचं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूने आम्हाला धक्का बसला असून हे कसं झालं हेच समजत नाहीये,” असं डॉक्टर आमीर सोहेलने म्हटलं आहे.