Home Blog Page 263

कोरोनाच्या आणखी लाटा भारतात येऊ शकतात, पुढील ६-१८ महिने अत्यंत महत्त्वपूर्ण असा WHO चा गंभीर इशारा

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दुसरी लाट भारतासाठी अधिक धोकादायक ठरली आहे. कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतामध्ये हाहाकार उडाला आहे. या प्राणघातक विषाणूमुळे दररोज सुमारे ४००० लोकं या देशात मरत आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी कोविड-१९ साथीच्या आगामी लाटांविषयी गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले, आगामी काळात कोरोनाच्या अधिक लाटा भारताच्या अडचणी वाढवू शकतात. डॉ.सौम्या स्वामीनाथन यांनी गंभीर इशारा देताना सांगितले की, कोरोनाच्या लढाईत पुढील ६-१८ महिने भारताच्या प्रयत्नांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

प्रसारमाध्यमाला दिलेल्या एका ऑनलाइन मुलाखतीत डॉ. स्वामीनाथन म्हणाले, ‘महामारीच्या या युद्धामध्ये बरेचसे विषाणूच्या विकासावर तसेच व्हेरिएंट्स विरुद्ध लसीची प्रतिकार क्षमता यावर अवलंबून असते आणि लसीची प्रतिकारशक्ती किती काळ लोकांचे संरक्षण करते.’ हे खूप महत्वाचे आहे. यात बरेच बदल होत आहेत.

ते म्हणाले, ‘आम्हाला माहीत आहे की, कोरोना साथीच्या या प्राणघातक टप्प्याचा नक्कीच अंत होईल. २०२१ च्या अखेरीस, जेव्हा जगातील जवळपास ३० टक्के लोक लसीकरण करतात तेव्हा हे आपण पाहू शकतो. हीच वेळ आहे जेव्हा आपण सतत होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट पाहण्यास सुरुवात होईल. यानंतर, २०२२ मध्ये लसीकरणाला वेग येऊ शकतो.

डॉ.स्वामीनाथन म्हणाले की, आपण सर्वजण कोरोना साथीच्या अवस्थेतून जात आहोत, जिथे अजूनही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आम्हाला पुढच्या ६ ते १८ महिन्यांपर्यंत आमच्या कामगिरीकडे लक्ष द्यावे लागेल, जी खूप कठीण वेळ असू शकते. तरच आपण कोरोनावर नियंत्रण किंवा दूर करण्याच्या दीर्घकालीन योजनेबद्दल बोलले पाहिजे. आम्हाला माहीत आहे की लसपासून प्रतिकारशक्ती आणि नैसर्गिक संसर्गापासून प्रतिकारशक्ती कमीतकमी आठ महिने टिकते. जसजशी वेळ जाईल तसतसे आम्ही अधिकाधिक लस कशी टिकेल यावर भर देत आहोत.

उपचारांच्या प्रोटोकॉलवर भाष्य करताना डॉ. स्वामीनाथन म्हणाले, ‘लोकांना हे समजून घेणे फार महत्वाचे आहे की, चुकीच्या वेळी चुकीचे औषध वापरल्याने फायद्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकते. आता सामान्यतः वापरल्या जाणार्‍या औषधांवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. ते म्हणाले, कोणताही देश या रोगाचा सामना करण्यासाठी ‘डब्ल्यूएचओ’च्या प्रोटोकॉलचा अवलंब करु शकतो.

डॉ. स्वामीनाथन म्हणाले की बी१.६१७ हा कोरोनाचा अत्यंत संक्रमक प्रकार आहे. रुप सातत्याने परिवर्तित किंवा व्हायरसच्या विकसित केलेल्या आवृत्त्या आहेत आणि म्हणूनच व्हायरल जीनोममध्ये बदल आढळतात. आणि ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे. RNA व्हायरस गुणाकार होत असल्याने, या व्हायरसची स्वतःस प्रतिकृती बनविण्यात मदत करते. यामुळे व्हायरस किंचित बदलतो. मुळात ही एक त्रुटी आहे, ज्याला विशेष महत्त्व नाही. त्यांचा कोणत्याही परिस्थितीत विषाणूवर परिणाम होत नाही.

मुंबईतील कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था, म्हाडाच्या १०० सदनिका टाटा मेमोरियलला हस्तांतरीत

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मानवतेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरात कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांची व काळजीवाहू व्यक्तींच्या निवासाची सोय करता यावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिकांच्या चाव्या आज ज्येष्ठ नेते व खासदार शरद पवार यांच्या हस्ते टाटा मेमोरियल रूग्णालयाला सुपूर्द करण्यात आल्या.

श्री.पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमाला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर.श्रीनिवास, ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक डॉ.राजेंद्र बडवे, टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक डॉ.शैलेश श्रीखंडे आदी उपस्थित होते.

यावेळी श्री.आव्हाड म्हणाले की, टाटा मेमोरियल रूग्णालय हे कर्करोग रूग्णांचे उपचार करण्यासाठी नावाजलेले रुग्णालय असून या उपचारासाठी फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातून कॅन्सरग्रस्त रुग्ण येत असतात. सोबतच त्यांचे नातेवाईक व काळजीवाहू व्यक्ती येतात. परंतू त्यांच्या राहण्याची व्यवस्था नसल्याने किंवा खासगी निवासस्थानाची सोय असलेले ठिकाण आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने बरेचदा नातेवाईकांना फुटपाथवर रहावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाने रूग्णालयाशेजारी असलेल्या परळ, शिवडी विभाग, महादेव पालव मार्ग, डॉ.बी.ए.रोड, करी रोड मुंबई येथील हाजी कासम चाळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मालमत्तेच्या समूह पुनर्विकास योजनेमधून म्हाडाचा विभागीय घटक असणाऱ्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळास एकू्ण १८८ सदनिका प्राप्त झाल्या आहेत. यापैकी सद्य:स्थितीत ३०० चौरस फुट असलेल्या १०० सदनिका टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या १०० सदनिका नाममात्र दराने (रु. १ प्रति वर्ष) भाडेपट्टा करारनाम्यानुसार म्हाडाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून विशेष बाब म्हणून टाटा मेमोरियल रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड यांनी सांगितले.

सदनिकांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग (म्हाडा) व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये करारनामा करण्यात येणार आहे, असे श्री.आव्हाड यांनी सांगितले.

डॉ.बडवे म्हणाले की, टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये कर्करोगावर उपचारासाठी रुग्ण येत असतात. या रुग्णांवर उपचार पूर्ण झाले तरच ती रोगमुक्त होऊ शकतात. रुग्णाला पूर्णपणे रोगमुक्त होण्यासाठी २ ते ३ महिन्यांचा कालावधी लागतो. या दोन ते तीन महिन्यांसाठी रुग्णासह रुग्णाच्या नातेवाईकांनाही मुंबईत राहणे गरजेचे आहे. दाट लोकसंख्येच्या मुंबई शहरात मध्यवर्ती ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ‘म्हाडा’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या १०० सदनिका १०० रुग्णांना जीवदान देणाऱ्या ठरणार आहेत, असे डॉ.बडवे यांनी सांगितले. टाटा मेमोरियल रुग्णालयाला १०० सदनिका उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे डॉ.बडवे यांनी आभार मानले.

ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका लवकरच खाजगी औषध कंपन्यांकडून २ लाख कोरोना लसींची खरेदी करणार

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका येथे केंद्राकडून सतत राज्य शासनाला कमी जास्त लसींचा पुरवठा होत असल्यामुळे शहरांतर्गत लसीकरण मोहिमेला बाधा येत आहे, व्यत्यय निर्माण होत आहे. काही वेळा अनेक दिवस लसीकरण केंद्र अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीच उपलब्ध नसल्यामुळे बंद ठेवावी लागत आहेत. कोरोनाच्या या संक्रमणाचा सामना करण्यासाठी व कोरोनाचे समूळ निर्मूलन होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर होणे महत्त्वाचे आहे, हा विचार ठेवून माननीय ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी नुकतेच ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिकांना सूचना केली की लवकरात लवकर जाहीर निविदेद्वारे आपापल्या महापालिकेसाठी खाजगी औषध कंपन्यांकडून लसी उपलब्ध करून घ्याव्या जेणेकरून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या लसीं व्यतिरिक्त अतिरिक्त लसींचा साठा त्याच्या महापालिकेकडे उपलब्ध राहील व लसीकरण मोहिमेत खंड पडणार नाही अशा सूचना दिलेल्या आहेत.

त्यानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने येत्या एक-दोन दिवसात निविदा प्रक्रिया जाहीर करून लवकरात लवकर परस्पर खाजगी औषध निर्मिती कंपन्यांकडून सध्या सुरुवातीला दोन लाख लसी उपलब्ध करुन घ्यावी अशा सूचना माननीय पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेल्या आहेत.

चक्रीवादळाला न जुमानता भर पावसात पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन; कोविडच्या नियमांचा उडाला फज्जा!

संपादक: मोईन सय्यद / मीरा भाईंदर प्रतिनिधी

फुकटच्या कार्याचे श्रेय घेण्याची हौस आणि प्रसिद्धीचा हव्यास यासाठी राजकीय नेते काय काय उपद्व्याप करतील? काहीच सांगता येणार नाही. याचा चांगलाच प्रत्यय आज मिरा भाईंदर शहरात नागरीकांना आला. एकीकडे तोक्ते चक्रीवादळाचा हैदोस, मुसळधार पाऊस तर दुसरीकडे जमावबंदी, कोविडच्या नियमांचे बंधन या सर्व गोष्टींना न जुमानता, भर पावसात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदर पश्चिमेकडील पं. भीमसेन जोशी रुग्णालयाच्या आवारात आज ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, पोलीस आयुक्त सदानंद दाते, महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, सभागृह नेता प्रशांत दळवी, स्थायी समिती सभापती दिनेश जैन व मिरा भाईंदर महानगरपालिकेचे अनेक वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते मात्र आपण लोकप्रतिनिधी आहोत आणि नियमांचे पालन करण्याची सर्व प्रथम जबाबदारी आपली आहे याचे भान यांपैकी कुणालाही राहिले नव्हते.

मिरा भाईंदर महानगरपालिका ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्णतेकडे

मिरा भाईंदर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात आणि त्यामुळे शहरातील रुग्णालयात ऑक्सिजनची वाढती मागणी या गोष्टी विचारात घेत मिरा भाईंदर महानरपालिके तर्फे रुग्णालयीन व्यवस्था वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांना उपचार करताना मोठया प्रमाणात ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती त्याची दखल घेत आमदार गीता जैन यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे शहरासाठी स्वतंत्र ऑक्सिजन प्लांटची मागणी करून त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या निधीची मंजुरी मिळवून घेतली होती. त्यानुसार भाईंदर पश्चिम येथील भारतरत्न पंडित भिमासेन जोशी रुग्णालयाच्या आवारात ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट उभारण्यात आला. त्याच ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज सोमवार दि. १७ मे, २०२१ रोजी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

भविष्यात मिरा भाईंदर शहरतील रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून  1 कोटी 80 लाख रुपये खर्च करून या प्लांटची निर्मिती करण्यात आली असून प्रतिदिन १७५ ऑक्सिजनचे जंबो सिलेंडरची निर्मिती करण्याची क्षमता या प्लांटमध्ये असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

मिरा भाईंदर शहराला या ऑक्सिजन निर्मिती प्लांटची अत्यंत आवश्यकता होती असे असले तरी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात तोक्ते चक्रीवादळाने थैमान घातले आहे. आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याच बरोबर कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी जमाबंदी, सोशल डिस्टनसिंग, तोंडाला मास्क लावण्याची सक्ती या नियमांचे बंधन देशातील सर्वच नागरिकांना घालण्यात आलेले आहेत. आणि म्हणून या सर्व नियमांचे पालन आधी लोकप्रतिनिधी यांचे कडून केले जावे अशी रास्त अपेक्षा नागरिकांकडून केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे गर्दी जमविणारे कार्यक्रम टाळून हाच कार्यक्रम प्रतिआकात्मक स्वरूपात किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करून एक वेगळा आदर्श निर्माण करता आला असता. परंतु आजकालच्या राजकीय नेत्यांना कसलेच तारतम्य राहिले नसून फुकटच्या श्रेय घेण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून आपली हौस भागवून घेत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे. सामान्य माणसाने कोविडच्या नियमांचे उल्लंघन केल्यास किंवा साधे तोंडावर मास्क न लावल्यास रोख दंडा सोबतच कठोर शिक्षा केली जात आहे. राजकीय नेत्यांना नियमांतून सूट आणि जनतेला मात्र कठोर बंधनं का? असा सवाल आता जनते कडून केला जात आहे.