Home Blog Page 268

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: मिलन शाह

पुणे – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नीविषयी फेसबुक या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र पंढरीनाथ काकडे (वय ५२, रा. माऊली बंगलो, जिल्हा परिषद शाळे जवळ, वडगाव शिंदे, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी आनंद रामनिवास गोयल (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र काकडे या फेसबुक प्रोफाईल वरून राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या नावाचा उल्लेख करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करण्यात आला होता.

मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीची नीतिभ्रष्ट करण्याच्या उद्देशाने जाणून-बुजून फेसबुकवर पोस्ट टाकून घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य करून त्यांची बदनामी केली आहे. त्यामुळे विमानतळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महिला व बालविकास विभागाचा निर्णय

कोविड-१९ आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय महिला व बाल विकास विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग आणि त्यामुळे कोविड-१९ बाधित व्यक्तींचे व मृत्युचे वाढलेले प्रमाण विचारात घेता, त्यांच्या बालकांच्या जीवनावर देखील गंभीर परिणाम होत आहे. काही प्रसंगी कोविड-१९ या रोगामुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे.

सर्वोच्च न्यायालय येथील न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीमार्फत (जे जे कमिटी) कोविड-१९ या रोगाच्या अनुषंगाने राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणासंबधी कार्य करणाऱ्या संस्थांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षिततेबाबत उपस्थित मुद्यांच्या अनुषंगाने व इतर मुद्यांबाबत जिल्हा स्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्देशानुसार जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये संबंधित जिल्ह्याच्या क्षेत्रातील महानगरपालिकांचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक (ग्रामीण), जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी हे समन्वयक म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव आहेत.

यामध्ये जिल्हाधिकारी हे टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील. तसेच संपूर्ण जिल्ह्यात कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशिलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करुन देण्याबाबत संबधितांस निर्देश देणे, दर पंधरा दिवसातून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करून कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बालगृहे/निरिक्षण गृहांतील प्रवेशित व तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा तसेच टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेतील.

महानगरपालिकेचे आयुक्त हे महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची तपशीलवार माहिती समन्वय अधिकाऱ्यास उपलब्ध करून देण्याबाबत त्यांच्या नियंत्रणाखालील संबधित अधिकाऱ्यास निर्देश देतील. तसेच महानगरपालिकांचे आयुक्त महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात आणि जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात रुग्ण कोविड-१९ वरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होतेवेळी या कालावधीमध्ये आपल्या बालकांचा ताबा कोणाकडे द्यावा ही माहिती रूग्णाकडून भरून घेण्याबाबत कार्यक्षेत्रातील सर्व रूग्णालयांना निर्देश देतील. तसेच चाईल्ड हेल्प लाईन क्र. १०९८ चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात येईल याची दक्षता घेतील. याशिवाय कोरोनाच्या पाश्वभूमीवर कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या बालगृहे/ निरीक्षणगृहांकरीता तात्काळ उपचार पुरविण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करतील.

दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना सर्वतोपरी संरक्षण उपलब्ध करून देणे व अशी बालके शोषणास बळी पडणार नाहीत किंवा बालकामगार अथवा तस्करी सारख्या गुन्हेगारीमध्ये सापडणार नाहीत याची दक्षता घेणे, अशा बालकांच्या दत्तक विधानाबाबत समाजमाध्यमांमध्ये चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलीस आयुक्त/अधीक्षक (ग्रामीण) यांच्याकडून केले जाईल.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांच्यावर या बालकांना त्यांचे कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबतची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करुन देणे, बालकाचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेणे अशी कामे त्यांच्याकडून केली जातील.

जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष हे अशा बालकांना बाल संगोपन योजने अंतर्गत लाभ देऊन बालकाचा ताबा नातेवाईकाकडे देण्याच्या शक्यतेबाबत पडताळणी करणे, अशा पडताळणी नंतर दत्तक प्रक्रियेची आश्यकता असल्यास प्रचलित ‘कारा’ च्या (सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऑथॉरिटी) मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करणे, आवश्यक असल्यास बालकासाठी समुपदेशनाची व्यवस्था करणे; आवश्यक असल्यास बालगृहामध्ये दाखल करणे.

तर चाईल्ड हेल्प लाईन १०९८ बाबत व्यापक प्रसिद्धी देणे, टास्क फोर्स मार्फत करण्यात येत असलेल्या कामांना व्यापक प्रसिद्धी देण्याचे काम जिल्हा माहिती अधिकारी करतील. कोरोना कालावधीमध्ये शून्य ते १८ वर्षे वयोगटातील सर्वच मुलांचे हक्क अबाधित राहतील याची दक्षता घेण्यासह सदर टास्क फोर्सच्या समन्वयकपदाची जबाबदारी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांची जबाबदारी असेल.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे या टास्क फोर्सचे सदस्य सचिव असून ते कोविड-१९ या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांबाबतची संबधित यंत्रणेकडून दर आठवड्यास माहिती प्राप्त करुन घेऊन महिला व बाल विकास आयुक्तांमार्फत राज्य शासनाला सादर करतील.

“कोविडमुळे अनाथ बालकांची मोठी समस्या संपूर्ण देशातच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ही एक सामाजिक समस्या बनत आहे. मात्र, अशा अनाथ बालकांचे पालन, पोषण, संरक्षण, शिक्षण आदी संपूर्ण जबाबदारी घेण्याचे कर्तव्य आणि जबाबदारी आम्ही राज्य शासन म्हणून पूर्ण क्षमतेने पार पाडू.” – महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर..

“कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांच्या असहायतेचा गैरफायदा कुणी घेऊ नये म्हणून विभागाने जिल्हास्तरावर टास्क फोर्सची स्थापना केली आहे. यामध्ये मुख्यत्वेकरून दोन्ही पालक कोविडमुळे दवाखान्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या मुलांचा ताबा कुणाकडे द्यायचा याबाबतची माहिती पालकांकडून घेणे, अनाथ मुलांच्या संगोपनाची जबाबदारी घेणे, त्यांच्या आरोग्याची, शिक्षणाची काळजी घेणे आदी बाबींचा समावेश आहे” – महिला व बालविकास प्रधान सचिव श्रीमती आय.ए.कुंदन..

भाईंदर पूर्वेकडील गोडदेव ग्रामस्थांकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

संपादक: मोईन सय्यद / भाईंदर, प्रतिनिधी:

भाईंदर पूर्व येथील गोडदेव गावातील ओम ब्रह्मदेव मास्टर्स क्रिकेट मंडळाकडून भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करून तब्बल रक्ताच्या १०८ पिशव्या गोळ्या केल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे देवींची जत्रा रद्द करून इतक्या मोठ्या प्रमाणात रक्त जमा करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भाईंदर पूर्व परिसरातील गोडदेव परिसरात गावदेवी मातेचे जागरूक देवस्थान आहे. दरवर्षी मे महिन्यात या गावात देवींची यात्रा भरवण्यात येते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून देशात करोनाचे संकट असल्यामुळे सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात बंदी घालण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या संकटामुळे या वर्षी देखील देवींची यात्रा रद्द करण्याचा निर्णय येथील ग्रामस्थांनी घेतला होता. मात्र राज्यात गंभीर प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे यंदा क्रिकेट मंडळाकडून रक्त दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे या रक्तदान शिबीराकरिता या क्रिकेट पटूंनी पुढाकार घेतला होता. त्यात तब्बल पुरुष आणि महिलांनी मिळून तब्बल १०८ रक्त पिशव्या जमा केल्या आहेत. या शिबिराचे आयोजित महेश म्हात्रे यांच्या कडून करण्यात आले.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची ‘ए.सी.बी’ चौकशी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या तीन स्वतंत्र तक्रारींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ए.सी.बी) गोपनीय चौकशी सुरू केली आहे. चौकशीदरम्यान तक्रारीतील आरोपांत तथ्य आढळल्यास सिंग यांच्याविरोधात खुली चौकशी सुरू होऊ शकते किंवा त्यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याबद्दल गुन्हा नोंदवून तपास केला जाऊ शकेल.
पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे, सहायक निरीक्षक अनुप डांगे आणि सट्टेबाज सोनू जालान यांनी सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. डांगे यांनी केलेल्या आरोपानुसार, गावदेवी पोलीस ठाण्यात असताना एका पबवर कारवाई आणि पब चालकाविरोधात गुन्हा नोंदविल्याने त्यांना निलंबित केले. निलंबन रद्द करण्यासाठी सिंग यांच्या नातेवाईकाने दोन कोटी रुपयांची मागणी केली.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतील अधिकाऱ्यांविरोधात एका फसवणूक प्रकरणात भक्कम पुरावे असूनही सिंग यांनी ते दडपले.शिवाय ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी अनेक गैरप्रकार करून बेहिशेबी मालमत्ता जमा केली, असा आरोप घाडगे यांनी केला. त्यांच्या तक्रारीवरून सिंग यांच्यासह ३२ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. सट्टेबाज सोनू जालान याने केलेल्या आरोपानुसार, सिंग, निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्याला खोट्या प्रकरणात अडकवले. अटकेची भीती घालून १० कोटींच्या खंडणीची मागणी केली. त्यापैकी तीन कोटी रुपये उकळले. जालान याने वरळी येथे पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचा पुनरुच्चार केला. तसेच सट्टेबाजी प्रकरणात बॉलीवूडमधील अभिनेत्यांकडूनही सिंग आणि त्यांच्या साथीदारांनी कोटय़वधींची खंडणी उकळली, असा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशात होऊ शकतं मग महाराष्ट्रात का नाही ?; लसीकरणात स्थानिकांना प्राधान्य द्या..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्रा राज्यत कोरोनाची भयंकर परिस्थिती समोर आहे. दिवसाला सरासरी ५० हजारांपेक्षा अधिक लोक कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. या महामारीपासून वाचण्यासाठी लसीकरण मोहिमेवर भर दिला पाहिजे. मात्र उपलब्ध लसीच्या साठ्यावर मर्यादा असल्याने अनेक लोकांना लसीकरणापासून वंचित राहावं लागत आहे. देशात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सगळ्यांना लस देण्याची घोषणा करण्यात आली. राज्यातही १८ वर्षावरील लोकांच्या लसीकरणाला सुरूवात झाली आहे पण म्हणावा तसा वेग यात आला नाही.

केंद्राने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारवर टाकली आहे. या वयोगटात राज्यात साडे पाच कोटींहून अधिक नागरिक आहेत. या सर्व लोकांसाठी १२ कोटी लस खरेदी करण्याची तयारी राज्य सरकारची असली तरी लस उपलब्ध होणं हाच मोठा चिंतेचा विषय आहे. सध्या राज्यात दुसरा डोस देण्यासाठी साडे चार लाख डोस कमी पडतायेत असं कळालं. आजही लोकांनी नोंदणी केली आहे परंतु त्यांना स्लॉट उपलब्ध होत नाही. अनेकदा हे स्लॉट आधीच बूक झाल्याचं निदर्शनास येते.

या सर्व गोष्टी पाहता उत्तर प्रदेश सरकारने फक्त त्यांच्या नागरिकांनाच लस देण्याचा जो निर्णय घेतला आहे. तसाच निर्णय महाराष्ट्र सरकारनेही घ्यावा अशी विनंती आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, यासाठी लसीचे डोस खरेदी करण्याची जबाबदारीही राज्य सरकारवर असेल तर या लसीकरणासाठी स्थानिकांनाच प्राधान्य का देण्यात येऊ नये ? जर यूपी सरकार स्थानिकांना लस देण्याचा निर्णय घेऊ शकतं मग महाराष्ट्र सरकारनेही याचा विचार करायला हवा. राज्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात लसीचे डोस कमी प्रमाणात आहेत. अशावेळी ज्यांच्याकडे स्थानिक पत्ता असलेले ओळखपत्र असेल अशाच लोकांना लस देण्यासाठी प्राधान्य द्यावं अशी मागणी स्थानिक १८ ते ४४ वयोगटातील लोकं मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना करत आहे.