Home Blog Page 267

ठाणे पोलीस आयुक्त कोण? यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर झाले मनोमिलन

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या बदलीनंतर ही गेले काही दिवस रिक्त असलेल्या पोलीस आयुक्त पदी अखेर भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ पोलीस अधिकारी जय जीत सिंह यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. जयजित सिंह यांच्या नियुक्तीवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अखेर समन्वय घडून आल्यामुळे त्यांच्या ठाणे पोलीस आयुक्त पदाच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

जय जित सिंग हे भारतीय पोलिस सेवेच्या १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये जय जीत सिंग यांची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावरून महाराष्ट्र राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदी करण्यात आली होती. गेल्याच आठवड्यात ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नियुक्ती महाराष्ट्र पोलिसांच्या गृहनिर्माण मंडळात करण्यात आली. त्यावेळेपासूनच महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख असलेले जयजीत सिंह यांच्या नावाची चर्चा ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी होत होती. तथापि जय जित सिंह यांच्या नावाबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांमध्ये एकवाक्यता होत नव्हती.

ठाकरे सरकार मधील खातेवाटपात गृहखाते राष्ट्रवादी च्या ताब्यात असल्यामुळे या खात्यातील नियुक्त्या, बदल्या या राष्ट्रवादी मार्फतच करण्यात याव्यात असा राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचा आग्रह होता. तर दुसरीकडे शिवसेनेतील वजनदार मंत्री हे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्रिपद ज्या पक्षाकडे आहे त्यांनी केलेल्या शिफारशी विचारात घेऊन गृह खात्यातील नियुक्‍त्या तसेच बदल्या करण्यात याव्यात याबाबत आग्रही होते. अखेरीस आज याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये चर्चेअंती मनोमिलन होऊन त्यानुसार ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी जय जित सिंह यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसातच जगजित सिंह यांच्या नियुक्तीचे आदेश निघतील असे प्रसिद्धीमाध्यमांना सांगण्यात येत आहे.

जागतिक परिचारीका दिनानिमित्त मिरारोड वोक्हार्ट हॉस्पीटलमध्ये परीचारीकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणा-या उपक्रमाचे आयोजन

संपादक: मोईन सय्यद / मुंबई, प्रतिनिधी

उपक्रमातंर्गत १०३० परिचारीकांच्या कार्याचा गौरव करित सन्मानित करण्यात आले

मिरारोड: वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत जागतिक परिचारिका दिनानिमित्त वोक्हार्ट ग्रुप हॉस्पिटल्सच्या वतीने सुमारे १०३० परिचारीकांना सन्मानित केले. मीरा रोड तसेच इतर भागातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा उपक्रम राबवित परिचारीका दिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादीत न ठेवता आठवडाभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या वर्षीचा आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन हा व्हॉईस टू लीड (नेतृत्वाचा आवाज) या संकल्पनेवर आधारीत होता. भविष्यातील आरोग्य सेवेसाठी एक दृष्टी ठेवत कोणत्याही परिस्थितीत अविरत रूग्ण सेवा करण्याचे वचन यावेळी देण्यात आले.

कोरोना सारख्या संकट काळातही अहोरात्र रुग्णसेवा पुरविणा-या ख-या अर्थाने कोव्हीड वॉरिअर्स ठरलेल्या परिचारीकांची भूमिक खरोखरच वाखण्याजोगी आहे. याच परिचारीकांच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपुर्ण आठवडाभर गायन स्पर्धा, सेल्फी काढणे, विविध कलागुण सादर करणे, नृत्याविष्कार आदी उपक्रमांचे आयोजन हॉस्पीटलच्या वतीने करण्यात आले होते. वाँक्खार्ट हॉस्पिटल सोबोच्या एलिझाबेथ जोसेफ यांची सर्व परिचारीकांच्या वतीने प्रतिज्ञा घेतली. तर वोक्हार्ट हॉस्पिटल्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर तसेच क्लिनिकल डायरेक्टर डॉ क्लाईव्ह फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले. या क्षेत्रात पाच वर्षाहून अधिक काळ सेवा पुरविणा-या परिचारीकांना सोन्याचे नाणे भेट देत विशेष सत्कार करण्यात आला.

वाँक्हार्ट हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालक जहाबिया खोराकीवाला सांगतात हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे दिवसरात्र रुग्णसेवेकरिता कार्यरत असलेल्या परिचारींकाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे होय. या महामारीच्या काळात संकटाशी लढणा-या रूग्णांना मानसिक आधार देणे, त्यांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवित त्यांची काळजी घेणे, त्यांच्या सुरक्षिततेबाबत खात्री करून घेणे अशा अनेक प्रकारे परिचारीकां आपआपली भूमिका बजावित आहेत आणि यापुढेही बजावणार आहेत. या परिचारीकांना समाजात आदराचे स्थान मिळावे तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक व्हावे, याकरिता अशाप्रकारचा उपक्रम राबविण्यात आला होता.

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अखंड रुग्णसेवा पुरविणा-या या परिचारीकांच्या कार्याला सलाम करत कोरोना सारख्या संकटाला लढा देण्याकरिता महत्त्वाची भूमिका बजाविणा-या या परिचारीकांचा आम्हाला खुप अभिमान वाटतो. रुग्ण सेवा करताना कसलाही भेदभाव न करता रुग्णांना अविरत सेवा पुरविणा-या परिचारीका या आरोग्यसेवेचा महत्त्वाचा भाग आहे असे प्रतिपादन डॉ. क्लाईव्ह फर्नांडिस, वाँक्हार्ट हॉस्पिटलमधील ग्रुप क्लिनिकल डायरेक्टर यांनी केले.

राज्यातील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा! – देवेंद्र फडणवीस

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधूत सावंत

राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, देशातील सुमारे 12 राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल.

या कोरोना साथीच्या काळात रूग्णालयात जाऊन, स्मशानभूमीत जाऊन, जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून हे पत्रकार बांधव या काळात काम करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असे असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची सुद्धा आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावे लागते. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावे लागते. यासंदर्भातील निर्णय तत्काळ आणि विनाविलंब करावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मासेमारीच्या बोटीतून हातभट्टी दारूची तस्करी; उत्तन सागरी पोलिसांनी केली मच्छिमार दाम्पत्यास अटक

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी

मासेमारीच्या बोटीतुन हातभट्टीच्या गावठी दारूची तस्करी केली जात असल्याच्या प्रकार उत्तन सागरी पोलिसांनी उघडकीस आणला असून खोल समुद्रात जाऊन पोलिसांनी कारवाई करून मासेमारीच्या बोटीसह मच्छीमार दाम्पत्यास अटक केली आहे.

एक इसम हा बोटीद्वारे गावठी हातभट्टीची दारु उत्तन येथे विक्री करीता आणणार असल्याची माहिती उत्तन सागरी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई गौरव साळवी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती, माहितीची शहानिशा केल्यानंतर उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी रात्री उप निरीक्षक कुरवाड व उबाळे सह साळवी आदींचे पथक भुतोडी बंदर येथे पोहचले. हातभट्टीची दारु असलेली बोट ही समुद्रात असल्याचे कळताच तेथे जाण्यासाठी मच्छीमार सुप्रीयन जुरान यांची रहस्यमय ही मासेमारी बोट घेऊन पोलीस पथक समुद्रात गेले.

समुद्रात उभी असलेली सहारा उर्फ चल बेटा ह्या मच्छीमार बोटीवर रात्री पावणे दहाच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी बोटीत असलेला राजेश डमनिक नुन हा छोट्या होडीच्या सहाय्याने पळून गेला. सदर बोटीवर पोलिसांना ४ मोठ्या कॅन मध्ये भरलेली हातभट्टीची ४१० लिटर इतकी दारू आढळून आली. पोलिसांनी दारूचा साठा व ५ लाख किमतीची मासेमारी बोट जप्त केली. सदर बोट हि राजेश व त्याची पत्नी प्रज्ञा नून ह्या दोघांच्या मालकीची असल्याने उत्तन पोलिसांनी नून दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मासेमारीसाठीच्या बोटीतून कायदयाने बंदी असून देखील जीवघेण्या हातभट्टीच्या दारूची तस्करी केली जात असल्याने उत्तन परिसरातील मच्छीमारांनी संताप व्यक्त केला असून आरोपीना बेड्या ठोकून बोटीचा परवाना कायमचा रद्द करावा अशी मागणी मच्छीमार नागरिकांकडून केली जात आहे.

कोविड झालेल्या रुग्णांनी घाबरून जाऊ नये; डॉक्टरांनी देखील स्टिरॉइडचा वापर नियंत्रित स्वरूपात करावा – डॉ.अश्विनी पाटील

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोविड होऊन गेलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसीस (Mucormycosis) हा आजार आढळून येत आहे .

म्यूकरमायकोसीस हा संधीसाधू संसर्गाचा (Opportunistic Infection) प्रकार असून तो एक प्रकारच्या बुरशी (Fungus) पासून होतो. सदर आजार हा नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी असलेल्या विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे.

या आजाराची लक्षणे :-
1. डोळ्याच्या आजूबाजूला दुखणे व डोळा लालसर होणे..
2. ताप..
3. डोकेदुखी..
4. खोकला..
5. श्वास घेण्यास त्रास होणे रक्ताची उलटी होणे..
6. भमिष्ठावस्था (Altered Sensorium) ही असून..

1. अनियंत्रित मधुमेह..
2. स्टेरॉईड चालू असल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्ती..
3. जास्त काळ आयसीयूमध्ये दाखल असलेले रुग्ण..
4. किडनी ट्रान्सप्लांट / कॅन्सर इ. आजारामुळे रोग प्रतिकार शक्ती कमी झालेले रुग्ण अशा रुग्णांमध्ये हा आजार आढळून येतो.

सध्यास्थितीत कोविड आजारामुळे उपचारासाठी स्टेरॉईडस आणि इतर इम्युनिटी कमी करणारी औषधे जास्त प्रमाणात वापरले आहेत. तसेच ICU मध्ये जास्त काळ दाखल रहावे लागत आहे, त्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे.

सध्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात या आजाराचे ६ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून त्यापैकी २ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत, आतापर्यंत २ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यापैकी १ रुग्ण डोंबिवली पूर्व येथील असून १ रुग्ण म्हारळगाव ठाणे ग्रामीण येथील आहे.

तरी कोविड मधून बऱ्या झालेल्या रुग्णांनी घाबरून न जाता वरील लक्षणे आढळल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी पाटील यांचे मार्फत करण्यात येत आहे.