Home Blog Page 27

डोंबिवली शाखेची वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली वाहतूक उपविभागाअंतर्गत म्हसोबा चौक,९० फिट रोड, डोंबिवली पुर्व या ठिकाणी दिनांक २४/०६/२०२३ रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान मा. डॉ.श्री विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त, वाहतूकविभाग ठाणे शहर यांचे आदेशाने फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई करण्यात आली असून मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.

विदाऊट हेल्मेट – ४९, विदाऊट सीट बेल्ट २२, जम्पिंग सिग्नल ०६, ब्लॅक स्क्रीन फिल्म ०१, ट्रिपल सीट ०४, फ्रंट सीट ०३, गणवेश न घालने ०३ व इतर ९४ अशा एकूण १८२ कसूरदार वाहनचालकावर कारवाई करून रुपये १,०३,१५०/- इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी रूपये ७२,९००/- दंड जागीच रोख वसूल करण्यात आला आहे.

या कारवाई मध्ये डोंबिवली वाहतूक विभागाचे ०१ अधिकारी, ०९ पोलीस अंमलदार व ०८ वॉर्डन तसेच कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे ०२ अंमलदार, ०१ वॉर्डन व कल्याण वाहतूक उपविभागाचे ०२ पोलीस अंमलदार असे एकूण ०१ अधिकारी, १३ अंमलदार, ०९ वॉर्डन या कारवाई दरम्याम हजर होते. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सीसीटिव्ही कॅमेराद्वारे वाहतूक विभागाकडून ई-चलन कारवाई सुरू करण्यात आली असून सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली असे डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

 

लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाचे संग्रहालय आणि स्कील सेंटर पनवेलमध्ये साकारले जाणार..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या नावाने पनवेलमध्ये म्युझियम साकारण्यात येईल, त्यासाठी पर्यटन विभागातर्फे पाच कोटी रुपये तरतूदीची तसेच येथील बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी लवकरच एक चांगले स्किल सेंटर उभे करण्याची घोषणा राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पनवेल येथे केली. भूमीपुत्रांचे दैवत स्वर्गीय दि.बा.पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग, लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती, श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर म्हणून लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार, पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विजय टिकोले, सुप्रिया ठाकूर, पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष अतुल पाटील, उपाध्यक्ष जे. डी. तांडेल, अरुणशेठ भगत, उद्योजक जे.एम.म्हात्रे, गुलाब वझे, दीपक म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनीही या महारोजगार मेळाव्याला भेट देऊन उपस्थित युवा वर्गाला शुभेच्छा दिल्या. मंत्री मंगलप्रभात लोढा पुढे म्हणाले की, लोकनेते दि.बा.पाटील यांचे स्थानिक जनतेसाठी व महाराष्ट्रासाठी फार मोठे योगदान आहे. ते लक्षात घेता त्यांची संघर्षगाथा संग्रहालयाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या माध्यमातून विविध नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. त्या मिळणे स्थानिकांचा हक्क आहे. त्यासाठी येथे ३० दिवसांच्या आत स्कील सेंटर उभे करू, असे सांगून राज्यात या शासनाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रात सातशेपेक्षा जास्त रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. आज पनवेलमध्येही रोजगार मेळावा होत आहे. येथे बेरोजगार उमेदवारांना नोकरी- रोजगारासाठी उपस्थित अधिकारी सर्व माहिती देतील. शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा स्वयंरोजगारासाठी कर्ज हवे असेल तर आमची जबाबदारी आहे की, त्यासाठी योग्य मार्गदर्शन करून तुम्हाला ते मिळवून देणे. या मेळाव्यानंतरही तुम्हाला जे काही सहकार्य हवे असेल ते आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी करतीलच. लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे यासाठी लढा उभारण्यात आला होता. त्या अंतर्गत झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी लोकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत मीही आहे. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

यावेळी सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, लोकनेते दि.बा.पाटील यांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही. त्यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्त, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले. जनतेचे हक्क अबाधित राहिले पाहिजेत, त्यांची प्रगती झाली पाहिजे यासाठी त्यांनी वेळोवेळी संघर्ष केला. लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, याकरिता येथील भूमीपुत्रांनी ऐतिहासिक लढा दिला आणि त्याला यश मिळाले असून या विमानतळाला राज्य सरकारने ‘दिबां’चे नाव देण्याचे जाहीरही केले आहे. आता यासाठी समितीमार्फत पुढील पाठपुरावा केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.

कृती समितीचे सल्लागार व माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार महेश बालदी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करून महारोजगर मेळाव्यानिमित्त उपस्थित तरुणांना शुभेच्छा दिल्या.
या महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध ३८ कंपन्यांकडून २ हजार ३९९ रिक्त पदांसाठी उमेदवारांची मागणी नोंदविण्यात आली होती. तर या मेळाव्यास ६५१ बेरोजगार युवकांनी नावे नोंदविली होती. मुलाखत १ हजार १२४ जणांनी दिली तर एकूण २७२ जणांची प्राथमिक निवड करण्यात आली, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या ठिकाणी आयोजित रक्तदान शिबिराला भेट देत ‘दिबां’ना अभिवादन केले. शेवटी जे.डी.तांडेल यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमानंतर लोकनेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी आणि अन्य मान्यवरांनी लोकनेते स्व. दि.बा.पाटील यांच्या पनवेल येथील घरी जाऊन त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

 

मुंबई महापालिकेच्या एसआयटी चौकशीतून अनेक उघडे होतील; देवेंद्र फडणवीस


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आहे आणि अनेक जण उघडे पडणार आहेत, त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरेंचा आक्रोश मी समजू शकतो. त्यांच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिकेत १२,५०० कोटींचा जो भ्रष्टाचार झाला, त्यावर कॅगने ताशेरे ओढले. त्यावर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्या चौकशीतून अनेकांचे बुरखे फाटणार आहेत आणि अनेक जण उघडे सुद्धा होतील. उद्धव ठाकरेंच्या आशिर्वादात जी गँग काम करीत होती, त्या गँगचे आता काही खरे नाही, असे त्यांना वाटत असल्याने, त्यांचा आक्रोश स्वाभाविक आहे. या आक्रोशातून त्यांनी केलेल्या विधानावर काय प्रतिक्रिया द्यायची, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई महापालिकेवर मोर्चा हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, दुसरे काही नाही. प्रकाश आंबेडकर हे ठाकरे गटासोबत युतीत आहेत आणि ते औरंगजेबाच्या मजारीवर जातात. औरंगजेबाचे महीमामंडन करतात, त्याला उद्धव ठाकरेंचे समर्थन आहे का ? काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन त्यांना या सार्‍या बाबी आता चांगल्या वाटत असतील, असेही देवेंद्र फडणवीस प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना म्हणाले.

 

जनधन योजने अंतर्गत अर्ज केल्यास खातेदारांना मिळणार १० हजार रुपये..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

प्रधानमंत्री जन धन योजने अंतर्गत १०,०००/- रुपये कसे मिळवायचे व तुम्ही जन धन खाते देखील उघडले आहे का ? त्यामुळे तुम्हाला सरकारकडून ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळत आहे! या सुविधेअंतर्गत तुमच्या खात्यात एक रुपयाही नसेल तरीही तुम्ही १०,०००/- रुपये काढू शकता ! याआधी फक्त ५००० रुपये ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध होती. पण पीएम जन धन योजने मध्ये सरकारने ही मर्यादा रुपये १०,०००/- पर्यंत वाढवली होती.

पीएम जनधन खातेधारकांना सरकार अनेक सुविधा पुरवते, ज्यामध्ये खातेदाराला १ लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. याशिवाय ३० हजार रुपयांचे आयुर्विमा संरक्षणही दिले जाते. एखाद्या खातेदाराचा अपघातात मृत्यू झाला तर त्यामुळे प्रधानमंत्री जन धन योजना खातेदाराच्या कुटुंबाला १ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते! दुसरीकडे, सामान्य परिस्थितीत मृत्यू झाल्यास, ३०,००० रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

पीएम जन धन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील उपलब्ध आहे. तुमच्याकडे पीएम जन धन खाते असल्यास तुम्ही ओव्हरड्राफ्टद्वारे तुमच्या खात्यातून १०,००० रुपये काढू शकता. परंतु जनधन खात्याची काही महिने योग्य देखभाल केल्यानंतरच ही सुविधा उपलब्ध होते. एका नवीन अहवालानुसार, सरकार जन धन खात्यांवरील ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवू शकते. याशिवाय इतर बचत खात्यांवरही ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाऊ शकते. यासोबतच लॉकडाऊनमध्ये अशा लोकांना फायदा मिळवून देण्याचा सरकारचा उद्देश आहे. ज्यांना मोफत रेशन आणि प्रधानमंत्री जन धन योजना खात्यात सिलिंडर किंवा पैसे मिळालेले नाहीत.

मुख्यमंत्र्यांची एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही निर्णय घेण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी एसटीचे आधुनिकीकरण करून या लोकवाहिनीला सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी आमदार भरत गोगावले,‘एसटी’चे सदिच्छादूत तथा अभिनेते मकरंद अनासपुरे, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया, ‘एसटी’चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त भिमनवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘एसटीचे अमृत महोत्सवी वर्ष’ व ‘देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष’ हा दुग्ध शर्करा योग आहे. एसटीचा ७५ वर्षांचा प्रदीर्घ प्रवास झाला असून ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. एसटी महामंडळाने ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीदवाक्याप्रमाने काम करावे. गुणवत्तापूर्वक व लोकाभिमुख एसटीची सेवा असली पाहिजे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना ५० टक्के प्रवास सवलत अशा योजनांना प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, की शासन हे लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे असावे, कायदा पण लोकांच्या हिताचाच असावा. शासनाने मागील काळात लोक हिताचे अनेक निर्णय घेतले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीसाठी शेतकऱ्यांना १५०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. राज्यात मेट्रो प्रकल्प, रस्ते निर्मिती आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध पर्याय शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी महामंडळाने पर्याप्त बसेसची व्यवस्था केलेली आहे. राज्यातील एसटी बस स्थानकांमध्ये कॉंक्रिटीकरण पूर्ण करून ‘बसपोर्ट’ ही संकल्पना राबविण्यात यावी. त्यासाठी पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल. एसटीच्या जमिनीचे मूल्यवर्धन करून त्यावर महामंडळाने उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करावे.

प्रवाशी हे एसटीसाठी सर्वस्व असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, एसटीचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचे काम शासन करीत आहे. नवीन इलेक्ट्रिक बसेस, वातानुकूलित बसेस महामंडळाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येत आहे. महामंडळाच्या ताफ्यात लवकरच ७ हजार बसेस येणार आहेत. तसेच बस स्थानकांवर जमिन उपलब्धतेनुसार मराठी चित्रपटांसाठी मिनी थिएटर ही नवीन संकल्पना राबविण्यात येईल. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. एसटी बसेस स्वच्छ, बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.चन्ने यांनी एसटीच्या विविध योजना व आतापर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली. सदिच्छा दूत मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या जडणघडणीत एसटीचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे ते नगर या पहिल्या बसचे वाहक स्व. केवट यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ‘अमृत महोत्सव महाराष्ट्राचा लोकवाहिनीचा’ कॉफी टेबलबुक चे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच २५ वर्ष सतत विना अपघात सेवा देणाऱ्या पाच चालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये आर्वी आगाराचे एजाज खान इस्माईल खान, तळेगाव जि. वर्धा आगाराचे विलास नाथे, नईमुद्दीमु काझी, धुळे आगाराचे भाऊसाहेब सूर्यवंशी व लासलगाव येथील मेहमूद चौधरी यांचा समावेश आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील तीन विभागांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जळगाव, जालना व भंडारा विभागांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहादा, कराड, बीड, अंबड, जामनेर, चोपडा, राळेगाव, सोयगाव व दिग्रस आगारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. एसटीचे विविध योजना व माहिती देणाऱ्या फिरते प्रदर्शन विश्वरथचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

थोडक्यात एसटी..

राज्यातील ३८ हजार खेड्यांना एसटीने जोडले असून ९७ टक्के जनतेपर्यंत एसटी पोहोचली आहे. एसटी कडे १६ हजार ५० बसेस असून २५० आगार आणि ५८० बस स्थानके आहेत. एसटी तर्फे रोज ५३ लाख प्रवाशांची ने-आण करते. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे, तर महिला सन्मान योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसमध्ये ५० टक्के तिकीट दरात सवलत देण्यात येत आहे. तसेच ‘अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजने’अंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरापासून शाळेपर्यंत मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे.