Home Blog Page 26

‘डोंबिवली डायमंड्स रोटरी क्लब’च्या वतीने नामवंत पत्रकारांचा गुणगौरव समारंभ संपन्न..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने दिनांक २२ जुलै २०२३ रोजी डोंबिवली पूर्वेकडील फडके रोड गणेश मंदिर संस्थान येथील वरद सभागृह येथे डोंबिवलीतील नामवंत पत्रकारांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

‘दै. प्रहार’ चे जेष्ठ पत्रकार बापु वैद्य, केंद्रीय पत्रकार संघाचे तालुका संघटक तसेच साप्ताहिक ‘न्याय रणभूमी’, ‘अंतिम न्याय’ व ‘लोकहीत न्यूज’ चे धडाडीचे राष्ट्रीय पदक विजेता पत्रकार अवधुत सावंत, साप्ताहिक ‘आपला भगवा’,’राजमुद्रा’ च्या संपादिका सारिका शिंदे, ‘डोंबिवली फास्ट न्यूज’ चे किशोर पगारे, ‘दै. लोकमत’ चे प्रशांत माने, ‘पुढारी ऑनलाईन’ च्या भाग्यश्री प्रधान आचार्य, ‘आज तक’ चे मिथीलेश गुप्ता, ‘तरुण भारत ऑनलाईन’ च्या जान्हवी मौर्य, ‘क्राईम बॉर्डर’ चे संपादक राजेंद्र वखरे, ‘दै.मुंबई चौफेर’ व ‘वृत्तमनास’ चे श्रीराम कांदू व दै. लोकसत्ता’ चे भगवान मंडलिक या सर्व पत्रकारांचा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स च्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी किशोर पगारे, सारिका शिंदे, भाग्यश्री प्रधान आचार्य, राजेंद्र वखरे या पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले .

त्याचबरोबर सतत पडणाऱ्या पावसातही आपल्याला सकाळी वेळेवर वर्तमानपत्र पोहचविणार्‍या मुलांना ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’ तर्फे रेनकोट देण्यात आले. तसेच पावसाळ्यात भर पावसातही प्लास्टिक कागदाच्या आडोशाने भाज्यांचा बचाव करत आपल्याला ताज्या भाज्या उपलब्ध करून देणाऱ्या काही गरजू भाजी विक्रेत्यांना क्लब तर्फे मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पराग धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन पराग धर्माधिकारी यांनी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’ करत असलेल्या कार्याची थोडक्यात माहिती उपस्थितांसमोर दिली. क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले यांनी जागरूक समाज घडविण्याच्या पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे सांगत त्यांच्या निरपेक्ष कार्याची स्तुती करत कौतुक केले व असेच कार्य निरंतर करत राहण्यासाठी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स’ च्या वतीने शुभेच्छा दिल्या.

सदर कार्यक्रमास अध्यक्ष रोटेरियन निलेश गोखले, मानद सचिव रोटेरियन जगदिश तांबट , क्लबचे संस्थापक रोटेरियन राजेश कदम, रोटेरियन संजय टेंभे, प्रकल्प प्रमुख रोटेरियन मनोज क्षिरसागर, प्रकल्प प्रमुख रोटेरियन सुदिप साळवी, रोटेरियन साधना साळवी, रोटेरियन उमेश स्थुल उपस्थित होते.

विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेने कायद्याचा दुरुपयोग करून सासरच्या मंडळींवर दाखल केला 498A अंतर्गत खोटा गुन्हा दाखल!

लातूर, प्रतिनिधी: भारतीय संविधानाला केंद्रस्थानी ठेऊन भारत देशाच्या प्रत्येक थरातील नागरिकांना न्याय देण्याच्या उद्देशाने देशात अनेक कायदे व नियम बनविले जातात परंतु पुढे जाऊन त्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याची अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळत आहेत. हुंडाबळी आणि महिलांवरील घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग करणारी अशीच घटना महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे घडलेली आहे. एक वर्षांपूर्वी स्वतःच्या मानमर्जीने घटस्फोट घेतलेल्या एका मुस्लिम महिलेने आपल्या वडिल्यांच्या मदतीने आकसाने सासरच्या पाच लोकांवर हुंडा मागून शारीरिक आणि मानसिक अत्याचार केल्याची खोटी तक्रार दाखल केली असून त्या तक्रारीनुसार किनगाव पोलीस ठाण्यात कलम 498A नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणाची हकीगत अशी आहे कि, अहमदपूर तालुक्यातील अंधोरी येथील मूळची राहणारी अफसाना अल्ताफ शेख नावाच्या महिलेचे 2018 साली मौजे खडी, तालुका पालम, जिल्हा परभणी या गावातील अल्ताफ शेख नावाच्या तरुणाशी मुस्लिम धर्माच्या रितीरिवाजा प्रमाणे नातेवाईक-मित्रमंडीळीच्या साक्षीने लग्न झाले. काही काळ त्यांचा संसार सुखाने चालू असताना त्या दाम्पत्याला एक गोंडस मुलगा जन्माला आला. त्यानंतर हि महिला आपल्या सासरच्या गावी मौजे खडी येथे सासू सैयदा आणि सासरा अजीज शेख यांच्या सोबत राहू लागली. नवरा अल्ताफ याने आपल्या उदरनिर्वाहासाठी मारुती डिजायर गाडी खरेदी करून ती भाड्याने चालवू लागला. गाडी भाड्याने चालवीत असताना त्याला सतत दोन-दोन तीन -तीन दिवस बाहेर गावी जावे लागत असे तर सासू-सासरे दिवसभर आपल्या शेताच्या कामानिमित्ताने शेतातच राहत होते.

अशा वेळी अफसाना नावाची हि महिला घरात लहान मुलासोबत एकटीच राहत असे. असे असताना अफसाना हिचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले आणि गेले अनेक दिवसांपासून त्यांचे अनैतिक संबंध चालू होते. दोन-तीन दिवसांनी जेव्हा तिचा नवरा अल्ताफ बाहेरून घरी येत असे तेव्हा ती नवऱ्याशी नीट वागत नव्हती, नवऱ्याकडे जास्त लक्ष देत नव्हती तेव्हा नवऱ्याला तिच्या चारित्र्याबद्दल संशय येऊ लागला आणि म्हणून नवऱ्याने तिच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आणि एके दिवशी त्या अफसाना नावाच्या महिलेला गावातील तरुणासोबत रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर अफसाना हिने रागाच्या भरात बोलली कि “तू मला शारीरिक सुख देऊ शकत नाही! मला तुझ्यासोबत राहायचे नाही तू मला घटस्फोट दे” असे सांगितले.

घडलेल्या ह्या सर्व प्रकारानंतर गावात माझी बदनामी झाली म्हणून अल्ताफ हा निराश होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु गावातील काही लोकांनी वेळीच त्याला पकडून त्याची समजूत काढली आणि त्या दोघात समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तरी देखील अफसाना नावाची ती महिला नवऱ्यासोबत राहायला तयार झाली नाही. एव्हढेच काय तर त्यावेळी तिच्या वडिलांनी देखील तिला घरात घेण्यास नकार दिला होता. “तुम्हाला काय करायचे ते करा! आता ती आमच्यासाठी मेली आहे” असे तिचे वडील त्यावेळी बोलत होते.

काही दिवसानंतर तिने नवऱ्याला सोबत घेऊन जाऊन मुस्लिम धर्मियांचे शरीरयत कोर्ट ‘दारुल कझा’ नांदेड येथे गेली आणि तिथे स्वखुषीने ‘खुलनामा’ लिहून देऊन घटस्फोट घेतला. त्यानंतर नांदेड येथेच कोर्टात जाऊन एक शपथपत्र देखील लिहून दिले आणि त्या शपथपत्रात तिने मान्य केले आहे कि तिचे एका तरुणाशी अनैतिक संबंध जुळले असून तिला नवऱ्यासोबत राहायचे नाही म्हणून ती स्वखुशीने घटस्फोट घेत आहे. तिला तिचा मुलगा जैद हा देखील नको आहे आणि काहीहि पोटगी, नुकसान भरपाई देखील नको आहे. त्याच बरोबर तिला सासरच्या कोणत्याही लोकांवर काही आक्षेप नाहीत किंवा काही तक्रार नाही आणि भविष्यात ती सासरच्या लोकांवर कोणत्याही पोलीस ठाण्यात कलम 498 नुसार किंवा हुंडाबळीची तक्रार करणार नाही असे शपथपत्रात लिहून दिले आहे.

अशी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घटस्फोट घेतल्यानंतर काही महिन्यानंतर ह्या महिलेने तिचे वडील मगदूम शेख यांच्या बळजबरीने सांगण्यावरून अहमदपूर येथील महिला तक्रार निवारण केंद्रात जाऊन सासरच्या लोकांविरोधात खोटी तक्रार केली. तेथे सुनावणी झाली असता सासरच्या लोकांनी सदरची संपूर्ण घटना संस्थेच्या लोकांना सांगितली आणि त्या तक्रारदार महिलेने स्वतःच्या मर्जीने घटस्फोट घेतला असल्याची सर्व कागदपत्रं दाखविले. महिला तक्रार निवारण केंद्रातील लोकांनी देखील नवरा-बायको दोघात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा समेट झाला नाही.

त्यानंतर काही महिन्यांनी त्या महिलेचे वडील मगदूम शेख यांनी किनगाव पोलीस ठाण्यात नवरा अल्ताफ शेख, सासू सैयदा शेख, सासरा अजीज शेख, मोठा दीर अहमद शेख आणि नणंद शमीम शेख यांचे विरुद्ध खोटी तक्रार दिली असून त्या तक्रारीत पाच तोळे सोने, चार लाख रुपये रोख आणि संसार उपयोगी वस्तू दिल्याची खोटी माहिती दिली आहे. एव्हढेच नव्हे तर सासरच्या लोकांनी जेसीबी घेण्यासाठी दहा लाख रुपये हुंडा मागितल्याची खोटी तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद क्र. 0162/2023 नुसार किनगांव पोलिसांनी सासरच्या पाच लोकांवर कलम 498, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.

या प्रकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे लग्नाच्या तब्बल पाच वर्षांनी हुंडा मागितल्याची खोटी तक्रार करण्यात आलेली आहे. तक्रारदार महिलेने आधी स्वतःहून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर जवळपास एक वर्षाने हि तक्रार केली आहे. त्याच बरोबर त्या महिलेची नणंद शमीम शेख हि मुंबईला राहत आहे तिचा ह्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तरी देखील तिला त्रास देण्याच्या उद्देशाने तिचे देखील नाव तक्रारीत टाकले आहे. त्यामुळे त्या महिलेने सासरच्या लोकांना खोट्या प्रकरणात अडकवून त्यांचे कडून दहा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा उद्देशानेच हि खोटी तक्रार केली असल्याचे बोलले जात आहे. एव्हढेच नव्हे तर किनगाव येथील काही बोगस पत्रकारांना हाताशी धरून तश्या बातम्या करून या प्रकरणात सासरच्या लोकांची खोटी बदनामी करून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

याबाबत सासरच्या लोकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला असून याबाबत लवकरच त्या अफसाना शेख, तिचे वडील आणि या प्रकरणात सामील असलेले बोगस पत्रकार यांच्या विरोधात लातूरचे पोलीस अधीक्षक सोबतच राज्याचे मुखमंत्री आणि राज्य मानवी हक्क आयोग यांचेकडे रीतसर तक्रार करून दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

“महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी देशात अनेक प्रभावी नियम व कायदे अमलांत आणले गेले आहेत. काही प्रकरणात महिलांना न्याय मिळावा हा त्यामागचा शुद्ध उद्देश्य असला तरी मात्र आता या कायद्याचा दुरुपयोगच जास्त केला जात असल्याचे दिसत असून अशा प्रकारे कायद्याचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे” असे निरीक्षण मा. सर्वोच्च न्यायालयाने 2015 साली आपल्या एका निरीक्षणात नमूद केले आहे. ह्या प्रकरणात देखील महिलेने केलेली तक्रार खोटी निष्पन्न झाल्यावर किनगाव पोलीस अफसाना नावाच्या त्या महिलेवर आणि तिचे वडील मगदूम शेख यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अजित पवार पुण्यातील घटनेनंतर गुन्हेगारांवर भयानक संतापले..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

पुण्यातील घटनेत प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ येथे प्राणघातक हल्ला केला. या घटनेत तरुणीही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग सुरू केला होता. तरुणापासून आपली जीव वाचवण्यासाठी ती तरुणी वाचवा… वाचवा… असा आक्रोश करुन भररस्त्यात धावत होती. त्याचवेळी, एक युवक जीवाची बाजी लावून पुढे सरसावला आणि आणखी एका तरुणाच्या मदतीने तरुणीचा जीव वाचला. या घटनेनं पुणे शहरासह महाराष्ट्र हादरला आहे. त्यावरुन, आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला आहे. गृहमंत्र्यांना वेळ नाही का? असा सवाल करत अजित पवार यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात फोफावल्याचं चित्र सध्या दिसत आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा अजिबात वचक राहिला नसल्याचं दिसतंय. दिवसाढवळ्या विद्यार्थिनींवर कोयत्यानं हल्ले होत आहेत. गृहमंत्र्यांना बहुधा राजकीय कलगीतुऱ्यातून कायदा व सुव्यव्यस्था हाताळायला वेळ मिळत नसावा. सुसंस्कृत म्हणून पूर्वापार ख्याती असलेलं पुणे शहर इतकं हिंस्त्र झालेलं यापूर्वी कधीच पाहिलं नाही, अशा शब्दात अजित पवारांनी तीव्र संताप व्यक्त केला. तसेच, या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असंही त्यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर म्हटलं.

 

‘मुंबईतील आषाढी एकादशी परंपरा’


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

महाराष्ट्र राज्य संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते, तर मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून पंढपूरच्या पांडुरंगाचा सोहळा म्हणजेच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. या आषाढी एकादशी वारीची फार मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पंढपूरला पायी जाण्याची परंपरा शतकानुशतके सुरु आहे. देशासह जगभरातील लाखो भाविक पंढरपूर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर, ग्यानबा-तुकारामांच्या जयघोषात ‘विठुरायाचे’ नामस्मरण करीत वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात लीन होतात. मुंबईत विशेषतः मध्य मुंबईच्या गिरणगावात विठ्ठल मंदिरासह काही ठिकाणी गेली अनेक वर्षे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी केली जाते. बदलत्या काळासोबत मुंबई बेटावरच्या रूढी व परंपरा अस्तंगत होत आहेत. वाड्यावस्त्यांची मुंबई गगनभेदी होत आकाशाला भिडत चालली आहे. मुंबईची जीवनशैली बदलली तरी काही महाराष्ट्रीयन परंपरा अजूनही टिकून आहेत. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेली श्री विठ्ठलाची मंदिरे आणि त्यात होणारे अखंड हरिनाम सप्ताह. १९८० नंतर मुंबईतील गिरण्या आणि कारखाने धडाधड बंद झाले. कष्टकरी मुंबईबाहेर फेकला गेला आणि त्याबरोबर गिरणगावातील चाळीचाळीतून उमटणाऱ्या आणि मंदिरातील भजनांच्या सुरावटी मंदावल्या. मुंबईतील गिरण्या आणि कारखाने बंद पडल्यानंतर कष्टकरी मुंबईकर एक तर उपनगरात फेकला गेला किंवा आपल्या गावाकडे परतला. त्यामुळे मुंबईच्या चाळीचाळीत आणि छोट्या मोठ्या मंदिरातून ऐकू येणारे भजन, मंजुळ स्वर मंदावले.

पूर्वी गिरणगावात बारश्यापासून ते लग्नाच्या सत्यनारायणाच्या पुजेपर्यंत त्यापुढे एखाद्या मृत्यूनंतर स्मशानापर्यंत ते उत्तरकार्याच्या दिवसापर्यंत भजन कीर्तन मोठ्या संख्येने होत असे. त्याची जागा आता बेंजो, डीजेच्या धांगडधिंगायने घेतली आहे. अशा परिस्थितीत मुंबईची भजन संस्कृती जगविण्यासाठी निष्ठेने जी थोडी मंडळी प्रयत्न करीत आहेत त्यांचे योगदान फार मोठे आहे. पारंपरिकतेची कास धरत काहीजण मुंबईचा हा ठेवा आपापल्या परीने जपत असल्याचे दिसून येत आहे. काळाच्या ओघात मुंबापुरीतील वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह क्षीण होत तर काही पडद्याआड जाऊ लागले आहेत.

मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ पेक्षा अधिक मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे मारुतीची, त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा तर देवींची मंदिरे हि पुरातन आहेत. विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तीची शंभर वर्षांहून अधिक वर्षे वारकरी परंपरा जोपासणारी अनेक मंदिर सुद्धा मुंबईत आहेत. प्रत्येक आषाढी एकादशीला टाळ मृदुंगाचा गजर आणि ‘ग्यानबा-तुकाराम’च्या जयघोषात तल्लीन वारकरी हेच दृश्य मुंबईतल्या मंदिरांमध्येही पहायला मिळतं. श्री विठ्ठल रखुमाई दैवताचे भौगोलिक स्थान मुंबई शहरात कुठे आहे आणि त्याठिकाणी काय पारमार्थिक कार्यक्रम होतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे.

वडाळा –
वडाळा बस डेपोजवळ, कात्रक रोडवरील श्री विठ्ठल मंदिर सर्वाना परिचित आहे. एकेकाळी या मिठागराच्या बेटावर व्यापारी असत. त्यातील एका व्यापाऱ्याला विठ्ठल-रखुमाई ची मूर्ती सापडली, त्यांनी ती पंढरपूरला संत तुकाराम महाराजांना दाखवली आणि त्यांनी मंदिर बांधण्यास सांगितले अशी आख्यायिका आहे. पुढे मुंबई विस्तारात गेली आणि या मंदिराचा लौकिक वाढू लागला. आषाढी एकादशीला सर्वदूर मुंबईतील हजारो भाविक भक्त दिंड्या-पताका घेऊन येथे येत असतात. मुंबईतील ज्या विठ्ठल भक्तांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून उभे आहे.

प्रभादेवी –
प्रभादेवी गावासाठी कै. हरी दामाजी परळकर यांच्या स्मरणार्थ त्यांची सून श्रीमती ताराबाई परळकर यांनी हे मुरारी घाग मार्गावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सन १९०० मध्ये हे मंदिर बांधले. गुरुवर्य अर्जुन मामा साळुंखे, गुरुवर्य नारायणदादा घाडगे, गुरुवर्य रामदादा घाडगे अश्या चार पिढ्या परमार्थ करीत आहेत. सन १९१५ च्या काळात हभप रामकृष्ण भावे महाराज मुंबईत ‘जगाच्या कल्याणा’ या ध्येयाने प्रेरित होऊन आले होते. रामभाऊ हे श्री विठ्ठलभक्त आणि सेवाधारी होते, हाकेच्या अंतरावरील बाळकृष्ण वासुदेव चाळीत असा सप्ताह उत्तमरीत्या पार पडल्याचे त्यांनी स्वतः अनुभवले होते. आपल्या आचार-विचाराव्दारे ‘जग लावावे सत्पथी’ हेच कार्य ठळकपणे करणाऱ्या भावे महाराजांना रामभाऊ नाईक भेटले आणि विनंती केली, आमच्या मंदिरात सात दिवसांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरु करावा. त्यांनी या सुचनेचे स्वागत केले आणि मग सन १९२१ पासून गोकूळ अष्टमी निमित्त श्रावण शुद्ध चतुर्थीपासून पुढे सात दिवसांचा दुसरा अखंड हरिनाम सप्ताह प्रभादेवीत सुरु झाला. त्याच मंदिरात पुढे काही काळानंतर माघ शुद्ध दशमी पासून सात दिवसांचा तिसरा अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला. भावे महाराजांनंतर गुरुवर्य अर्जुनमामा साळुंखे आणि गुरुवर्य हभप नारायणदादा घाडगे यांनी गुरुपदाची गादी सांभाळत महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गावोगावी श्री सद्गुरू भावे महाराज वारकरी समाजाचे पारमार्थिक कार्य अनेक अखंड हरिनाम सप्ताहाच्या मार्फत पोहोचवले आहे. सद्गुरू हभप श्री रामकृष्ण भावे महाराज यांनी उभारलेल्या धार्मिक चळवळीला म्हणजे मुंबई शहरातील अखंड हरीनाम सप्ताह सुरु करण्याला सन १९२३ मध्ये एकशे तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सद्गुरू भावे महाराज ट्रस्टची श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारात सुसज्ज धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य हभप रामदादा घाडगे यांच्या गुरुपदाखाली हभप कृष्णामास्तर घाडगे यांच्या मार्गदर्शनाने मंदिरात अनेक भाविक भक्त वर्षभर पारंपरिक धार्मिक कार्यक्रम पार पाडीत असतात. आषाढी एकादशीला मुंबईतील अनेक भजनी मंडळी तसेच दादर ते वरळी पर्यंतचे हजारो वारकरी तसेच शालेय विद्यार्थी वेशभूषा दिंड्या घेऊन या पुरातन मंदिरात देवाच्या दर्शनाला येत असतात.

बांद्रा –
सरकारी वसाहतीत १९७६ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिरात श्रीविठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती या काळ्या पाषाणातील तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती संगमरवरी स्वरूपात आहेत. संत मुक्ताबाईंची सुंदर तसबीर आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ‘संत मुक्ताबाई पुण्यतिथी समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह’ साजरा होत असतो. या मंदिरातील ४० वारकऱ्यांनी अनेक वर्षे ‘आळंदी ते पंढरपूर’ अशी पायी वारी केली आहे. आज ही वसाहत मोडकळीस आली आहे, बरेच भाविक भक्त विस्थापित झाले आहेत तरीही आषाढी एकादशीला निष्ठेने उत्सव धार्मिक पद्धतीने पार पाडीत आहेत.

सेंच्युरी मिल वसाहत हरीहर संत सेवा मंडळ –
वरळी येथील कामगार वसाहतीत प्रांगणात निवृत्ती महाराज समाधी पुण्यतिथी सोहाळ्यानिमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण १९६५ पासून आयोजित केले जाते. बिर्ला परिवार आणि रामप्रसादजी पोद्दार हे खरे या धार्मिक कार्यक्रमाचे आश्रयदाते होते. गिरणी कामगारांनी सुरु केलेल्या या सोहळ्यास वै हभप निवृत्ती महाराज देशमुख नागपूरकर यांनी व्यापक स्वरूप दिले. अकराशे अकरा वाचक बसविण्याचा संकल्प सोडला परंतु तो २१०० पर्यंत गेला. पारायणाचार्य वै पुंडलिक महाराज वेळूकर यांनी आयुष्यभर परायणाची धुरा वाहिली तर नानासाहेब कोठेकर यांनी कीर्तन संयोजनाची जबाबदारी सांभाळली. श्रीमद भगवद्गगीता पाठाची परंपरा हभप राणे गुरुजी यांनी तर भजन परंपरा भजनसम्राट वै हभप मारुतीबुवा बागडे यांनी केले. गेल्या ५९ वर्षात माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, वि.स.पागे यांनी व महाराष्ट्रातील उत्तमोत्तम नामवंत कीर्तनकारांनी हजेरी लावली आहे, गिरणी संपापर्यंत प्रतिष्ठा पावलेल्या या सप्ताहात श्रवणभक्तीसाठी हजारो भाविक आणि अभ्यासू हजेरी लावीत असत. रजनीकांत दीक्षित, मनोहर राणे, ललन गोपाळ शर्मा, दत्ताराम लांबतुरे आदी कार्यकर्त्यांनी आजही ही परंपरा टिकवून ठेवली आहे.

लोअर परेल –
येथील बारा चाळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर. श्रीक्षेत्र पंढरपूरला बडवे मंडळीकडून भाविकांना होणार त्रास आणि यात्रेच्या वेळी शासनाने सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १९६७ मध्ये जुन्नरचे कीर्तन केसरी गुरुवर्य रामदासबुवा मनसुख यांच्या नेतृत्वाखाली लढा सुरु होता. लोअर परेल येथील या मंदिरात भक्ती करणारे ज्ञानेश्वर मोरे माऊली हे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष होते. तरुण वयातील एक अभ्यासू वक्ते म्हणून त्यांचा परिचय वारकरी पंथातील झाला होता. परंतु ४ जानेवारी १९७३ त्यांचे निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी कोकणात १८ पारायणे करण्याचा संकल्प केला होता ते हयात असताना १४ पारायणे झाली उर्वरित ४ पारायणे त्यांच्या समाजातील अनुयायी यांनी केली. त्याच्यानंतर हभप कृष्णाजीराव शिंदे आणि पोपट बाबा ताजणे यांनीही संप्रदाय सांभाळण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सध्या गुरुवर्य अनंत दादामहाराज मोरे हे उच्च विद्याविभूषित संप्रदायाचे गुरुवर्य म्हणून धुरा सांभाळत आहेत. श्रीक्षेत्र आळंदी आणि पंढरपूरला धर्मशाळा असून लोअर परेल येथील वर्षभर नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम आणि अखंड हरिनाम सप्ताह होत असतात. आषाढी एकादशीला लोअर परेल मधील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात.

वरळी कोळीवाडा –
श्री शंकर मंदिर हे कोळी बांधवानी १८ ऑगस्ट १९०४ मध्ये बांधले. त्यानंतर १९२२ ला आळंदी निवासी गुरुवर्य तुकाराम महाराज कबीर त्याठिकाणी आले. आणि त्यांनी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात केली. साधारण १९२५ पासून याठिकाणी त्रयी सप्ताह (तीन आठवड्यांचा) अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली. तीन आठवडे सातत्येने चाललेला असा हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात इतरत्र कुठेही नाही. १९५३ पासून आजतागायत हैबतबाबा दिंडी क्रमांक १ रथाच्या पुढे आळंदी ते पंढरपूर अशी पायी दिंडी वारी या मंदिरातील भाविक भक्त निष्ठेने करीत आहेत. अगोदरच्या काळात बैलगाडीतून सामान घेऊन दिंडी निघत असे. मामासाहेब दांडेकर, नारायणदादा घाडगे, प्रमोद महाराज जगताप, केशवमहाराज कबीर यांच्यासह शेकडो मान्यवर कीर्तनकारांनी कीर्तने झाली आहेत. या मंदिरात आरतीसाठी १९०८ पासूनचा पुरातन ढोल आहे. आषाढी एकादशीनिमित्त कोळीवाड्यातील शेकडो भाविक भक्त देवदर्शनासाठी येत असतात. विलास वरळीकर हे सध्या अध्यक्ष आहेत.

सायन –
शीव म्हणजे आताच्या सायन फ्लायओव्हर जवळील श्री विठ्ठल मंदिर. श्रीधर दामोदर खरे हे १८६० साली मुंबईत आल्यानंतर सायन मध्ये स्थायिक झाले. ते एकदा पंढरपूरला वारीसाठी गेले असता त्यांनी धातूंची मूर्ती आणली, परंतु ती चोरीस गेली. त्यानंतर त्यांनी पाषाणाची मूर्ती घडवून घेतली. त्यावेळी त्याठिकाणी आगरी-कोळी लोकांची वस्ती मोठ्याप्रमाणे होती, त्यांनी एकत्र येऊन मंदिर बांधले आणि १८९३ मध्ये मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. पंढरपूरच्या रुक्मिणी मंदिरातील पुजारी पंढरीनाथ उत्पात यांना पुजारी म्हणून तर वासुदेव बळवंत सोमण यांच्या नेतृत्वाखाली मंदिराचा कारभार करण्यासाठी ट्रस्ट नियुक्त करण्यात आला. प्रत्येक सणानुसार या मंदिरातील मूर्तींना आभूषणे आणि वस्त्रालंकार घालण्यात येतात. आषाढी एकादशीला मंदिराला विलोभनीय सजावट करण्यात येते.

माहीम –
माहीम फाटक ते मोरी रोड या भागातील १९१६ सालचे प्रसिद्ध माहीम विठ्ठल-रखुमाई मंदिर. १९१४-१५ मध्ये माहीम इलाख्यात प्लेगची साथ पसरली होती. भयभयीत झालेले लोक एका तांत्रिक भगताकडे गेली तेव्हा त्याने सांगितले या बेटावर श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करा. तेव्हा १९१६ साली मंदिराचे निर्माण केले. आणि पंढरपूरला जाऊन काळ्या पाषाणाच्या मूर्ती आणल्या. तेव्हापासून आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक आणि भजनाचे कार्यक्रम हजारो गर्दीत होत असतात.

बांद्रे –
बाळाभाऊ तुपे यांनी संकल्पना मांडल्यानंतर नाभिक समाजाने ९ जानेवारी १९४० साली श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराची उभारणी केली. स्थानिक भाविकांच्या गर्दीत आषाढी एकादशी साजरी केली. अनेक दिंड्या येत असतात.

भायखळा –
भायखळा पश्चिमेला ना.म.जोशी मार्गावर हे श्री विठ्ठल रखुमाई मंदिर १२९ वर्षाचे हे पुरातन मंदिर आहे. मंदिरात नित्य भजन, पोथीवाचन, आरती, हरिपाठ होत असतात. प्रदीर्घ चाललेली अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा निष्ठेने पार पाडली जात आहे. आषाढी एकादशीला सातरस्त्यापासून भायखळ्यापर्यंत हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.

गोखले रोड दादर –
जीवनाचा सुरुवातीचा अधिक काळ अलिबाग येथे झाल्याने अलिबागकार हे आडनाव स्वीकारलेले परंतु मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गणपत ल गुडेकर यांनी आपल्या धार्मिक कार्याला प्रभादेवीतील गोखले रोड झंडू फार्मसी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात १९५२ पासून श्रीराम नवमी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात केली. गाथ्यावरील भजन, पोथी वाचन, एकादशीला कीर्तन हे तेव्हापासून नित्य होत असतात. १९६८ ला अलिबागकर महाराज यांचे निधन झाल्यानंतर गुरुवर्य हभप गोपाळबाबा वाजे यांनी धुरा सांभाळली. आणि पंढरपूर, आळंदी यासह महराष्ट्रात संप्रदाय पोहोचविला. श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कासार घाटाजवळ या वारकरी समाजाची धर्मशाळा असून विद्यमान गुरुवर्य म्हणून नारायण महाराज वाजे हे समाज चालवीत आहेत. आषाढी एकादशीला दादर सैतानचौकी, एल्फिस्टन परिसरातील शेकडो भक्त दर्शनाला येत असतात.

दादर पश्चिम –
डी.एल वैद्य रोड मठाच्या गल्लीत हे विठ्ठल मंदिर आहे. शिवाजी पार्क परिसरातील शेकडो भाविक भक्त याठिकाणी नेहमीच दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात नारदीय कीर्तन परंपरा राबविली जाते. या परंपरेचे शिक्षण आणि सादरीकरण विशेषतः महिलांचा सहभाग अधिक असतो. काही वर्षांपूर्वी अखिल भारतीय कीर्तन संस्थेचे महाराष्ट्र व्यापी कीर्तन संमेलन यांनी आयोजित केले होते. आषाढी एकादशीला दिवसभर भजने आणि कीर्तने होत असतात.

विशेष म्हणजे गेल्या शतकभरातील धर्मक्षेत्रांसह खेड्यापाड्यात वारकरी पंथ आणि संतांचा विवेकी विचार पोहोचविणारे शेकडो कीर्तनकार सर्वश्री गुरुवर्य मामासाहेब तथा सोनोपंत दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर, गुंडामहाराज, तात्यासाहेब वास्कर, शंकरमहाराज कंधारकर, रामचंद्र महाराज नागपूरकर, अमृतमहाराज नरखेडकर, बन्सीमहाराज तांबे, भानुदास महाराज देगलूरकर, किसनमहाराज साखरे, अर्जुनमामा साळुंखे, किसनदादा निगडीकर, मारुतीबाबा कुर्हेकर, जगन्नाथ महाराज पवार, रामदासबुवा मनसुख, हभप गहिनीनाथ औसेकर महाराज, माधवराव शास्त्री, गोपाळबुवा रिसबूड, भीमसिंग महाराज, चैतन्य महाराज देगलूरकर, बंडातात्या कराडकर, रामकृष्ण महाराज लहवितकर, ज्ञानेश्वर महाराज मोरे, महंत प्रमोद महाराज जगताप, रविदास महाराज शिरसाट, एकनाथमहाराज सदगीर, केशव महाराज उखळीकर, संदीपान महाराज शिंदे, बंडातात्या कराडकर, पांडुरंगबुवा घुले, बळवंत महाराज औटी, न्यायमूर्ती मदन गोसावी, अशोक महाराज सूर्यवंशी, बोडके बुवा, आनंददादा महाराज मोरे अशा शेकडो वारकरी सांप्रदायातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने-प्रवचने झाली आहेत. मुंबईकरांच्या या मंदिरात हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने आले आहेत.

गिरण्यांच्या भोंग्याबरोबर गिरणगाव जागा व्हायचा, कष्टकरी कामगार घामाने चिंब व्हायचा परंतु मराठी माणसाची संस्कृती टिकवण्यासाठी बेभान व्हायचा. फुलाजीबुवा नांगरे, हातिस्कर बुवा, वासुदेव (स्नेहल) भाटकर, शिवरामबुवा वरळीकर, मारुतीबुवा बागडे, खाशाबा कोकाटे, हरिभाऊ रिंगे, खाशाबा कोकाटे,, मारुतीबुवा बागडे, तुळशीरामबुवा दीक्षित, हरिबुवा रिंगे, किशनबुवा मुंगसे, भगवानबुवा निगडीकर, दामू अण्णा माळी, पांडुरंगबुवा रावडे, विठोबाबापू घाडगे, बाबुबुवा कळंबे, चंद्रकांत पांचाळ, विलासबुवा पाटील, परशुरामबुवा पांचाळ, रामचंद्रबुवा रिंगे या भजनी गायकांनी आणि राम मेस्त्री, गोविंदराव नलावडे, तुकाराम शेट्ये, मल्हारीबुवा भोईटे, सत्यवान माने, गणपतबुवा लेकावले, शंकर मेस्त्री, भाऊ पार्टे, विठोबा अण्णा घाडगे, राम घाडगे या पखवाज वादकांनी मुंबईकरांना रात्रभर जागविले होते. मिल ओनर्स असोशिएअशन प्रभादेवीच्या मफतलाल सभागृहात मिल कामगारांच्या भजन स्पर्धा घ्यायचे. ही स्पर्धा आणि काही नामवंत काळाच्या पडद्याआड गेले असले तरी नवोदित पिढी मागचा भजन परंपरेचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी तो चालविण्याचा प्रयत्न करीत आहे.

मंदिरात धार्मिक कार्याला जोडून घेतलेली पहिली पिढी गेल्या काही वर्षात निवृत्त होऊन मुंबईच्या उपनगरात किंवा गावी वास्तव्याला गेली आहे. काहींनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यामुळे ‘वारकरी प्रबोधन महासमितीचे’ संस्थापक अध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्त्री आणि सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष हभप राजाराम तथा नाना निकम हे दरवर्षी गिरणगावात दिंडी सोहळा काढीत असतात. परंतु भविष्यात उंच उंच टॉवरच्या भुलभुलैयात मुंबईतील मंदिराचा कळस आणि त्या ठिकाणचा चाललेला परमार्थ दिसेल काय? किंबहुना सुरुवातीच्या काळातला परमार्थ उभारी घेत पुन्हा उंची गाठणार आहे का या प्रश्नाचे उत्तर काळ देणार आहे.

संकलन –
रवींद्र मालुसरे
(अध्यक्ष)
मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई
भ्रमणध्वनी: ९३२३११७७०४

डोंबिवली शाखेची वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई..


संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

डोंबिवली वाहतूक उपविभागाअंतर्गत म्हसोबा चौक,९० फिट रोड, डोंबिवली पुर्व या ठिकाणी दिनांक २४/०६/२०२३ रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान मा. डॉ.श्री विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त, वाहतूकविभाग ठाणे शहर यांचे आदेशाने फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई करण्यात आली असून मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली.

विदाऊट हेल्मेट – ४९, विदाऊट सीट बेल्ट २२, जम्पिंग सिग्नल ०६, ब्लॅक स्क्रीन फिल्म ०१, ट्रिपल सीट ०४, फ्रंट सीट ०३, गणवेश न घालने ०३ व इतर ९४ अशा एकूण १८२ कसूरदार वाहनचालकावर कारवाई करून रुपये १,०३,१५०/- इतका दंड आकारण्यात आला असून त्यापैकी रूपये ७२,९००/- दंड जागीच रोख वसूल करण्यात आला आहे.

या कारवाई मध्ये डोंबिवली वाहतूक विभागाचे ०१ अधिकारी, ०९ पोलीस अंमलदार व ०८ वॉर्डन तसेच कोळसेवाडी वाहतूक उपविभागाचे ०२ अंमलदार, ०१ वॉर्डन व कल्याण वाहतूक उपविभागाचे ०२ पोलीस अंमलदार असे एकूण ०१ अधिकारी, १३ अंमलदार, ०९ वॉर्डन या कारवाई दरम्याम हजर होते. यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सीसीटिव्ही कॅमेराद्वारे वाहतूक विभागाकडून ई-चलन कारवाई सुरू करण्यात आली असून सर्वांनी मोटार वाहन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची माहिती देऊन जनजागृती करण्यात आली असे डोंबिवली वाहतूक उपविभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.