Home Blog Page 273

राज्यात कार्यान्वित झाले हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे ३८ पीएसए प्रकल्प – आरोग्यमंत्री राजेश टोपे

संपादक: मोइन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सध्याच्या कोरोना काळात राज्यात उद्भवलेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रयत्न केले आहेत. राज्यात जिल्हा रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणारी प्रणाली (पीएसए) बसविण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे ३८ पीएसए प्लांट कार्यान्वित झाले असून त्याद्वारे दिवसाला सुमारे ५३ मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती होत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १२५० मेट्रीक टन ऑक्सिजन राज्यात उत्पादीत असून त्याची मागणी १७५० मेट्रीक टन एवढी झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अन्य राज्यांमधून ऑक्सिजन आणतानाच स्थानिक पातळीवरच ऑक्सिजन निर्मिती व्हावी यासाठी हवेतून ऑक्सिजन शोषून तो रुग्णांना देणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारावर प्लांट सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

ऑक्सिजनच्या बाबतीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० पीएसए प्लांटसाठी ऑर्डर देण्यात आली आहे. राज्यात अशा प्रकारे ३५० प्लांट बसविण्याचे नियोजन असून त्याद्वारे ५०० मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात कार्यान्वित झालेले हे ३८ पीएसए प्रकल्प बुलढाणा, वाशीम, बीड, लोखंडी सावरगाव, हिंगोली, जालना, नांदेड, उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, गोंदिया, अहमदनगर, शिरपूर, भुसावळ, नंदूरबार, शहादा, सातारा, पुणे, बुलढाणा, चिखली, खामगाव येथील जिल्हा रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय, खासगी रुग्णालय याठिकाणी उभारण्यात आले आहेत.

वाशिम, सातारा, हिंगोली, अहमदनगर, भंडारा, अलिबाग, रत्नागिरी, बुलढाणा, उस्मानाबाद आणि सिंधुदूर्ग येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये केंद्र शासनाच्या मदतीने हवेतील ऑक्सिजन शोषून तो शुद्ध करून रुग्णांना पुरविणारे पीएसए प्लांट बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीमुळे जाणवणाऱ्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ह्या प्रकल्पातील ऑक्सिजनचा वापर हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

रेमडेसिवीर इंजेक्शन सरकारी शुल्कात गरीबांना उपलब्ध होणार – नितीन गडकरी

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

जेनेटीक लाईफ सायन्सेस परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी..

विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुरवठा..

वर्ध्याच्या जेनेटीक लाईफ सायन्सेसमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरू झाले आहे. ही आनंदाची बाब आहे. या औषधीकरिता अस्वस्थता असल्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. महाराष्ट्रात रेमडेसिवीरचं उत्पादन सुरू झाल्याने रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबेल. गरीबांना सरकारी शुल्कात रेमडेसिवीर उपलब्ध होईल. जेनेटीक लाईफ सायन्सेस अतिशय कमी वेळात भारत सरकारची परवानगी मिळणारी देशातील पहिली कंपनी असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

वर्ध्याच्या सेवाग्रामस्थित एमआयडीसी परिसरातील जेनेटीक लाईफ सायन्सेस कंपनीत रेमडेसिवीर उत्पादनाला सुरूवात झाली. येथे दररोज ३० हजार व्हायलची निर्मिती होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अल्पावधीत उत्पादनास परवानगी मिळवून दिली. आज ६ मे रोजी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ‘जेनेटीक लाईफ सायन्सेस’ कंपनीत उत्पादनाची पाहणी करीत आढावा घेतला.

यावेळी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे डॉ. महेंद्र क्षीरसागर, नगराध्यक्ष अतुल तराळे आदी उपस्थित होते.

गडकरी यांनी यावेळी उत्पादन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना, औषध उत्पादन डोळ्यांनी बघायला मिळाले असल्याचे सांगितले. याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात पहिल्यांदा करून महाराष्ट्रातदेखील सर्व ठिकाणी देण्याचा प्रयत्न राहील. त्यानंतर देशात इतरही ठिकाणी दिले जाईल. सगळं काही आम्हालाच मिळाले पाहिजे असा आग्रह नाही मात्र वर्धा जिल्ह्याला निश्चितच प्राथमिकता मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

इंजेक्शनकरीता अस्वस्थता होती. काही लोकांनी काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला. ती वेळ राहणार नाही. गोरगरीबांना सरकारने ठरवून दिलेल्या किमतीत इंजेक्शन उपलब्ध होईल, असेही गडकरी म्हणाले. वर्ध्यात उत्पादन सुरू करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. पण, जिद्दीने काम केले. देशातील, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी मदत केली. अन्न व औषधी प्रशासन विभागाने मदत केली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, स्वीय सहायक मांडलेकर यांनी परवानगी देण्यात मदत केली. अनेकांचे याकरीता सहकार्य मिळाले. हेट्रो या हैद्राबादच्या मल्टीनॅशनल कंपनीने जेनेटिक लाईफ सायन्सेसला सगळे मानक व प्रयोगशाळेतील उपकरणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. इंजेक्शन प्रत्यक्ष तयार होताना बघितले तेव्हा आनंद झाला असेही गडकरी म्हणाले.

वर्धा जिल्ह्यात ऑक्सिजनची कमी राहणार नाही…

वर्धा जिल्ह्यात ऑक्सिजनची कमी राहणार नाही. भिलाईवरून येणारे ट्रक येथे आणण्याबद्दलच्या सूचना दिल्या आहेत. २० टन सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयाला देण्यात येईल. उर्वरित देवळीला स्टोअर करण्यात येईल. सेवाग्राम आणि सावंगी येथे 20-20 टॅन क्षमतेचे ऑक्सिजनचे प्रकल्प लवकर उभे करण्यासाठी पाठपुरावा करू. सिलेंडरही वाढवू, असे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. विदर्भात व्हेंटीलेटर वाटलेत. बायपॅप आणि ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर पण आलेत. सांगाल तेवढे व्हेंटीलेटर द्यायला तयार आहे फक्त त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. सगळ्यांनी हिमतीने आता प्रतिकार केला पाहिजे. संकट मोठे आहे. परिस्थिती आव्हानात्मक आहे. तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे यावेळच्या अडचणी लक्षात घेऊन आपण पूर्णपणे तयार राहायला पाहिजे. एकाही माणसाचा मृत्यू ऑक्सिजन, औषधीविना होता काम नये, यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असे गडकरी म्हणाले.

५ हजार कोव्हॅक्सिन व ९ हजार कोव्हिशिल्ड चा लससाठा प्राप्त, तरीही गोंधळ कायम !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

लस उपलब्ध नसल्याने गेले पाच दिवस पहिल्या मात्रेसाठी डोंबिवली, कल्याण, नवी मुंबईत लसीकरण बंद होते. ते काही प्रमाणात लस उपलब्ध झाल्यानंतर दुपारनंतर सुरू झाले. मात्र ऐन वेळी लस आल्याची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. पालिकेच्या २८ केंद्रांवर लस दिली जात होती. डोंबिवलीत लसी अभावी ४५ वरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू होती तर नवी मुंबईत १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे, मात्र ते फक्त एकाच केंद्रावर सुरू असल्याने अनेकांची निराशा झाली आहे.

दिवसभरात अनेकदा प्रयत्न करूनही लसीकरणाची तारीख व वेळ मिळत नसल्याने डोंबिवली व नवी मुंबईकर त्रस्त आहेत. त्यात शहरात लशींचा तुटवडा असल्याने मागील चार दिवस लसीचा पहिला डोस देणे बंद होते. पालिकेच्या वाशी, नेरुळ, ऐरोली येथील रुग्णालयात कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा दिली जात होती. पहिल्या मात्रेसाठी येणाऱ्या नागरिकांना परत जावे लागत होते. महापालिकेला ५ हजार कोव्हॅक्सिन व ९ हजार कोव्हिशिल्डच्या लसकुप्या प्राप्त झाल्याने दुपारी १ नंतर लसीकरण सुरू झाले होते परंतु वाशी येथील कामगार विमा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र मिळालेला लससाठाही कमी असल्याने लसीकरण किती दिवस सुरू राहील हे पालिका प्रशासनालाही सांगता येत नाही. लसीकरणाचे दैनंदिन चित्र बदलत असल्याने नागरिकांमध्ये अद्याप गोंधळ आहे.

गृहमंत्रालयाचे राज्यांना आदेश; रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या आगींच्या घटनांसंदर्भात नियमावली तयार करा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोणत्याही खासगी अथवा सरकारी रुग्णालयाला विशेषतः कोरोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयाला आग लागण्याच्या घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेण्याचे आणि त्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश गृहमंत्रालयाने राज्यांना दिले आहेत. गेल्या काही दिवसात, देशातल्या काही राज्यांमधल्या काही रुग्णालयांना आग लागल्याच्या घटना घडल्याने आता गृहमंत्रालयाला जाग आली आहे. याबद्दल एक निवेदन गृहमंत्रालयाने दिलं आहे. यात म्हटलं आहे, राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासकांशी चर्चा केल्यानंतर केंद्रिय गृहसचिव यांनी हे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत आग लागलेल्या घटना पाहता, तसंच उन्हाळ्याच्या दिवसात वाढणारं तापमान लक्षात घेता हे समोर येत आहे की, वाढत्या तापमानामुळे, देखभालीच्या अभावामुळे किंवा काही यंत्रांवर ताण आल्याने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याच्या घटना घडत आहेत. ज्यामुळे माणसांचे जीव जात आहेत, तसंच अत्यावश्यक साधनसामुग्रीचंही नुकसान होत आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन रुग्णालयांचं आगीपासून संरक्षण करण्यासाठीचा सुनियोजित आराखडा तयार करण्याचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश देण्यात आले आहेत.

राज्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्यांना वेळोवेळी रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणेची, तसंच इतर उपयुक्त यंत्रणांची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत, असं सांगण्यात आलं आहे. अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृहरक्षक विभागाच्या महासंचालकांनी जारी केलेल्या नियमावलीचाही उल्लेख गृहमंत्रालयाने केला आहे.

मोदींनी ३७० कलम हटवताना जी हिंमत दाखवली ती मराठा आरक्षणासाठीही दाखवावी : उद्धव ठाकरे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा समाजाचे आरक्षण घटनाबाह्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दि.०५ रोजी दिला. मराठा आरक्षण विषय राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल तमाम मराठा बांधवांसाठी धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायलयाने नेमकं काय म्हंटलं?

राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. मराठा आरक्षणाच्या लढाईत निराशाजनक निर्णय आला आहे. त्यानंतरही मराठा समाजाने संमजस्यपणा दाखवल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजीराजे यांनीही संयम दाखवला. ते म्हणाले की, ज्या वकीलांनी उच्च न्यायालयात विजय मिऴवून दिला त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात केस लढली. निकालावर अभ्यास केला जात आहे.

केंद्राला ‘सर्वोच्च’ दिलासा! दिल्लीत ‘मुंबई मॉडेल’ राबवण्याचा दिला सल्ला

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा आरक्षणाची लढाई संपलेली नाही. न्यायालयाने मार्ग दाखवून दिला आहे. न्यायालयाने आरक्षण कायदे करण्याचे अधिकार राज्याला नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी हा अधिकार पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कलम ३७० हटवताना जी हिंमत दाखवली तशीच हिंमत मराठा आरक्षणासाठीही दाखवावी आणि मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्यावा. यासाठी उद्या पीएम मोदींना पत्र लिहिणार आहे.

*मराठा आरक्षण : ९ सप्टेंबर २०२० पर्यंतचे प्रवेश वैध*
आपल्याला हक्क आपल्याला मिळवून देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हाती आल्यानंतर आम्ही अभ्यास करत आहोत. यासाठी ज्येष्ठ विधीज्ञांची समिती नव्हे फौज नेमली असल्याचे ते म्हणाले.

दुसरीकडे मराठा समाजाच्या मागास स्थितीबद्दल अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गायकवाड समितीचा अहवाल स्वीकाराहार्य नसल्याचे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. दरम्यान आरक्षण धोरणानुसार ९ सप्टेंबर २०२० पर्यंत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते, ते वैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री कोरोना परिस्थितीवर बोलताना म्हणाले की कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचे केलेल्या प्रयत्नांचे न्यायालयाने कौतुक केले आहे. महाराष्ट्रातील रुग्णवाढ मंदावली आहे. देशातील प्रमुख शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे गाफील राहुन चालणार नाही. केंद्राकडे २०० कोटी मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली आहे. लसपुरवठा वाढला की लसीकरणाला वेग येईल.३ हजार टन मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचा मानस असून दररोज १७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरु केली गेली असून काही दिवसात ऑक्सिजनमध्ये महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार.