Home Blog Page 275

भाजप नगरसेविका मेघना रावलच्या हॉटेलमध्ये चालत होता वेश्या व्यवसाय! पोलिसांनी धाड टाकून पाच मुलींची केली सुटका!

संपादक: मोईन सय्यद / मिरा भाईंदर, प्रतिनिधी:

मिरा भाईंदर शहरातील प्रभागच्या भाजप नगरसेविका मेघना रावल यांच्या मालकीच्या ‘द मेरियाड’ या हॉटेलमध्ये शहरात कडक लॉकडाउन असून देखील राजरोसपणे वेश्या व्यवसाय चालू होता. पोलिसांनी या हॉटेलवर धाड टाकून पाच मुलींची सुटका केली आहे. लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली भाजप नागरसेविका मेघना रावल यांच्या मालकीचे असलेले ‘द मेरियाड’ या हॉटेलमध्ये चक्क कुंटणखाना चालवला जात असून दलाला मार्फत टिव्ही मालिकांत काम करणाऱ्या मुलीं पासून ते मॉडेलिंग करणाऱ्या मुली याच हॉटेलमध्ये ग्राहकांना पुरविल्या जात असल्याची माहिती परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. माहितीची खात्री केल्या नंतर अमित काळे यांच्या पथकाने या हॉटेलवर धाड टाकून पाच मुलींची सुटका केली आहे.

पोलिसांनी सुटका केलेल्या मुली भोजपुरी चित्रपटात काम करायच्या तर काही मुलींनी टिव्ही मालिकांत देखील काम केले आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाउन झाल्यामुळे चित्रपट सृष्टीची कामे बंद पडल्याने या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही दलालांनी चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले असून पोटाची खळगी भरण्यासाठी नाईलाजाने या मुलींवर वेश्या व्यवसाय करण्याची पाळी आली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी धाड टाकून रामरतन कारवा (30) आणि परबत मानचामरिया (42) या दोन दलालांना अटक केली आहे.

गेल्या काही वर्षांत मिरा भाईंदर शहरातील लॉजिंग बोर्डिंगच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, जुगाराचे अड्डे, डान्सबार अशा अनेक अनैतिक व्यवसायात भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे समोर आल्याने पक्षाची प्रतिमा खूपच डागाळलेली असून ‘पार्टी विथ डिफरेन्स’ म्हणून नैतिकतेचा आव आणणाऱ्या भाजपचा पुन्हा एकदा खरा चेहरा लोकांसमोर आला असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून केली जात आहे.

गेल्या दोन महिन्या पासून शहरात संपूर्ण लॉकडाउन लागले असून सर्व हॉटेल बियरबार, लॉजिंग बोर्डिंग बंद असताना देखील भाजप नागरेविकेच्या या हॉटेलमध्ये मात्र राजरोसपणे वेश्या व्यवसाय कसा काय चालू होता? या बद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याची देखील या हॉटेलमध्ये भागीदारी असल्याचे बोलले जात असून त्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादानेच या हॉटेलमध्ये असे अनैतिक कार्य केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना पदोन्नती..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

राज्यातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांसोबत बढती देण्यात आली आहे. या बदल्यामध्ये ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिश्नोई आणि अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती अभियान के. वेंकटेशम यांचं नाव आहे.

विवेक फणसळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई येथे वर्णी लावण्यात आली आहे. तर के.वेंकटेशम यांची संचालक, नागरी संरक्षण आणि संदीप बिश्नोई यांची महासंचालक (न्यायिक व तांत्रिक) विभाग येथे पदोन्नती झाली आहे.

सोन्याचे दागिने गहाण ठेवून फसवणूक करणारी टोळी अटक.

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

भिवंडी येथील शांती नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोन्याचे दागिने गहाण ठेवून फसवणूक करणाऱ्या टोळीला शांतीनगर पोलीस ठाणे, भिवंडी यांनी अटक केली आहे.

याबाबत मिळालेले वृत्त असे आहे कि, एका महिलेने फिर्यादी यांचे अंदाजे साडे सहा तोळे वजनाचे एकूण ९०,०००/- रुपयांचे सोन्याचे दागिने ६ महिन्यात परत देतो असे सांगून ते ठरलेल्या वेळेत परत न देता स्वतःकडे ठेऊन फिर्यादी यांच्या दागिन्यांचा अपहार केला असल्याबाबत तसेच फिर्यादी यांच्यासह इतर महिलांचे देखील दागीने आणि रोख रक्कम १ तोळे सोन्याच्या बदल्यात १५०० रु. व १,००,०००/- रुपयांवर १०,०००/- प्रती महिना व्याज अशा वेगवेगळ्या स्कीम सांगून ठेऊन घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर गुन्ह्यातील महिला आरोपीसह तिच्या सात साथीदारांना अटक केली. अटक आरोपींनी भिवंडी शहरातील एकूण २६५ लोकांची वरील प्रमाणे फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

सदर प्रकरणी पोलिसांनी एकूण २४०६. ७ ग्रॅम वजनाचे ७३,५४,३२०/- रु. किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत व पुढील तपास सुरू आहे असे शांतीनगर पोलीस यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

५ मे च्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात आठ दिवसांचा संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दि. ३ मे २०२१ रोजी १ हजार ५६८ वर पोहोचली असून ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात ५ मे रोजीच्या मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे. प्रशासनाची चर्चा करून सांगली जिल्ह्यात ५ मे रोजी मध्यरात्रीपासून ८ दिवसांचा संपूर्ण कडकडीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

सांगली जिल्ह्याला ऑक्सिजन काठावर मिळतोय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावे लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत, म्हणून कोरोनाची शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे सद्यस्थितीत गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी हा संपूर्ण लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती पालकमंत्री पाटील यांनी केली आहे.

तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षित रहा, असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.

पालकमंत्री जयंत पाटील हे १ मे पासून जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहेत व कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती, रुग्णसंख्या, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या सर्व गोष्टींचा आढावा घेत आहेत. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आणि अन्य भागात कोरोनाची परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणीही सलग दोन दिवस बैठक घेत कोरोना नियंत्रण आणण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशही पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.

राजकारणी, अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर वाहने; आठ वर्षांसाठी पालिकेकडून एक कोटी ६२ लाख रुपये खर्च

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत

कोरोनामुळे खर्च जास्त आणि त्याच्या तुलनेने उत्पन्नात घट अशी परिस्थिती असताना मुंबई महापालिकेच्या प्रशासनाने अधिकाऱ्यांना गाड्या देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्याची हालचाल सुरू केली आहे.
शासन पुरस्कृत कंपनीकडून भाडेकरारावर गाड्या घेण्यासाठी निविदा मागविण्याची अट शिथिल करण्यासाठी स्थायी समितीची परवानगी मिळविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांच्यासह वैधानिक, विशेष समित्या आणि प्रभाग समिती अध्यक्षांना मोटरगाडी देण्यात येते. मात्र ही वाहने वारंवार बंद पडत असल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत होती. या प्रकाराचे पडसाद स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले होते. स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या वादळी चर्चेनंतर प्रशासनाने अतिमहत्त्वाचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी भाडेतत्त्वावर पाच टाटा नेक्सॉन इवी एक्स झेड प्लस विद्युत वाहने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांवर पालिकेचा जवळपास दुप्पट खर्च होणार आहे. एका गाडीचे वस्तू आणि सेवा करासह आठ वर्षांचे भाडे ३२ लाख ४८ हजार ६३२ रुपये इतके होणार आहे.

पालिकेला आठ वर्षांसाठी पाच गाड्यांपोटी एक कोटी ६२ लाख ४३ हजार १६४ रुपये मोजावे लागणार आहेत. शासन पुरस्कृत ई.ई.एल.एस कंपनीकडून ही वाहने भाडेतत्त्वावर घेता यावीत यासाठी निविदा मागविण्याची अट शिथिल करण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला आहे. या प्रस्तावावर स्थायी समितीच्या बुधवारच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. स्थायी समिती कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.